मान्सून लांबल्याने किंवा कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर काळे ढग का दाटतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
जून महिन्यात भारतात मान्सूनचे वेध सुरु होतात. उन्हाच्या तडाख्यानंतर मान्सूनपूर्व सरी आणि मान्सूनच्या सरी बरसण्याची प्रतीक्षा असते. पण यावर्षी जून मध्यावर आला तरीही पावसाचा काही पत्ता नाही.
मान्सूनच्या आगमनाची आणि त्याच्या योग्य बरसण्याची प्रतीक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वच घटकांना असते. भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर कशाप्रकारे अवलंबून आहे हे आपण जाणून घेऊया.
‘भारताचं बजेट हे मान्सूनवरचा जुगार आहे’
1899 साली भारताचे व्हाइसरॉय म्हणून नियुक्त झालेल्या लॉर्ड कर्झन यांचं भारताची अर्थव्यवस्था आणि मान्सूनवरचं वाक्य फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या या उल्लेखाला जवळपास शंभर वर्षं झाली असली तरीही त्याचा संदर्भ दिला जातो.
ज्येष्ठ दिवंगत पत्रकार दुर्गा दास यांच्या ‘इंडिया फ्रॅम कर्झन टू नेहरू एंड आफ्टर’ या पुस्तकात मान्सूनवरच्या रिपोर्टींगचं महत्त्व अधोरेखित केललं आहे.
दुर्गा दास लिहितात, ‘लॉर्ड कर्झन यांचं भारताचं बजेट हे मान्सूनवरचा जुगार आहे, हे मत प्रसिद्ध झाल्यानंतर तेव्हाचे पत्रकार सिमला हवामान विभागाकडून दररोज जाहीर होणाऱ्या हवामान अहवालावर नजर ठेऊन असायचे. मान्सूनमध्ये खंड पडणे ही बाब अत्यंत महत्त्वाच्या बातम्यांमध्ये गणली जायची आणि त्याचे अपडेट्स संपूर्ण भारतात आणि जगभरात पाठवले जायचे.’
मान्सूनचे वेळोवेळचे अपडेट्स देणाऱ्या बातम्यांचं महत्त्व आजही कायम आहे. मान्सून कधी येणार, मान्सून काळात किती पाऊस होणार, मान्सूनची प्रगती कशी आहे, मान्सून कधी परत जाणार यांसारखे अपडेट्स आजही बातम्यांमधून लोकांपर्यंत पोहोचवले जातात. कारण मान्सूनच्या प्रत्येक अपडेटची माहिती फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वाच्या घटकांनाही हवी असते.
भारतासाठी मान्सून का महत्त्वाचा?
भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. द हिंदू या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
भारतातील ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारीत आहे आणि शेती बहुतांशपणे मान्सूनवर आधारित आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या सुबत्तेसाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
पुण्यातील गोखले इंस्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल सायन्स एँड इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर आणि एग्रो इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर असलेल्या जयंती काजळे यांनी भारतासाठी मान्सून का महत्त्वाचा ठरतो या मागचं कारण उलगडून सांगितलं.
“मान्सूनच्या उशिराने येण्याने चिंता वाढते कारण आपल्या एकूण लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही शेतीवर अवलंबून आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की देशातील सिंचनाखाली असलेला भाग अजूनही साधारणपणे 50-53 टक्के आहे. म्हणजे बाकीचा 50 टक्के भागाला सिंचन मिळत नाही.
अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सिंचनाच्या बाबतीत राज्यनिहाय वेगळेपण असू शकतं. जसं की पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये ९७-९८ टक्के शेती ही सिंचनाखाली आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्याच्या बाबतीत ही टक्केवारी २० टक्क्यांच्या जवळपास आहे. सरकारकडून जी आकडेवारी मिळते त्यावरुन तरी हेच चित्र दिसतं. पाणी हे कृषी उत्पादनं आणि या क्षेत्राच्या वाढीसाठीची प्राथमिक गरज आहे,” असं जयंती काजळे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
फक्त ग्रामीणच नाही तर निमशहरी आणि शहरी जीवनावरही मान्सूनचा परिणाम होतो. ते आपण पुढे बघूया.

