करिअर आणि वेळेचं व्यवस्थापन: आजचं काम उद्यावर ढकलताय? मग या 8 गोष्टी करायलाच हव्यात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्लॉडिया हॅमंड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तम करिअर घडवायचं असेल तर वेळेचं व्यवस्थापन किंवा Time Management ला खूप महत्त्व आहे. वेळेचं नीट व्यवस्थापन करता आलं नाही तर उत्तम कौशल्यं असूनही करिअरवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
हा लेख लिहिण्यापूर्वी मी माझे कपडे मशीनमध्ये धुवायला टाकले, कपभर चहा केला आणि घेतला, काही इमेलला उत्तरं दिली, फेसबुक पाहिलं आणि काही ब्लॉग वाचले.
तोपर्यंत कपडे धुवून झाले होते, मग मी ते बागेत वाळत टाकले.
खरंतर या बारीक-सारीक कामांचा माझ्या लेखनावर काहीच फरक पडत नाही. मला जे लिहायचं होतं, ते मी वेळेत पूर्ण केलं.
आपण सगळेच काही प्रमाणात चालढकल करत असतो, आजचं काम उद्यावर ढकलत असतो. पण जर काम करण्याची शेवटची तारीख उलटून गेली तर त्याचे परिणाम वाईट होतात. हे परिणाम माहीत असतानाही जर आपण काम पुढे ढकलत असू तर मग अडचण निर्माण होते.
सारखी सारखी चालढकल करणं तब्येतीला हानिकारक असतं. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस वाढतो, तुम्ही नियमित व्यायाम करत नाही आणि कधी कधी तर आजारी पडलात तर डॉक्टरकडेही वेळेवर जात नाही.
आजचं काम उद्यावर ढकलणं टाळण्यासाठी आपल्याला काही मानसशास्त्रीय टीप्स मदत करू शकतात.
1. प्रेरणेसाठी फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहू नका
इंग्लंडमधल्या लाफबोरो विद्यापीठात 'प्रेरणा' या विषयावर अभ्यास करणारे क्रीडा मानसशास्त्रज्ञ इयान टेलर यांच्या मते, लोक प्रत्येक गोष्टीला 'इच्छाशक्ती' हेच उत्तर असल्याचं गृहित धरतात.
"इच्छाशक्ती हा प्रेरणेचा फक्त एक प्रकार आहे, तीच सगळं काही नाहीये," असं टेलर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
कुठल्याही कामाला टाळण्यासाठी इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्याऐवजी ते काम करणं तुमचं ध्येय गाठण्यासाठी किती अपरिहार्य किंवा महत्त्वाचं आहे, असा विचार करा.
जर तुम्ही 30 मिनिटं धावत असाल आणि तुमच्या स्नायूंना दुखापत झाली, तर त्याबद्दल वाईट वाटण्याची आवश्यकता नाही. कारण ती दुखापतही तुमच्या तंदुरुस्त होण्याच्या प्रक्रियेतला एक भाग असते.
2. पराभवाच्या भीतीनं कामात चालढकल?
कामात चालढकल करण्याच्या विषयावर शेफिल्ड विद्यापीठात 15 वर्षांहून अधिक संशोधन करणाऱ्या फ्युशिया सिरॉईस यांना असं आढळलं की, कामं पुढे ढकलण्यामागे वेळेचं अयोग्य नियोजन किंवा आळशीपणा हीच कारणं नेहमी नसतात, तर यात भावनांचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.
तुम्हाला अयशस्वी होण्याची भीती वाटत असेल तर ते काम पुढे ढकलण्यासाठी तुम्ही कारणं शोधायला लागता आणि तुम्हाला नको वाटणाऱ्या गोष्टी करायला टाळाटाळ करता.
पण यातून एक दुष्टचक्र सुरू होऊ शकतं. कारण तुम्ही कामात चालढकल केल्यानं ते काम करायला खूप कमी वेळ उरतो. मग त्याता तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता कमी कमी होत जाते आणि तुम्ही जास्तच काळजीत पडता. अशावेळेस उशीर झाला असेल तर तुम्ही ते काम सुरूच करत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तुमच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या या भावनांचा सामना करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या कामातील सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला करत असलेल्या कामातून खूप काही शिकायला मिळेल किंवा तुम्हाला त्यातून अपेक्षेपेक्षा जास्त आनंदही मिळेल.
3. पुढचं नियोजन करा
तुमच्या कामात दिरंगाई होण्यास विशिष्ट गोष्ट कारणीभूत ठरत असतील तेव्हा, तर 'जर-तर' या मानसशास्त्रीय रणनीतीचा अवलंब करा. या रणनीतीनुसार, जर कामात चालढकल करण्याची वेळ आली, तर त्यावर मात करण्यासाठी तुम्ही काय कराल, हे आधीच ठरवता येईल.
उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण करायचा आहे, पण कुणीतरी तुम्हाला वीकेंडला कॉफी पिण्यासाठी बोलावलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला संध्याकाळी भेटण्याचा पर्याय देऊ शकता.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ पीटर गॉल्वित्झर यांनी या 'जर-तर' रणनीतीसंदर्भातील 94 अहवालांचा अभ्यास केला. त्यांना असं आढळलं की, ही रणनीती वापरणारे लोक इतरांपेक्षा दोन ते तीनपट अधिक प्रमाणात त्यांच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून काम करतात.
4. गुंतागुंत कमी करा
कोणतेही काम जितकं शक्य तितक्या सोप्या पद्धतीनं करा.
तुम्ही कधी 'चॉईस आर्किटेक्चर'बद्दल ऐकलंय का? म्हणजे तुमच्या समोर असणारे पर्याय तुम्हाला फायदेशीर ठरतील असेलच ठेवायचे. उदाहरणार्थ, म्हणजे जर तुम्ही कॅन्टिनमध्ये चॉकलेट्सऐवजी फळं ठेवलीत, तर ग्राहक आपोआप आरोग्याला हितकारक असणाऱ्या फळांची निवड करतील.

