'हिंदू मुलींनी हिंदू मुलांशीच लग्न करावं' : भाजप खा. गोपाळ शेट्टी यांचं मत

एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला, तर त्यांच्या भावंडांची लग्न ठरतानाही अडचण येते, असं गोपाळ शेट्टी म्हणाले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला, तर त्यांच्या भावंडांची लग्न ठरतानाही अडचण येते, असं गोपाळ शेट्टी म्हणाले.

पालकांच्या परवानगीशिवाय लग्न करणाऱ्या मुलींसाठी लग्नाचं कायदेशीर वय 18 वर्षांऐवजी 21 करण्यात यावं, असं एक खासगी विधेयक मुंबईतले भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गुरुवारी संसदेत मांडलं. या विधेयकावरून त्यांच्यावर टीका होत असताना बीबीसी न्यूज मराठीने त्यांच्याकडून अधिक जाणून घेतलं.

मुलींना येणारी समज, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह, 'लव्ह जिहाद', संस्कृती आणि परंपरा, अशा अनेक विषयांवर बीबीसी न्यूज मराठीच्या प्रतिनिधींनी तसंच प्रेक्षकांनी खासदार शेट्टी यांना अनेक प्रश्न विचारले. (संपूर्ण मुलाखत या बातमीच्या तळाशी पाहू शकता). त्यातले 9 महत्त्वाचे प्रश्न खाली दिले आहेत :

1. मतदानाचा अधिकार 18व्या वर्षी, मग लग्नाचा अधिकार का नको?

मुलींना 18व्या वर्षी लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण तो जसा मुलीचा अधिकार आहे, तसाच आईवडिलांचाही अधिकार असतोच की आपल्या मुला-मुलींवर! मुलींचं भावी जीवन उत्तम घडावं, असंच आईवडिलांना वाटत असतं. लग्न करू नका, असं कोणीच म्हणत नाही. पण तिने परिपक्व व्हावं आणि मगच आपल्या आयुष्याचा विचार करावा.

मतदानाच्या अधिकाराबाबत तुम्ही विचारलं. गेल्या निवडणुकीत लोकांनी मला मतं दिली. आता त्यांना माझं नाव पटलं नाही, तर ते पुढल्या निवडणुकीत मला नाकारू शकतात. पण लग्न केलं, तर आपण वेगळा विचार करू शकतोच, असं नाही.

2. अनेक लग्न मोडतात, या तुमच्या दाव्यांना आकडेवारीचं पाठबळ आहे का?

सध्या तरी माझ्या हाती कोणतीही आकडेवारी किंवा संशोधन नाही. हे खासगी विधेयक आहे. ते सोडत पद्धतीने चर्चेला येतं. ते चर्चेला आलं की हे सगळे मुद्देही पुढे येतील. ही चर्चा म्हणजेही संशोधनाचाच भाग आहे. आकडेवारीही जमा होईल.

विधेयक मांडल्यापासून मला समाजमाध्यमांवरून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रभरातून अनेकांनी मला संदेश पाठवले आहेत. मी अनेक वर्षं सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहे. त्या अनुभवातूनही काही गोष्टी सातत्याने समोर आल्या आहेत. त्यांचाही आधार घेता येईल.

आकडेवारी किंवा माहिती ही अचूक नसते. त्या माहितीबाबतही वाद होतातच. एकेकाळी जन्म झाल्या झाल्या मुलींची लग्नं ठरवली जात होती. त्यानंतर हे वय 13-14 एवढं पुढे गेलं. आता ते 18 आहे. हे बदल होतच असतात.

3. आंतरजातीय लग्नाला तुमचा विरोध आहे का?

आंतरजातीय लग्नाला माझा मुळीच विरोध नाही. वयाच्या 18व्या वर्षाआधी मुलीचं लग्न होऊ नये, हादेखील माझा मुद्दा नाही. तसा कायदाच आहे. माझा मुद्दा एवढाच की, लग्न आईवडिलांच्या संमतीने व्हावं.

16व्या वर्षी मुलींचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि मग कायद्याने सज्ञान होण्याची वाट त्या बघतात. वयाची 18 वर्षं पूर्ण झाली की आईवडिलांनाही न सांगता त्या लग्न करतात. शिकलेली मुलं बऱ्याचदा लग्नाची घाई करत नाहीत. पण इतरांच्या बाबतीत तसं होत नाही.

4. तुमच्या पक्षाचीही हीच भूमिका आहे का?

माझ्या पक्षाची ही संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीतूनच मला हे ज्ञान प्राप्त झालं आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. 18व्या वर्षी मुलींना समज नसते, असाही माझा आरोप नाही.

उलट आजकालची लहान मुलं जास्तच हुशार आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यांना सगळं काही समजतं. माझी मुलगी माझ्यापेक्षा जास्त शिकली असली, तरी तिला माझ्यापेक्षा जास्त कळतं असं नाही. माझं तिच्याकडे काटेकोर लक्ष असतं. ती काय करते, कुठे जाते, यावर आईवडिलांचं लक्ष असणं गरजेचंच आहे.

5. UNICEFच्या आकडेवारीनुसार भारतातल्या जवळपास 27 टक्के मुलींची लग्न 18 वर्षांपेक्षा लहान असताना होतात. या पालकांच्या मानसिकतेबाबत तुम्ही का बोलत नाही आणि हा भाजपचा दुटप्पीपणा नाही का?

