तृतीयपंथीय : ‘नोकरी म्हणून नाही, तर आत्मसन्मानासाठी पोलीस व्हायचंय’

- Author, हर्षल आकुडे आणि अमोल लंगर
- Role, बीबीसी मराठी
“पोलिसांना पगार कमी मिळतो. लोकांकडे मागून पैसे मिळवले, तरी तुझ्याकडे खूप पैसे माझ्याकडे येतील, असं मला काही जण म्हणाले. पण मला पोलीस व्हायचंच आहे. कारण, पोलिसांत नोकरी केल्यानंतर मला आणि माझ्यासारख्या तृतीयपंथीयांना मिळणारा मान पैशापेक्षा खूप मोठा आहे.”
“मला पैशांसाठी किंवा नोकरी म्हणून पोलीस व्हायचं नाही, तर आत्मसन्मानासाठी पोलीस व्हायचं आहे. समाज माझ्याकडे ज्या नजरेने पाहतो, तसा पुढच्या पिढीतील तृतीयपंथीयांकडे पाहू नये, यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे.”
परभणी जिल्ह्यातील पोलीस भरतीत तृतीयपंथीय गटातून अर्ज केलेल्या योगेश्वरी फड बोलत होती.

‘शरीर मुलाचं, पण अंतर्मन मुलीचं’
योगेश्वरी ज्ञानोबा फड ही मूळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील धर्मपुरी येथील रहिवासी आहे.
ती सांगते, “लहानपणापासून मला आईवडिलांनी मुलगा म्हणून वागवलं आणि वाढवलं. शिक्षणही मी मुलांप्रमाणेच घेतलं. पण माझ्यातील हावभाव मुलींसारखे होते, हे सगळ्यांना माहिती होतं. शाळेतील मित्र, शिक्षक मला चिडवायचे. मी वयात आले तेव्हा मला समजू लागलं की माझं शरीर मुलाचं आहे, पण अंतर्मन मुलीचं आहे. आपण चुकीच्या शरीरात प्रवेश घेतला आहे, हे मला कळून चुकलं.”
“बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी निर्णय घेतला की आता साडी घालायची. तेव्हापासून मी मुलीप्रमाणेच राहू लागले. पण लोक मला वेगळ्या नजरेने पाहतात, हिणवतात म्हणून मी शिक्षण सोडून दिलं.”
"एक वेळ अशी आली होती की आयुष्यात आपलं कुणीही नाही, असं वाटून आत्महत्येचे विचारही मनात येत होते. पण स्वतःला सावरून घेतलं आणि मुलगी म्हणून बाहेर पडू लागले," असं ती म्हणते.
“जग काहीही म्हणत असलं तरी आपलं तृतीयपंथीय असणं आईने मोकळ्या मनाने स्वीकारलं. आजवरच्या संपूर्ण प्रवासात आईची खंबीर साथ मिळाल्यानेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो,” असंही योगेश्वरी सांगते.

प्रशिक्षण केंद्रांकडून प्रशिक्षणास नकार
पोलीस भरतीसाठी मेहनत घेत असताना काय अडचणी आल्या, सराव कसा केला या प्रश्नाचं उत्तर देताना योगेश्वरीने तिच्या तयारीची कहाणी सांगितली.
ती म्हणते, “मला पोलिसांत जाता येईल, याचा विचारही मी कधी केला नव्हता. शिक्षण सोडून दिल्यापासून तर मी घराबाहेर पडणंही बंद केलं होतं. पण कोर्टाने तृतीयपंथीयांच्या भरतीसाठी परवानगी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर मी भरतीसाठी अर्ज केला.
“पोलीस भरतीच्या तयारीसाठी मी काही प्रशिक्षण केंद्रांमध्ये चौकशी केली. पण तुम्ही प्रशिक्षण केंद्रात आलात, तर इतर मुला-मुलींवर वाईट परिणाम होईल, असं उत्तर मला त्यांच्याकडून मिळालं.”
“या कारणामुळे माझी तयारी मी स्वतःच करायचं ठरवलं. पण ती तयारी करतानाही मला अवघडल्यासारखं वाटायचं. लोक टोमणे मारतील, किन्नर काय पोलीस होईल, असं बोलतील, ही भीती मला होती. लोकांचं बोलणं सहन होणार नाही म्हणून सगळे जण झोपलेले असताना मी सराव करायचं ठरवलं. सरावादरम्यान, मी रोज पहाटे चार वाजता मी धावण्याचा सराव करायचे,” असं योगेश्वरी सांगते.

