नंदुरबारच्या कड्याकपारीत अजूनही जिवंत आहे महिलांचा जीव घेणारी डाकीण प्रथा

- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
"की कोयो बाय कमी पडतोते?
बाई कुठे कमी पडते? बाई कुठे कमी पडणारे?"
गावानं डाकीण ठरवलेल्या 45 वर्षांच्या सुगीबाई वसावे (नाव बदललेले) यांचा प्रश्न खरंतर इतका सामूहिक होता की तो समजून घ्यायला भिलोरीतून कोणत्याही दुसऱ्या भाषेत भाषांतरित करण्याचीही गरज नव्हती.
"बाई उदरात पोसते. जन्म देते. बाई पोरालाही दूध पाजते आणि पोरीलाही. मग फक्त बाईच कुणाच्या वाईटावर कशी उठू शकते?" सुगीबाईंच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.
दिवस मावळत होता तसा सातपुड्याच्या पर्वत रांगांमधल्या आदिवासी पद्धतीच्या, बांबूच्या चिपड्या एकमेकांत गुंतवून बांधलेल्या सुगीबाईंच्या झोपडीत अंधार भरून जात होता.
चुलीच्या आणि होळीच्या चंद्राच्या धुसर प्रकाशात डोक्यावर लुगड्याचा पदर घेतलेली फक्त त्यांची आकृतीच दिसत होती.
जणू बाईपणावर आजवर झालेल्या अन्यायाचा जाब 'आदिम बाई' त्यांच्या तोंडून विचारत होती.
त्यांच्या झोपडीत वीज नाही. नंदूरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यात येणाऱ्या त्यांच्या गावात आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या घरात नाही. घरासमोरच्या हात पंपाचे पाईप काढून नेल्यापासून तोही वापरता येत नाही.
"खांबावरून वीज घेतली तरी रात्रीत कुणीतरी येऊन तार कापून जातं. आम्ही परत जोडली तर दबलेली भानगड उकरली जायची भीती वाटते. म्हणून रात्री तसंच अंधारात बसतो," त्या सांगत होत्या.
शेजारी बसलेला त्यांचा मराठी बोलू शकणारा मुलगा आणि हिंदी बोलू शकणारी मुलगी त्याला जोड देत होते.
ही 'भानगड' म्हणजे पाच वर्षांपूर्वी लागलेला डाकीण असल्याचा डाग. त्यांना डाकीण ठरवणारे (त्यांच्या भाषेत डाकीण काढणारे) त्यांच्याच पाड्यावरचे, दूरच्या भाऊबंदकीतले आहेत.
त्या कुटुंबातल्या एका महिलेची दाढ सुजून प्रचंड दुखत होती. त्याचा आळ सुगीबाईंवर आला.
सुगीबाई डाकीण आहेत, त्या माणूस खातात, करणी करतात असं म्हटलं गेलं. तेव्हापासून गावात काहीही वाईट घडलं की ते सुगीबाईंच्याच माथी मारलं जाऊ लागलं.
भगताच्या वाऱ्या केल्या, डाकिणीच्या परीक्षा दिल्या, जातपंचायतीच्या बैठकीत कैफीयत मांडून पाहिली. पण कशाचाच उपयोग झाला नाही.


परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की एक दिवस त्यांच्यावर आळ घेणारे सुगीबाईंचा जीव घ्यायला त्याच झोपडीवर चालून आले.
सुगीबाईंनी मागच्या दारानं पळ काढला. 2021 च्या ऑगस्टची ती काळरात्र त्यांना मुलांसोबत जंगलात लपून काढावी लागली.
"एकदा काडेपेटीही घेऊन आले आणि झोपडीला चौफेर घेरलं. वाटलं, संपलं सगळं आता! पण मुसळधार पाऊस सुरू झाला आणि आगीनं पेटच घेतला नाही," सुगीबाई सांगत होत्या.
प्रचंड त्रास, एकटेपण आणि गाव, पंच, माहेर, पोलीस प्रशासन कोणाकडूनच न मिळणारी मदत.
"सगळं इतकं असह्य होतं तीन मुलं आणि दोन मुलींसकट आम्ही दोघं नवरा बायको सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार करत होतो," त्या पुढे म्हणाल्या.
प्रत्येक पाड्यात एक डाकीण?
सातपुड्याच्या कड्याकपारीत जीव मुठीत घेऊन बसलेल्या कितीतरी बायकांचे चेहरे आणि त्यांच्या कथांचा फ्लॅशबॅक सुगीबाईंचं बोलणं ऐकताना डोळ्यासमोर तरळू लागला.
23 वर्षांपूर्वी याच भागात, धडगाव तालुक्यातल्या मांडवी खुर्द गावात, डाकीण असल्याच्या संशयावरून केलीबाई पटले यांचा खून झाला होता.
2003 ला झालेल्या त्यांच्या खुनानंतरच तर डाकीण प्रथा प्रकाश झोतात आली आणि त्याविरोधातला पहिला एल्गार सातपुड्यात दुमदुमला.
मधल्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून डाकीण प्रथा विरोधी परिषदा, संवाद यात्रा भरवण्यात आल्या. पोलीस विभागाच्याही काही मोहिमा झाल्या.
सरकार, प्रशासनानं डाकीण प्रथा संपवण्याचे थोडे फार प्रयत्नही केले. पुढे 2013 ला महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादुटोणा विरोधी कायदाच आला.
त्यातल्या सहाव्या आणि सातव्या अनुसूचीप्रमाणे, एखादी व्यक्ती करणी करते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते, तिच्यामुळे रोगराई पसरते, कोणाला खाते असं म्हणणं, चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, नग्न धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं गुन्हा असल्याचं म्हटलं गेलं.
गुन्हा करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठरली.

तरीही फक्त सातपुड्यातल्या भिल्लं आणि पावरा आदिवासी समुदायातच नाही तर महाराष्ट्रात गडचिरोली, पालघर आणि भारतात झारखंड, आसाम या राज्यातही डाकीण प्रथा अजूनही जिवंत आहे.
कधीही कोणत्याही बाईला डाकीण म्हटलं जाऊ शकतं. गावात कुणी वारलं, आजारी पडलं, शेताचं, धान्याचं, जनावरांचं नुकसान झालं असं कोणतंही कारण पुरतं.
त्या संशयावरून बाईला मारहाण केली जाते. स्मशानातली राख खायला लावणं, माणसाची लघवी प्यायला लावणं, तोंडाला काळं फासणं असे अत्याचार केले जातात. गावातून हाकलून लावलं जातं. तिचा खूनही केला जाऊ शकतो.
नेमक्या किती महिलांना आजपर्यंत डाकीण ठरवलं गेलं आहे, त्यातल्या किती जणींनी अन्याय मान्य केला, कितींचा अमानुष छळ केला गेला, किती जणींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या, किती जणींचे खून झाले, आणि किती आरोपींना शिक्षा झाली याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
नंदुरबारचा विचार केला तर प्रत्येक गावात नाही; तर त्यातल्या प्रत्येक पाड्यावर एका महिलेला डाकीण ठरवलं जातं असं म्हणलं तरी ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही, असं या भागात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते सांगतात.

