You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ताजोद्दीन महाराज: विठ्ठलाला आयुष्य समर्पित करणारा मुस्लीम कीर्तनकार
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचं कीर्तन करतानाच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने सप्टेंबर 2021 मध्ये निधन झालं होतं. मुस्लीम धर्माचा त्याग न करता वारकरी संप्रदायाची जीवनशैली अंगीकारणारे ताजोद्दीन महाराज यांना हिंदू-मुस्लीम सलोख्याचे उत्तम उदाहरण म्हणून अद्यापही ओळखलं जातं.
जन्माने मुसलमान असलेल्या ताजोद्दीन महाजारांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला नव्हता. पण, आध्यात्माची आवड असल्याने लहानपणीच त्यांनी वारकरी संप्रदायाची जीनवशैली अंगीकारली होती.
कुटुंब आणि समाजाचा विरोध झुगारून त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार, समाज प्रबोधन, हिंदू-मुस्लीम ऐक्य, सामाजिक एकता आणि एकोप्याचा संदेश दिला.
गावातील भारूड आणि नाटकांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास प्रसिद्ध कीर्तनकारापर्यंत कसा झाला? मुस्लीम कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे ताजोद्दीन महाराज होते तरी कोण? त्यांच्या जीवनावर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.
कोण होते ताजोद्दीन महाराज?
ताजोद्दीन महाराजांचं पूर्ण नाव ताजोद्दीन नूरामत शेख.
महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला.
ताजोद्दीन महाराजांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही बोधलापुरीचे माजी सरपंच मधुकर साळवे यांच्याशी संपर्क केला. ते म्हणतात, "लहानपणीच ताजोद्दीन महाराज आळंदीला निघून गेले होते. त्यांना आध्यात्माची फार आवड होती."
बोधलापुरीचे ग्रामस्थ त्यांना भारूड करणारे म्हणून ओळखत. गावोगावी जाऊन ते नाटकांच्या माध्यमातून भारूड सादर करत. प्रसिद्ध कीर्तनकार बनण्याचा त्यांच्या प्रवास खरा गावातूनच सुरू झाला होता.
ह.भ.प. कीर्तनकार आणि गायक किशोर महाराज दिवटे हे ताजोद्दीन महाराजांना खूप वर्षांपासून जवळून ओळखत. बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "ताजोद्दीन महाराज भारूडाच्या माध्यमातून कीर्तनाकडे वळले. गावातच त्यांनी भारूड करायला सुरूवात केली. त्यामुळे कीर्तनाची गोडी निर्माण झाली. गेल्या 40 वर्षांपूर्वी ते कीर्तन करत होते."
ताजोद्दीन महाराज नाथ महाराजांचं भारूड आणि गावोगावी जाऊन सोंग करत असत.
मधुकर साळवे पुढे म्हणतात, "ताजोद्दीन महाराज कृष्ण आणि राधेची गाणी म्हणायचे. ते स्वत: राधा बनत आणि लहान मुलांना कृष्ण बनवून गायन करत."
वारकरी संप्रदाय आणि ताजोद्दीन महाराज
लहानपणापासूनच आध्यत्माची गोडी असलेले ताजोद्दीन महाराज पुढे वारकरी परंपरेशी जोडले गेले.
गीता, कुराण या धर्मग्रंथांचा त्यांनी गाढा अभ्यास केला होता. या दोन्ही ग्रंथांच्या अभ्यासानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचा स्वीकार केला.
ताजोद्दीन महाराजांना जवळून ओळखणारे म्हणतात, ताड-हदगावचे तुका बाबा हे त्यांचे आध्यात्मिक गुरू असल्याची माहिती आहे.
किशोर महाराज दिवटे पुढे सांगतात, "वारकरी सांप्रदायाच्या नियमावली अंतर्गत ते सर्व करायचे. वारकरी सांप्रदायाचा वारसा त्यांनी जोपासला होता."
ताजोद्दीन महाराजांची पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. नित्यनेमाने ते पंढरपूरची वारी करायचे.
ताजोद्दीन महाराज 40 वर्षांपासून वारकरी सांप्रदायासोबत जोडले गेले होते. वारकरी संप्रदायाचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला.
बोधलापुरी गावाचे ग्रामस्थ नासिर शेख म्हणतात, "ताजोद्दीन महाराजांचा जन्म मुस्लीम धर्मात झाला असला तरी, त्यांनी कामय हिंदू धर्माची आणि वारकरी संप्रदायाची सेवा केली. ते जन्माने मुस्लीम असले तरी त्यांची हयात हिंदू धर्माच्या सेवेत गेली."
ताजोद्दीन महाराजांनी वारकरी सांप्रदायाचे संस्कार जोपासले होते. कोणताच धर्म चुकीचा संदेश देत नाही, अशी शिकवण ते नेहमी कीर्तनात द्यायचे.
कीर्तनकार ताजोद्दीन महाराज
घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत, पोलीस कर्मचारी योगेश गायके कीर्तनकार आहेत. ताजोद्दीन महाराजांशी त्यांचा बऱ्याचवेळा संपर्क आलाय.
