युक्रेनजवळ रशियन लष्कराचं विमान कोसळलं, किमान 65 जणांचा मृत्यू

रशियन सैन्याच्या विमानाला युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोद भागात अपघात झाला आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने येणाऱ्या बातम्यांनुसार इल्युशिन-76 नावाच्या या लष्कराच्या विमानात किमान 74 लोक होते, ज्यांचा मृत्यू झाला.

बीबीसी प्रतिनिधी स्टीव्ह रोजनबर्ग यांनी सांगितलं की, या विमानात युक्रेनचे 65 युद्धकैदी होते, ज्यांना हस्तांतरासाठी नेण्यात येत होतं.

विमानात सहा क्रू मेंबर आणि तीन सहायकही उपस्थित होते.

रशियन संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं की, 'इल-76' या लष्कराच्या विमानात 65 युक्रेनी युद्धबंदी होते, ज्यांना युक्रेनसोबत अदलाबदल करण्यासाठी नेण्यात येत होतं.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयए नोवोस्तीने 24 जानेवारीला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिहिलं की, विमानात सहा क्रू मेंबर आणि तीन सहायक उपस्थित होते.

बेल्गोरोद प्रांताचे गर्व्हनर व्याचेस्लाव ग्लादकोव्ह यांनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर म्हटलं की, ही घटना सोरोचांस्की जिल्ह्यामध्ये घडली आहे.

स्थानिक चॅनल ब्लेतगोरोव्हने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक विमान अचानक खाली कोसळायला लागतं आणि जमिनीवर आदळतं. त्यानंतर या विमानाला आग लागलेली दिसते.

रशियन खासदाराचा दावा- विमानाला तीन क्षेपणास्त्रं धडकली

रशियन खासदार आणि रिटायर्ड जनरल आंद्रेई कार्तपोलोव्हने सांगितलं की, क्रॅश झालेल्या विमानाला तीन क्षेपणास्त्रं धडकली होती.

त्यांनी दावा केला की, पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला ज्या पद्धतीची क्षेपणास्त्रं दिली आहेत, तशीच ही क्षेपणास्त्रं होती.

ही माहिती कशी मिळाली हे कार्तपोलोव्ह यांनी सांगितलं नाही.

ही क्षेपणास्त्रं 'पेट्रियट' मिसाइल्स होती की 'आइरिस-टी' होती, हे तपासानंतरच कळेल असंही कार्तपोलोव्ह यांनी म्हटलं.

या भागाचे गर्व्हनर व्याचेस्लाव ग्लादकोव्ह यांनी सांगितलं की, त्यांना या घटनेची माहिती आहे, मात्र त्यांनी यापेक्षा अधिक काहीही सांगितलं नाही.

रशियाच्या राष्ट्रपती भवनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की, क्रेमलिनला या दुर्घटनेची माहिती आहे. मात्र, त्यांनी सविस्तर माहिती द्यायला मनाई केली आहे.

बीबीसी व्हेरिफायने केला व्हिडिओ कन्फर्म

रशियामध्ये सैन्याचं जे विमान क्रॅश झालं आहे, त्याच्या सत्यतेची पडताळणी बीबीसी व्हेरिफायने केली आहे.

हे रशियाचंच इल-76 विमान असल्याचं बीबीसीच्या पडताळणीत आढळून आलं आहे. विमान कोसळतानाचा व्हीडिओ हा ताजा आहे आणि बेल्गोरोद प्रांतातील याबलनोव्ह गावात चित्रीत करण्यात आला आहे.

बीबीसी व्हेरिफायनं विमान कोसळतानाचा व्हीडिओ बारकाईने पाहिला तेव्हा त्यांना त्यात निळ्या रंगाची एक इमारत आणि एक चर्चही दिसलं.

गुगल मॅप्सवरील स्ट्रीट व्ह्यूच्या मदतीने ही जागा जुळवून पाहिली तेव्हा ती याबलोनोवो गावाजवळच असल्याचं आढळलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)