बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सहआरोपीला भाजपनं 'स्वीकृत नगरसेवक' बनवलं, नंतर दिले राजीनाम्याचे आदेश

बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत 'स्वीकृत नगरसेवक' म्हणून भाजपने संधी दिली होती. पण या प्रकरणावरून मोठी टीका झाली.

त्यानंतर तुषार आपटे यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यायचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी दिले असल्याचे बीबीसी मराठीशी बोलताना कार्यालयातुन स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच आपटे यांनीही काही वेळातच राजीनामा दिल्याचं सांगितलं.

आपटे हे दोन वर्षांपूर्वी बदलापूर शहरातील शाळेत झालेल्या दोन लहानग्या विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी होते.

बदलापुरातील एका शाळेत दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

चौथीतील एका चिमुरडीवर शाळेतील स्वच्छतागृहात सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेविरोधात स्थानिकांनी निदर्शनं केली. रेल्वे वाहतूक रोखून धरली होती.

पुढील काही दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आरोपी आणि शाळेविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला होता.

बदलापुरात चौथीच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या पालकांकडून केला होता. याशिवाय शाळेच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप त्यावेळी करण्यात आले होते.

या प्रकरणात अक्षय शिंदे याच्यासह शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर दोघेही फरार होते. शेवटी ३५ दिवसांनी कर्जत येथील एका फार्महाऊसमधून ठाणे गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. अद्यापही त्याच्याविरोधात कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

या प्रकरणानंतरही आपटे या शैक्षणिक संस्थेवर कार्यरत आहेत. तसेच भाजपकडून पालिका निवडणुकीतही सक्रिय होते. भाजपचे अनेक नगरसेवक निवडून आणण्यामागे त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे भाजपने त्यांना स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. मात्र या भाजपच्या निर्णयावरून राज्यभर सर्वत्र टीका होत आहे.

विरोधकांकडून टीका

भाजपने तुषार आपटे यांची नियुक्ती केल्यानंतर सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अजून किती खालची पातळी गाठणार? यातून भाजपला काय संदेश द्यायचाय? असा सवाल उपस्थित केला. अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध! म्हणत रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.

तर, बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते जयेश वाणी यांनी धन्यवाद भाजप. महाराष्ट्राचा चिखल केल्याबद्दल, अशी टीका करत संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, "माता - भगिनीं बद्दल देवा भाऊ किती संवेदनशिल आहेत माहितंय? आज बदलापुर चिमुर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी तुशार आपटेला भाजपने बदलापुर नगरपरिषदेत स्विकृत नगरसेवक बनवलं. धन्यवाद भाजप. महाराष्ट्राचा चिखल केल्याबद्दल."

घटनाक्रम

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या शाळेच्या दोन विश्वस्तांना पोलिसांनी अटक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर सुमारे दीड महिन्यांनी ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी ही अटक केली.

याआधीच उच्च न्यायालयाने या आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना अटक करण्यात झालेल्या दिरंगाईवरून राज्य सरकार आणि पोलिसांची कानउघाडणी केली होती.

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर (सोमवारी) गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउन्टरचा तपास क्रिमिनल इनवेस्टिगेशन डिपार्टमेंट (CID) कडे सोपवण्यात आला आहे. CID ने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला आहे.

स्वसंरक्षणार्थ आम्ही गोळीबार केला असा पोलिसांचा दावा आहे. यानंतर अक्षय शिंदेंचे वडील अण्णा शिंदे यांनी मुलाची फेक एन्काऊंटरमध्ये हत्या केल्याचा आरोप करत एसआयटी तपासाची मागणी मुंबई हायकोर्टात केली होती.

त्यांच्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टानं या कथित एन्काऊंटरवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

हायकोर्टानं पहिला प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे, पोलिसांनी अक्षय शिंदेच्या थेट डोक्यातच गोळी का झाडली? आधी गोळी कुठे मारायची याबाबत पोलिसांना माहिती असतं. त्यानं ज्यावेळी बंदुक खेचली तेव्हा गाडीतले इतर पोलिस त्याच्यावर ताबा मिळवू शकले असते. आरोपी काही बलदंड नव्हता. ही घटना दिसते तशी नाही. याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही. काय सत्य आहे ते समोर आणा, असे निर्देशही हायकोर्टानं दिलेत.

हायकोर्टानं दुसरा सवाल उपस्थित केला तो म्हणजे अक्षय शिंदेला बंदूक कशी लोड करता आली? त्याला बंदूक चालवण्याचा आधीच अनुभव होता का? यावर सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आरोपी आणि पोलिसांमध्ये पिस्तुलासाठी झटापट झाली आणि यातच बंदूक लोड झाली असं कोर्टात सांगितलं. पण, पोलिसांचा हा दावाही हायकोर्टानं फेटाळून लावला.

पोलिसांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कमकुवत व्यक्ती पिस्तुल लोड करू शकत नाही. रिव्हाल्वरने कोणीही गोळी झाडू शकतो. पण, पिस्तुलनं सामान्य व्यक्ती गोळी झाडू शकत नाही. त्यासाठी खूप शक्ती लागते.

तुम्ही कधी पिस्तुल वापरली आहे का? मी शंभरवेळा पिस्तुल वापरली आहे. त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे, असंही न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

इतकंच नाहीतर आरोपीला वाहनातून नेताना पोलिस इतके निष्काळजी कसे वागू शकतात? आरोपीला नेताना बंदोबस्तासाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत का? त्याच्या हातात बेड्या होत्या का? असाही सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. तसेच आरोपीनं जर तीन गोळी झाडल्या आणि एक गोळी पोलिसाच्या पायाला लागली तर मग इतर दोन गोळ्यांचे काय झाले? असे अनेक सवाल हायकोर्टानं उपस्थित केले.

तसेच आरोपीवर गोळी किती दुरून चालवली गेली? त्याचा फॉरेसिक रिपोर्ट, घटनेवेळी उपस्थित असलेल्या सर्व पोलिसांच्या फोनची माहिती आणि आरोपीला छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज हे सगळं जपून ठेवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिले. जर तपास बरोबर झाला नाही असं आढळून आलं तर आम्हाला आवशक्य ते आदेश द्यावे लागतील असंही हायकोर्टानं यावेळी बजावलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्ङणाले हेते की, 23 सप्टेंबरला आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

या घटनेत पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली होती.

या प्रकरणी बदलापूर येथील संबंधित शाळेच्या विश्वस्त मंडळातील दोन सदस्यांवर पाॅक्सो अंतर्गत सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे.

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर 1 ऑक्टोबरला सुनावणी आहे.

गोळीबारानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेला नेण्यात आलं. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तसंच, अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्त संजय जाधव यांची बीबीसी मराठीला माहिती दिली की, "आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा तुरुंगातून घेऊन जात असताना गोळीबाराची घटना घडली, ज्यात त्याचा मृत्यू झालेला आहे."

ठाणे पोलिसांनी अशी माहिती दिली की, "बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या गाडीतच गोळीबार केला."

"या चकमकीत पोलीसही जखमी झाले होते, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याला उपचारांसाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं," असं पोलिसांनी सांगितले.

गोळीबारावेळी गाडीत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे म्हणाले

ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 262,132,109,121 तसंच शस्त्र अधिनियम कलम 27 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

संजय शिंदे हे गोळीबाराच्या वेळी गाडीत उपस्थित होते. मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी असं म्हटलं आहे की, "तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा आमच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रमुख आरोपी होता. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. दुपारी दोन वाजता आम्ही तळोजा कारागृहाकडे रवाना झालो."

संजय शिंदे त्यांच्या जबाबात म्हणतात की, "मी आणि सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी सरकारी पिस्टल सोबत घेतले होते. त्यावेळी मी माझे पिस्टल मध्ये 5 राउंड लोड केलेले होते. 23 सप्टेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंदेला आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनने मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर इकडे निघालो होतो."

"मी या वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजूस पुढे बसलो होतो आणि निलेश मोरे आणि 2 अंमलदार आरोपीसह वाहनाचे मागील बाजूस बसले होते. हे वाहन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा, "मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?" असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितलं."

संजय शिंदे यांनी त्यांच्या जबाबात सांगितलं की, "आम्ही सरकारी वाहनाने अक्षय शिंदेला घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता सव्वा सहा वाजेच्या सुमारास, अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्टल बळाचा वापर करून खेचू लागला. त्यानंतर निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यास अडवण्याचा प्रयत्न केला."

आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी, "मला जाऊ द्या" असे म्हणत होता, झटापटीमध्ये निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा त्यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले.

त्यावेळी आरोपी अक्षय शिंदेने निलेश मोरे यांच्या पिस्टलचा ताबा घेऊन "आता मी एकालाही जीवंत सोडणार नाही," असे रागाने ओरडून आम्हास बोलू लागला.

त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझ्या व हरिश तावडे यांच्या दिशेने त्याचे हातातील पिस्टल रोखुन आम्हाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.

