बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : पंजाबमधून आणखी एका 22 वर्षीय तरुणाला अटक

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी न्यूज मराठी

माजी मंत्री बाबा सिद्दिकी मर्डर केसप्रकरणी पंजाबमधून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने पंजाबच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सच्या साथीनं संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 वर्षीय अक्षदिप करजसिंह गिल या आरोपीला अटक केली आहे.

हा आरोपी पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील पक्का चिस्ती गावातील रहिवासी असून सध्या या आरोपीला मुंबईला आणण्यात आलं आहे.

सिद्दिकींवर गोळ्या झाडणारा आरोपी याआधी अटकेत

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणारा शूटर शिवा कुमार अखेरीस पोलिसांच्या ताब्यात आला आहे. शिवा कुमारसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आलीय.

मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफसोबत संयुक्त कारवाई करत, उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातून या 5 जणांना अटक केली.

शिवा कुमारसोबत अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेन्द्र प्रताप सिंह यांना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

अटक करून या आरोपीना मुंबई गुन्हे शाखेत आणले जात आहे.

याआधी म्हणजे 26 ऑक्टोबर 2024 रोजी पंजाब पोलिसांसोबतच्या संयुक्त कारवाईत मुंबई पोलिसांनी सुजित सुशील सिंह याला अटक केली होती.

आता शिवा कुमारला अटक केल्यानं मुंबई पोलिसांना बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठं यश मिळालं आहे.

या पाच आरोपींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या सहा अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या टीममध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी (युनिट 5), पोलीस निरीक्षक स्वप्नील काळे (युनिट 7), हवालदार विकास चव्हाण (युनिट 3), हवालदार महेश सावंत (युनिट 7) यांचा समावेश आहे.

हे पथक गेल्या 25 दिवसांपासून आरोपींचा माग काढत होते आणि त्यांचा शोध घेत होते.

शूटर शिवा कुमारनं पोलिसांना काय सांगितलं?

उत्तर प्रदेश पोलिसांना दिलेल्या जबाबात शिवा कुमारने पोलिसांना शुभम लोणकर आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी शिवा कुमारनं दिलेल्या जबाबाचं पत्रक काढलंय. त्यानुसार, आरोपी शिवा कुमार याने चौकशीनंतर सांगितलं की, "मी आणि धर्मराज कश्यप हे एकाच गावात राहत होते. मी पुण्यात स्क्रॅपचं काम करत होतो. माझं आणि शुभम लोणकरचं दुकान एकमेकांशेजारीच होतं. शुभम लोणकर लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करतो. स्नॅपचॅटवरून शुभमने माझा आणि लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा म्हणजेच अनमोल बिश्नोईचा संवाद घडवून आणला. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याच्या बदल्यात मला दहा लाख रुपये मिळतील असं सांगण्यात आलं होतं. तसेच प्रत्येक महिन्याला मला काहीनाकाही मिळत राहील असंही सांगण्यात आलं होतं."

शिवा कुमार पुढे म्हणाला की, "शुभम लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर यांनी आम्हाला हत्येसाठी लागणारं शस्त्र, काडतूस, सिमकार्ड आणि मोबाईल दिला होता. हत्येनंतर एकमेकांशी बोलता यावं म्हणून तिन्ही शूटर्सना नवीन मोबाईल आणि सिमकार्ड दिले होते. आम्ही अनेक दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांची रेकी करत होतो, आणि 10 ऑक्टोबरच्या रात्री आम्ही योग्य वेळ बघून बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. त्यादिवशी सण होता म्हणून पोलीस होते आणि तिथे गर्दी होती, यामुळेच दोन लोकांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आणि मी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरलो."