फोटो स्रोत, ANI
मान्सून उशिरा येण्याचे लगेचच परिणाम कृषी क्षेत्रातल्या काही पिकांवर उमटतात. उदाहरण द्यायचं झालं तर 2021-22 मध्ये देशात जवळपास 411.2 लाख हेक्टर भागावर तांदूळाची लागवड केली होती. 2022-23 मध्ये मान्सूनचं आगमन उशिरा झाल्यामुळे त्याचा परिणाम लगेचंच दिसला. यावर्षी तांदूळाच्या लागवडी खालंच क्षेत्र 3.8 लाख हेक्टरने कमी झालं. 2022-23 च्या आर्थिक पाहाणी अहवालात हे नमूद केलेलं आहे.
मान्सून, शेती आणि भारताचा व्यापार
संपूर्ण जगात खाद्यपदार्थांसाठी महत्त्वाचे समजले जाणारी पिकं जसं की तांदूळ, गहू आणि ऊस यांचा भारत एक प्रमुख उत्पादक देश आहे.
याशिवाय डाळी, तेलबियांचे उत्पादन खरीप हंगामात घेतलं जातं जो मान्सूनचा कालावधी असतो. जून महिन्यात मान्सूनच्या आगमनासोबत शेतकरी पेरण्यांची सुरुवात करतात.
फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील एकूण अन्नधान्य पिकांच्या उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन हे खरीप हंगामात होतं. त्यामुळे मान्सूनचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम हा अन्नधान्याचं उत्पादन आणि पुरवठ्यावर होऊ शकतो. त्यापाठोपाठ अन्नधान्याची महागाई सुद्धा वाढू शकते. कमी उत्पादनामुळे देशाची निर्यात कमी होऊ शकते.
सरासरी पेक्षा कमी झालेल्या मान्सूनमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता बळावते.
इकॉनॅमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी 60 टक्के लोक हे कृषीक्षेत्राशी निगडीत अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेतील त्याचा वाटा 18 टक्के आहे.
शेती आणि संबंधित रोजगारावर देशातील जवळपास अर्धी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस कमी जास्त होण्याचा थेट परिणाम या लोकसंख्येवर आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पडल्यास त्याचेही परिणाम शेतीवर होतात. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा भूस्खलन झाल्यास शेतीचं नुकसान होतं.
दुष्काळ असो की पूरपरिस्थिती शेतकऱ्यांना अनुदान आणि सबसिडी देण्याची तयारी राज्य आणि केंद्र सरकारला ठेवावी लागते. यासाठी निधी सुद्धा राखून ठेवावा लागतो.

फोटो स्रोत, ANI
चांगल्या मान्सूनचा मार्केटमधल्या मागणी आणि पुरवठ्यावरचा परिणाम
चांगल्या मान्सून हंगामात कृषी क्षेत्रातलं उत्पादन वाढतं. ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती वाढते. परिणामी ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढते. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये चांगल्या मान्सूनमुळे एफएमसीजी उत्पादनांची ग्रामीण भागातील मागणी कशी वाढते यासंदर्भात माहिती दिलेली आहे.
चांगल्या मान्सून हंगामात फक्त एफएमसीजी उत्पादनेच नाहीतर, ट्रॅक्टर, टू- व्हिलर, घरांचं बांधकाम साहित्य, शेतीनिगडीत वस्तू, यांची मागणी वाढते. या गोष्टींशी निगडीत असणाऱ्या कंपन्यांच्या शेअर व्हॅल्यूवर याचा परिणाम होतो. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसते.
