भावनांक म्हणजे काय, उत्तम भावनांक असलेल्या कर्मचाऱ्यांची का वाढत आहे मागणी?

भावनांक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जोएना यॉर्क
    • Role, बीबीसी वर्कलाइफ

तुम्ही बऱ्याच वेळा हे ऐकलं असेल की जितका बुद्ध्यांक महत्त्वाचा आहे, तितकाच भावनांक देखील महत्त्वाचा आहे. म्हणजेच इंटेलेजन्स कोशंट (IQ) इतकाच इमोशनल कोशंट (EQ) देखील महत्त्वाचा आहे.

काही क्षेत्र तर असे आहेत की जिथे उच्च भावनांक असलेल्या उमेदवाराला पसंती दिली जाते. गेल्या काही काळात जास्त भावनांक असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

इमोशनल कोशंट किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय असतं ते आपण या लेखात पाहणार आहोत.

असा एक अनुभव असतो की नोकरी इच्छुक उमेदवार हे बहुतांश वेळा आपल्या तांत्रिक कौशल्याबद्दल आणि वैयक्तिक यश संपादनाबद्दल भरमसाठ गोष्टी आपल्याला रिज्युमेवर किंवा सीव्हीवर लिहिताना दिसतात.

बऱ्याचदा इंटरव्यूमध्ये देखील उमेदवार आपल्या तांत्रिक कौशल्याची, विविध परीक्षांमध्ये मिळालेल्या यशाची उजळणी पुन्हा पुन्हा करताना दिसतात. पण तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का कामात यशस्वी होण्यासाठी काही वेगळ्या कौशल्यांबद्दल आता बोललं जात आहे.

बऱ्याचदा असं होतं की काही खास कौशल्यं असून करिअरमध्ये तुमची प्रगती होईल याची शाश्वती देता येत नाही पण एक असं कौशल्य आहे की जर ते तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही आत्मसात केलं तर तुमच्या यशाची खात्री आहे असं तज्ज्ञ वारंवार सांगत आहेत...आणि ते कौशल्य आहे 'इमोशनल इंटेलिजन्स'.

याच कारणामुळे विविध क्षेत्रातील लीडर्स किंवा टॉप मॅनेजर्स हे 'इमोशनल इंटेलिजन्स' अधिक असलेल्या उमेदवाराचा शोध घेताना दिसत आहेत. इमोशनल इंटेलिजन्स अर्थात EQ ची बोर्डरूममध्ये खूप चर्चा होताना दिसत आहे.

'EQ' म्हणजे असे कौशल्य, अशी क्षमता की आपल्या जीवनात आपण भावनिकदृष्ट्या किती सक्षम आहोत हे पाहणं.

आपल्या स्वतःच्या भावना, तसेच आजूबाजूच्या लोकांच्या भावना ओळखता येणं आणि या ज्ञानाचा वापर करून एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं. तसेच, आपली उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमता वाढवून आपल्या ओळखी वाढवणं - अशा भावनिक गोष्टींशी निगडित असलेल्या कौशल्यांना एकत्रितरीत्या इमोशनल इंटेलिजन्स म्हटलं जातं.

इमोशनल इंटेलिजन्स

फोटो स्रोत, Getty Images

'काम करणे हे आव्हानात्मक होत आहे,' असे वारंवार आपण म्हणतो पण कामाची व्याख्या काय असते?

काम करणे म्हणजे नेमके काय? याबाबत व्यवस्थापन शास्त्रातील तज्ज्ञ काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.

'तसं पाहायला गेलं तर, काम करणं म्हणजे आपल्या कामकाजविषयक नातेसंबंधातील गुणवत्ता वाढवणे,' असं युकेतील अॅमी ब्रॅडली सांगतात.

अॅमी या 'हंट इंटरनॅशनल बिजनेस स्कूल'मध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच त्यांनी द ह्युमन मूमेंट हे पुस्तक लिहिले आहे.

त्या सांगतात, "काम हे लोकांकडूनच करून घेतलं जातं किंवा केलं जातं. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावना किंवा इतरांच्या भावनांना समजून काम करू नाही शकला तर दीर्घकाळासाठी कार्यक्षमता टिकून राहणे अत्यंत कठीण होऊन जाईल."

त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच मार्क क्रेमर देखील इमोशनल इंटेलिजन्स महत्त्वाचा आहे असं सांगतात.