बहराईचला कसा आला? हेही शिवा कुमारने सांगितलं. तो म्हणाला की, "मी मोबाईल रस्त्यात फेकून दिला आणि मुंबईवरून पुण्याला निघून आलो. पुण्यावरून झाशी आणि लखनऊमार्गे बहराईचला आलो. रस्त्यात मी माझे सहकारी किंवा हँडलर्सयांच्याकडून मोबाईल मागायचो आणि फोनवर बोलायचो. रेल्वेतल्या एका सहप्रवाश्याकडून मोबाईल घेऊन मी अनुराग कश्यपला फोन केला. त्याने मला सांगितलं होतं की अखिलेन्द्र, ज्ञान प्रकाश आणि आकाश यांनी माझी नेपाळमध्ये लपण्याची व्यवस्था केली आहे. यामुळेच मी बहराईचला आलो होतो आणि इथून माझ्या साथीदारांना घेऊन नेपाळला पळून जाणार होतो."

शूटर शिवा कुमार कोण आहे?

शिवा कुमार गौतम उर्फ शिवा हा बाबा सिद्दिकी हत्याकांडांतील आरोपी आहे. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शिवा फरार होता. मुंबई पोलिसांनीही त्याच्या नावाचा उल्लेख करत, तो फरार असल्याचं सांगितलं होतं.

उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे सर्कल ऑफिसर अनिल कुमार यांच्या मते, शिवा कुमार गौतम हादेखील गंडारा वस्तीचा रहिवासी आहे.

तसंच, शिवा कुमार गौतम आणि धर्मराज दोघं शेजारी असून दोघं मुंबईत राहत होते.

शिवा कुमारचे वडील गवंडी काम करत होते.

शिवा कुमार याच्या विरोधात बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण वगळता कोणताही गुन्हा दाखल नाही.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात जेव्हा शिवाचं नाव पुढे आलं, तेव्हा ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवाची आई म्हणाली की, "तो पुण्याला गेला होता आणि तिथं भंगारचं काम करायचा. मला हीच माहिती होती. मुंबईबाबत मला काहीही माहिती नव्हती."

शिवाची आई पुढे म्हणाली होती, "तो होळीला घरी आला होता. परत गेल्यानंतर तो आलाच नाही. फोनवरूनही कधी बोलला नाही. त्याचं वय 18-19 वर्षे असेल.”

आतापर्यंत कुणाला अटक?

याआधी (26 ऑक्टोबर) माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक झाली होती. मुंबईतील रहिवासी सुजित सुशील सिंह याला मुंबई आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली होती.

पंजाब पोलिसांच्या महासंचालक कार्यालयानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितचा बाबा सिद्दिकी हत्येमध्ये सहभाग होता. तसंच त्यानं तीन दिवसांपूर्वी याबाबत नितीन गौतम सप्रे आणि आणखी एका आरोपीला माहिती दिली होती.

सुजितनं त्यांना यासाठी मदतही केली होती. पंजाब पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं.

शुभम लोणकरला पुण्यातून अटक

सुजित सुशील सिंह याला अटक करण्यापूर्वी या प्रकरणात शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली होती.

प्रवीण लोणकरने त्याचा भाऊ शुभम लोणकर याच्यासोबत मिळून कट रचल्याची माहिती आहे.

प्रवीण लोणकरनेच धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सामील केलं. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितले होते.

धर्मराज कश्यप आणि गुरनैल सिंग हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

आता शिवा कुमारलाही अटक करण्यात आलंय.

मुंबई पोलीस काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.

मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले होते की, "माजी मंत्री त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हा निर्मल नगर पोलीस ठाण्याचा हद्दीत त्यांची हत्या झाली आहे.

"या घटनेच्या नंतर लगेचच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत घटनास्थळावरच दोन आरोपीना पकडलं आहे.

"सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे आणि त्यांच्या टीमने दोन आरोपींना पकडलं आहे. यातील फरार झालेल्या आरोपीचा आणि इतर आरोपींचा तपास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे," असं नलावडे यांनी सांगितलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 21 राउंड गोळ्या जप्त केल्या आहेत. या घटनेत लॉरेन्स बिष्णोई गँगच्या संभाव्य भूमिकेबाबत आम्ही चौकशी करत आहोत, असंही पोलीस म्हणाले होते.