या प्रश्नावर कालपासून चर्चा सुरू आहे म्हणजे माझ्या पक्षातल्या लोकांनाही माझा मुद्दा कळला असणार. त्यांच्यापैकी कोणीही माझा मुद्दा खोडून काढलेला नाही. म्हणजे त्यांचं समर्थनच असणार, असं मानून मी पुढे जात आहे.

बालविवाह

फोटो स्रोत, AFP/STRDEL

फोटो कॅप्शन, बालविवाह

आपल्या देशात बालविवाहांना कायद्याची मंजुरी नाही. आता कुठेतरी होत असेल आणि ते सरकारपर्यंत पोहोचत नसेल, तर तो भाग वेगळा आहे. ही आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि जबाबदारी आहे. तुमच्या-आमच्यासारख्या लोकांनी ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला हवी.

6. लव्ह-जिहादचा उल्लेख तुम्हाला करायचा होता का? लव्ह-जिहादला विरोध करण्यासाठी हे विधेयक आहे का?

मी आणि माझा पक्ष लोकशाही मानतो. म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाला माझा विरोध नाही. मी माझ्या विधेयकात लिहिलं असलं, तरी माझ्या म्हणण्याचा उद्देश हा की, असं लग्न करत असताना आपण जे करतो ते बरोबर आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांची बैठक योग्य हवी.

लग्न झाल्यानंतर अनेकांना पश्चात्ताप होतो. सर्वोच्च न्यायालयातही असे अनेक खटले येतात. त्या वेळी सर्वोच्च न्यायालय कायद्यानुसार जोडप्याच्या बाजूनेच निकाल देतं. त्यामुळेच हे वय वाढवून 21 करावं, असं मला वाटतं.

7. तुम्ही मुलींचा हक्क काढून घेत आहात, असं नाही का वाटत?

मी मुलींना आणखी सुरक्षित करत आहे. आई-वडिलांच्या संमतीने ठरवून केलेली लग्नं मोडली तर ती मुलगी एकटी नसते. तिच्या मागे तिचे आईवडील ठामपणे उभे राहतात. प्रेम विवाहात ती मुलगी एकटी पडते. अनेकदा आईवडील आपली भूमिका सोडायला तयार होत नाहीत आणि त्या मुलीची परवड होते.

बीबीसी मराठीशी बोलताना गोपाळ शेट्टी

फोटो स्रोत, Facebook Live screengrab

फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीशी बोलताना गोपाळ शेट्टी

लग्न झाल्यानंतर अनेक गोष्टी घडत असतात. एक समाज म्हणून काही सुधारणा आपण करत असतो. कायद्याच्या माध्यमातून सरकारही काही करत असते. हे मुलींच्या हिताचं विधेयक आहे, त्याने मुलींना नक्कीच लाभ होईल.

8. हिंदू मुली मुस्लीम घरांमध्ये जातील, याची भीती वाटते का?

वर्तमान स्थिती पाहिली तर असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. पण ते आपल्या हातात नसतं. लोकशाही व्यवस्थेत त्यांना तो अधिकार दिला आहे. एक हिंदू म्हणून मला असं नेहमीच वाटतं की, हिंदू मुलींनी हिंदू मुलांशीच लग्न करावं. पण म्हणून त्यांनी करूच नये, असं बंधन मी त्यांच्यावर लादत नाही.

लव्ह-जिहाद हे माझ्या डोक्यात नव्हतं. सरकारने 18 वर्षांचं वय ठरवलं आहे. मुलगी कॉलेजमध्ये जेमतेम शिकते आणि तिला संसार, घरगृहस्थी वगैरे कळण्याआधीच ती लग्नात बांधली जाते. हे होऊ नये, यासाठीच मी हे विधेयक मांडलं आहे.

एक कूळ, जात, धर्म, हे काही आपण तयार केलेलं नाही. ते परंपरेने चालत आलेलं आहे. त्यानुसारच हे जग चाललं आहे. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला, तर त्यांच्या भावंडांची लग्न ठरतानाही अडचण येते.

लव्ह-जिहाद

फोटो स्रोत, AFP/CHANDAN KHANNA

फोटो कॅप्शन, लव्ह-जिहादच्या प्रकरणांमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली होती.

भाजप नेहमीच जातीविरोधी भूमिका घेत असल्याचा दावा करतो. या दाव्याशी तुम्ही असहमत आहात का?

अजिबात नाही. संघ परिवाराच्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे. धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारली आहे. पण माझ्या भूमिकेबद्दल मी ठाम आहे आणि मी ती मांडणार. मी हे विधेयक मांडल्यानंतर आता चर्चा होत आहे. त्यातूनच एक मंथन होईल.

9. फ्रान्समध्ये लग्नासाठीचं वय 16 करण्यात आलं आहे. आपण उलट्या दिशेने प्रवास करत आहोत का?

पाश्चिमात्य संस्कृती आपण स्वीकारायची की नाही, हा चर्चेचा मुद्दा आहे. फ्रान्समध्ये मुलगा जन्माला आला की तिथे सरकार मायबाप असतो. आपल्याकडे अजूनही आईवडील नावाची संस्था आहे.

line

संपूर्ण मुलाखत इथे पाहू शकता -

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

तुम्ही हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)