इमोशनल इंटेलिजन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इमोशन इंटेलिजन्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इमोशनल इंटेलिजन्स ही एक व्यापक संज्ञा आहे. त्यात भावनांशी निगडित अनेक गोष्टींचा समावेश होतो.

"तुम्ही कठीण प्रसंगात कसे वागता, संघर्षाची स्थिती असेल तेव्हा कसे वागता, जर एखादा मोठा धक्का बसला तर कसे वागता, जर तुमच्यापैकी एखाद्या सहकाऱ्याला नैराश्य वाटत असेल किंवा दुःखी वाटत असेल तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कसं वागता, तुम्ही परिस्थितीशी कसं जुळवून घेऊन काम करता, तुमच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही कशा वाटाघाटी करता, या सर्व गोष्टी इमोशनल इंटेलिजन्समध्ये येतात," असं क्रेमर सांगतात.

क्रेमर हे अमेरिकेत राहणारे ऑर्गनायजेशन अॅंड डेव्हलपमेंट कन्सल्टंट आहेत. त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स इन वर्कप्लेस नावाचे पुस्तक लिहिले आहे.

'बढतीसाठी, तुमच्या कामातील प्रगतीसाठी किंवा दिलेल्या पदावर पूर्ण क्षमतेनी काम करण्यासाठी, कारणीभूत ठरणारा घटक म्हणजे EQ,' (भावनांक) असं ते सांगतात.

इमोशनल इंटेलिजंट व्यक्ती किंवा उत्तम भावनांक असलेली व्यक्ती कशी काम करते असं विचाराल तर त्याचं उत्तर असं देता येईल की विविध प्रश्न हाताळण्यासाठी भावनिकदृष्ट्या सक्षम असणे.

यंत्रवत काम करणे किंवा आपलं डोकं खाली घालून या आठवड्यात किंवा दिवसभरात कोणती कामं करायची याची यादी तयार करून ते करत बसणे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स नाही.

तर मानवी नातेसंबंध, आपल्या तसेच आपल्या सहकाऱ्यांच्या भावनांना प्राधान्य देणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स.

पारंपरिक विचारसरणीला आव्हान देणारा हा नवा विचार स्वीकारणे आव्हानात्मक आहे. पण याचे फायदे अनेक आहेत. आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या हिताला प्राधान्य देणं, सकारात्मक वातावरण निर्माण करणे या गोष्टींना आता पूर्वीपेक्षा अधिक मागणी आहे.

भावनांक म्हणजे काय?

पारंपरिकरीत्या कर्मचाऱ्यांकडून असं वर्तन अपेक्षित होतं की त्यांनी त्यांच्या भावनांना कामाच्या ठिकाणी त्यांनी अगदी झाकणबंद डब्यात ठेवावं. अर्थात ही काही वास्तववादी अपेक्षा नाही.

आपण सर्व भावनिक असतो. आपण मानव आहोत, हीच गोष्ट आपण भावनिक आहोत हे समजण्याकरता पुरेशी ठरते. त्यामुळे काम आणि भावना यांचा वेगवेगळा विचार केला जाऊ शकत नाही किंवा त्यांचं विलगीकरण देखील केलं जाऊ शकत नाही, असं क्रेमर सांगतात.

विफलता असो वा अस्वस्थता वाटणे असो, काम पूर्ण केल्याचा आनंद असो, आपल्या कामातून मिळणारे समाधान, आपले सहकारी किंवा कार्यालयाबाहेरचं आपलं आयुष्य या सर्वांचा प्रभाव आपल्या कामावर आणि कामाच्या ठिकाणी होतो.

ऑफिस

फोटो स्रोत, Getty Images

हीच गोष्ट ओळखून येल विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ पीटर सालोव्हे आणि जॉन डी. मेयर यांनी 1990 मध्ये इमोशनल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला.

पुढे मानसशास्त्रज्ञ आणि लेखक डॅनियल गोलमन यांनी उच्च भावनांक असलेल्या व्यक्तीमध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी असतात अशी मांडणी केली. उच्च भावनांक असेल्या व्यक्तीमध्ये स्वतःला ओळखणे, स्व-नियंत्रण, सामाजिक भान आणि नातेसंबंधांचे व्यवस्थापन या चार गोष्टी असतात असे त्यांनी सांगितले.