डोंगरात विखुरलेल्या सहा-सात घरांचा एक पाडा असतो. अशा सहा-सात पाड्यांचा एक गाव म्हणवला जातो.
"यात दहा किंवा त्याहून जास्तच प्रकरणांपैकी आमच्या सारख्या संस्था संघटनांपर्यंत किंवा एखादं पोलिसांपर्यंत पोहोचतं," असं अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे सांगतात.
बाकीच्यांचं काय होतं?
कधी धडगावच्या भुरीबाई पावरांसारख्या (नाव बदलेले) महिला वयाच्या 60 व्या वर्षी हतबलतेनं माहेरी येऊन राहतात, काही परागंदा होतात.
तेही शक्य नसेल तर नर्मदेच्या खोऱ्यातल्या एका दुर्गम भागातल्या राजीबाई वसावेंसारख्या (नाव बदलेले) काही जणी आत्महत्या करतात. डाकीण काढलेल्या महिलांच्या मुलींनीही आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे.
भगताचं वर्चस्व
20 वर्षांपूर्वी त्यांच्या पाड्यावरच्या अशाच एका महिलेला डाकीण काढण्यात आलेली तेव्हा ती माहेरी पळून गेली होती, असं सुगीबाई सांगत होत्या. पण सुगीबाईंनी सगळ्यांविरोधात लढायचं ठरवलं.
"मी डाकीण नाही हे मला माहीत होतं. म्हणून मीच भगताकडे जायला तयार झाले," सुगीबाई पुढे सांगत होत्या. अशावेळी भगताकडे येण्या-जाण्याचा सगळा खर्च डाकीण काढलेल्या बाईलाच करावा लागतो.
"वैरा आणि कोंडुला या दोन्ही गावात भगतिणी होत्या. त्यांनी दाढ दुखण्याचा डाकिणीशी काही संबंध नाही असं सांगितलं. पण त्यांचं पटलं नाही म्हणून परत रुल्या नावाच्या गौऱ्या या गावातल्या भगताकडे नेलं," सुगीबाई म्हणाल्या.
आदिवासी समाजात महिला भगतांचं प्रमाण आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वासही कमी असतो. पुरूष भगतासारखं त्यांचं स्थान अढळ असत नाही. काही उलटलं किंवा त्रास वाढला तर या भगतीणींनाही डाकीण म्हटलं जाऊ शकतं.

"गौऱ्याच्या भगताकडे एक मोठा जड दगड होता. दगड उचलायचं नाटक भगत करतो. उचलला गेला म्हणजे बाई डाकीण," त्या सांगत होत्या. डाकीणीच्या शक्तींमुळे दगड उचलला जातो, असं भगत सांगतो.
या तिसऱ्या गौऱ्याच्या भगतानंच त्यांना डाकीण काढलं असावं, असा सुगीबाईंचा अंंदाज आहे.
याच रुल्या भगतानं 2024 च्या एप्रिल महिन्यात 45 वर्षांच्या पोतीबाई वसावे (नाव बदलेलं) डाकीण असल्याचा सरळ सरळ आरोप केलेला. तेव्हा त्याला पोलिसांनी अटकही केली होती.
धडगाव तालुक्यातल्या पोतीबाईंच्या गावात पोहोचायला कच्च्या रस्त्यानं कित्येक डोंगर ओलांडून जावं लागलं होतं आणि तेवढेच डोंगर पुढेही दिसत होते.
घाटाघाटाच्या रस्त्यातून प्रवास करताना कितीतरी ठिकाणी लहान मुलं होळीनिमित्त मोहाची दारू विकताना दिसली होती.
खोटं ठरवता आलं नाही ते सत्य
पोतीबाईंच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबातला 24 वर्षांचा तरूण मुलगा एक महिन्याच्या आजारपणानंतर वारला.
200 किमी लांब, गुजरातच्या सुरत शहरात एका खासगी रुग्णालयात तो कोमात होता तेव्हाच त्याचे कुटुंबीय इकडे भगताकडे ज्वारीचे दाणे घेऊन गेले होते.
रुल्या भगतानं एका विशिष्ट सम विषम पद्धतीनं दाण्यांची मांडामांड केली आणि त्यावरून एक डाकीण पोराला खात असल्याचं सांगितलं.

थेट नाव न घेता डाकीण असलेल्या महिलेचा नवरा कमजोर आहे, तिला दोन मुलं आहेत, तिचं एक घर पक्कं आहे आणि एक घर साधं आहे, अशा काही ढोबळ खुणा त्यानं सांगितल्या.
पोतीबाईंचे पती गंभीर नैराश्याशी झगडत आहेत हे साऱ्या गावाला माहीत होतं. त्यांच्यावर आधीपासूनच संशय होता. त्याची खातरजमा भगतानं केली होती.
खोटं ठरवता येत नाही ते सत्य म्हणून साऱ्यांनी स्वीकारलं.
तिकडे सुरतहून मुलाच्या मृत्यूची खबर आल्याबरोबर गावकऱ्यांचा मोठा जमाव पोतीबाईंच्या घरावर चालून गेला.
"एकीनं माझे केस ओढून जमिनीवर पाडलं आणि लाथांनी मारायला लागली. दुसरीनं डोक्यात मारलं त्याची जखम अजूनही आहे," पोतीबाई आठवून सांगतात.
"त्यातल्याच एकानं माझी नाटी (साडी) फाडली. आणि जमावातला एक पुरूष माझ्या अंगावर येऊन बसला आणि अंगाशी चाळे करू लागला," पोतीबाई सांगता सांगता मध्येच थांबल्या. पुढे काय झालं तेही त्यांना सांगवत नव्हतं.
डाकीण बाईला हवं तसं वापरून मारून टाकायचं अशा पद्धतीची वक्तव्य जमाव करत होता एवढंच त्यांनी सांगितलं.