ते म्हणतात, "मुस्लीम कीर्तनकार नेमकं सांगतो काय? याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्सूकता होती. सुरूवातीला ताजोद्दीन महाराजांच्या कीर्तनाच्या कॅसेट निघायच्या. त्यामुळे ते हळूहळू लोकांमध्ये प्रसिद्ध झाले."
मुस्लीम कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजोद्दीन महाराजांची आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्येही कीर्तनं होत असत.
योगेश गायके पुढे सांगतात, "ताजोद्दीन महाराजांचं कीर्तन मी बऱ्याचवेळा ऐकलंय. कीर्तनात ते हिंदू-मुस्लीम ऐक्याबद्दल बोलायचे. कुराण, गीता आणि वारकरी सांप्रदायाचं तत्वज्ञान सांगायचे. हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाबद्दल त्यांना फार ओढ होती."
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद बाळगला नाही असं ते लोकांना वारंवर सांगत. व्यसनमुक्ती आणि इतर विषयांवर समाजप्रबोधन आणि जनजागृती त्यांच्या कीर्तनाचा अविभाज्य भाग होता.
किशोर महाराज दिवटे म्हणाले, मी अनेकवेळा तीजोद्दीन महाराजांना कीर्तनात त्यांना साथ दिलीये. ते कायम म्हणत, "मी मुसलमान असतानाही कीर्तन करतोय. धर्म वेगळा नाही."
कीर्तन करताना महाराज अनेकवेळा म्हणायचे, "कीर्तन चालू असताना मला मरण आलं तर चांगलं," असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात.
ताजोद्दीन महाराज मध्यंतरीच्या काळात अनेकवर्ष औरंगाबादमध्ये रहात होते. मधुकर साळवे पुढे म्हणतात, "आम्ही त्यांना विनंती केली होती. तुम्ही गावाकडे चला. तेव्हापासून ते गावात आले आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं."
गावात ताजोद्दीन महाराजांनी एक मंदीरही उभारलंय.
कुटुंब आणि समाजाकडून विरोध
मुस्लीम असूनही ताजोद्दीन महाराज वारकरी सांप्रदायाशी जोडले गेले. लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीत लिन होत असत.
कीर्तनकार आणि पोलीस कर्मचारी योगेश गायके पुढे सांगतात, "सुरूवातीला त्यांच्या वडीलांकडून मोठा विरोध झाला. माहितीनुसार, त्यांच्या आईने त्यांना आजोळी ठेवलं. याचठिकाणी त्यांचा वारकरी सांप्रदाय आणि हिंदू धर्माशी संबंध आला."
ताजोद्दीन महाराजांना मुस्लीम समाजाच्या विरोधाचाही सामना करावा लागला होता.
किशोर महाराज दिवटे म्हणाले, "कीर्तन सुरू करण्याच्या सुरूवातीच्या काळात ताजोद्दीन महाराजांना मोठ्या संघर्षाला सामारं जावं लागलं. मुस्लीम समाजाने भरपूर विरोध केला. पण संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी भक्कम उभा होता."
ताजोद्दीन महाराजांवर अत्यसंस्कार
ताजोद्दीन महाराजांवर त्यांच्या जन्मगावी बोधलापुरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पद्धतीने अंत्यसंस्कार झाले.
पोलीस कर्मचारी योगेश गायके म्हणतात, "अंत्यविधी मुस्लीम आणि हिंदू दोन्ही पद्धतीने करण्यात आला. दरम्यान, काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितल्यानंतर अंत्यविधी शांततेत पार पडला."
मुस्लीम संतांची परंपरा
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात, "वारकरी संप्रदाय सर्व धर्मांसाठी खुला आहे. याला खूप वर्षांपासूनची परंपरा आहे."
एकनाथांचे समकालिन शेख मोहम्मह महाराष्ट्रातील सर्वांत मोठे मुस्लीम संत होते. ताजोद्दीन बाबांच्या आधी अनेक मुस्लीम किर्तनकार संतपरंपरेत होऊन गेले आहेत.
संत साहित्याचे अभ्यासक मोर पुढे सांगतात, वारकरी परंपरेचा आधार भागवत धर्माचा आहे. भागवत धर्म आणि इस्लामधील सूफी संप्रदाय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कबीर, कमाल किंवा शेख मोहम्मद यांच्यासारखे संत असोत, याठिकाणी धर्म येत नाही.
संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक म्हणतात, "भागवत धर्म आणि इस्लामधील सुफी पंथ यांचा एकमेकांशी सुसंवाद खूप चांगला आहे. त्यामुळे ताजोद्दीन बाबांसारखा मुस्लीम व्यक्ती वारकरी संप्रदायात येऊन कीर्तनकार होऊ शकतो."
ते पुढे सांगतात, देव आणि भक्तांचं नातं. उपासाना विधी, नैतिकता आणि आचरणावर भर या सूफी पंथ आणि वारकरी संप्रदायातील भक्ती विश्वातील समान गोष्टी आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)