पंढरपूरच्या वारीमध्ये मनुवादी, सनातनी विचारांचीही 'दिंडी'

यंदाच्या वर्षी पंढरीची वारी 29 जून ते 17 जुलै या काळात होत आहे. वारीचा परतीचा प्रवास पंढरपूरहून 21 जुलैला सुरू होईल.

वारीत सर्व जाती-धर्माचे, वयोगटाचे लोक सहभागी होतात. वारी ही सर्व प्रकारची विषमता नाकारणारी, सर्वांना सोबत घेऊन जाणारी चळवळ. वारकरी संप्रदायाने कायमच अंधश्रद्धा, रुढी, सनातनी विचारांना विरोध केलेला दिसून येतो.

मग वारीमध्ये सनातनी, मनुस्मृतीला मानणाऱ्या विचारांचा शिरकाव कसा झाला?

बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी 2018 सालच्या आषाढी वारीनिमित्त याचाच आढावा घेत लिहिलेला लेख, पुन्हा प्रसिद्ध करीत आहोत

"मनुस्मृती हा वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचा ग्रंथ आहे. प्रत्येक संताने मनुस्मृतीचाच आधार घेतला आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा हे मनुस्मृतीवरच आधारलेली आहे. मनुस्मृतीत जे लिहिलं गेलं तेच गाथेतून मांडलं गेलं आहे. भगवंताकडनं मनूला ज्ञान झालं आणि तेच मनूनं मानवाला सांगितलं. पण आपल्याकडे मनुस्मृती लोकांना समजलीच नाही. तिचा अर्थच अनेकांना समजत नाही."

हे विचार शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांचे नाहीत, तर ते आहेत निवृत्ती महाराज वक्ते यांचे!

85 वर्षीय वर्षीय निवृत्ती महाराज वक्ते हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेले वक्ते यांचं वास्तव्य पंढरपूरमध्ये असतं. गेली अनेक दशकं ते कीर्तन-प्रवचन करत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला वारकरी संप्रदायातील ज्या व्यक्तींनी विरोध दर्शवला होता त्यापैकी वक्ते एक होते.

राज्य सरकारने त्यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारानं गौरवलं आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो.

खरं तर वारकरी संप्रदाय ही मनुस्मृतीतील विषमता नाकारणारी एक चळवळ म्हणून ओळखली जाते. जेव्हा याच वारकरी संप्रदायातील वक्ते यांच्यासारखा कीर्तनकार थेट मनुस्मृतीचं समर्थन करतो तेव्हा ती आश्चर्याची गोष्ट मानली जाते.

पण वारकरी संप्रदायातले सगळेच काही या भूमिकेचं समर्थन करत नाहीत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बडवे हटाव मोहिमेमध्ये अग्रभागी राहिलेले डॉ. भारत पाटणकर यांचं म्हणणं आहे की, वक्ते जे बोलत आहेत ते वारकरी संप्रदायात घुसलेल्या सनातनी हिंदुत्ववाद्यांचं प्रतीक आहे.

"वक्ते महाराज जे बोलत आहेत त्यावरुन कल्पना येते की सनातनी विचारांची मंडळीही वारकरी संप्रदायात कशाप्रकारे घुसलेली आहेत. वक्ते महाराज हे अशा प्रकारचे एकटे कीर्तनकार नाहीत. त्यांच्यासारखे इतरही काही सनातनी हिंदुत्ववादी कीर्तनकार वारकरी संप्रदायात आहेत. ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पण ते आहेत हे नक्की. या मंडळींची भिस्त अर्थातच मनुस्मृतीवर आहे. खरं तर मनुस्मृतीत जे काही मांडलं आहे ते सगळं वारकरी परंपरेनं नाकारलं आहे," पाटणकर सांगतात.

पाटणकर पुढे सांगतात की, "वारकरी परंपरेत हिंदुत्ववाद्यांचा शिरकाव पहिल्यांदा बडव्यांच्या माध्यमातून झाला. ते केवळ विठ्ठल मंदिरात अस्पृशांना प्रवेश रोखून थांबले नाहीत तर विठ्ठलाबाबत अनेक कथा रचून पवित्र-अपवित्रतेच्या कल्पना त्यांनी पसरावल्या. शूद्र समजल्या जाणाऱ्या नामदेवांसोबत विठ्ठल जेवला म्हणून विठ्ठल अपवित्र झाला आणि त्याचे शुद्धीकरण करण्याची गरज आहे अशी कथा सांगत खुद्द विठ्ठलावरच एक प्रकारे मनुस्मृतीची अंमलबजावणी केली."