घटनेनंतर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. बाबा सिद्दीकी यांना नॉन कॅटेगराईज्ड सुरक्षा देण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली नव्हती, तीन अधिकारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

पोलीस पुढे म्हणाले की, "घटनास्थळावर तीन आरोपी होते, त्यापैकी एकाच शोध सुरू आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 15 टीम्स याचा तपास करत आहेत. ज्या ठिकाणी बाहेरच्या पोलिसांची मदत लागेल तिथे ती घेतली जात आहे.

लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान खान यासोबतच इतरही बाजूने आम्ही चौकशी करत आहोत. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली पोस्ट खरी आहे की खोटी हेदेखील आम्ही तपासत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.

या तिन्ही आरोपींचा रेकॉर्ड आम्ही तपासत आहोत, ते जिथे राहतात तिथल्या स्थानिक पोलिसांकडून आम्ही माहिती घेत आहोत. फरार आरोपींची ओळख पटली असून आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचं नलावडे म्हणाले.

या प्रकरणातील आरोपी मुंबईत कधी आले होते, कुठे राहत होते, हत्येसाठी त्यांना मदत कुठून करण्यात आली याबाबतही मुंबई पोलीस तपास करत असल्याचं सांगण्यात आलं.

बाबा सिद्दिकींचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री तिघांनी गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दिकींना जवळच असणाऱ्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबा सिद्दिकी हे ऐंशीच्या दशकापासून (1977-78) राजकारणात सक्रिय होते.

यंदा फेब्रुवारीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करेपर्यंत म्हणजे गेली जवळपास चार दशकं ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं.

बाबा सिद्दिकी यांच्या ‘बॉलिवूड कनेक्शन’बाबतही कायम चर्चा होत असे. सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्त अशा हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे की आम्ही तत्काळ दोघा जणांना अटक केली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की विरोधक हे सत्तेकडेच नजर लावून बसले आहेत. पण आम्हाला राज्य सांभाळायचे आहे.

राजकीय क्षेत्रातील इतक्या महत्त्वाच्या स्थानी असलेल्या नेत्याची भररस्त्यात हत्या झाल्यानं मुंबईतील आणि एकूणच महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हा प्रश्न केवळ बाबा सिद्दिकींच्या हत्येनं समोर आला नाही, तर गेल्या आठ-दहा महिन्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहिल्यावरही कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे का, असा प्रश्न उभा राहतो.

कायदा-सुव्यवस्थेचा हा प्रश्न बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचं उघड’

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींना श्रद्धांजली वाहिली आणि एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं की, “या हत्येची घटनेनं महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचं उघड झालं आहे. सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे आणि न्याय मिळेल, हे पाहिलं पाहिजे.”

माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद पवार यांनी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करताना, महाराष्ट्रातील ‘कोलमडलेल्या कायदा-सुव्यवस्थे’वर चिंताही व्यक्त केलीय.

शरद पवार म्हणाले, “राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.”

तसंच, शरद पवारांनी विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले की, बाबा सिद्दिकींच्या हत्येची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपही केले.

विजय वडेट्टीवर म्हणाले की, राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.

राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती, पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही, कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते. एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो, ही गंभीर बाब आहे, याची चौकशी झाली पाहिजे.”

बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना, सदर घटनेची चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. दोन आरोपींना पकडल्याची, तर एक आरोपी फरार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. या घटनेनं आम्हा सगळ्यांचाच धक्का बसला आहे. या घटनेचा तपास करत आहेत. काही धागेदोरे मिळत आहेत. मात्र, त्यावर आता लगेच बोलणं योग्य होणार नाही."

शरद पवारांसह विरोधकांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "विरोधकांना केवळ सत्ताच हवीय. इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही ते सत्तेच्या खुर्चीकडेच पाहत आहेत. आमच्यासमोर पूर्ण महाराष्ट्र आहे. त्यांनी सत्तेकडे नजर लावून बसावं."