"शेवटी गावातून ओढत बाहेर काढलं. आईला घरात घेतलं तर तुला पण मारून टाकीन आणि घरही पेटवून देईन अशी धमकी मोठ्या मुलाला दिली," पोतीबाई सांगत होत्या.
माहेरी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. जवळपास सात महिन्यानंतर प्रकरण शांत झाल्यावर त्या गावात परत आल्या.
मधल्या काळात गावातल्या नियमाप्रमाणं पोतीबाईंच्या माहेरचे, त्यांना डाकीण काढणारे आणि गावातले काही ज्येष्ठ अशी पंचाची बैठक भरली.
डाकीण काढणाऱ्यांनी भरपाई म्हणून 500 रुपये द्यावेत आणि प्रकरण मिटवून टाकावं असं पंचांनी सुचवलं. पण त्यानंतरही डाकीण म्हणून त्रास दिला जाणार नाही, याची शाश्वती पोतीबाईंना नव्हती.
शिवाय, खरंच डाकीण आहे म्हणून इतक्या कमी पैशात मिटवलं असं म्हटलं जाण्याचीही शक्यता होती. म्हणून पोतीबाईच्या मोठ्या भावाने पोलीस केस करायचं ठरवलं.
त्यांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींना अटक झाली. पण ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

या बातम्याही वाचा:
- महाराष्ट्र नवहिंदुत्वाची प्रयोगशाळा बनतो आहे का?
- धाकट्या भावालाही संपत्तीचा समान वाटा मिळावा म्हणून आग्रह धरणाऱ्या बहिणीची हत्या, 21 वर्षांपासून प्रकरण कोर्टातच
- राधे माँ यांचा सुखविंदर कौर ते 'देवी माँ' हा प्रवास कसा झाला? वाचा त्यांची कहाणी
- 'शिवाजी विद्यापीठ' हे नाव देण्यामागचा काय आहे इतिहास? नाव बदलण्याच्या मागणीला का होतोय विरोध?

डाकिणीपेक्षा मोठी कायद्याची भीती
पोतीबाईंच्या घरासमोरचं शेत ओलांडलं की लगेचच या अटक झालेल्या आरोपींचं घर येतं.
या सगळ्या प्रकाराबद्दल पोतीबाईंना डाकीण म्हणणाऱ्या कुटुंबाचं आता काय म्हणणं आहे ते समजून घ्यायला आम्ही त्यांच्याशी बोललो.
"गावात कुणीच एकट्यानं काही करू शकत नाही. गावातल्या सर्वांनी म्हटलं म्हणून आम्ही त्यांना डाकीण काढली. पोलिसांत तक्रार केल्यानंतर गावानं फक्त आमचंच नाव पुढे केलं," कुटुंबातला एक तरूण मुलगा सांगत होता.
थोडं विचारल्यानंतर एम.एस.डब्लू पूर्ण करून मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेत तो काम करत असल्याचं समजलं. डाकीण असते का, या प्रश्नावर तो पुढेही शांतच होता.
"आता झालं ते झालं. सगळं विसरून त्यांनी पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. पण पोतीबाई ऐकत नाही.
"उलट, ती डाकीण आहे आणि माणसं खाते तर तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाऊ नका असं ऐकवते," कुटुंबीय पुढे सांगत होते.

