'आजच्या सर्व जटील प्रश्नांचं उत्तर गांधी विचार आहे' - ब्लॉग

    • Author, लक्ष्मीकांत देशमुख
    • Role, ज्येष्ठ लेखक

आज देश अस्वस्थ आहे. भारतीय संविधान ज्या 'आम्ही भारतीय लोक'साठी निर्माण झालं आहे, त्या लोकशाहीच्या अमृतमहोत्सवी वर्षात ती भारतीय जनता कमालीची अस्वस्थ व हताश आहे. रोजगाराच्या पुरेशा संधी नाहीत म्हणून तरुण वर्गात एक असह्य खदखद आहे.

आर्थिक विषमता पराकोटीची वाढली आहे आणि 80 कोटी लोकांना सरकार देत असलेल्या मोफत धान्यवर जगायची वेळ आली आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार, देशाचा पोशिंदा बळीराजाचे सरासरी मासिक उत्पन्न अवघे 10 हजार रुपये आहे. म्हणजेच शासन निर्धारित किमान वेतनापेक्षाही कमी. तसेच, आंतरराष्ट्रीय परिमाण दोन डॉलरच्या आत आहे.

आज समाजा-समाजात राजकीय स्वार्थासाठी दुही माजवली जात आहे. केंद्रातल्या सरकारचा धर्माधिष्टीत सांस्कृतिक राष्ट्रवाद दलित, आदिवासी व अल्पसंख्यकांना असुरक्षित करीत आहे. त्यांची रोजची जगण्याची लढाई कठीण होत चालली आहे.

अशा रीतीने लोकांना संविधान प्रणित आर्थिक व सामाजिक न्याय नाकारला जात आहे. असं असताना सामान्य लोक सोडा, पण विचारवंत, लेखक - कलावंत आणि नागरी / स्वयंसेवी संस्था पण आवाज उठवू शकत नाहीत. कारण त्यांचा आवाज पद्धतशीरपणे दडपला जात आहे.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सर्व विरोधी पक्ष एकजात हतबल झालेले दिसत आहेत. या उलट केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारचा अजेंडा धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांना छेद देणारा आहे.

रोजीरोटीच्या प्रश्नांऐवजी धार्मिक उन्माद निर्माण करीत जनमानस बधिर केलं जातंय. त्यांची ज्ञानाची भूक आणि अभ्यूदयाची प्रेरणा कमजोर केली जात आहे. देश - समाजासाठी उत्तम काम करून योगदान द्यायची भावना मारली जातेय.

कारण? केंद्रीय सत्तेचे विधिनिषेध शून्य राजकारण, भ्रष्टाचारच्या ऑक्टोपसचा घट्ट बसलेला विळखा, बेरोजगाराची फौज निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आणि भूक-बेकारीची वाढती समस्या. या व अशा अनेक कळीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे बौद्धिक सामर्थ्य आणि प्रामाणिक इच्छा सरकारकडे दिसत नाहीय.

मग अशा परिस्थितीत तुम्ही आम्ही भारतीय लोकांनी, ज्यांच्याकडे भारतीय संविधानाने देशाचे सार्वभौमत्व दिले आहे, त्यांनीच आता 'झाले ते बस झाले' अशा निर्धाराने पुढे आले पाहिजे. पण ते कसे शक्य आहे? हे केवळ भाबडे स्वप्न वा भोंगळ आदर्शवाद तर नाही? प्रबळ सत्तेशी न्याय हक्कासाठी कसा लढा द्यायचा?

या साऱ्या प्रश्न आणि शंका - कुशांकांचे एकच उत्तर आहे. तुम्ही आम्ही साऱ्यांनी थोडे थोडे गांधी झाले पाहिजे.

होय, गांधीजी हे केवळ भारताचे राष्ट्रापिताच नाहीत, तर आपण भारतीय माणसातील उदात्तता, सहिष्णूता व एकमेकांशी धरून बंधुतेने शांततामय सहअस्तित्वाने राहण्याच्या अभिमानस्पद भारतीय वारशाचे ते एक उन्नत व अनुकरणीय प्रतिक आहेत.

गांधीजींनी आपणास काय दिलं?

गांधीजींनी आपणास काय दिलं? निर्भयता दिली, अहिंसक सत्याग्रहाचे शस्त्र व ते चालवण्याचे अभिनव शास्त्र दिले. ते काय आहे? आपला आतला आवाज काय सांगतो हे नीट ऐकायचे. त्यावर शांतपणे साधक बाधक विचार करून निर्णय घ्यायचा. तो इष्ट आणि त्याप्रमाणे कृती करायची.

शांतपणे, समोरच्याला शाब्दिक हिंसा पण होणार नाही अशा पद्धतीने आपले मत सांगायचे, पटवून द्यायचे. कटाक्षाने साधनशुचिता पाळायची. आपले अस्त्र हे सत्य, विवेक आणि अहिंसा आहे. विरोध करताना, निषेध करताना आपण कदापिही प्रेम, करुणा, सद्भाव सोडायचा नाही.

आपला विरोध अन्यायी धोरण व कृतिबद्दल आहे. त्याचे वाहक झालेल्या लोकांविरुद्ध नाही. 'जे खळांची व्यंकटी सांडो' या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे समोरचा माणूस नाही, तर त्याच्या मनातील खलत्व नष्ट करण्यासाठी आपले आंदोलन आहे.