आरोपी अक्षय शिंदे याचे रौद्र रूप व देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिस्टलमधुन आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री आली म्हणुन मी प्रसंगावधान राखून मी व माझे सहकारी यांचे स्वसंरक्षणार्थ माझे कडील पिस्टल ने 1 गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला व त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला."

यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती या जबाबात नोंदवण्यात आली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फेही पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात ही घटना कशी घडली याचा वृत्तांत पोलिसांनी दिला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन, पोलीस त्याला नेत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. त्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे."

सुषमा अंधारेंनी उपस्थित केले 'हे' 5 प्रश्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा कुणी महात्मा नाही. त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी, पण त्याला ही शिक्षा होत असताना कायद्याची प्रक्रिया पाळली गेली पाहिजे.

"या देशाचा शत्रू असणाऱ्या कसाबला फाशी देताना सुद्धा कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पाळली गेली होती. तीच प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात पार पडायला हवी होती. अक्षय शिंदेचा झालेला हा एन्काउंटर ही एका अर्थाने बदलापूर प्रकरणातील सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय."

सुषमा अंधारेंनी या घटनेसंबंधी 5 प्रश्न विचारले आहेत :

  • हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार जणांचा एन्कांऊटर झाला, त्या प्रकरणात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वापरली गेली, तीच स्क्रिप्ट या प्रकरणात वापरली गेली आहे हे फार उल्लेखनीय आहे.
  • अक्षय शिंदे जर एवढा हिंस्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याची नेआण करताना पोलिसांनी पुरेशी काळजी का घेतली नाही?
  • अक्षय शिंदेच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने पोलिसांच्या कमरेची बंदूक काढून पोलिसांवर गोळीबार करणं त्याला शक्य आहे का?
  • अक्षय शिंदेकडून पोलिसांच्या पायावर गोळी लागते पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते आणि त्यात त्याचा जीव जातो. हे असं कसं घडलं?
  • पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपासयंत्रणा जी राबवली जात होती, ती संशयास्पद होती. पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता. बदलापूर प्रकरणातील शाळेशी संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. त्याला अटक का केली गेली नाही?

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, "या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाहीत. सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे पोलीस कर्मचारी तत्काळ निलंबित व्हायला हवेत. या प्रकरणातील संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि आतातरी सत्तेचा मोह सोडून, कायद्याची चाड राखून देवेन्द्रजी, तुम्ही राजीनामा देणार आहात का?"

या बातम्याही वाचा :

राजकीय नेते काय म्हणाले?

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे."

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेच्या 'न्यायिक चौकशी'ची मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात?

"बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.

"बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे," असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, "बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे. ह्या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. ह्या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील.

"पण ह्या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि ह्या लपवालपवीचा काही संबंध आहे का? ह्याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी!"

बदलापूरमध्ये काय घडलं होतं?

16 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आलं होतं.

16 ऑगस्टला पीडित मुलीचे पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचले होते, परंतु तब्बल 12 तास त्यांना बसून ठेवण्यात आलं असा आरोप स्थानिकांनी केला होता. पोलीस प्रशासानाने दिरंगाई केल्याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

16 ऑगस्टला पालकांनी बदलापूर पूर्वेतील पोलीस स्टेशनमध्ये शाळेतील अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती.

शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. हजारोंच्या संख्येत बदलापूरमधील नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून धरला होता.

बीबीसी मराठीला मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, ‘पीडित मुलगी साडे तीन वर्षांची असून आपल्या आजी-आजोबांच्या घरी बदलापूर येथे राहते. आजी-आजोबांना संशय आल्याने त्यांनी आईला अचानक फोन करून कामाच्या ठिकाणाहून घरी बोलावून घेतलं.’

आईने मुलीला विचारलं असता तिने आपल्या प्रायव्हेट पार्टला वेदना होत असल्याचं सांगितलं, तसंच शाळेतील ‘दादा’ नावाचा इसम कसे वर्तन करतो याची माहिती दिली.

एका मुलीच्या माहितीवरून दुसऱ्या आणखी एका मुलीसोबत अशीच काहीशी घटना घडल्याचीही माहिती पालकांना कळाली आणि 16 ऑगस्टला पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं.

पालकांकडून मुलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली असून त्यात लैंगिक शोषण झाल्याचं समोर आल्याचीही माहितीही पोलिसांना पालकांनी दिली होती.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीविरोधात पॉक्सो-बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता कलम 65(2), 74, 75,76 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनावरही पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि एका महिला कर्मचाऱ्याचं निलंबन केलं होतं.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी (विशेष तपास पथक) गठीत करण्याचे निर्देश दिले होते.

तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं. यात बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)