कायद्याची भीती त्यांच्या मनात साफ दिसत होती. डाकीणीच्या भीतीपेक्षाही ती मोठी होती.
आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर गावात पुन्हा एकदा पंचाची बैठक बसली असल्याचं पोतीबाईंनी पुढे सांगितलं.
समझोता करून तक्रार मागे घ्या, असं पंचाचं म्हणणं होतं. त्यानंतर पोतीबाईंना पुन्हा डाकीण म्हणून हिणवलं गेलं तर आरोपी कुटुंबाला 15 ते 20 हजार रुपयांचा दंड केला जाईल.
किंवा पोतीबाईंच्या कुटुंबानं पुन्हा डाकीण म्हणून अपमान केला असल्याचा विषय काढला तर त्यांनाही तितकाच दंड भरावा लागेल, असं पंचांनी सुचवलं.
न्यायाचा समझोता
"कधीमधी दारू पिऊन आजही ते डाकीण म्हणतात. म्हणून शिव्याशाप देतात. गावातले लोक तोंडावर बोलत नसले तरी पाण्याला गेल्यावर बायका दूर होतात. गावात कुठे बसायला गेल्यावर कुजबुजतात," पोतीबाई पुढे सांगतात.
त्यांच्याच गावातल्या एका पाड्यावर त्यांच्याआधी एका महिलेला असंच डाकीण ठरवल्याचंही त्यांनी सांगितलं.
"साप चावल्यानंतर गावातली एक बाई वारली. पण तिला डाकीणीनं खाल्लं असं म्हणून काही दिवसांपूर्वीच गावानं एका महिलेला हाकलून दिलं होतं.
"जिला डाकीण ठरवलं तिच्या माहेरकडचे आणि तिच्यावर आरोप करणारे यांच्यात समझोता झाला आणि बाईला माहेरी पाठवलं गेलं," पोतीबाई सांगत होत्या.

महिलेच्या माहेरच्यांनी ठरवलं तरच पोलीस तक्रार होते. पण पंचासमोरच्या वाटाघाटीतून आरोप करणारे आणि महिलेच्या माहेरचे दोघांनाही फायदा होत असेल तर महिलेला न्याय मिळाला नाही तरी चालतो.
"डाकीण प्रथेबद्दल या पंचांची संवेदनशीलता किती, डाकीण असते यावर खरंच त्यांचा विश्वास नसतो की गावात शांतता रहावी म्हणून ते असा निर्णय देतात आणि मुख्य म्हणजे, या पंचांमध्ये महिला असतात की नाही या साऱ्या प्रश्नांची उत्तरं उघड आहेत," विनायक सावळे म्हणतात.
भारत सरकारच्या कायदा व्यवस्थेबद्दलची भीती असणाऱ्या आणि त्यातल्या असहजतेचा अनुभव घेतलेल्या आदिवासींना त्यांची जुनी पंच पद्धतच बरी वाटते हे पोतीबाईंच्या बोलण्यावरूनही लक्षात येतं.
"डाकीण काढणाऱ्या लोकांना पंचांनी मोठा दंड करावा," असं त्यांचं म्हणणं होतं. "पंचांनी नाही, कायद्याने," त्यांच्या मोठ्या भावाने त्यात सुधारणा केली.
त्या डाकीण नाहीत हे पोतीबाईंना पक्कं माहीत होतं. पण डाकीण असते की ती अंधश्रद्धा आहेत याबद्दल त्यांचं काही पक्कं मत नव्हतं.
खोलवर रुजलेला समज
डाकीण असते हा समज आदिवासींच्या मनात खोलवर रुजलेला आहे, असं रायसिंग पडवी म्हणतात.
ते स्वतः आदिवासी आहेत. अक्कलकुवा तालुक्यातल्या वाडीबार जिल्हा परिषद शाळेत ते शिक्षक आहेत.
आदिवासी भाषेत 'अंधश्रद्धा' या अर्थाचा शब्दच नाही असं त्यांच्याशी बोलताना समजलं.
"पिढ्यांपासून चालत आलेले समज पूर्णपणे अमान्य करणं मलाही इतकी वर्ष शक्य झालं नव्हतं," रायसिंग म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून ते स्थानिक पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतात.
लहानपणापासून डाकिणीच्या अनेक कथा आजीकडून, वाडवडिलांकडून ऐकल्याचं ते पुढे सांगत होते. गावात आलेल्या परक्या बाईबद्दल कधी कोणाला विश्वास वाटत नसे.