गांधींच्या सत्याग्रहाचे हे साधे सोपे व आचरणात आणायला कठीण नसलेले भारतीय परंपरतले तत्वज्ञान आहे. ते स्वीकारून आपण साऱ्यांनी थोडे थोडे गांधी झालं पाहिजे. अन्याय व अत्याचाराचा होईल तितका प्रतिकार आपण केला पाहिजे.

सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणाबाबत साधक बाधक चर्चा करीत समुहमन जागृत केलं पाहिजे आणि कधी मतदानातून, कधी चर्चा संवादातून तर कधी मोर्चा आंदोलनातून आपला रोष व्यक्त करीत अन्यायाला वाचा फोडली पाहिजे.

सरकार आपलेच आहे, ते परकीय नाही, म्हणून त्याचे विचार आपण बदलू शकतो यावर विश्वास ठेवत काम करणं. हीच तर संविधानकृत लोकशाही आहे.

स्वातंत्र्यलढा देताना गांधीजींनी हेच केलं होतं. सामान्य माणसांच्या मनातली भीती चरखा चालवणे, मूठभर मीठ उचलणे, अहिंसक सत्यागृह करणे अशा साध्या साध्या गोष्टीतून नष्ट केली होती. हीच गांधींप्रणित सविनय प्रतिकारची शिकवण आहे.

असं असलं तरी स्वतंत्र भारतात गांधींना बदनाम करण्याचा पहिल्यापासून प्रयत्न होत आला आहे. अलीकडच्या काळात त्याला अधिक वेग व धार आली आहे. कारण गांधी म्हणजे न्याय, सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव आणि बंधुता हे भारतीय मन-मानसात घट्ट बसलेलं समीकरण आहे. हे समीकरण नष्ट केल्याविना मनुस्मृतीला मानत हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचे स्वप्न साकर होणे शक्य नाही हे भाजप/संघ परिवाराला चांगले माहिती आहे.

म्हणून गांधींबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. त्यांना सत्य काय ते सप्रमाण सांगत असे प्रयत्न विफल व पराभूत करणे गरजेचे आहे. तसेच गांधी व त्यांच्या विचाराची अमरता, जगमान्यता आणि प्रासांगिकता लोकांपुढे आणणं आजच्या विपरीत परिस्थितीत अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रासह सर्व राज्यात गांधी विचार जिवंत ठेवणे व तो पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी सातत्याने काम करण्यासाठी गांधीजींच्या हत्येनंतर अवघ्या 15 दिवसात वर्ध्याला पंडित नेहरू, सरदार पटेल, राजेंद्रबाबू प्रसाद, मौलाना आझाद यांच्यासह सर्व राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीत सर्व प्रांतात लोकवर्गणीतून गांधी भवन निर्माण करून गांधीजीची चेतना जिवंत ठेवण्यासाठी म्हणजेच गांधी 'बाय स्पिरिट' अमर ठेवण्यासाठी काम करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महाराष्ट्रात कोथरूड पुणे येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या नोंदणीकृत नागरी संस्थेमार्फत गांधी भवन ही वास्तू निर्माण झाली.

या गांधी भवनचे संस्थापक होते थोर गांधींवादी नेते मामासाहेब देवगिरीकर. त्यांच्या नंतर बाळासाहेब भारदे आणि सध्या डॉ. कुमार सप्तर्षी त्याची धुरा अध्यक्ष म्हणून वाहत आहेत आणि गांधी विचाराचा प्रसार सातत्याने करीत आहेत.

आजच्या वर वर्णीलेल्या अस्वस्थ परिस्थितीत गांधी विचाराच्या चिकित्सक मांडणीतून आजच्या सर्व जटील प्रश्नावर तोडगा निघू शकतो. या बुद्धिनिष्ठ विचारातून एक परिणामकारक कार्यक्रम म्हणून पुणे गांधी भवनाने तीन दिवसाचे 'गांधी विचार साहित्य संमेलन 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान आयोजित केले.

गांधी विचार साहित्य संमेलनाचे मिशन स्टेटमेंट

या संमेलनाचे मिशन स्टेटमेंट आहे, "देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक परिस्थिती ढासळली आहे. गाडी रूळावर आणण्यासाठी भारतीय समाजाला पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांकडे जावे लागेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा, चारित्र्याचा व शीलाचा त्या काळावर कसा प्रभाव होता, हे नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे."

"त्यांचा विचार हा वैश्विक असून तो चिरकालीन आहे, याचे भान सर्वांना असणे जरुरीचे आहे. सद्यस्थितीत गांधी विचारांचा तरुणांनी मागोवा घेणे आणि भविष्याकालीन मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे. या तीन दिवसीय संमेलनात गांधी विचार साहित्य संमेलन त्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे."

हे संमेलन सर्वांसाठी आहे, पण खास करून आजच्या तरुणाईसाठी आहे. गांधीजींचे विचार आजही कसे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहे हे पटवून देण्यासाठी हे गांधी विचार साहित्य संमेलन आहे. आमचे तरुणाईला आवाहन आहे की आपण खुल्या दिलाने या संमेलनात सहभागी व्हावं आणि गांधी समजून घ्यावेत. तुमच्या मनातील गांधींबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि तुमच्या आजच्या अस्वस्थतेला एक विधायक उत्तर सापडायला मदत होईल.

(लक्ष्मीकांत देशमुख हे प्रसिद्ध लेखक व माजी संमेलनाध्यक्ष आहेत. लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.