फोटो स्रोत, Getty Images
आपण हेच आपल्यासाठीही करू शकतो : तुम्हाला सकाळी धावण्यासाठी जायचं असेल, तर तुम्ही तसे कपडे घालून तयार राहा किंवा दुसऱ्या दिवशी प्राधान्यानं करायच्या कामांच्या गोष्टी रात्रीच तुमच्या डेस्कवर मांडून ठेवा. म्हणजे सकाळी सगळ्यात आधी ते काम करण्यास तुम्ही सुरूवात कराल.
तसंच, तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवा. म्हणजे, स्क्रीनवरील नोटिफिकेशन्स बंद करा, फोनचा आवाज बंद करा आणि सोशल मीडियावरून लॉग आऊट व्हा.
5. स्वत:ला प्रोत्साहन द्या
कॉर्नेल विद्यापीठातल्या कॅटलीन वूली यांच्या संशोधनातून असं समोर आलंय की, कुठल्याही गोष्टीसाठी तात्काळ प्रोत्साहन मिळालं किंवा परतावा मिळला, तर लोक ती गोष्टी आणखी मेहनतीनं करण्यास प्रेरित होतात.
पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठातील कॅथरिन मिल्कमन यांच्या अभ्यासानुसार, जीममध्ये लोकांना ऐकण्यासाठी ऑडिओबुक दिलं, तर ते जीममध्ये जास्त काळ घालवण्याची शक्यता असते. कारण ऑडिओबुक त्यांना प्रेरणा देणारी गोष्ट ठरते.
त्यामुळं तुम्हाला काय आवडतं हे जाणून घ्या.
6. तुमच्या भविष्याविषयी अधिक वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा
अनेकांना असं वाटतं की आपल्याकडे भविष्यात अधिक वेळ असेल. म्हणजे येत्या काळात आपण अधिक सक्षम असू, तेव्हा गोष्टी चांगल्या प्रकारे पार पाडू त्यामुळे आजच्या गोष्टी उद्यावर ढकलल्या, आज जसं जगतोय तसंच जगत राहिलो तर त्यात काहीच चूक नाही.
असं कधीच होत नसतं. आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टीला किती वेळ लागेल, याचा अंदाज आपल्यला येत नाही. यालाच नियोजनशून्यता असं म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
नियोजनशून्यतेसाठी मी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या पहिल्या आवृत्तीचं उदाहरण देईन. 1860 साली असं जाहीर करण्यात आलं की, ही डिक्शनरी तयार करण्यासाठी दोन वर्षे लागतील. मात्र, ती 1928 पर्यंत पूर्णच झाली नाही. आणि नंतर ती इतकी जुनी झाली की, दुसऱ्या संशोधित आवृत्तीचं कामही एकाचवेळी सुरू झालं.
7. स्वत:शी प्रामाणिक राहा
तुम्ही ऑफिसमध्ये असता त्यावेळेस अर्ध्याहून अधिक काळ तुम्ही ऑनलाईन असाल, तर तुमच्या कामाप्रती असलेली तुमची निष्ठा ही शंभर टक्के नसते, असं समोर आलंय.
हातातल्या कामाबद्दल नकारत्मक भावना असेल, तर ती उत्तरोत्तर वाढत जाते.
एकाच परीक्षेला एखादा विद्यार्थी अनेकवेळा सामोरं जात असेल, तर त्यानं त्या परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेकदा चालढकल केलेली असते असं दिसून येतं.

फोटो स्रोत, Getty Images
सिरोईस यांच्या मते, इतरांकडून आपण जेवढ्या प्रामाणिकतेची अपेक्षा करतो, तितकं स्वत:ही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं असता एक गोष्ट आढळली की, चालढकल केल्याबद्दल ज्यांनी स्वत:ला माफ केलंय ते लोक पुन्हा परिक्षेला बसण्याची शक्यता जास्त असते.
सिरसोई यांच्या मतानुसार, आपण मित्रांपेक्षा स्वतःच्या बाबतीत जास्त कठोर वागतो. आपण स्वत:बाबतही तितकीच सहानुभूती दाखवली पाहिजे.
8. स्वत:विषयी चांगलं बोला
आपण बोलतना जी भाषा वापरतो त्या भाषेसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा खूप फरक पडतो.
2008 सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी कॅलिफोर्नियात एक संशोधन करण्यात आलं होतं. एक सर्वेक्षण घेण्यात आलं होतं, त्यात विचारण्यात आलं होतं की, मतदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं?

फोटो स्रोत, Getty Images
भाषेतला हा फरक अत्यंत छोटा असेल, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ज्यांना 'मतदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं' असा प्रश्न विचारला होता त्यात ग्रुपमधले 82 टक्के लोकांनी मत दिलं तर ज्यांना 'तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं' असा प्रश्न विचारला होता त्यातल्या 95 टक्के लोकांनी मत दिलं होतं.
त्यामुळे स्वतःविषयी बोलताना असं म्हणू नका की मी पळायला जातोय, तर असं म्हणा की मी एक रनर आहे. असं केलंत तर तुमची पळायला जायची शक्यता जास्त आहे. कारण अशावेळेस तुम्ही कसे वागता हे सांगत नसता, तर तुम्ही कसे जगता हे सांगत असता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