मोतीलाल ओसवाल या फायनान्शियल सर्विस कंपनीने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार दुष्काळी वर्षांमध्ये सोन्याची मागणी कमी होते. कमी उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आणि ते बचतीचा मार्ग निवडतात. सोने खरेदी जो ग्रामीण आणि निमशहरी भागात जास्त पसंतीचा बचतीचा पर्याय मानला जातो कमी मान्सूनच्या काळात त्याला फटका बसतो.
“जेव्हा मान्सून समाधानकारक नसतो तेव्हा कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. ते यासाठी की, यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्न कमी होतं. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या मागणीवर त्याचा परिणाम होतो. ही मागणी कमी होते म्हणजे, की एका शेतीशी संबंधित घरातील बिगरशेती उत्पादनांसाठीची मागणी कमी होते.
यामुळे चांगला मान्सूनमुळे फक्त कृषीसंबंधी क्षेत्रातच नाही तर बिगर कृषी क्षेत्राला चालना मिळते. जेव्हा चांगली पिकं होतात आणि चांगलं उत्पन्न मिळतं, तेव्हा त्याचा परिणाम बाकी क्षेत्रांवर जसं की व्यापार, दळणवळण दिसून येतो. त्या त्या पिकांची जी पुरवठा साखळी असते, त्यावरही सकारात्मक परिणाम दिसतो,” असं जयंती काजळे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, ANI
मान्सूनचा महागाईवर आणि आरबीआयच्या धोरणांवर कसा परिणाम होतो?
चांगल्या मान्सून सीझनमुळे पिकांचं उत्पादन चांगलं होतं. ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती आटोक्यात राहतात. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया consumer price index (CPI) म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार सातत्याने आढावा घेते.
CPI मध्ये 50 टक्के वाटा हा अन्नधान्याच्या गोष्टींचा असतो. ज्यावरुन किरकोळ महागाई दर दिसतो. यामुळे कमी पावसाच्या वर्षांत सीपीआय बहुतांश वेळा वर जाताना दिसतो. जास्त महागाईचा दर म्हणजे रिझर्व्ह बॅंक व्याजदरांमध्ये कपात करण्याची शक्यता कमी असते. ज्याचा परिणाम ग्रामीण ते शहरी सगळ्याच भागांवर होतो.
रिझर्व्ह बँकेने व्याजाचे दर वाढीव ठेवले तर त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होतो. चढ्या व्याजदरांमुळे बाजारातली गुंतवणूक कमी होते. ज्याचा थेट परिणाम रोजगार निर्मितीवर होतो.
काही तज्ज्ञांच्या मते दुष्काळामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावं लागतं. ज्याचा परिणाम देशाच्या वित्तीय तुटीवर होऊ शकतो. त्यामुळे चांगला मान्सून हा सरकारी तिजोरीसाठी उपयुक्त ठरतो.
मान्सून आणि बिगरशेती क्षेत्र
अर्थतज्ज्ञांच्या मते मान्सूनचा परिणाम हा फक्त शेती आणि त्यासंबंधित व्यवसायांवरच नाही तर इतर क्षेत्रांवरही होतो. मिनाक्षी चक्रबोर्ती आणि सच्चिदानंद शुक्ला या दोन अर्थतज्ज्ञांनी जर्नल आफ मॅनेजमेंट आऊटलूकमध्ये एका रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी मान्सूनचा आर्थिक उलाढालींवर होणाऱ्या परिणामांची चिकीत्सा केली आहे.
‘मान्सूनचा कृषी अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम सर्वश्रूत आहे. तथापि, मागणी पुरवठा आणि कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांशी परस्पर संबंध यामुळे मान्सूनचा जीवनमानावर आणि अर्थव्यवस्थेतील एकंदर मागणीवर लक्षणीय परिणाम होताना दिसतो,’ असं त्यांच्या रिसर्च पेपरच्या निष्कर्षांमध्ये म्हटलेलं आहे. बिगरशेती क्षेत्रावरच्या मान्सूनच्या प्रभावाबद्दलही या संशोधनात उल्लेख आहे.