मात्र, या घटनेवरून मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्यातही बाबा सिद्दिकी हे राजकीय नेते होते. गेली चार दशकं ते राजकारणात सक्रीय होते. सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या इतक्या ज्येष्ठ नेत्याची अशी हत्या होत असेल आणि तेही ऐन विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधी, तर ही घटना त्याही दृष्टीने गांभीर्य वाढवते.

हत्या, गोळीबार, हिट अँड रन, अत्याचार; महाराष्ट्रात काय चाललंय?

बाबा सिद्दिकींच्या हत्येच्या घटनेमुळेच केवळ कायदा-सुव्यवस्थेची चर्चा सुरू झालीय, असं नाही, तर गेल्या काही महिन्यांपासून घडणाऱ्या घटनांनंतर सातत्यानं सर्वसामान्य लोक आणि विरोधी पक्षांकडून हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

अगदी काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना आणि त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू या घटनेनंही महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर राज्यातच नव्हे, तर देशभरात चर्चा झाली.

गेल्या आठ-दहा महिन्यांपासून म्हणजे यावर्षीच्या जानेवारीपासूनच्या निवडक घटनांवर एक नजर टाकूया, म्हणजे हत्या, अत्याचार, हिट अँड रन, लैंगिक अत्याचार अशा घटना राजरोसपणे घडत असल्याचं आणि पर्यायानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं लक्षात येईल.

1) या वर्षाची सुरुवात पुण्यातल्या गँगवॉरनं झाली होती. 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर 3 ते 4 जणांनी गोळीबार केला. त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला. कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली होती.

2) कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशनमध्येच खुलेआम गोळीबार केल्याची घटना घडली होती. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या समोरच ही घटना घडली होती. या गोळीबारात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक आणि कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, तसंच त्यांच्यासोबतचे सहकारी राहुल पाटील हे जखमी झाले.

3) मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी फेसबुक लाइव्ह करतानाच गोळीबार करून हत्या करण्यात आली. घोसाळकरांवर 5 गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्यातच घोसाळकर यांचा मृत्यू झाला. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने गोळीबार करून आत्महत्या केली.

4) 14 एप्रिल 2024 च्या पहाटे अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला. या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली, तर या आरोपींना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आलेली.

या आरोपींपैकी एकानं दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात आत्महत्या केली.

5) 19 मे 2024 च्या पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अतिवेगानं जाणाऱ्या पोर्शे कारनं दुचाकीवरच्या दोघांना उडवलं. त्या दोघांचाही या अपघतात जागीच मृत्यू झाला. या घटनेनं वादालाही आमंत्रण दिलं. कारण अल्पवयीन असलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे आरोप झाले.

6) पुणे पोर्शेसारखीच घटना मुंबईतल्या वरळीत 7 जुलै 2024 रोजी घडली. वरळीतल्या अ‍ॅट्रीया मॉलसमोर पहाटे बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या मिहिरने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडले. त्यांना तसंच फरफटत नेल्याची माहिती समोर आली आणि लोकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. या घटनेतील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

7) 16 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आलं होतं. 16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचले होते, परंतु तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आलं होतं.

त्यानंतर नागरिकांचा उद्रेक झाला. बदलापूर रेल्वेस्थानकात लोक उतरले आणि रेल्वे रोखल्या. मूळ लैंगिक अत्याचाराची घटना, त्याची गुन्हा नोंद न होणं आणि त्यानंतर लोकांचा उद्रेक यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला होताच. तोवर या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला.

8) गेल्या महिन्यातच म्हणजे, एक सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याचे वार करत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

धार्मिक हिंसाचाराच्या वाढत्या घटना, हत्या-अपघातांच्या घटना इत्यादी दिवसागणिक वाढत जात असल्यानं सहाजिकच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतं. महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरण हा तसा एरव्ही कौतुकाचा विषय असताना, या घटना कशा घडत आहेत, खरंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय का, हे प्रश्न बीबीसी मराठीनं कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित जाणकार आणि राजकीय विश्लेषकांनाही विचारले.

