You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सलमान खानला झुकायला लावणाऱ्या बिष्णोई समाजाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
- Author, नारायण बारेठ
- Role, बीबीसी हिंदी डॉटकॉमसाठी जयपूरहून
वन्यप्राण्यांसाठी, झाडंवेलींसाठी काम करणाऱ्या बिष्णोई समाजामुळेच अभिनेता सलमान खान तुरुंगात आहे. काय आहे हा समाज?
शुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राणी आणि वृक्षवेलींच्या रक्षणाचं काम बिष्णोई समाज करतो.
जंगलातल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि झाडं जगवण्यासाठी ते प्राणांची बाजी लावू शकतात.
म्हणूनच सलमान खानचं हरणं आणि काळवीट शिकार प्रकरण समोर आल्यानंतर बिष्णोई समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
बिष्णोई समाज गुरु जंभेश्वर यांना आदर्श मानतो. जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 मार्गदर्शक तत्वांचं ते पालन करतात. वन्यजीवांची काळजी आणि झाडांचं रक्षण करणं हे त्यातलचं एक तत्व आहे.
बिष्णोई समाज केवळ राजस्थानपुरता मर्यादित नाही. राजस्थानसह हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही बिष्णोई समाजाची माणसं राहतात.
बिष्णोई समाज
"आमचे मार्गदर्शक जंभेश्वर यांनी आम्हाला भूतदयेचा मार्ग आखून दिला. सर्वजीवांप्रती दयेची भावना व्हावी आणि झाडांची काळजी घ्यायला हवी. असं वर्तन असेल तर मोक्षप्राप्ती होते," असं जोधपूरचे खासदार जसवंत सिंह बिष्णोई यांनी सांगितलं.
या समाजाचे लोक वृक्ष आणि वन्य प्राण्यांसाठी जुन्या काळापासून सत्ताधाऱ्यांशी लढत आले आहेत.
बिष्णोई समाजातील पर्यावरण विषयातील कार्यकर्ते हनुमान बिष्णोई भूमिका मांडतात. ते म्हणतात, "जोधपूरमधल्या राजघराण्यानं झाडं तोडण्याचा आदेश दिला तेव्हा बिष्णोई समाजानं विरोध केला. ही 1787ची गोष्ट आहे. त्यावेळी अभय सिंह यांचं राज्य होतं."
जोधपूरचे माजी खासदार आणि माजी मंत्री बिश्नोई सांगतात की, "सर साठे रुंख रहे तो भी सस्तो जान, अशी घोषणा देण्यात आली होती. त्याचा अर्थ झाडांसाठी स्वत:च्या प्राणांची आहुती द्यावी लागेल तरी द्यावी."
पूर्वजांचं योगदान
"राजघराण्याची माणसं झाडं तोडण्यासाठी आली तेव्हा जोधपूरच्या खेजडली आणि परिसरातल्या मंडळींनी जोरदार विरोध केला. बिष्णोई समाजातल्या अमृता देवी झाडाच्या ठिकाणी स्वत: जाऊन उभ्या राहिल्या.
अमृता देवींच्या पावलावर पाऊल ठेवत बिष्णोई समाजातील 363 लोकांनी झाडांसाठी पर्यायानं पर्यावरणासाठी स्वत:च्या प्राणांचं योगदान दिलं. यामध्ये 111 महिलांचा समावेश होता.
याच योगदानासाठी दरवर्षी खेजडलीमध्ये मेळ्याचं आयोजन केलं जातं. निसर्गाला जपण्यासाठी जीवन अर्पित करणाऱ्या पूर्वजांना आदरांजली वाहण्यासाठी बिष्णोई समाजाची माणसं खेजडलीमध्ये एकत्र येतात. निसर्गसंवर्धनाचा वसा नव्या पिढीकडे संक्रमित होण्यासाठी हा मेळा आयोजित केला जातो," असं बिष्णोई सांगतात.
बिष्णोई समाजाचे गुरु
गुरु जंभेश्वर यांचा जन्म 1451मध्ये झाला. बिकानेर जिल्ह्यातलं समरथल बिष्णोई समाजाचं तीर्थस्थळ आहे. याचठिकाणी जंभेश्वर यांची समाधी आहे. याच ठिकाणी मेळा भरतो.
मारवाड विभागाचे विभागीय आयुक्त मुन्शी हरदयाल यांनी बिश्नोई समाजावर पुस्तक लिहिलं आहे. ते सांगतात, "बिश्नोई समाजाचे संस्थापक जंभेश्वर पंवार राजपूत होते. 1487मध्ये या प्रदेशात प्रचंड दुष्काळ पडला. त्यावेळी जंभेश्वर यांनी लोकांची सेवा केली होती. त्यावेळी जाट समुदायाच्या अनेक समर्थकांनी जंभेश्वर यांचं काम पाहून प्रेरित होत बिष्णोई धर्म अंगीकारला होता.
मुन्शी हरदयाल लिहितात, "बिष्णोई समाजाची माणसं जंभेश्वर यांना विष्णूचा अवतार मानतात. जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 तत्वांचं बिष्णोई समाज पालन करतो. बीस (वीस) आणि नौ (नऊ) म्हणजेच बिष्णोई असं मानलं जातं."
बिष्णोई समाजात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीचा दफनविधी होतो.
माजी खासदार बिष्णोई सांगतात, "राजस्थान, हरयाणा, पंजाब भागामध्ये बिष्णोई समाजातील व्यक्तीच्या निधनानंतर मृतदेह पुरला जातो. उत्तर प्रदेशच्या काही भागात मात्र मृतदेहाला अग्नी दिला जातो."
राजस्थानात वन्यजीवांसाठी तळमळीनं झटणारा समाज अशी त्यांची ओळख आहे. आपल्या कामाप्रतीची त्यांची बांधिलकी अतीव असते. हरणांची शिकार करणाऱ्यांविरोधात त्यांचा लढा सातत्यानं सुरू असतो.
अतूट नात्याची कहाणी
बिष्णोईबहुल गावांमध्ये या समाजाच्या महिला अनाथ हरणाला स्तनपान करताना दिसतात. माजी खासदार बिष्णोई सांगतात, "वन्य प्राण्यांप्रती बिष्णोई समाज कटिबद्ध असतो. शेतीवाडी आणि पशुपालन याद्वारे बिष्णोई समाजाची माणसं उदरनिर्वाह करतात. मात्र बदलत्या काळासह बिष्णोई समाजाची माणसं व्यापार क्षेत्राकडेही वळत आहेत."
बिष्णोई समाजाचे हनुमान बिष्णोई सांगतात, "निसर्गाची जपणूक करण्याचा वसा गुरु जंभेश्वर यांनीच आम्हाला दिला आहे. सहअस्तित्वाचं तत्व आम्ही प्रमाण मानतो. मानवी जीवनाची जी किंमत आहे, तेवढंच सभोवतालचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जंभेश्वर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी बिष्णोई होण्याचा मार्ग स्वीकारला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)