You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मृतदेह' त्याला स्वप्नात येऊन हाक मारायचा, स्वप्नातल्या जागेवर गेल्यावर पुढे काय झालं?
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी
"मी निकीत उर्फ योगेश पिंपळ आर्या. गेले पाच दिवस खेडच्या भोस्ते घाट परिसरात भटकत आहे. 16 ऑगस्ट 2024 च्या रात्रीपासून एक मृत व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये येत आहे.
ती व्यक्ती रेनकोट घालून आहे. तिच्या पायात काळ्या रंगाचे बुट आहेत आणि एक बॅग आहे. ती व्यक्ती माझ्याकडे मदत मागत आहे. मला वाटलं होतं की हे फक्त एक स्वप्न असेल.
पण तो माणूस सतत माझ्या स्वप्नांत येतोय, त्यामुळे मला झोप सुद्धा येत नाही. तो माणूस स्वप्नांतून मला जसं मार्गदर्शन करत आहे तसा मी त्याचा शोध घेत आहे. तो कोण आहे हे मला माहिती नाही, तरीही मी त्याला मदत करत आहे."
असा एक व्हीडिओ योगेश आर्या नावाच्या तरुणानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 17 सप्टेंबरला शेअर केला होता.
त्या दरम्यान तो भोस्ते घाट परिसरात त्याच्या स्वप्नांत येऊन मदत मागणाऱ्या मृत व्यक्तीच्या शोधात फिरत होता.
योगेश आर्या नावाचा हा 30 वर्षांचा तरुण काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या भोस्ते घाट परिसरात फिरत होता.
त्याच्या स्वप्नांत एक मृत व्यक्ती येत असून ती त्याला मदत मागत आहे, असा दावा तो करत होता. आश्चर्य म्हणजे त्याला पडलेल्या स्वप्नाप्रमाणे खरंच त्या जंगलात ती मृत व्यक्ती सापडली.
ती मृत व्यक्ती कोण होती? तिचा आणि योगेशच्या स्वप्नांचा एकमेकांशी काय संबंध होता? हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.
नक्की प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतवाडीतील आजगावमध्ये राहणारा योगेश आर्या याने 17 सप्टेंबरला पोलिसांना सांगितले होते की त्याला वारंवार एका मृत व्यक्तीची स्वप्नं पडतात. रत्नागिरीतील खेड रेल्वे स्टेशन समोर एका पुरुषाचं प्रेत असून तो स्वप्नांत येऊन त्याला मदत मागत आहे.
योगेशचं हे सांगणं विचित्र वाटत असलं तरीही त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी FIR नोंदवली. तसेच तो सांगत असलेल्या परिसराची तपासणीदेखील सुरू केली.
पोलिसांनी तपास केला असता, योगेश आर्यानं सांगितल्याप्रमाणं त्या जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता.
त्या झाडाजवळ जाऊन पाहिलं असता आंब्याच्या झाडावर काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्टया बांधत त्याला टॉवेलनं बांधून गळफास घेतलेल्या एका पुरुषाचा मृतदेह खाली पडलेला आढळला.
त्याच्या अंगात राखाडी रंगाचं जॅकेट व राखाडी रंगाची पँट असून त्याच्या आतमध्ये मानवी हाडांचा सापळा होता. त्याच्या जवळच काळ्या रंगाची बॅग आणि काळ्या रंगाचे बुट होते.
या मृतदेहापासून 5 फूट अंतरावर मानवी कवटी पडलेली होती.
जे स्वप्नांत दिसलं तेच सत्य बनून समोर येणं ही गोष्ट पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक होती. एखादी मृत व्यक्ती स्वप्नांत येते आणि मदत मागते. तिचं ठिकाण सांगते आणि त्याच ठिकाणी अगदी स्वप्नांत दिसल्याप्रमाणे ती मृत व्यक्ती कशी काय सापडते, हा पोलिसांपुढचा मोठा प्रश्नं होता.
योगेशनं इन्स्टाग्रामवरील व्हीडिओमध्ये काय म्हटलंय ?
17 सप्टेंबरला शेअर केलेल्या एका व्हीडिओमध्ये त्यानं म्हटलंय, "नमस्कार, मी निकीत उर्फ योगेश पिंपळ आर्या. गेले पाच दिवस खेडच्या भोस्ते घाट परिसरात भटकत आहे.
16 ऑगस्ट 2024 च्या रात्रीपासून एक मृत व्यक्ती माझ्या स्वप्नांत येत आहे. ती व्यक्ती रेनकोट घालून आहे. तिच्या पायात काळ्या रंगाचे बुट आहेत आणि जवळ एक बॅग आहे.
ती व्यक्ती माझ्याकडे मदत मागत आहे. मला वाटलं होतं हे फक्त एक स्वप्नं असेल. पण तो माणूस सतत माझ्या स्वप्नांत येतोय त्यामुळे मला झोपसुद्धा येत नाही. तो माणूस स्वप्नांतून मला जसं मार्गदर्शन करत आहे तसा मी त्याचा शोध घेत आहे.
तो कोण आहे हे मला माहिती नाही, तरीही मी त्याला मदत करत आहे." असं सांगणारा तो व्हीडिओ योगेशनं 15 सप्टेंबरला सकाळी रेकोर्ड केला होता.
