You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या
अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. याविषयी रुग्णालयाकडून अथवा पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अजून मिळालेली नाही. पण ANI आणि PTI या वृत्तसंस्थांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
दक्षिण मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली जाईल. आरोपींनी आत्महत्येचं पाऊल का उचललं याचा पोलिस तपास करत आहेत, असंही पीटीआयने म्हटलं आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. सलमानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना गुजरातमधून अटक करण्यात आलेली, तर या आरोपींना पिस्तूल पुरवल्याप्रकरणी दोघांना पंजाबमधून अटक करण्यात आलेली. सोनू चंदर आणि अनुज थापन अशी पंजाबमधून अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबाराची घटना घडली होती.
सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेनं दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही गोळीबाराची घटना घडली, तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात दोन अज्ञातांविरोधात कलम 307 अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात सलमान खानच्या सुरक्षारक्षकानं दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला.
यात दोन अज्ञान व्यक्ती मोटारसायकलवर येऊन सलमान खानच्या घरावर गोळीबार करताना दिसत होते.
मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानशी फोनवरून चर्चा केली. 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं.
यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानसोबत फोनवरून चर्चा करून सुरक्षेसंदर्भात दिलासा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली.
''आम्ही त्यांची सुरक्षा वाढवण्यास आणि त्याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वत: सलमानशी बोललो आहे आणि सांगितलं आहे की सरकार तुमच्यासोबत आहे. तुम्हाला त्रास होईल असं काहीही होणार नाही, कठोर कारवाई केली जाईल,'' असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
विरोधकांची टीका
शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार धक्कादायक आहे. सलमान ज्या भागात राहतात तिथं महाराष्ट्रातील कष्ट करणारी जनता राहते. भरस्त्यावर जर गोळीबार होत असेल, तर अब की बार गोळीबार सरकार, जे मी अनेक महिने म्हणतेय, त्याच्यावर आणखी एक शिक्कामोर्तब झालंय.”
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी संजय राऊत यांनी म्हटलं की, “मुंबईसह महाराष्ट्रातील कायदा-व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. सलमानच्या संदर्भात झालेली फायरिंग, याने भाजपच्या सरकारची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पण त्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं हे आहे.”
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14 एप्रिलला नागपुरात दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “सलमान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा तपास पोलीस करीत आहेत. त्याची माहिती मिळाली की दिली जाईल. मात्र, या घटनेवरुन कायदा-सुव्यवस्था बिघडली असा अर्थ काढणं चुकीचं आहे.”
धमकीचं पत्र
2022 च्या मे महिन्यात पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारं पत्र मिळालं होतं.
'सलमान और आपका बहुत जल्द मुसेवाला होगा' ( सलमान आणि तुमचा लवकरच मुसेवाला होणार) अशी धमकी चिठ्ठीतून देण्यात आली होती.
सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुसेवालाच्या हत्येनतंर सलमान खानच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली होती. याचं कारण म्हणजे मुसेवालाच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुढे आलं होतं. काही वर्षापूर्वी लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.