काम करताना रोज तणाव येतो, तर मग हे फंडे वापरून बघा

लल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हग पिम
    • Role, आरोग्य संपादक

नोकरीचं ठिकाण पूर्वीपेक्षा जास्त तणावपूर्ण बनलं आहे का? आपण ओझ्याखाली दाबले गेलो आहोत, असं कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त वाटू लागलं आहे का? सतत येणाऱ्या ई-मेलमुळे कर्मचाऱ्यांना ताण जाणवतो का? ही समस्या वाढत असल्याचं नुकताच मिळालेला डेटा आणि केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे.

एका व्यावसायिकाने यावर तोडगा काढला आहे आणि इतरांनीही तो अंमलात आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या व्यावसायिकाने आठवड्यातून चार दिवसच काम करण्याचा उपाय सुचवला आहे.

अंकुर शहा 'महाबीज' नावाची फुटवेअर कंपनी चालवतात. ते सांगतात काही महत्त्वाचं कारण असेल तर ते आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातले चार दिवस ऑफिस वगळता कुठूनही काम करण्याची परवानगी देतात. अट केवळ एकच ती म्हणजे कर्मचाऱ्यांनी ईमेल किंवा स्काईपवरून संपर्कात रहावं.

शिवाय त्यांची कंपनी कर्मचारी किती वेळ काम करतो, याचा हिशेबही ठेवत नाही.

लंडनमधल्या कर्मचाऱ्यांनी महिन्यातून एकदा होणाऱ्या मीटिंगला हजर असावं, एवढी अपेक्षा असते.

कर्मचाऱ्यांना घरी बसून किंवा कुठल्याही दूरवरच्या ठिकाणावरून आणि त्यांना हवं त्या वेळेत काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर कर्मचारी आनंदी राहतील आणि त्यांची उत्पादन क्षमताही वाढेल, असा कंपनीला विश्वास वाटतो.

नोकरी, जॉब, ताण, दडपण, दबाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कामाचा ताण

आपल्या पूर्वीच्या व्यवसायाविषयी बोलताना शहा सांगतात, "कामाच्या अतिताणाचा मला अनेकदा त्रास व्हायचा. त्यामुळे आठवड्यातून चारच दिवस काम करणं नैसर्गिक असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे सतत उत्तम काम करण्याची मानसिकता सहज तयार होते."

कामाच्या ताणाचा थेट राष्ट्राच्या आरोग्यावरच परिणाम होऊ शकतो, असं शहा यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते बरीच आकडेवारीही देतात.

NHS डिजिटल या संस्थेनं इंग्लंडमध्ये डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना दिलेल्या फिटनेस सर्टिफिकेटची आकडेवारी दिली आहे.

काम करण्याइतपत कर्मचाऱ्याची तब्येत बरी नसेल तर डॉक्टर कर्मचाऱ्याने घेतेलेल्या रजेच्या पहिल्या सात दिवसांनंतर हे सर्टिफिकेट देतात.

मज्जातंतू आणि तणावाशी संबंधीत आजारांसाठी 2016-17 या वर्षात 5,76,000 फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले होते. तर पुढच्याच वर्षी म्हणजे 2017-18मध्ये तब्बल 6,20,000 इतके फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले.

काळजीचं कारण

या आकडेवारीसंदर्भात रॉयल कॉलेज ऑफ जीपीचे उपाध्यक्ष प्राध्यापक मार्टिन मार्शल म्हणतात, "अनेकांसाठी काम हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हितकारक ठरू शकतं, असं पुराव्यांवरून सिद्ध होतं. मात्र कामाच्या ताणामुळे लोक आजारी पडू लागले तर ते काळजीचं कारण आहे आणि हल्ली अनेकांच्या बाबतीत हे घडत आहे, असंच ही आकडेवारी सांगते."

The Health and Safety Executive या संस्थेने ONS लेबर फोर्स सर्वेक्षणाचा डेटा वापरून काही माहिती सादर केली आहे. त्यानुसार 2017-18 या वर्षात ब्रिटनमध्ये 5,95,000 कर्मचारी कामाचा ताण, नैराश्य आणि चिंता याने ग्रासले आहेत. वर्षभरापूर्वी हीच आकडेवारी 5,26,000 इतकी होती.