पहिले दोन गुण हे स्वतःबद्दल आहेत. म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे, स्वतःला ओळखणे आणि आपल्या भावनांचे योग्यरित्या नियंत्रण आणि व्यवस्थापन करणे.

थोडक्यात असं की ज्या व्यक्तीला स्वतः आपण कोण आहोत ही जाणीव असेल तर त्याला किंवा तिला ही जाणीव होईल की मीटिंग जर वेळेपेक्षा अधिक लांबल्या तर आपल्याला त्रास होतोय किंवा आपण तणावात आहोत याची जाणीव होते.

आणि जर हीच व्यक्ती आपल्या भावनांना नियंत्रित करू शकत असतील तर एका मोठ्या त्रासापासून त्यांचे सहकारी वाचतील. कारण जर आपल्याला मीटिंगची वेळ वाढली आहे म्हणून त्रास होतोय पण समोर कुणी महत्त्वाची व्यक्ती किंवा पाहुणे आले आहेत, त्यांच्यासमोर आपल्या भावनांचे उत्कटपणे प्रदर्शन करण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

कदाचित त्यामुळे आपले सहकारी आणि आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकते. हे सर्व चांगला भावनांक असणारी व्यक्ती टाळू शकते.

ऑफिस

फोटो स्रोत, Getty Images

तिसरा आणि चौथा गुण आहे सामाजिक भान आणि नातेसंबंधांचे व्यवस्थापन - म्हणजे आपण हे किती उत्तमरीत्या समजू शकतो की आपल्या सहकाऱ्यांच्या काय भावना आहेत.

त्या समजून घेऊन कार्यक्षम आणि सदृढ नातेसंबंध त्यांच्यासोबत प्रस्थापित करणे. या ठिकाणी सहवेदना किंवा समानुभूती असणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. याचा अर्थ असा असतो की स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेऊन पाहणे आणि मग त्यासंबंधी निर्णय घेणे.

याबाबत अॅमी ब्रॅडले सांगतात की "हा एक महत्त्वाचा गुण आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या जागी आपण असतो तर काय झालं असतं असा दृष्टिकोन ठेवून त्या व्यक्तीला समजून घेऊन समोरच्या व्यक्तीला सहकार्य करणे किंवा पाठिंबा देणे. जर असं केलं तर आपल्याला एक नवा दृष्टिकोन मिळू शकतो."

कोरोनाचा कठीण काळ आणि भावनांक

भावनांक ही संज्ञा अगदीच अलीकडील काळातील वाटत असली, तरी व्यावसायिक संदर्भात भावनांक हा नेहमीच महत्त्वपूर्ण घटक मानला गेला आहे.

याचे एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे एका संशोधनातून असं समोर आलं आहे की ज्या कर्मचाऱ्यांचा भावनांक हा कमी असतो ते लोक कामाच्या ठिकाणबाबत जास्त कुरबुरी करताना आढळतात किंवा ते लोक वरिष्ठांसमोर सतत या तक्रारी घेऊन जाताना दिसतात.

त्यांची कामाप्रती निष्ठा कमी असते, कामातून मिळणारं समाधान कमी असतं आणि ते कार्यक्षम नसतात तसेच कामाशी संबंधित गोष्टींचा त्यांच्यावर तणाव पडतो. या गोष्टींचे महत्त्व कुणी नाकारणार नाही.

पण कोरोनाच्या काळात असं घडलं की भावनांक हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे किंबहुना याला दुसरा पर्याय नाही असा विचार पुढे आला.

कोरोनाची जेव्हा लाट आली होती तेव्हा आपल्या संपूर्ण टीमला एकत्र ठेऊन, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन कार्यक्षमता अबाधित ठेवणं हे आव्हान टीम लीडर्स किंवा मॅनेजर्ससमोर होतं.

कारण एका बाजूला आपल्या टीमसोबत सहवेदनेनं वागणं, त्यांचा आत्मविश्वास बळकट करणे हे काम होतं तर तसं करत असताना कार्यक्षमता कमी झाली नाही पाहिजे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं.

वर्क फ्रॉम होम

फोटो स्रोत, Getty Images

कर्मचाऱ्यांसमोर देखील नवीन आव्हानं होती. जसं की कामाची बदललेली जागा आणि स्वरूप समजून घेणे. त्यातून अनेकांना पूर्णपणे थकव्याचा अनुभव आला पण काही लोकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं.

