महिलांना पुरुषांपेक्षा जास्त रडू का येतं? अश्रूंमागचं नेमकं विज्ञान काय?

आपण दु:ख झाल्यावर, भावनांनी भारावून गेल्यावर, रागावल्यावर किंवा अगदी आनंद झाल्यावरही रडत असतो. भावनिक झाल्यामुळं अश्रू ढाळणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

अनेक प्राणी लहानपणी त्यांना खूप त्रास होत असल्यास ते लक्षात आणून देण्यासाठी मोठ्यानं ओरडतात.

मात्र गुंतागुतींच्या भावनांना प्रतिसाद देताना अश्रू येण्यासाठी आवश्यक असलेली रचना किंवा मज्जामार्ग त्यांच्या मेंदूमध्ये दिसत नाही.

अश्रूंची शरीरात निर्मिती कशी होते, त्यामुळे शरीरात काय होतं, हे वैज्ञानिकांना माहिती आहे.

मात्र माणूस का रडतो आणि भावनांमुळे अश्रू येण्यामागे काय कारण असतं, हे अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही.

अश्रू म्हणजे काय?

"अश्रू पाच घटकांनी बनलेले असतात. ते म्हणजे, श्लेष्मा (चिकट पदार्थ), इलेक्ट्रोलाइट्स, पाणी, प्रोटीन आणि लिपिड", असं डॉ. मेरी बॅनियर-हेलाउएट म्हणतात.

डॉ. मेरी या स्वित्झर्लंडमधील इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बायोलॉजीमध्ये पोस्टडॉक्टरल फेलो आहेत.

त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'क्राउडसायन्स' या कार्यक्रमात सांगितलं की, या सर्व घटकांचे वेगवेगळे गुणधर्म असतात. उदाहरणार्थ, प्रोटीन अँटीव्हायरल आणि अँटीबँक्टेरियल असतात. तर इलेक्ट्रोलाइट्स हे शरीराच्या क्रियांसाठी आवश्यक असलेली खनिजं असतात.

विशेष म्हणजे अश्रूंचेही प्रकार असतात. अश्रू तीन प्रकारचे असतात.

ते म्हणजे, बेसल टियर्स, रिफ्लेक्स टियर्स आणि इमोशनल टियर्स.

संशोधक म्हणतात, "बेसल अश्रू हे तुमच्या डोळ्याच्या पृष्ठभागावर नेहमीच असतात, ते तुमच्या डोळ्यांना ओलसर ठेवतात किंवा डोळ्यांसाठी वंगणाचं काम करतात."

जेव्हा एखादा कीटक किंवा धूळ यासारखा त्रासदायक पदार्थ डोळ्यात जातो, तेव्हा रिफ्लेक्स टियर्स स्त्रवतात.

डोळ्यांना होणारा हा त्रास डोळ्याच्या कॉर्नियामधील मज्जापेशींद्वारे जाणवतो किंवा लक्षात घेतला जातो. कॉर्निया म्हणजे डोळ्यातील पारदर्शक, घुमटाच्या आकाराचा बाह्य थर, जो जंतू आणि कचऱ्यापासून सरंक्षण करण्याचं काम करतो.

संपूर्ण शरीरात या भागात मज्जापेशींची घनता सर्वाधिक असते. या पेशी तापमान, यांत्रिक ताण आणि कोरडेपणा ओळखू शकतात, असं बॅनियर-हेलाउएट म्हणतात.

मज्जापेशींकडून आलेले संदेश मेंदूपर्यंत पोहोचतात. ते मेंदूच्या ज्या भागात पोहोचतात त्याला लॅक्रिमल न्युक्लियस म्हणतात.

मेंदूचा हा भाग अश्रूंवर नियंत्रण ठेवतो. या भागापर्यंत संदेश आल्यावर तो अश्रूच्या ग्रंथींना अश्रूंचं उत्पादन वाढवण्याचा संदेश देतो.

भावनांमुळे येणारे अश्रू

इमोशनल टियर्स किंवा भावनिक अश्रू या तिसऱ्या प्रकारात गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात.

भावना हाताळणारे किंवा भावनांशी संबंधित प्रक्रिया करणारे मेंदूतील भागदेखील लॅक्रिमल न्यूक्लियसशी संवाद साधतात. मात्र हे साध्या संरक्षक प्रतिक्रियेपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या मार्गांनी होतं.

ॲड विंगरहोएट्स, नेदरलँड्समधील टिलबर्ग विद्यापीठात क्लिनिकल सायकॉलॉजीचे (उपचारात्मक मानसशास्त्र) एमेरिटस किंवा मानद प्राध्यापक आहेत. विंगरहोएट्स यांच्या मते, अनेकदा रडणं हे एकाच भावनेऐवजी भावनिक भार किंवा एकाच वेळी खूप भावना असण्याचं प्रतिबिंब असतं.