"गावात एक दुर्मिळ पक्षी असतो. माणसानं किंचाळावं तसा तो रात्रीच्या वेळी ओरडतो. डाकीण त्या पक्षाचं रूप घेऊन झाडावर बसते, बैल खाते, माणसांना मारते असे अनेक विचित्र समज आहेत." रायसिंग म्हणाले.
"डाकीण काढण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे, असं म्हणता येणार नाही. पण आधी जितक्या उघडपणे बाईला डाकीण ठरवलं जायचं तसं आता कुणी करत नाही.
"आधी सगळा गाव तिला वाळीत टाकायचा. आता निदान फक्त तेवढ्या एका पाड्यातूनच तिला त्रास दिला जातो. बाकी गाव कायद्याच्या भीतीनं वरवर तरी बोलतो," ते म्हणतात. 23 वर्षांत एवढंच बदललं असं त्यांना वाटतं.
"आणखी एक बदल म्हणजे आता त्यात पक्षाचं राजकारणही आलं आहे. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्याला खाली खेचायचं असेल तर त्याच्या घरातल्या बाईला किंवा सुनेला डाकीण ठरवणं सोयीचं जातं," ते सांगतात.
विधवा, एकट्या महिलेची जमीन हडपण्यासाठीही तिला जवळचेच नातेवाईक डाकीण ठरवतात, असंही ते सांगत होते. पण तसं डाकीण ठरवलेल्या कोणत्याही महिलेनं आम्हाला स्पष्टपणे सांगितलं नाही.
गैरसमजाचा पंचनामा
आजारपण हेच काठीच्या 35 वर्षांच्या धोंडीबाई राऊत (नाव बदलेलं) यांच्याही त्रासामागचं कारण होतं.
2025 च्याच जानेवारी महिन्यात डाकीण ठरवून त्यांना मारहाण झाली होती. त्यानंतर माहेरी अडीच महिने राहून एक आठवड्यापूर्वीच गावात परत आल्याचं त्या सांगत होत्या.
आता आपल्यालाही गाव वाळीत टाकेल, कोण काय कसा त्रास देईल याची काळजी त्यांना वाटते, "टेन्शन होई माहू," त्या म्हणतात.
त्यांच्या मोठ्या चुलत दीराची मुलगी सिकल सेल ॲनिमिया असल्यानं सतत आजारी पडत असते.
पण धोंडीबाई जादुटोण्यानं तिला खात आहेत, असं म्हटलं जाऊ लागलं. 9 जानेवारीच्या सकाळी दीरानं त्या घरी एकट्या असताना दिरानं लाथाबुक्यानी, लाकडाच्या ओंडक्यानं बेदम मारहाण केली.

"गावातून मारत, ओढत त्यांनी त्यांच्या घरी मुलीपाशी नेलं आणि हिला परत आणून दे, आमच्या घरातलं जे बिघडवलं ते नीट करून दे अशी मागणी करत होते. कशीतरी त्यांच्या तावडीतून सुटून मी घरी पळून आले.
"तर त्यांचा मुलगा मोठा दगड घेऊन माझ्या मागे पळत येत होता. पुन्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब मारहाण करायला कुड्याच्या भिंतीं तोडून घरात घुसलं. मी बेशूद्ध झाल्यावर मेली असं समजून सगळे निघून गेले," धोंडीबाई सांगत होत्या.
मार बसला त्याचे वळ त्यांच्या शरीरावर अजूनही आहेत. त्यातून उठणाऱ्या कळाही ताज्या आहेत.
त्यांची अवस्था इतकी वाईट होती की जातपंचायत वगैरे सोडून थेट मोलगी ग्रामीण रुग्णालय गाठावं लागलं आणि पोलीस तक्रार करावी लागली.
पोलिसांना दिलेल्या जबानीत या सगळ्यासोबतच आरोपीनं त्यांच्या अंगावरचे कपडे फाडल्याचंही लिहिलं आहे.
एवढे तपशील असूनही त्यांच्याकडे असलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) अंधश्रद्धा आणि जादुटोणा विरोधी कायद्याचा उल्लेखच केला गेला नव्हता.

