You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भाजपच्या सावित्रीबाई फुले बहुजन समाज पक्षात जाणार?
दलितांच्या मुद्दयावर भारतीय जनता पक्षात बंडखोरीचा सूर आळवणाऱ्या सावित्रीबाई फुले गेले काही दिवस चर्चेत आहेत.
1 एप्रिलला लखनऊमध्ये भारतीय संविधान बचाओ रॅलीमध्ये फुले म्हणाल्या, "कधी म्हणतात की घटना बदलायला आलो आहोत कधी म्हणतात की आरक्षण संपवावं, बाबासाहेबांची घटना सुरक्षित नाही."
बीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी आणि प्रतिनिधी इक्बाल अहमद यांनी दिल्लीत सावित्रीबाई फुले यांच्याशीफेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली. या चर्चेदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी भाजपबरोबर मतभेद आणि बसपामध्ये प्रवेशाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...
घटनेला किती धोका आहे या प्रश्नाला उत्तर देताना सावित्री कुणाचं नाव घेत नाही पण म्हणतात, तुम्हाला सगळं माहिती आहे हे कोण लोक आहेत.
सावित्रीबाईंनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे
वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, रेडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेलच किती बदलण्याच्या गोष्टी होत आहेत. कधी समीक्षा करण्यासाठी तर कधी आरक्षण संपवण्यासाठी.
जर भारताची घटना किंवा आरक्षण संपलं तर बहुजनांचा आधारच संपेल. जर आज बहुजन समजाचे लोक पोलीस किंवा अगदी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहत असतील तर ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे पाहत आहेत.
माझं म्हणणं आहे की भारताची घटना चांगली आहे. त्याला पूर्णपणे लागू केलं पाहिजे. आजपर्यंत अनेक सरकारं आली पण भारताची घटना पूर्णत: लागू झालेली नाही. म्हणूनच मागास जातीच्या अनेक माणसांना झोपडपट्टीमध्ये सक्तीनं राहावं लागतं. आजही त्यांना मैला वाहून नेण्याचं काम नाईलाजास्तव करावं लागतं.
राजकारणात कशा आल्या?
मी जेव्हा खूप लहान होते तेव्हा लोक बामसेफशी जोडले गेले होते. आमचे गुरू अछेवरनाथ कनौजिया यांच्याशी आमची चर्चा झाली. मायावती तेव्हा मुख्यमंत्री होत्या.
बहराईचला झालेल्या रॅलीत आमच्या कुटुंबातले अनेक लोक गेले होते. गुरूजींनी मला भाषण देण्यास पुढे केलं. त्यादिवशी मी जेव्हा घरी आलो तेव्हा ते म्हणाले, जर मायावती मुख्यमंत्री बनू शकतात तर माझी मुलगी पण होऊ शकते.
माझे बाबा म्हणाले होते की, मी माझ्या मुलीला मायावतीसारखं पुढे नेऊ इच्छितो. बाबांनी मला गुरूजींना दत्तक दिलं. त्यांनी मला शिकवलं आणि राजकारणात आणलं.
मी सहावीला होते तेव्हा मला स्कॉलरशिप मिळायला हवी होती. मी माझ्या शिक्षकांना म्हटलं, की जर सरकारकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असेल तर मला पण मिळायला हवी. त्यावेळी शिक्षकांनी मला शाळेतून काढून टाकलं.
मी तीन वर्षं वाट पाहिली. त्यावेळी गुरूजींनी माझी भेट मायावती यांच्याशी करून दिली. मायावतींनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि मला शाळेत प्रवेश मिळवून दिला. तेव्हापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
मायावतींची साथ सोडून भाजपमध्ये का?
राजकीय परिस्थितीमुळे मला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. 2000मध्ये मायावतींनी मला पक्षातून काढून टाकलं होतं. यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपच्या तिकिटावर मी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली. 2012मध्ये मी आमदार झाले. 2014मध्ये मी खासदार झाले. मी संधीसाधूपणाचं राजकारण करत नाही.
