You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हनिमून'च्या वादातून सासऱ्याने जावयावर फेकले अॅसिड, नेमके प्रकरण काय?
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
लग्नानंतर हनिमूनला कुठं जायचं? यावरून झालेल्या वादानंतर संतापलेल्या सासऱ्यानं जावयावर अॅसिड हल्ला केल्याचा प्रकार कल्याणमध्ये नुकताच घडला होता. यानंतर जखमी जावयावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर सासऱ्यानं पळ काढला असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
हनिमूनला नेमकं कुठं जायचं या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. पण ईबादच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीमध्ये यामागं वेगळं कारण असल्याचंही समोर येत आहे. पण हे कारण देत सासऱ्याने जावयावर हल्ला केला.
हा प्रकार एवढ्यावर थांबलेला नसून अजूनही सासरा फरार असताना फोन करून जावयाला ठार मारण्याची धमकी देत आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या मुलाने स्वतःच्याच वडिलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.
अॅसिड हल्ल्याचं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात.
नेमके प्रकरण काय?
आयेशा आणि ईबाद यांचा काही महिन्यांपूर्वी म्हणजेच 23 जुलै रोजी निकाह झाला होता. पण त्यानंतरही आयेशा तिच्या आई वडिलांच्या घरीच राहत होती. त्यांच्या निकाहनंतरचा वलिमा विधी झालेला नव्हता. त्यामुळं आयेशाची बिदाई करण्यात आलेली नव्हती.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार आयेशाच्या शिक्षणाच्या कारणामुळं दोन्ही कुटुंबांनी मिळून हा निर्णय घेतला होता. पण या दरम्यानच्या काळात आयेशाचे वडील जकी खोटाल आणि ईबाद यांच्यात काही वाद सुरू झाले.
याच वादातून खोटाल यांनी ईबाद यांच्यावर अॅसिड हल्ला केला. ईबाद अतिक फालके हे 18 डिसेंबरच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. कल्याणमधील आग्रा रोड परिसरात रस्त्याच्या बाजूला काही कारणासाठी ते थोडावेळ थांबले.
पण त्याचवेळी त्यांचे सासरे जकी खोटाल अचानक मागून आले आणि त्यांनी ईबाद यांच्या अंगावर अॅसिड फेकलं. तसंच शिवीगाळ करत त्यांनी ईबाद यांना ठार मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यात ईबाद यांचं तोंड भाजल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ईबाद यांना घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर कल्याण पश्चिममधील अॅपेक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हनिमूनचं ठिकाण ठरलं वादाचं कारण
आयेशा नोव्हेंबरमधील परिक्षेनंतर वलिमाचा विधी उरकून सासरी जाणार असं दोन्ही कुटुंबांनी ठरवलं होतं. ईबाद या दरम्यान पत्नी आयेशाला भेटायचा. त्यांच्या वलिमासाठी 25 डिसेंबरची तारीखही ठरली होती.
ईबादला आयेशाबरोबर काश्मीरला फिरायला जायची इच्छा होती. त्यानं आयेशाबरोबर त्याची तयारीही सुरू केली होती. पण ईबादचे सासरे जकी खोटाल यांचा विरोध होता.
जावयानं लेकीसोबत काश्मीरला फिरायला जाण्याऐवजी मक्का-मदिनाला जाऊन ईश्वराचा आशीर्वाद घ्यावा असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी दबाव टाकायला सुरुवातही केली होती.
ईबाद-आयेशा मात्र निर्णयावर ठाम होते. त्यातून काही दिवसांपासून जावई आणि सासऱ्यात धूसफूस सुरू झाली होती. तोच वाद वाढत गेला. वाद एवढा विकोपाला पोहोचला की, जकी खोटाल लेकीचं लग्नं मोडण्याची धमकी देऊ लागले.
हे नातं मान्य नसून, ते मोडून टाकायला हवं असं म्हणत ते सतत भांडू लागले. या सगळ्या रागातून त्यांनी ईबादवर 18 डिसेंबर रोजी अॅसिड हल्ला केला.
ईबादचे कुटुंबीय काय म्हणाले?
हा अॅसिड हल्ला हनिमूनच्या वादातून झाला की यामागं अजून काही कारणं होती हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं ईबाद फालके यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली.
"हनिमूनचा वाद तर होताच पण मुलगी सासरच्या मंडळींबरोबर राहू नये असं जकी खोटाल यांचं म्हणणं होतं. ईबादनं आई वडिलांबरोबर न राहता पत्नीबरोबर वेगळं राहावं यासाठी ते दबाव आणत होते," असं ईबादचे कुटुंबीय म्हणाले.
वेगळं राहणार असं लिहून दिलं तरच मुलीला सासरी पाठवणार असल्याची अट त्यांनी घातली होती. पण ईबाद आणि आयेशा या दोघांचाही त्याला विरोध होता. त्यामुळं चिडून जकी खोटाल लग्न मोडायला निघाले होते, असं ईबादचे कुटुंबीय म्हणाले.
जकी खोटाल त्यांच्या मुलीला लग्न मोडलं नाही तर ते पत्नीला म्हणजे आयेशाच्या आईला सोडचिठ्ठी देतील अशी धमकीही देत होते. ऑक्टोबर महिन्यात आयेशा आणि त्यांच्या आईनं याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती.
तक्रारीच्या रागातून खोटाल यांनी पत्नी आणि मुलीला घरातून हाकलून दिलं होतं. असं केल्यानं वलिमा होणार नाही, असं जकी खोटाल यांना वाटलं होतं. पण आयेशा आणि त्यांच्या आई मात्र 25 डिसेंबरला वलिमा करण्याच्या निर्णयावर ठाम होत्या.
त्यामुळं आपलं कोणी ऐकत नाही या रागातून जकी यांनी धमकी दिली होती. अखेर त्यांनी धमकी दिल्याप्रमाणं ईबाद यांच्यावर अॅसिड हल्ला केला.
हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नाही. फरार असतानाही जकी खोटाल फोन करून "ये तो सिर्फ ट्रेलर था पिक्चर अभी बाकी हैं", असं म्हणत धमक्या देत असल्याचं नातलगांचं म्हणणं आहे.
याविरोधात त्यांच्या मुलानेच म्हणजे मोहम्मद जकी खोटाल यानं वडिलांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल केली आहे.
पोलीस काय म्हणाले?
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
बीबीसीनं या प्रकरणासंदर्भात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक एस.आर.गौड यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले की," हनिमूनला जाण्याच्या वादातूनच हा अॅसिड हल्ला झाला आहे. फरार आरोपी जकी खोटाल यांचा आम्ही शोध घेत आहोत."
या प्रकारणातील आरोपी जकी खोटाल यांच्यावर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 124-1 आणि 351-3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.