You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोज चालण्याचे 'हे' आहेत 10 फायदे
- Author, केरी टॉरेन्स
- Role, आहारतज्ज्ञ
चालणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ती फुकट आहे. ती कधीही कुठेही करता येते. अगदी वर्षानुवर्षं तुमच्या जगण्याचा ती भाग होऊ शकते.
तुम्हाला जर पायांची काही समस्या असेल किंवा तुम्ही अशक्त असाल तर गोष्ट वेगळी, नाहीतर चालण्यासारखा योग्य व्यायाम नाही.
चालणं ही एक एरोबिक क्रिया आहे. त्यात शरीराच्या खालच्या भागातल्या स्नायूंचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्याचे फायदे जास्त आणि तोटे कमी आहेत.
नेहमीपेक्षा वेगाने आणि जास्त अंतर चालल्याचे अनेक फायदे आहेत.
चालण्याचे दहा फायदे या लेखाच्या माध्यमातून पाहू या.
1. हृदयासाठी चांगलं
चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
वेगाने चालल्यास हृदय आणि श्वसन क्रियेत फायदा होतो.
जर तुम्हाला चिंता किंवा डिप्रेशन असेल तर चालण्याचा आणखी फायदा होतो.
2. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
शरीराचं वजन घेऊन आपण दिवसभर चालतो. त्यामुळे शरीरातील हाडांची शक्ती वाढते. त्यामुळे हाडं लवकर ठिसूळ होत नाहीत.
3.स्नायू बळकट होतात.
रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात. विशेषत: पाय, बोटं, कंबर, यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं.
चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते. चालण्यामुळे शरीराचा बाक चांगला राहतो.
4. कॅलरी कमी होतात
वजन कमी करण्यासाठी चालणं हा अतिशय उत्तम उपाय आहे. कोणत्याही वेळेला कितीही वेगाने चाललं तरी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे वजन कमी होतं.
सकाळी सकाळी चाललं तर दिवसभराच्या भुकेवरही नियंत्रण राहतं.
5. इन्सुलिनवर नियंत्रण
अनेक अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की चालण्यामुळे साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे फॅट साचत नाहीत. कारण त्याचा थेट संबंध हृदयरोग, डायबिटिस आणि यकृताच्या विकारांशी असतो.
इन्सुलिन आपल्या शरीराला कसा प्रतिसाद देतो हे चालण्यामुळे आणखी सुधारतं.
6. म्हातारपण लांबतं किंवा आयुर्मान वाढतं
चालण्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं. चालण्यामुळे आयुष्याची 16-20 वर्षं वाढतात. जास्तीत जास्त चाललं की लवकरात लवकरात मृत्यू येण्याचा धोका कमी होत जातो.
7.चिंता आणि काळजी मिटते
चालण्यामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते आणि सामाजिक पातळीवरही त्याचे फायदे होतात. डिप्रेशन असेल तर चालणं हे अँटी डिप्रेसंट म्हणून काम करतं.
नियमित चालण्यामुळे आयुष्याला एक शिस्त, एक उद्दिष्ट मिळतं. मूडही चांगला राहतो. एका विशिष्ट लयीत चालल्यास दीर्घकाळासाठी मानसिक आरोग्य चांगलं राहतं.
8. 'व्हिटामिन डी'च्या पातळीत सुधारणा
मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे व्हिटामिन डीच्या पातळीत सुधारणा होते. याचं कारण असं की सूर्यप्रकाश त्वचेवर पडून व्हिटामिन डीची निर्मिती होते.
पण इथे एक काळजी घेतली पाहजे. व्हिटामिनची कमतरता असेल तर स्नायुंची शक्ती कमी होते. त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते.
9. रोगप्रतिकारकशक्ती वाढते
एखाद्या धरणाच्या बाजूला चालायला गेलं तर IgA हे प्रतिपिंड सुधारण्यास मदत होते. यामुळे तोंडाचं आरोग्य सुधारतं, लाळ तयार होण्यास मदत होते. तसंच नाक, अन्ननलिका यांचं आरोग्य सुधारतं. रोगप्रतिकारक शक्ती आणि फुप्फुसांचं कार्य सुधारतं.