त्या दरम्यान तो भोस्ते घाट परिसरात त्या स्वप्नातल्या मृत व्यक्तीचा शोध घेत फिरत होता. दुसऱ्या एका व्हीडिओत एक डोंगर दाखवत त्यानं म्हटलंय, "ती व्यक्ती असलेली हाच तो डोंगर माझ्या स्वप्नांत यायचा. ती व्यक्ती मला 'सिग्नल' देत आहे. मी काहीही करून तिला मदत करणारच."
दरम्यान तिथं असलेल्या एका टपरीवाल्या काकांनी योगेशला डोंगरात जाण्याचा मार्ग दाखवला असल्याचं देखील त्यानं सांगितलं आहे.
या प्रवासाला सुरूवात केल्यानंतरच्या पहिल्या पाच दिवसात त्याला रेकार्डींग करता येत नव्हतं असं त्यानं म्हटलं आहे. तसंच " आज मला खुप टास्क आहेत. मला लवकर सिमकार्ड चालू करून घ्यावं लागेल.
परंतु माझ्याकडं कोणतंही ओळखपत्र नाही." असं म्हणताना त्यानं त्याचं कारण देखील सांगितलं.
योगेश गोव्यामधील एका कंपनीत काम करायचा. 6 सप्टेंबरला सगळी कामं संपवून रूमवर गेला आणि त्या रात्री अचानक दुचाकी घेऊन त्याच्या स्वप्नात येणाऱ्या मृत व्यक्तीच्या शोधात निघाला.
परंतु 7 सप्टेंबरच्या रात्री 10.30 ला त्याला जाग आली तेव्हा तो गुजरातमधील सूरतच्या रेल्वे स्टेशनवर होता. गोव्यावरून तो सूरतला कसा पोहचला, त्याच्यासोबत नक्की काय झालं यातलं त्याला काहीच माहिती नसल्याचं त्यानं सांगितलं.
त्यानं सांगितल्यानुसार, या प्रवासात त्याची सगळी कागदपत्रं असलेली बॅग आणि दुचाकी हरवली. त्याच्या अंगावर एक जॅकेट आणि शॉर्ट पँट होती.
त्या पँटच्या खिशात फक्त 2600 रूपये होते. त्या रात्री तो सूरत रेल्वे स्टेशनलाच झोपला. त्या रात्री पुन्हा ती मृत व्यक्ती त्याच्या स्वप्नात आली आणि तिनं त्याला तिथल्या एका टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जायला सांगितलं..
मग त्यानं गोव्याला परत न जाता तिथंच थांबून ती टेक्स्टाईल इंडस्ट्री बघायचं ठरवलं. त्यानं म्हटलंय की, "मी तिथं का गेलो ते मला माहिती नाही.
ती व्यक्ती मला जसं सांगत आहे, मी तसं करत आहे. ती माझ्याकडे का मदत मागत आहे, मला माहिती नाही. पण मला त्या व्यक्तीला काहीही करून मदत करायचीच आहे."
एका व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलंय की, "मला माझ्या गोव्यातल्या दिवसांची, ऑफिसची, मित्रांची खूप आठवण येत आहे. माझी बॅग, मोबाईल, गाडी सगळं काही गायब आहे.
मी बाईक वर निघालेलो मग सूरतला कसा पोहोचलो मला काहीच आठवत नाही. घरच्यांना जर मी हे सांगितलं तर ते माझ्यावर विश्वासच ठेवणार नाहीत.
ऑफिसमधले मयूर सर तर, माझ्यावर नेहमी खूप हसतात. तू स्टोरीज बनवतो असं म्हणतात, पण मी तसं काही करत नाही. मी खरं बोलतो आणि खरं सांगतो.
त्यानंतर तो रत्नागिरीमधील खेड रेल्वे स्टेशनच्या समोरील डोंगरात त्या मृत व्यक्तीच्या शोधात निघाला. त्यानं नवीन मोबाईल आणि सिम कार्ड घेतलं. त्याच्या या प्रवासातले त्याचं अनुभव सांगणारे व्हीडिओ बनवून ते इन्स्टाग्रामवर शेअर केले.
त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अपयश आल्यानं योगेशनं थेट पोलीस स्टेशनच गाठलं आणि पोलिसांच्या मदतीनं त्यानं त्या मृतदेहाचा शोध घेतला.
पोलीस तपासात काय खुलासे झाले ?
दरम्यान ही मृत व्यक्ती कोण आहे आणि तिचा योगेश आर्याच्या स्वप्नांशी काय संबंध आहे याबद्दल पोलीस तपासात काय पुढे आलं, हे जाणून घेण्याकरता बीबीसी मराठीनं रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली.
त्यावेळी ते म्हणाले, "मृत व्यक्तीची अजून तरी ओळख पटलेली नाही, परंतु आमचा तपास चालू आहे. तसेच आमच्या तपासात योगेश आर्याला मानसिक समस्या असल्याचं निष्पन्न झालं आहे."
"परंतु पोलिसांच्या चौकशी दरम्यान योगेश आर्या स्वतःहून घरातून निघून गेला आहे. तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे." असंही पुढे ते म्हणाले.
दरम्यान त्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास अजून चालू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे अजून कोणकोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)