सत्ताधारी नेते सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचं काय - मविआ

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते शरद पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, "बाबा सिद्दिकींची हत्या झाली. मुंबई देशात असं एकमेव शहर असेल ज्याला दोन पोलीस आयुक्त आहेत. सरकारने मुंबईसाठी आणखी पाच पोलीस आयुक्त नेमावेत. आमची हरकत नाही. त्यांनी जे जे लाडके आहेत त्यांना पोलीस आयुक्त करावं. मात्र कारवाया करायचं काय? महिला असुरक्षित आहेत. राजकीय नेते असुरक्षित आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते असुरक्षित आहेत. मग सामान्य जनतेचं काय?"

"एकूणच या गद्दारांना, त्यांच्या सेवकांना जेवढी सुरक्षा दिली गेली आहे ती सुरक्षा काढून जनतेसाठी का वापरत नाही? मला वाटतं सरकारने गद्दारांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा पुरवली असेल. ही पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या नेत्यांना लक्ष केलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या राजधानीत अशा हत्या होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत. काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिजीत घोसाळकर या उमद्या तरुणाचीही हत्या झाली. ही जबाबदारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. गृहमंत्री त्यांचे मोठमोठे होर्डिंग लावतात, पण जबाबदारी घेत नाहीत. मागे फडणवीसांचा राजीनामा मागितल्यावर ते म्हणाले होते की, उद्या गाडीखाली कुत्रा आला, तरी राजीनामा मागाल. या राज्यात फडणवीस सामान्य जनतेची तुलना कुत्र्याशी करतात. त्यामुळे ते राज्यकर्ते म्हणून राहण्याच्या लायकीचे नाहीत."

"हे सरकार केवळ घोषणा करत आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी करणार याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या निवडणुकीत जनतेने या सरकारला घरी पाठवावं, अशी आमची अपेक्षा आहे", असंही ठाकरेंनी नमूद केलं.

शरद पवारांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "देशात महाराष्ट्राचा प्रशासनाबाबत एक वेगळा लौकिक होता. उत्तम प्रशासन म्हटलं की महाराष्ट्राकडे, तामिळनाडूकडे बघितलं जायचं. मात्र, सध्या सत्तेत असणाऱ्या ज्या प्रकारे निर्णय घेत आहेत त्याची सामान्य लोकांमध्ये टिंगल व्हावी अशी स्थिती तयार झाली आहे."

"गेल्या दीड महिन्यात मंत्रिमंडळात किती निर्णय घेण्यात आले, त्या निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता किती आहे, याचा आढावा घेतला तर महाराष्ट्राच्या प्रशासनाचा लौकिक उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं. त्यामुळे अशा लोकांच्या हातातून महाराष्ट्राला वाचवावं लागेल, सत्ता काढून घ्यावी लागेल", असं शरद पवार यांनी म्हटलं.

"बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात अटक केलेले आरोपी खरे की खोटे?"

"बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात अटक केलेले आरोपी खरे की खोटे?" या चर्चेवर शरद पवार म्हणाले, "बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाची पुरेशी माहिती आमच्याकडे नाही. हे प्रकरण तपासाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे पुरेशी माहिती नसताना तपासावर विपरित परिणाम होईल असं कोणतंही विधान आम्ही करणार नाही. या प्रकरणाची जबाबदारी सरकारची गृहमंत्र्यांची आहे. त्यांना निर्णय घेता येत नाही असं दिसतंय. त्यामुळे सत्तात्याग करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही."

नाना पटोलेंनी सिद्दिकी हत्याप्रकरणी सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, "राज्यात होणाऱ्या हत्यांची केवळ चौकशीच नको, तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची आवश्यकता आहे."

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय का?