10. आतड्यांचं आरोग्य सुधारतं
वेगाने चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे आतड्यातल्या जीवाणूंवरही परिणाम होतो. पचनशक्ती, प्रतिकारकशक्ती वाढते.
चालण्यासाठी काही वेगळी उपकरणं लागतील का?
ज्या ठिकाणी चालायला जायचं त्या भागात योग्य प्रकारे चालण्यासाठी फक्त चांगल्या बुटांची आवश्यकता असते. तसंच योग्य प्रकारचे कपडेही लागतात.
म्हातारवयात असलेल्या तीन पैकी एक माणूस पडण्याची घटना घडते. त्यामुळे शरीराचं संतुलन ठेवणं हे एक नेहमीचं आव्हान असतं.
त्यामुळे योग्य कपडे आणि योग्य बूट परिधान करावेत.
एखाद्या ट्रेकिंगला जायचं असेल, तरी हे आवश्यक आहे. चांगले बूट घातले की कंबरेवर येणारा ताण कमी होतो. तसंच गुडघ्यावर आणि घोट्यावर येणारा ताणही कमी होतो.
मी चालण्याचा सराव कसा सुरू करू शकतो?
चालण्याची सुरुवात कधीही आणि कशीही सुरू करू शकतो. चालण्याचा वेग, क्षमता आपण कमी जास्त करू शकतो.
चालण्याने जखमा किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी असते. जर तुमची जीवनशैली बैठी असेल, फारशी शारीरिक हालचाल करत नसाल तर चालणं हा उत्तम व्यायाम आहे. त्यासाठी आधी हळूहळू आणि त्यानंतर थोडा वेग वाढवावा. 30 मिनिट 6.4 किमी प्रतितास या वेगाने चाललं तर त्याचा फायदा होतो.
एखादा चालणाऱ्यांचा ग्रुपमध्ये गेलात तर सतत प्रेरणा मिळत राहील, नवीन मित्रमैत्रिणी तयार होतील आणि नवीन जागाही बघायला मिळतील.
चालण्याचा व्यायाम करताना काय काळजी घ्यावी?
सगळ्या व्यायामांसारखे चालण्याचे काही तोटेसुद्धा आहेत. हे तुम्ही कुठे चालता यावर अवलंबून असतंच, पण त्यात रस्ते सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षा आणि हवेच्या दर्जाचा समावेश होतो. खालील टिप्स फॉलो करा आणि तुमच्या चालण्याचा अधिकाधिक आनंद घ्या.
- तुम्ही चालायला जाणार असाल तर कोणालातरी सांगून जा.
- तुम्ही रात्रीही लोकांना स्पष्ट दिसाल असे कपडे घाला.
- सोबत मोबाईल फोन ठेवा.
- ट्रॅफिक नसेल असा रस्ता बघा.
- ट्रॅफिकच्या नियमांचं योग्य पालन करा.
चालण्याची काही निश्चित वेळ असते का?
जी तुम्हाला वाटते तीच खरी चालण्याची वेळ असते. तुम्ही चालण्याचं निश्चित केलं की, तुमच्या जगण्याचा एक भाग होतो.
नुकत्याच झालेल्या काही संशोधनानुसार, जर तुम्ही स्त्री असाल आणि सकाळी 8 ते 11 या दरम्यान चालण्याचा व्यायाम केला तर हृदयरोगाचा आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
सरतेशेवटी काय तर चालणं हा सक्रिय राहण्यासाठीचा उत्तम उपाय आहे. तो फुकट आहे, त्याने वजन कमी होतं आणि तुम्हाला छान वाटतं. अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येतं. एका विशिष्ट वेगाने, लयीने केल्यास स्टॅमिना वाढण्यास मदत होते हृदयाचं आरोग्य वाढतं आणि आयुर्मान वाढतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)