'मांसाहार केल्यामुळे बॉयफ्रेंड द्यायचा त्रास', आत्महत्या केलेल्या पायलट सृष्टीच्या कुटुंबाचे आरोप काय?

राहत्या घरात आढळला एअर इंडियाच्या महिला पायलटचा मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
फोटो कॅप्शन, सृष्टी तुली आणि आदित्य पंडित हे दोघे एकाच प्रशिक्षण केंद्रात शिकत होते
    • Author, प्रियांका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी

प्रियकराच्या जाचाला कंटाळून एअर इंडियात पायलट असलेल्या 25 वर्षीय महिलेनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर संबंधित प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

सृष्टी तुली असं या तरुणीचे नाव असून ती मुंबईत अंधेरीतील मरोळ येथे राहत होती.

या प्रकरणात पोलिसांनी तरुणीचा प्रियकर आदित्य पंडित यास अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पवई पोलिसांना 25 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजताच्या सुमारास मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून अकस्मात मृत्यूची बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस तेथे तपासणीसाठी आले.

तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यात असे आढळले की गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरुन तिचा मृत्यू झाला आहे.

24 नोव्हेंबर 2024 ला कामावरून घरी परतल्यानंतर तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सृष्टी तुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा 27 वर्षीय प्रियकर आदित्य पंडितवर सृष्टीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.

सूचना- या बातमीतील काही तपशील वाचकांना विचलित करू शकतात.

त्या दिवशी काय घडलं?

सृष्टीचे काका विवेककुमार तुली यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या आधी साधारणपणे पाच ते सहा दिवस सृष्टी आणि आदित्य एका घरात राहत होते.

25 नोव्हेंबरला रात्री 1 वाजताच्या सुमारास आदित्य मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी कारने निघाला होता. त्याआधी त्या दोघांमध्ये वाद झाले होते, नंतर फोनवर देखील दोघांचे वाद झाले होते.

दरम्यान, काही वेळानंतर सृष्टीनं आदित्यला कॉल करून आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितल्यानं तो पुन्हा मुंबईला सृष्टीच्या राहत्या घरी आला.

सकाळी घरी परत आल्यानंतर सृष्टी दरवाजा उघडत नव्हती, कॉल्स उचलत नव्हती. त्यामुळे आदित्यनं दरवाजा उघडण्यासाठी चावी बनवणाऱ्या व्यक्तीस तसेच त्यांची एक मैत्रीण उर्वी पंचाळ हिला बोलावून दरवाजा उघडला असता सृष्टीनं गळफास घेतल्याचं आढळून आलं.

त्यांनतर आदित्य यानं सृष्टीला अंधेरीतील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये राहणारे सृष्टीचे काका विवेककुमार तुली यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांना 25 नोव्हेंबरला सकाळी 6.52 वाजता दिल्लीत राहणारी त्यांची मुलगी राशी तुली हिच्याकडून सृष्टीचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर ते त्यांची मुलगी राशी आणि काही नातेवाईंकासोबत त्याच रात्री 8.30 च्या सुमारास थेट मुंबईला पोहोचले.

कुटुंबीयांचे आरोप

आदित्यकडून होणाऱ्या छळाला आणि गैरवर्तनाला कंटाळून सृष्टीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सृष्टीचे काका विवेककुमार तुली यांनी आरोप केला आहे की, मागील काही काळापासून ती आदित्यच्या वागण्यामुळे त्रस्त होती.

आदित्य सृष्टीसोबत सार्वजनिक ठिकाणी अनेकदा गैरवर्तन करायचा, तिचा अपमान करायचा. त्यानं सृष्टीला मांसाहार करण्यापासूनही रोखलं होतं.

सृष्टीसोबत काम करणारे सहकारी आणि तिच्या मैत्रिणी यांच्याकडून देखील विवेककुमार तुली यांना आदित्यच्या सृष्टीसोबतच्या गैरवर्तणुकीबाबत माहिती मिळाली.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

कोणत्याही गोष्टीवरून वाद करून तो सृष्टीला नेहमी ब्लॉक करायचा. तिला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे सृष्टी मोठ्या प्रमाणावर मानसिक ताणामध्ये असायची.

आदित्यविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये सृष्टीचे काका विवेककुमार तुली यांनी अशा काही प्रसंगांचा उल्लेख देखील केला आहे. त्यांनी सांगितलं की एकदा मांसाहार करण्यावरून झालेल्या वादात आदित्य सृष्टीला एकटीला रस्त्यावर सोडून निघून गेला होता.

मूळची उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील सृष्टी 2019 मध्ये दिल्लीतील द्वारका येथे कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)च्या प्रशिक्षणासाठी गेली होती. साधारण दोन वर्षांपूर्वी सृष्टी आणि आदित्य तिथंच एकमेकांना भेटले होते.

नंतर तिथं झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यान CPL चे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर 2023 मध्ये सृष्टीला एअर इंडीया कंपनीत नोकरी मिळाली त्यामुळे तिला मुंबईमध्ये राहायला यावं लागलं.

कायदेशीर कारवाई आणि तपास

एसीपी प्रदीप मैराळे यांनी सांगितलं की, "या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्य पंडितवर संशय व्यक्त केल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे."

एसीपी प्रदीप मैराळे
फोटो कॅप्शन, एसीपी प्रदीप मैराळे यांनी सांगितले की पोलीस पुढील तपास करत आहेत

"याप्रकरणी पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाती लागलेले पुरावे आणि संशयित आदित्य पंडित याची चौकशी चालू आहे." असंही पुढे ते म्हणाले.

दरम्यान येत्या काळात या प्रकरणात अजून कोणकोणते नवीन खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाची सूचना

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

महत्त्वाची सूचना