इन्स्टाग्रामवरून प्रेम जुळलं, दुबईहून लग्नासाठी आला, पण ना वधू भेटली ना लग्नाचा मंडप दिसला

    • Author, हरमनदीप सिंग
    • Role, बीबीसी पंजाबी

पंजाबच्या जालंधरमधील 28 वर्षीय तरुणाला इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रेम करणं महागात पडलंय. आपली फसवणूक झाल्याचं या तरुणाच्या अगदी लग्नाच्या दिवशीच लक्षात आलं. हा तरुण वरात घेऊन लग्नस्थळी पोहोचला. पण त्याला ना वधू दिसली, ना लग्नाचा मंडप!

झालं असं की, नवरदेव फुलांनी सजवलेली गाडी, वाजत-गाजत वरात घेऊन 6 डिसेंबरला लग्नाच्या ठिकाणी पोहोचला होता. पंजाबमधील मोगा इथं त्याचं लग्न होणार होतं. पण तो प्रत्यक्ष वरात घेऊन पोहोचला, तेव्हा त्याला तिथं लग्नाचा मंडपही सापडला नाही आणि वधूही दिसली नाही.

त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून बघत असलेल्या लग्नाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आपली केवळ भावनिक नाही, तर आर्थिक फसवणूकही झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं आणि एकच धक्का बसला.

दीपक असं या तरुणाचं नाव असून तो जालंधर जिल्ह्यातील तहसील नाकोदरमधील मरियाला गावातील रहिवासी आहे.

दीपक दुबईत बांधकाम मजूर म्हणून काम करतो. दीपकच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या ठरलेल्या तारखेला तो नातेवाईकांसोबत वरात घेऊन लग्नाच्या ठिकाणी पोहोचला.

तिथं कोणीही दिसलं नाही. त्यामुळे त्यानं वधूशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला वधूनं फोन घेतला नाही. पण, काही वेळानंतर फोन बंद येत होता.

दीपकने केलेल्या दाव्यानुसार, त्याचं ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तिचं नाव मनप्रीत कौर आहे. ती वकील असल्याचं सांगत होती. दीपक गेल्या सात वर्षांपासून दुबईत राहत होता आणि लग्नाच्या काही दिवसाआधी पंजाबला आला होता.

लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडलं?

दीपकच्या म्हणण्यानुसार, त्याची मैत्रिण मनप्रीत कौरने लग्नासाठी रोझ गार्डन पॅलेस नावाचा पॅलेस ठरवला होता. याठिकाणी दीपक 100 लोकांसोबत आपली वरात घेऊन लग्नासाठी मोगा इथं पोहोचला. पण, त्याठिकाणी वधू किंवा वधूच्या कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं.

दीपक सांगतो, मोगाला लग्नस्थळी पोहोचल्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. आधी तिनं फोन उचलला नाही आणि नंतर तिचा फोन बंद येत होता. 5 डिसेंबरपर्यंत आम्ही चांगलं बोलत होतो.

गेल्या तीन वर्षांतही आमच्यात चांगलं बोलणं व्हायचं. मला कधीच वाटलं नाही की माझी फसवणूक होईल. माझी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आम्ही पोलिसांना बोलावलं.

दोघे कसे भेटले?

दीपकने सांगितल्यानुसार, मोगा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मनप्रीत कौरसोबत दीपकची ऑनलाइन ओळख झाली. मनप्रीत कौरनं दीपकला इंस्टाग्रामवर फॉलो केलं. त्यानंतर दोघंही पहिल्यांदा एकमेकांसोबत बोलले. यातच त्यांनी एकमेकांचा फोन नंबरही शेअर केला.

सुरुवातीला दोघंही तासन् तास फोनवर बोलत राहायचे. यादरम्यान त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

गेली तीन वर्ष त्यांचं बोलणं सुरूच होतं. यावेळी दीपक दुबईत बांधकाम मजुरीचं काम करत होता.

किती दिवस सुरू होतं प्रेमप्रकरण?

दीपकच्या म्हणण्यानुसार, त्यांचं प्रेमप्रकरण जवळपास तीन वर्ष सुरू होतं. पण, लग्नाच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबरला हे नातं संपलं. या तीन वर्षांत ती सतत त्याच्यासोबत, त्याच्या कुटुंबीयांसोबत फोनवरून बोलत होती. पण, या तीन वर्षांच्या काळात एकदाही ते लोक प्रत्यक्ष भेटले नाही. तसेच मुलीचं कुटुंबीय सुद्धा दीपकच्या संपर्कात होतं. पण, तेही फक्त फोनवरून. लग्न ठरल्यानतंरही दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटले नाहीत.

दीपक सांगतो, मी मनप्रीतला आजपर्यंत भेटू शकलो नाही. कारण मी दुबईत होतो. मी नुकताच पंजाबला आलो आहे. दोन्ही कुटुंब देखील एकमेकांना भेटू शकले नाहीत. आमच्या फोनवरील चर्चेदरम्यान आम्ही 2 डिसेंबर ही लग्नाची तारीख निश्चित केली होती.

पण, काही दिवसांपूर्वी मनप्रीतनं फोन करून सांगितलं की तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे लग्नाची तारीख बदलायला लागले. त्यामुळे आम्ही लग्न पुढे ढकलत 6 डिसेंबर ही तारीख ठरवली.

आर्थिक फसवणुकीबद्दल दीपकने काय केले आरोप?

दीपकने केलेल्या दाव्यानुसार, मनप्रीत कौरने गेल्या तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणात वेगवेगळ्या कारणानं त्याच्याकडून 50 ते 60 हजार रुपये घेतले आहेत. प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर सहा महिन्यातच मनप्रीतनं पैसे मागायला सुरुवात केली.

घरातील कामं, कुटुंबातील सदस्य आजारी आहेत असं सांगून ती पैसे मागायची. मी हे पैसे वेस्टर्न युनियनच्या माध्यमातून मनप्रीतला पाठवले आहेत. ही सर्व रक्कम एकाचवेळी दिली नसून तीन वर्षांत जेव्हा गरज असेल तेव्हा दिली आहे.

हे प्रेम नव्हतं तर फक्त फसवणूक होती हे मला आता समजलं आहे. फसवणूक करणे हाच त्यांचा उद्देश होता आणि तो पूर्ण झाला आहे, असाही आरोप दीपकनं केला आहे.

दीपकनं मेहतपूर जालंधर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मेहतपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुखदेव सिंह म्हणाले की, आम्हाला तक्रार प्राप्त झाली असून आम्ही पुढील कारवाई सुरू केली आहे. चौकशीत जे समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)