'ताट समोर ठेवलं, पण ताटात जेवणंच नाही'
सरावाच्या अडचणी पार पाडून चाचणीसाठी पोहोचले, मात्र, तिथेही आपली निराशा झाल्याचं योगेश्वरी म्हणते. शासनाने तृतीयपंथीयांना अर्जाची सोय तर केली, पण ते केवळ दाखवण्यापुरतं होतं, अशी तिची तक्रार आहे.
योगेश्वरी म्हणते, “मला शारीरिक परीक्षेत 36 गुण मिळाले, पुरुषांची मेरीट 40 गुणांची लागली. महिलांचं मेरीट 26 गुणांचं होतं. पण तरीही माझं नाव लेखी परिक्षेसाठीच्या पात्रता यादीत आलं नाही. शासनाने केवळ तृतीयपंथीय म्हणून कॉलम उभा करून दिला. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते करण्यात आलं. ‘ताट समोर ठेवलं, पण ताटात जेवणंच दिलं नाही,’ असा हा प्रकार आहे.
“आम्हाला भरतीसाठी पुरेसा वेळही मिळाला नाही. महिला-पुरुष उमेदवारांनी तीन-तीन वर्षे मेहनत घेऊन या भरतीची तयारी केली आहे. पण आम्हाला केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यामुळे तृतीयपंथीयांचं मेरीट हे पुरुष किंवा महिलांमध्ये न लावता स्वतंत्र लावण्यात यावं,” अशी मागणी योगेश्वरीने केली आहे.

‘समांतर आरक्षण नसल्याने अर्ज खुल्या प्रवर्गात’
पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना सर्वसामान्य गटात घालण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याशी संपर्क साधला.
पोलीस भरतीचं नियम समजावून सांगताना रागसुधा म्हणाल्या, “पोलीस भरतीच्या नियमांनुसार यंदा महिला आणि पुरुषांसोबतच तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार तृतीयपंथीय गटातून अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र, कागदपत्रांच्या नियमानुसार त्यांचे अर्ज हे खुल्या सर्वसाधारण गटात समाविष्ट करून घेण्यात आले.”
“खुल्या सर्वसाधारण गटामध्ये केवळ पुरुषच असतात असं नाही, तर काही कारणांमुळे कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेल्या महिलासुद्धा या गटात समाविष्ट असतात, त्या सर्वांचं मेरीट एकत्रित घेण्यात येतं. त्यामुळे या प्रवर्गात नियमानुसार सर्वाची खुली स्पर्धा असते,” असं रागसुधा यांनी सांगितलं.
त्या पुढे सांगतात, “कायद्यानुसार, पोलीस भरतीत पॅरेलल (समांतर) आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार खुला प्रवर्ग, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींसह महिला, खेळाडू, एक्स-सर्व्हिसमन, होमगार्ड आदी समांतर आरक्षणाच्या विविध कॅटेगरी आहेत.
“मात्र, त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या कॅटेगरीची तरतूद नाही. त्यामुळे तृतीयपंथीय असं वेगळं आरक्षण द्यावं, हा शासकीय धोरणाचा विषय आहे. हा विषय राज्य शासनाच्या अधीन आहे. त्यामुळे यासंदर्भात शासनाकडून धोरण निश्चित करण्यात आलं किंवा कायद्याने तरतूद केली, तरच भरतीत तसं आरक्षण मिळू शकेल,” असं पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांनी सांगितलं.
कोर्टात जाण्याची तयारी
भरतीत तृतीयपंथीयांवर अन्याय झाला असून आमचं मेरीट स्वतंत्र लावण्याची आवश्यकता आहे, असं योगेश्वरीने म्हटलं.
ती म्हणते, "शासनाने आमचं ऐकलं नाही तर आम्ही कोर्टात याचिका दाखल करू. आम्ही कोर्टात लढा देऊनच पोलीस भरतीत अर्ज करण्याची परवानगी मागितली होती. त्याच प्रकारे आमचं मेरीट स्वतंत्र लावावं, ही मागणी घेऊन कोर्टात धाव घेण्याची तयारी आम्ही केली आहे."
"अशा प्रकारचं आरक्षण इतर राज्यांमध्ये आहे. भरतीत फक्त तृतीयपंथीय कॉलम उभा करून काही उपयोग नाही. तुम्हाला तृतीयपंथीयांना सामावून घ्यायचं असेल, तर त्या दृष्टीने सरकारने काही निर्णय घेण्याची गरज आहे," असं मत योगेश्वरीने व्यक्त केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