बाबासाहेबांमुळे मला तिकीट मिळालं. बहराइच मतदारसंघ अनुसूचित जातीजमातींसाठी आरक्षित नसता तर मी खासदार होऊ शकले नसते. मला कोणी (भाजप) तिकीट देईल यावर विश्वासच नव्हता.
भाजपशी फारकत का?
माझा विरोध नाही. घटना सर्वार्थानं लागू व्हावी यासाठी काम करणं ही खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे. घटना सर्वसमावेशकदृष्ट्या लागू व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी विनंती केली आहे. घटना पूर्णांशाने लागू होण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन.
आता ज्या कायद्याची चर्चा आहे तो होण्यापूर्वी अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी महिलांसह गाव पेटवून देण्यात येत असे. सामूहिक बलात्कार आणि शोषण होत असे.
कायदा आता झाला. अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीचं शोषण केलं तर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. लोकांना या कायद्याची भीती वाटते.
दोन एप्रिलला भारत बंददरम्यान हिंसक क्रांती झाली. त्यावेळी कायद्याचं उल्लंघन करणारी जी व्यक्ती सुप्रीम कोर्टात गेली आहे, तिला कठोर शिक्षा व्हायला हवी.
चार वर्षं गप्प का?
मी गप्प नव्हते. भारतात मागास, अनुसूचित जातीजमाती आणि आदिवासी महिलांबरोबर अन्याय होत आहे.
संविधानाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीचे पुतळे जोडले जात आहेत. बाबासाहेबांची मूर्ती तोडणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
2014 मध्ये लोकसभेत मी दलितांचा मुद्दा मांडला होता. महिला आणि उपेक्षित वर्गाच्या प्रश्नाचा मुद्दा सातत्यानं मी मांडत आहे. बहुजन समाजातील व्यक्तींवर अत्याचार करण्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे.
(केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे. तुमचं सरकार पावलं का उचलत नाही? असा प्रश्न राजेश जोशी यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान सातत्याने विचारला. अनेकवेळा विचारलेल्या या प्रश्नाला सावित्रीबाईंनी काहीही उत्तर दिलं नाही.)
बसपात प्रवेश करणार का?
योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईन. घटनेच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी मी गावापासून संसदेपर्यंत लढा देत आहे. न्याय्यहक्कांसाठीची लढाई सातत्यानं सुरू आहे. या कामासाठी मला गावोगावी जाऊन भटकावं लागलं तरी मी जाईन.
देशातल्या सगळ्या बहुजनांना मी संघटित करेन. घटनेची शिस्तबद्ध अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भारत अखंड आहे असं म्हणता येणार नाही.
माझ्याकडे संघटनात्मक अधिकार आहे. मी असं करू नये असं कोणी म्हणत असेल तर ते माझ्या अधिकारावर गदा आणणारं आहे. माझी लढाई सुरूच राहील, त्यासाठी मला शहीद व्हावं लागलं तरी चालेल.
देशाच्या एकात्मतेला धक्का पोहोचवणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. अखंड भारताच्या संकल्पनेची मी समर्थक आहे.
सपा-बसपा आघाडीबद्दल काय वाटतं?
आघाडी होते आणि तुटतेही. विचारप्रवाहांवर आघाडी अवलंबून असते. दोन्ही पक्षाची माणसंच आघाडीचा निर्णय घेतात. देशात 85 टक्के माणसं बहुजन समाजाची आहेत. जातीनिहाय जनगणनेची मी मागणी केली आहे. सरकारने हे करणं आवश्यक आहे. यानंतर या समाजातली किती माणसं श्रीमंत आहेत, गरीब आहेत हे समजू शकेल.
(संभाषणाच्या अखेरीस सावित्रीबाईंनी मायावती आणि कांशीराम यांच्या 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी' या नाऱ्याचा संदर्भ दिला. बंडखोरीचा सूर आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)