"विठ्ठल पूजेच्या वेळी ऋग्वेदातील पुरुषसूक्त म्हटले जाणे हे सुद्धा वारकरी परंपरेशी विसंगत आहे. पुरुषसूक्तामध्ये असे म्हटलं आहे की, विश्वपुरुषाच्या तोंडातून ब्राह्मण, बाहुंमधून क्षत्रिय, धडामधून वैश्य आणि पायामधून शूद्र जन्माला आले. वर्णभेदाचा पाया हे पुरुषसूक्त आहे आणि वारकरी संप्रदाय वर्णभेदाच्या पलीकडे आहे. विठ्ठल मंदिरातून बडवे जरी हटले असले तरी पुरुषसूक्तातून बडव्यांचा हा विचार मात्र कायम आहे."

"हिंदुत्ववाद्यांकडून वारीत शिरकावाचा प्रयत्न सुरूच असतो. विश्व हिंदू परिषदेनंही वारीच्या काळात काही वर्षांपूर्वी पंढरीच्या वाळवंटात मेळावे आयोजित करून शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. ताजा शिरकाव करण्याचा प्रयत्न म्हणजे गेल्या वर्षी संभाजी ऊर्फ मनोहर भिडेंच्या शिवप्रतिष्ठानकडून तलवारी घेऊन वारीत शिरण्याचा प्रयत्न! मात्र वारकऱ्यांनी त्यांना बाहेर काढायला पोलिसांना भाग पाडले. आता पुन्हा या वर्षी त्याच्याही पुढे पाऊल टाकत ज्ञानेश्वर आणि तुकोबांपेक्षा मनु एक पाऊल पुढे आहे असं वक्तव्य भिडेंनी वारीत केले आहे. वारकरी संप्रदायानं सहिष्णुता, समानता, बंधुतेचा जो विचार प्रचंड दडपशाहीतून टिकवून ठेवला तो यांना मोडायचा आहे. त्यामुळे हा शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे."

संविधानातील मूल्यांचा आग्रह धरत प्रबोधन करणारे कीर्तनकार म्हणून ओळख असलेले श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सनातनी विचारांचे समर्थन करणाऱ्या काही संस्थांनी तर असा फतवा काढला आहे की सोन्नरांचं कीर्तन आयोजित करू नका.

"ज्यांनी तुकाराम महाराजांची गाथा बुडवायला लावली, ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना बहिष्कृत केलं ती मंडळी आजही अस्तित्वात आहेतच. मी समतेचा विचार मांडत आहे. माझी भूमिका अशी आहे की वारकरी संप्रदाय हा स्वातंत्र्य-समता-बंधुता यांचा आग्रह धरणारा पुरोगामी विचार आहे. हेच मी मांडत आहे. मात्र काही प्रवृत्तींना हे अडचणीचं ठरत असावं."

"काही वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकालाही वारकरी संप्रदायातील काही मूठभर लोकांनी विरोध केला. काही संस्था-संघटनांनी वारकरी संप्रदायातील काही मंडळींना हाताशी धरून वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. कारण वारकरी चळवळ ही मुळात अंधश्रद्धेच्या विरोधातील आहे. संतांचं कार्य आणि विचार हे अंधश्रद्धेला फाटा देणारे होते."

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जेव्हा आणला जाणार होता तेव्हा सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीकडून कडाडून विरोध दर्शवला गेला होता. त्यावेळी वारकरी संप्रदायातून ज्या मंडळींनी विधेयकाला विरोध केला त्यांची सनातनने साथ दिली होती.

सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "वेगवेगळ्या महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविरोधात केलेल्या प्रयत्नांमध्ये सनातनचे साधक सहभागी झाले होते. निवृत्ती महाराज वक्ते, प्रकाश महाराज जवंजाळ, नरहरी महाराज चौधरी अशा महाराजांसोबत सनातनच्या साधकांनी कायद्याला विरोध करण्याचे काम केले होते."

सनातनी व्यवस्थेला पर्याय म्हणून वारकरी संप्रदाय उभा राहिला हा विचार सनातन संस्थेला मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की, "मुळात काही मंडळींकडून हा एक प्रकारचा गैरसमज पसरवण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय हा सनातन धर्माचा पाया आहे. वारी हे सनातन धर्मातील व्रत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा सनातनी व्यवस्थेला पर्याय म्हणून उभा राहिलेला नाही."

या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आम्ही थेट वारीत पोहचलो आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरी मुक्कामी असताना ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांची भेट घेतली.