नुसता मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला होता. अडीच महिन्यांत आरोपींवर काहीच कारवाई झाली नाही.
"आधी ते कायद्याचा उल्लेख करायला तयारच नव्हते. शेवटी, सरकारी वकिलांचा सल्ला घेऊ असं सांगून आम्हाला पिटाळलं," धोंडीबाईंचे कुटुंबीय माहिती देत होते. कायदा नंतर जोडला गेला.
एकूणातच अंधश्रद्धा आणि जादूटोणा कायद्याविषयीची पोलिसांची समज फार तोकडी असल्याचं लक्षात येतं.
धडगाव पोलीस स्टेशनतंर्गत 2024 मध्ये डाकीणीच्या नऊ गुन्ह्यांची नोंद आहे. त्या गुन्ह्यांचे तपशील मागितले तेव्हा तक्रारीच्या चार्जशीटमधून पुराव्या अभावी अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा काढून टाकावा लागतो, असं पोलीस निरिक्षक राजेंद्र जगताप यांच्या बोलण्यात आलं.
गावात झालेल्या भांडणांचा बदला घेण्यासाठी आदिवासी डाकीण कायद्याचा वापर करतात, असा पोलिसांचा समज आहे.
"भांडणांमुळे कोणाला मारहाण झाली तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. नव्या भारतीय न्याय संहितेच्या कायद्यानुसार कलम 115 (2) लागतं. तो अदखलपात्र गुन्हा ठरतो. मग धडा शिकवण्यासाठी, सूड उगवायचा म्हणून डाकीण म्हटलं, असं खोटं सांगितलं जातं," परिसरातले एक पोलीस कर्मचारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगत होते.
अशिक्षित आदिवासींना कायद्याविषयी एवढी माहिती कशी असणार असं विचारल्यावर त्यांचा अर्ज टाईप करून देणारे किंवा पोलीस पाटील त्यांना याची कल्पना देतात, असं ते म्हणाले.

"अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा नीट वाचला तर 2 सी आणि बी प्रमाणे डाकीण म्हणवली गेलेली व्यक्ती घरात अघोरी पूजा पाठ करतो का, घरात त्यासाठीची सामग्री आहे का, त्याने त्याआधी लोकांना तसं काही केल्याचे साक्षीदार आहेत का, हे पहावं लागतं," ते म्हणाले.
घटनास्थळी पंचनामा करायला गेल्यावर असं काही साहित्य वगैरे सापडत नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध होत नाही, असंही ते पुढे सांगत होते.
"डाकीण म्हणून त्रास दिल्याच्या अनेक तक्रारींची नोंद पोलिसांकडे अनेकदा होत असते. पण प्रत्यक्षात घडणाऱ्या गुन्ह्यांपेक्षा येणाऱ्या तक्रारी नक्कीच कमी असतील," नंदूरबारच्या जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.
डाकीण म्हणून मारहाण करणं ही फार गंभीर गोष्ट आहे. पण हिंसेची तीव्रता कमी असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचतात त्यापेक्षा नक्कीच अधिक प्रमाणात घडत असणार, असं त्यांचं म्हणणं होतं.
जिल्हा पातळीवर प्रशासनाने अंधश्रद्धा विरोधी समिती स्थापन केलेली आहे. त्यांच्या नियमित बैठका होत असतात. त्यातही आलेल्या तक्रारींवर चर्चा होत असते.
"ज्या महिलांना तक्रार करायला समोर येता येत नाही त्यांना वेगवेगळ्या संस्था, संघटना मदत करत असतात. त्यांच्यामाध्यमातूनही महिला अत्याचाराच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत असतात. पोलिसांकडे तक्रार येताच त्यावर त्वरित कारवाई केली जाते," जिल्हाधिकारी सेठी म्हणाल्या.
शिवाय, जनजागृतीवरही प्रशासनाचा भर असतो असं डॉ. सेठी सांगत होत्या. पण जनजागृतीच्या व्हीडिओमधली लोक स्थानिक आदिवासींना ओळखीची वाटत नाहीत, असं त्यांना नंदूरबारच्या जिल्हाधिकारी म्हणून घालवलेल्या सहा महिन्यांच्या काळात लक्षात आलं आहे.
"जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आता स्थानिक पातळीवर त्यासाठी एक विभाग तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून स्थानिक लोकांकडून आदिवासी भाषेतूनच जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातील. विशेषतः आश्रम शाळेतील 14 ते 18 या मुलांसाठीचे हे व्हीडिओ असतील," डॉ. सेठी म्हणाल्या.
शिवाय, प्रशासनाकडून डाकीण प्रथेतल्या पीडितांच्या पुर्नवसनासाठीही काही उपाययोजना केल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलं. जिल्ह्यात वयस्कर, पारलिंगी आणि इतर परिघावरच्या लोकांसाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांमधून त्यांना मदत केली जाऊ शकते का यावर प्रशासन काम करेल.
येत्या काळात पोलिसांसाठीही जनजागृतीची सत्र घेतली जातील आणि फक्त कायद्याबद्दलची माहितीच नाही तर महिलांविषयीच्या पूर्वग्रहांवरही काम केलं जाईल, असंही डॉ. सेठी यांनी सांगितलं.
नेमकी जबाबदारी कोणाची?
डाकीण प्रश्नाबाबत पोलीस यंत्रणा फक्त असक्षमच नाही तर अज्ञानी आणि असंवेदनशील आहे, असं मत अंनिसचे कार्यकर्ते विनायक सावळे यांनी मांडलं.
"शिवाय, प्रशासनाला, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेलाही तो प्रश्न आपला वाटत नाही. कोणीच त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. सामान्य आदिवासी लोकांमध्ये दीर्घकाळ जनजागृती करावी लागणार हे बरोबरच आहे. पण सद्यस्थितीत त्यासाठीची संसाधनं कमी पडत असताना आणखी किती महिला त्रास सहन करत राहणार?" ते म्हणतात.