या कारणांमुळे जवळपास कामाचे 57% दिवस वाया गेल्याचं HSEचं म्हणणं आहे.

नोकरी, जॉब, ताण, दडपण, दबाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑफिस

HR प्रोफेशनल्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या The Chartered Institute of Personnel and Development (CIPD) या संस्थेने आपल्या सदस्यांमध्ये नुकताच एक सर्वे केला आहे. त्यानुसार मानसिक अनारोग्य आणि कामाचा अतिताण या कारणांमुळे कर्मचारी दीर्घ रजेवर जाण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सर्वे करण्यात आलेल्या सदस्यांपैकी 55% लोकांनी 2017 साली कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आणि चिंता वाढल्याचं म्हटलं आहे. तर वर्षभरापूर्वी हे प्रमाण 41% होतं.

CIPDच्या रॅचेल सफ म्हणतात, "आधुनिक काळातल्या ऑफिसमध्ये शरीरापेक्षा मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम होत आहे. कामाच्या ठिकाणी ताण वाढवणाऱ्या पद्धती आणि तणाव दूर करण्याच्यादृष्टीने फारच कमी कंपन्या काम करत आहेत."

मात्र हल्ली अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचं कर्मचारी संघटना असलेल्या CBIचं म्हणणं आहे.

नोकरी, जॉब, ताण, दडपण, दबाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑफिसमधल्या कामाचा ताण वाढत चालला आहे.

कामाच्या ठिकाणचं आरोग्य महत्त्वाचा मुद्दा आहे का, याविषयीचं उत्तर देणाऱ्या 63% कंपन्यांपैकी निम्म्याहून अधिक कंपन्यांच्या मालकांनी या समस्येवर केवळ उपाय करणं पुरेसं नसून त्या उद्भवूच नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

या समस्येविषयी चर्चा करणे, त्याविषयी अजूनही असलेले गैरसमज दूर करणे आणि या समस्येने ग्रासलेल्या कर्मचाऱ्यांना मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपन्यांनी अजून बरंच काही करण्याची गरज असल्याचं CBI मध्ये चीफ यूके पॉलिसी अधिकारी असलेले मॅथ्यू फेल मान्य करतात.

कंपन्यांसाठी मदत

मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरुकता आणि खुलेपणा असण्याचा अर्थ म्हणजे कंपनी अधिक कर्मचारीधार्जिणी आहे आणि याबाबतीत कंपनीकडून मदत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही मोकळेपणा वाटतो.

पूर्वी कदाचित नैराश्य आणि चिंता या बाबत कर्मचारी फारशी वाच्यता करायचे नाहीत आणि त्यामुळेच त्याबद्दलची फारशी आकडेवारी उपलब्ध होत नसावी.

अर्थात मानसिक आरोग्याविषयीच्या समस्यांची कामाच्या ठिकाणाशी संबंधित नसलेलीही अनेक कारणं आहेत.

नोकरी, जॉब, ताण, दडपण, दबाव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑफिसमध्ये काम करताना ताण येणं साहजिक

मात्र मानसिक आरोग्य आणि रोजगार याविषयी वर्षभराहूनही अधिक काळापासून जो अभ्यास केला जातोय त्या अहवालानुसार ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे.

HBOS कंपनीचे माजी अध्यक्ष लॉर्ड स्टिव्हनसन आणि चॅरिटी माईंडचे पॉल फार्मर यांनी एक दीर्घकालीन योजना तयार केली आहे. ज्याअंतर्गत सर्वच संस्थांना कामाच्या अतिताणामुळे होणाऱ्या मानसिक आजारांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित केलं जाईल.

सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी कामाचा अतिताण असलेले कर्मचारी ओळखून त्यांना मदत पुरवावी, असा सल्ला ते देतात.

त्यांनी ऑक्टोबर 2017 सालीच ब्रिटेनमध्ये कामाच्या ठिकाणच्या ताणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा धोक्याचा इशारा दिला होता. आता ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचं दिसतंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)