ते म्हणतात, "भावना क्वचितच शुद्ध स्वरुपात आढळतात. अनेकदा त्या वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण किंवा त्यात वेगानं होणारे बदल असतात."

ते असंही म्हणतात की आपल्या वयानुसार भावनिकपणे रडण्यामागची कारणं बदलतात. लहान मुलांसाठी शारीरिक वेदना हे रडण्यामागचं मुख्य कारण असतं. मात्र प्रौढ आणि वृद्धांमध्ये ते कमी असतं.

आपण जसजसे मोठे होतो, तसतसं रडण्याचा अधिकाधिक संबंध सह-अनुभूतीशी (एम्पथी) असतो. म्हणजेच "फक्त स्वत:च्या दु:खाबद्दलच नाही, तर इतरांच्या दु:ख आणि वेदनांबाबतही" रडणं.

विंगरहोएट्स नमूद करतात की सकारात्मक भावनांमुळे देखील - उदाहरणार्थ कला किंवा निसर्गसौंदर्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना - अश्रू येऊ शकतात.

मग माणसं का रडतात, त्याचा काय उपयोग?

अनेकजण रडल्यानंतर बरं वाटतं, आराम पडतो, असं सांगतात. मात्र हा परिणाम खरा असतो की नाही, यावर विज्ञानाच्या पातळीवर चर्चा सुरू आहे.

लॉरेन बिलस्मा, मानसशास्त्रज्ञ (क्लिनिकल सायकॉलिस्ट) आणि अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत.

रडल्यामुळे आपल्याला बरं वाटतं की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या ह्रदयाच्या गतीचे सेन्सर्स वापरत आहेत.

इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपल्या ह्रदयाची लय आणि गती किंवा ठोके नोंदवतात. त्यातून आपल्याला, आपली मज्जासंस्था कशाप्रकारे काम करत आहे, याची थोडी कल्पना येते.

त्यांच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या निष्कर्षांमधून असं दिसतं की आपण रडायला सुरुवात करण्याच्या अगदी आधी, आपल्या सिंपॅथेटिक नर्व्हस सिस्टममधील क्रिया शिगेला पोहोचलेल्या असू शकतात.

ही व्यवस्था आपल्या 'लढण्याच्या किंवा पळण्याच्या' प्रतिसादासाठी जबाबदार असते.

सिंपॅथेटिक नर्व्हस सिस्टम म्हणजे तणावग्रस्त किंवा धोकादायक परिस्थितीसाठी आपल्या शरीराला सज्ज करणारी मज्जासंस्था.

त्या पुढे म्हणतात की "आणि मग रडायला सुरुवात केल्यानंतर लगेचच, आपल्याला पॅरासिंपॅथेटिक क्रियेमध्ये वाढ झालेली दिसते." ही मज्जासंस्थेची अशी शाखा असते जी आपल्याला शांत होण्यास आणि निवांत होण्यास मदत करते.

मात्र विंगरहोएट्स म्हणतात की रडल्यामुळे आपल्याला नेहमीच बरं वाटत नाही. विशेषकरून जर आपल्याला नैराश्य आलेलं असेल किंवा थकवा आलेला असेल तर तसं होत नाही.

तसंच आपण कोणत्या कारणानं रडत आहोत यावरही ते अवलंबून असतं.

"आपण जेव्हा नियंत्रणात आणता येण्यासारख्या परिस्थितींबाबत रडतो, तेव्हाच आपल्या मन:स्थितीत सुधारणा झाल्याचं दिसतं. मात्र जेव्हा आपण नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितींवर रडतो, तेव्हा तसं दिसून येत नाही," असं ते म्हणतात.

आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांमुळंही देखील फरक पडू शकतो.

"तुमच्या रडण्याबाबत त्यांनी समजून घेत प्रतिक्रिया दिली आणि तुम्हाला धीर दिला, तुमचं सांत्वन केलं, तर तुम्हाला बरं वाटतं. मात्र जर त्यांनी तुमची चेष्टा केली, टर उडवली किंवा ते रागावले किंवा तुम्हाला त्याची लाज वाटली, तर मग रडण्यातून आपल्याला कोणताही आराम मिळणार नाही किंवा बरं वाटणार नाही," असं ते म्हणाले.

सामाजिक संकेत

आपल्या रडण्याचा इतरजण आपल्याशी कसं वागतात, त्याच्यावर परिणाम होतो, याचे काही पुरावे आहेत.

इस्रायलमध्ये एका प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासातून असं आढळून आलं की, ज्या पुरुषांनी महिलांच्या भावनिक अश्रूंचा वास घेतला ते ज्या पुरुषांनी खारट किंवा क्षारयुक्त द्रावणाचा वास घेतलेल्या पुरुषांपेक्षा कमी आक्रमक होते.