टिळकांनी याविषयी बोलताना सांगितलं, "वारकरी संप्रदायानं तत्कालीन बंदिस्त परंपरेपासून पुढे जात एक नवी परंपरा उभी केली. आधीच्या मर्यादित चौकटीत ज्या समाजघटकांना स्थान नव्हते त्यांना ओळख प्राप्त करून देणे ही या संप्रदायाची सर्वात मोठी ताकद आहे. सनातन संस्थेसारख्यांचे विचार असणाऱ्यांना वारकरी संप्रदायाशी जुळवून घ्यायचं असेल तर त्यांना वारकरी संप्रदायानं जी मूल्यं मांडलेली आहेत त्यांचा स्वीकार करून यावं लागेल. त्यातील पहिलं समता, दुसरा बंधुभाव, तिसरं प्रेम, चौथं नीतियुक्त आचार आणि पाचवं सर्वाभूती प्रेम. पण आम्ही आमची मूल्यव्यवस्थाही ठेऊ आणि तुमच्याशी येऊन एकरूप होऊ असा त्यांचा आग्रह असेल तर हे अशक्य आहे, विसंगत आहे. तेल पाण्याशी एकरूप होत नाही तसं ते ज्या मूल्यांचा आग्रह धरत आहे त्यानुसार ते वारकरी संप्रदायासोबत येऊ शकत नाहीत."

संभाजी भिडे यांनी मनुबाबत केलेले विधान हे त्यांचं संत विचाराचं तोकडं आकलन दर्शवतं अशी टिळक यांची भूमिका आहे.

ते म्हणतात, "संभाजी भिडेंनी जे काही विधान केले आहे त्यावर मी असे म्हणेल की संत विचाराचं तोकडं आकलन असल्यानं गुरुजी असं बोलले आहेत. मनुनं व्यक्तिगत धर्माचरणापेक्षा सामूहिक धर्माचकरणाचा आग्रह धरला म्हणून तो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या एक पाऊल पुढे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुळात वैदिक धर्म हाच व्यक्तिप्रधान होता आणि संतांनी तो समूहप्रधान बनवला आहे. गुरुजींना हे कळालं नाही म्हणून त्यांनी ते विधान केलं असावं."

संत साहित्याचे आणखी एक अभ्यासक डॉ. किशोर सानप यांचं म्हणणं आहे की, "सनातनी हिंदुत्ववादी आणि वारकरी संप्रदाय यांची तुलनाच होऊ शकत नाही. सनातनी संस्थांची भूमिका तत्वत: मूलतत्ववादी आणि कट्टरवादी आहे. वारकऱ्यांची भूमिका मुळातच मूलतत्ववादी, कट्टरवादी आणि जातीयवादी नाही. या दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही. वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंना त्यामध्ये प्रवेश नाही देत तर जगातील सर्वांना सोबत घेतो. हिंदुत्ववाद्यांची संकल्पना आणि वारकरी संप्रदायाची संकल्पना वेगवेगळी आहे. हिंदुत्ववादी एका विशिष्ट अजेंड्याला घेऊन चालतात. आग्रहीपणे सर्व ठिकाण्यांवर कब्जा करण्याचं त्यांचं एकमेव लक्ष्य असतं. हे बोलतात एक मात्र त्यांचा अजेंडा दुसराच असतो."

या सगळ्या चर्चेबाबत सर्वसामान्य वारकरी काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरांची पालखी पुणे जिल्ह्यातील वाल्हे मुक्कामी असताना आम्ही तिथे जाऊन काही वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोललो.

त्यातील 1988 पासून पंढरीची वारी करणाऱ्या सदाशिव विठ्ठल बोरगे यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे.

"हा संप्रदाय पुरोगामी विचारांचा क्रांतिकारी संप्रदाय आहे. कबिरांचा प्रभाव असलेले, अनगडशहासारख्या मुस्लीम सूफी संतांशी सलोख्याचे संबंध असणारे संत तुकाराम यांचा हा संप्रदाय आहे. प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी मराठीत लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा संप्रदाय आहे. या पुरोगामी संप्रदायाची आणि प्रतिगामी सनातनी मंडळींची सोबत होऊच शकत नाही. मनुस्मृतीत लिहिलेल्या गोष्टींना विरोध करतच वारकरी संप्रदाय उभा राहिला आहे. त्यामुळे मनूची ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांसोबत तुलनाच होऊ शकत नाही. हे संत मनूच्या कैक पावलं पुढे होते," बोरगे सांगतात.