‘मान्सूनचा परिणाम हा बिगरशेती क्षेत्रांवरही दिसतो. वीज, गॅस आणि पाणीपुरवठा हे यामध्ये सगळ्यांत महत्त्वाचे आहेत. ते यासाठी कारण अपारंपरिक स्रोतांपासून (जसं की जलविद्यूत प्रकल्प, सौरऊर्जा) वीज निर्मीती वाढली आहे. ते मोठ्या प्रमाणात हवामानावर अवलंबून असतात. मान्सूनचा यावर मोठा प्रभाव पडतो. गंभीर संकटं जसं की दुष्काळ किंवा पूर यांचा बिगरशेती क्षेत्रावर कमी परिणाम होत असला तरिही सामान्य पातळीमधील चांगल्या मान्सूनचा (मार्केटमधील) मागणीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसतं,’ असं मिनाक्षी चक्रबोर्ती आणि सच्चिदानंद शुक्ला यांनी निष्कर्षात म्हटलेलं आहे.
चांगल्या मान्सूनचा देशपातळीवर सरासरी सकारात्मक परिणाम दिसला तरीही प्रोफेसर जयंती काजळे सांगतात की, स्थानिक पातळीवर त्या त्या भागांनुसार मान्सून बरसण्यात, पिकांचं उत्पादन होण्यात आणि ग्रामीण भागातील उत्पन्न वृद्धी होण्यात फरक पडू शकतो.
“एखाद्या पिकाचं जास्त प्रमाणात उत्पादन झालं आणि त्या पिकाचे भाव जर कोसळले तर मग ग्रामीण भागातील उत्पन्न वाढणार नाहीत. हे मायक्रो पातळीवर किंवा एखाद्या पिकाच्या बाबतीत किंवा एखाद्या रिजनच्या बाबतीत होऊ शकतं.

फोटो स्रोत, ANI
पण जर संपूर्ण भारतात जर सामान्य, चांगला मान्सून असेल तर हे रिजनल भागातले व्हेरिएशन समोर येत नाहीत. कारण ते सरासरीमध्ये ऍडजस्ट होतं. म्हणजे जर नकारात्मक परिणाम हा सकारात्मक परिणामांपेक्षा कमी असेल, तर आपल्याला असं दिसतं की उत्पादन वाढलंय. याचं कारण हेच की काही भागांत चांगला पाऊस होतो. काही भागांमध्ये चांगला मान्सून होत नाही,” असं जयंती काजळेंनी सांगितलं.
मान्सूनवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न
भारतीय कृषी अर्थव्यवस्था मान्सूनवर अजूनही बऱ्याच प्रमाणात अवलंबून असली तरीही मान्सूनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी विविध धोरणांची आखणी गेल्या अनेक वर्षांमध्ये केलेली आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या योजना राबवल्या जातात. प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरोने जारी केलेल्या एका पत्रकात मान्सूनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी काही उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये सिंचनासाठी अनुदान आणि राज्यांना आर्थिक मदत, पाणी जमीनीत मुरवण्याच्या उपाययोजना, कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्या देण्याबाबत जागरुकता, खरीप पिकांचा वेळोवेळी आढावा घेणे यांसारंख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
यावर्षी हवामान विभागाचा मान्सूनसाठी काय अंदाज आहे?
हवामान विभागाकडून 2023साठी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पण यावेळेस वायव्य भारतात सरासरीच्या खाली पाऊस असेल असा अंदाजही हवामान विभागाने जारी केलेला आहे. मोठं शेती उत्पादक राज्य पंजाब वायव्येलाच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
जूनमधील पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
तर इकॉनॉमिक टाइम्समधील एका रिपोर्टनुसार खाजगी हवामान अंदाज जारी करणारी संस्था स्कायमेटने अलनिनोमुळे सरासरी पेक्षा कमी मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. तसंच दुष्काळ पडण्याचा 60 टक्के शक्यता असल्याचंही म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