संशोधक यावर सहमत आहेत की अश्रू हे एखाद्या सामाजिक संकेतासारखं काम करतात.

त्यातून असं दिसतं की आपल्याला मदतीची आवश्यकता आहे आणि त्यातून इतर लोकांची मदत करण्याची इच्छा वाढते.

काही अभ्यासातून असं दिसून येतं की भावनिक अश्रूंमुळे आपण अधिक विश्वासार्ह वाटू शकतो.

याच गोष्टीमुळे आपल्या पूर्वजांना एकमेकांना सहकार्य करता आलं असावं आणि एकमेकांना आधार देण्यास मदत झाली असावी.

बाळांच्या रडण्याचा मुद्दा येतो, तेव्हा त्याबद्दल असे पुरावे आहेत की प्रौढांच्या मेंदूतील ज्या भागांमध्ये काळजी घेण्याची प्रतिक्रिया निर्माण होते, बाळाच्या रडण्यामुळे मेंदूच्या त्या भागांमधील जाळं सक्रिय होऊ शकतं.

विंगरहोएट्स यांना वाटतं की, मानवी अश्रूंमध्ये कदाचित उक्रांती झाली असावी, कारण मानवाचं बालपण प्रदीर्घ काळ असतं. या काळात आपण आपल्या पालकांवर अवलंबून असतो.

ते पुढे म्हणतात, यासंदर्भात एक कल्पना अशी आहे की बाळाच्या अश्रूंमुळे प्रौढांमधील आक्रमकता कमी होण्यास मदत होऊ शकते. कारण मोठ्यानं रडणं "खूप त्रासदायक, चीड आणणारं असतं. त्यामुळे आपण आक्रमक होऊ शकतो."

"बाळाच्या बाबतीत तो स्व-संरक्षण करण्याचा एक प्रकार म्हणून ही बाब अगदी योग्य वाटते. ही गोष्ट मला खूप रंजक, उत्सुकता निर्माण करणारी वाटते," असं ते म्हणतात.

काहीजण जास्त का रडतात?

बिलस्मा यांच्या मते, पुरुष सरासरी महिन्यातून शून्य ते एक वेळा रडतात. तर महिला चार ते पाच वेळा रडतात.

हे अनुभवातून, निरीक्षणातून आलेलं किंवा शिकलेलं वर्तन असू शकतं. मात्र मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आपल्याला हे सर्व संस्कृतींमध्ये दिसून देतं. त्यामधून दिसतं की हेच संपूर्ण चित्र नाही किंवा हेच कारण त्यामागे नाही.

"सर्वसामान्यपणे महिला भावनिकदृष्ट्या अधिक प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या किंवा भावना अधिक व्यक्त करणाऱ्या असतात. मला वाटतं की रडण्यातून त्याबाबत फक्त एक फरक प्रकट होतो. यामागे मज्जासंस्थेतील फरक, हार्मोनमधील फरक, व्यक्तिमत्वातील फरक असू शकतात," असं त्या म्हणतात.

बिलस्मा म्हणतात की मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या हार्मोनमधील बदलांचा आपण किती रडतो यावर परिणाम होतो, हे दाखवणारा सध्या कोणताही ठोसा पुरावा नाही. मात्र लिंगामधील फरक आणि गर्भधारणा आणि वाढतं वय यासारख्या गोष्टींमुळे हार्मोन्सची त्यात भूमिका असते, अशी शंका त्यांना वाटते.

व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्यांच्या परिणामांवरदेखील त्यांनी संशोधन केलं आहे. त्यातून त्यांना आढळलं आहे की रडण्याचा संबंध विशेषकरून न्युरोटिक किंवा बहिर्मुख असल्याचं दिसतं.

"न्युरोटिसिझमचा संबंध नैराश्य आणि चिंतेशी आहे. त्यामुळेच आपल्याला तिथे तो संबंध कदाचित दिसत असावा," असं त्या म्हणतात.

"आम्हाला असंही आढळलं की ज्या लोकांमध्ये अधिक सह-अनुभूती (एम्पथी) होती, ते रडण्याची अधिक शक्यता होती. कारण, कदाचित ते इतर लोकांना दु:खात, अडचणीत असल्याचं पाहिल्यावर त्यासंदर्भातील प्रतिक्रिया म्हणून रडतात," असं त्या पुढे म्हणतात.

शेवटी, रडणं हे सामाजिक संबंधांशी निगडीत असल्याचं दिसतं.

विंगरहोएट्स म्हणतात त्याप्रमाणे, "असं दिसतं की रडणं हे जणूकाही एखाद्या उद्गारवाचक चिन्हाप्रमाणे काम करतं. त्यातून तुम्हाला या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव होऊ शकते."

(बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील 'क्राउडसायन्स' या कार्यक्रमातील एका भागावर आधारित.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.