अॅमी ब्रॅडले सांगतात की "जे कर्मचारी स्वतःला नीट ओळखतात आणि भावनांचे स्वनियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतात ते आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक असतात. असे कर्मचारी हे आपल्या वरिष्ठांना सांगू शकतात की या कामाचा त्यांना थकवा जाणवतोय.

"आणि आता हे काम यावेळी बंद करणे अधिक योग्य राहील. जास्त काम करून पूर्ण शक्तीचा व्यय करण्यापेक्षा आता काम थांबवणे अधिक योग्य आहे असं ते स्वतः समजू शकतात आणि इतरांनाही समजावून सांगू शकतात," अॅमी ब्रॅडली सांगतात.

कोरोनाच्या काळात हे देखील लक्षात आलं की ज्या संस्था आपल्या कर्मचाऱ्यांचा भावनांक चांगला असावा किंवा त्यांच्या भवितव्याबाबत सजग नाहीत त्यांना मोठा फटका बसला.

फेब्रुवारी 2022 मध्ये गॅलप सर्व्हेत ही गोष्ट समोर आली आहे की कर्मचाऱ्यांना असं वाटतं की त्यांचे व्यवस्थापक कोरोनाच्या काळात त्यांची काळजी घेत होते पण आता व्यवस्थापकांच्या वर्तनात नकारात्मक बदल झाले आहे.

मे 2020 मध्ये अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक कर्मचाऱ्यांना हे वाटत होतं की त्यांचे व्यवस्थापक त्यांची काळजी घेतात. आता हाच आकडा निम्म्यावर आला आहे. कर्मचारी आणि व्यवस्थापकांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना प्रबळ नसल्याचा नकारात्मक परिणाम जाणवला आहे.

घरून काम करण्यामुळे देखील भावनांकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वच काम हे एका व्हर्चुअली किंवा डिजिटल स्पेसमध्ये होत असल्यामुळे तिथे थेट संपर्क कमी झाला. त्यामुळे समोर असलेल्या व्यक्तीच्या नेमक्या भावना काय आहेत, त्या व्यक्तीची देहबोली कशी आहे या गोष्टी समजण्यास काही वावच उरला नव्हता.

किंवा बहुतांशवेळा संवाद हा मेसेजद्वारे होत असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आवाजाची लय कशी आहे हे समजून घेण्याचा देखील फारसा संबंध उरला नव्हता.

अशा वेळी, ज्यांचा भावनांक हा उच्च होता अशा कर्मचाऱ्यांनी किंवा व्यवस्थापकांनी या बदलाशी लवकर जुळवून घेतलं आणि थेट समोर नसलेल्या व्यक्तीच्या भावना कशा असू शकतात याचा अंदाज बांधून त्यांचे वर्तन होतं.

भावनांक वाढवण्यासाठी काय करावे?

आता हे सर्व वाचल्यावर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की भावनांक नेमका वाढवायचा कसा? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण भावनांक हा जन्मजात गुण नसतो.

त्यात असं काही नसतं की एखाद्याला जन्मतःच जास्त भावनांक आहे आणि एखाद्याला कमी. जितकं याकडे लक्ष द्याल तितका वाढवता येण्याची शक्यता असते.

EQ ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती जन्मभर वाढवता येऊ शकते, असं क्रेमर सांगतात. ते सल्ला देतात की जर तुम्हाला तुमचा भावनांक वाढवायचा असेल तर तुम्ही सेल्फ अवेअरनेस म्हणजेच स्वतःच्या भावना काय आहेत हे ओळखण्याचे काम हाती घेण्यापासून सुरुवात करावी.

म्हणजेच आपल्या या क्षणाला काय भावना आहेत, आपल्या डोक्यात कोणते विचार आहेत, आपल्याला यावेळी काय हवे आहे आणि यावर आधारित आपण कोणती कृती आता करणार आहोत याचं भान असणं म्हणजे भावनांकाच्या संदर्भातील स्वतःला ओळखणं असतं.

कार्यालय

फोटो स्रोत, Getty Images

क्रेमर सांगतात की "जर समजा तुम्हाला तुम्ही काय विचार करत आहात हे कळत नाहीये, तुम्हाला काय हवंय हे ठाऊक नाहीये, तर या स्थितीतून पुढे जाण्याचा तुमचा मार्ग कठीण असेल."

जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या भावना काय आहेत याची एकदा जाणीव झाली तर त्या भावनांचे व्यवस्थापन करणे हे सोपे होते.

जेव्हा एखादा कठीण प्रसंग ओढावतो तेव्हा लक्षात ठेवा की तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हे ध्यानात घ्या की तुम्हाला तत्काळ त्या घटनेवर किंवा वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. असा प्रसंग ओढावला तर थोडा वेळ घ्या आणि मग त्यावर प्रतिक्रिया द्या.

अॅमी ब्रॅडली सांगतात की "जे आपल्या स्वतःच्या भावना ओळखतात आणि भावनांवर नियंत्रण ठेऊ शकतात ते कर्मचारी हे स्वतःच्या हितासंबंधी अधिक जागरुक असतात."

या बाबत त्या एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की "सुरुवातीला तुम्ही हे समजून घ्या की कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे तुमच्याबद्दलचे मत काय आहे आणि तुमचे स्वतःबद्दलचे मत काय आहे. त्या दोन्हीमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न आपण करावा."

याचे एक उदाहरण देता येईल की तुमच्या सहकाऱ्यांना वाटतं की तुम्ही कधी कधी उशिरा येता. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही कधीच उशीर करत नाहीत. अशा वेळी स्वतःचे योग्यरित्या मूल्यमापन करणे आवश्यक आहे.

ऑफिस

फोटो स्रोत, Getty Images

आता या बाबतीत आपण काय करू शकतो? तर यासाठी फीडबॅक घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही तुमच्या कामाचे आणि वागणुकीचे फीडबॅक मागा. त्यांना विचारा की कोणत्या ठिकाणी मी चांगलं काम करतोय आणि कोणत्या ठिकाणी माझ्यात सुधारणेला वाव आहे.

माझ्या कामात सुधारणा करण्यासाठी मी आणखी काय करायला हवं असं तुम्ही विचारू शकता. जर तुमच्या सहकाऱ्यांना देखील असं वाटत असेल की कामाच्या ठिकाणी एक विश्वासाचं नातं असायला हवं आणि एकमेकांना सहकार्य केल्याने आपली प्रगती होऊ शकते तर ते देखील तुम्हाला फीडबॅक मागतील. या परस्पर सहकार्यातूनच सर्वांची प्रगती साधू शकते.

एक महत्त्वाची सूचना त्या या संदर्भात देतात की तुम्हाला जर फीडबॅक घ्यायचा असेल तर तुम्ही त्यासाठी तयार असायला हवं. तुमच्या चुका तुम्हाला कुणी सांगतंय असं वाटणं हे वरदान म्हणून घ्यायला हवं, लगेच आपण कसे बरोबर आहोत हे सांगू नका. कुणाकडून फीडबॅक मागणं आणि लगेच आपण कसे बरोबर आहोत हे सांगणं अयोग्य आहे.

समजा तुम्हाला वाटतं की तुम्ही शांततापूर्वक म्हणणं समजून घेता, पण तुमच्या सहकाऱ्यांना वाटतं की तसं काही नाही. तर तुमच्या सहकाऱ्यांना जरा झुकतं माप द्या आणि ती गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न करा.

घरी, कार्यालयात, मित्रांसोबत असताना तुम्ही सक्रियपणे याकडे लक्ष द्या की तुम्ही खरंच त्यांचं म्हणणं ऐकत आहात का, की ते बोलत असताना तुमचं लक्ष दुसरीकडेच असतं, कुणी काही बोलत असताना तुम्ही मोबाईलमध्ये तर वारंवार पाहात नाहीत ना, अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.

जर तुम्ही काळजीपूर्वक यावर काम करू लागला तर तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू हा तुमचा स्वभाव बनत आहे.

हे सर्व ज्ञान घेऊन एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की इतरांसोबत तुमची प्रगती व्हावी याची जाणीव असं अत्यंत महत्त्वांचं आहे.

क्रेमर सांगतात की जगातील भावनांकांसंबंधीची सर्व पुस्तकं तुम्ही वाचू शकता पण तुमचा भावनांक वाढेलच याची काही शाश्वती नाही, कारण तुम्ही इतरांसोबत कसे वागता आणि त्यांना तुमच्याबद्दल काय वाटते हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)