महाराष्ट्राच्या निवडणुका महिन्याभरावर येऊन ठेपल्या असताना, राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्याची अशाप्रकारे हत्या होणं, हे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतं का, असा प्रश्न बीबीसी मराठीनं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचं दिसत नाही आणि पोलासांनीही तसं काही सांगितलं नाहीय. त्यामुळे या घटनेवरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणं घाईचं होईल.

मात्र, यावेळी अभय देशपांडेंनी हा प्रश्नही उपस्थित केला की, “बाबा सिद्दिकी यांना जर ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली गेली असेल आणि त्यातूनही त्यांच्यावर इतक्या जवळ जाऊन गोळीबार करून जात असेल, तर हे निश्चितच चिंताजनक आहे. तसंच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा आहे.”

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई मात्र या घटनेला 'कायदा-सुव्यवस्थेचा वचक संपल्याचं' लक्षण मानतात.

ते म्हणतात की, "एखादी घटना घडल्यानंतर कायद्यानं शिक्षा देण्याचं प्रमाण कमी झालंय, चकमकीसारखे कायद्याबाहेरील गोष्टी घडवल्या जातात आणि त्यातून काहीही साध्य होत नाही.

"गुन्हेगारी संपवण्यासाठी सुरक्षा कडेकोट असणं आवश्यक असतेच, पण एखादी घटना घडल्यानंतर तातडीने दखल घेऊन तशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. मात्र, आपल्याकडे एकसारख्याच घटना वारंवार आणि अगदी काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या दिसून येतात. हा कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचं निदर्शक मानायचं, नाहीतर काय?"

तसंच, कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे, हा विरोधकांचा आरोप आहे, असं म्हणून राज्य सरकारने पळ काढणं सोडून द्यायला हवं आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गांभीर्यानं पावलं उचलायला हवीत, असंही हेमंत देसाई म्हणाले.

तर माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांच्याशी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बातचित केली. सुराडकरांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत मत मांडलं. त्यांच्या मते, “पोलिसांनी अनावश्यक राजकीय दबाव झुगारून, आपण लोकांना बांधील आहोत, हे स्वत:ला पुन्हा सांगणं गरजेचं झालंय. यासाठी अधिकार पदावरील पोलिसांनी ताठ बाणा दाखवणं आवश्यक आहे.”

“आपण सुरक्षेसाठी या सेवेत आहोत, राजकीय नेत्यांसाठी नव्हे, हे उच्च अधिकार पदावरील पोलिसांनी त्यांच्या वागणुकीतून संदेश दिला पाहिजे. जे आता होताना दिसत नाहीय. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार समोर येतो,” असं सुराडकर म्हणतात.

दरम्यान, राजकारण आणि गुन्हेगारी या अनुषंगाने अभय देशपांडे गंभीर चिंता व्यक्त करतात.

ते म्हणतात की, “गेल्या काही महिन्यांमधील घटनांवर नजर टाका, तुम्हाला राजकीय क्षेत्रातलेच गुन्हे कित्येक दिसतात. राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सामावून घेण्याची काय अपरिहार्यता आहे, याचा विचार केला पाहिजे. दंडशक्तीशिवाय राजकारण होत नाही का, असा प्रश्न निर्माण झालाय. हे सर्व आपल्यावरच उलटणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. वाढत्या गुन्हेगारी घटना या त्याचंच द्योतक आहे.”

माजी आयपीएस अधिकारी शिरीष इनामदार म्हणाले की, "बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत हयगय झाली, असं म्हणता येणार नाही. शिवाय, ही घटना राजकीय वैमनस्यातून झालेली सकृतदर्शनी तरी दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात निवडणुका आहेत, म्हणून सर्व राजकीय क्षेत्रासाठी ही घटना घातक संकेत आहे, असंही म्हणता येणार नाही."

कायदा-सुव्यवस्था कडेकोट असली पाहिजे, हे खरं असलं तरी बाबा सिद्दिकींची घटना कुठल्या हेतून घडलीय, हे समोर आल्यानंतर त्यावरून आपल्याला इतर निष्कर्षापर्यंत पोहचता येईल, असंही इनामदार म्हणाले.

(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)