आजपर्यंत डाकीण प्रथा हा सगळ्या गुंतावळ्यातला हा प्रचंड दुर्लक्षित राहिलेला, कोणीही जबाबदारी न घेणारा प्रश्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अंधारात बसलेल्या सुगीबाईंच्या प्रकरणातही तेच दिसत होतं. स्थानिक पोलिसांनी दाद दिली नाही म्हणून 2021 मध्ये सुगीबाईंनी नंदुरबारला पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार केली होती.
"न्यायालयात आमच्या बाजूने लढणारा सरकारी वकील हा आरोपींच्या वकिलांच्या हाताखाली काम करणारा सहाय्यक आहे," सुगीबाईंचा सलूनमध्ये काम करणारा मुलगा सांगत होता.
डाकीण म्हणून महिलेला त्रास देणाऱ्यांना सहा महिने ते एक वर्ष अशा ठराविक वेळेत शिक्षा केली जावी, अशी सुधारणा कायद्यात व्हावी असं सुगीबाईंना वाटतं.

पण कित्येक दिवसांत त्यांच्या खटल्याची तारीखही आलेली नाही. त्यांच्यावर आरोप करणारे एक दिवस जेलमध्ये राहून जामिनावर सुटले आणि सुगीबाईंचे कुटुंब आणखी भीतीच्याच छायेत वावरते.
"आम्ही कुठे बाहेर गेलो की कधी लोक मारतील याचा नेम नसतो," सुगीबाईंची थोरली मुलगी, 27 वर्षांची अर्चना (नाव बदललेले) सांगू लागली.
"आम्ही रात्रीचा दरवाजा बंद करून, कंदिल मालवून, मोबाईल सायलेंट करून बसतो. कुणाचा फोन आलेला समजलं तरी हळू आवाजात बोलतो. आवाज ऐकून कुणी पुन्हा मारायला येऊ नये, एवढीच भीती असते," अर्चना सांगते.
आईला डाकीण ठरवलं की तो डाग मुलीलाही लावला जातो. आई मुलीला दुधातून डाकिणीची विद्या शिकवते, असा समज आहे. त्यामुळे पुढेमागे आपल्यालाही डाकीण म्हणवलं जाणार आहे, हे अर्चनाला चांगलाच माहीत आहे.
या सगळ्या काळजी सोडून एक दिवस तरी मनापासून हसता यावं, असं तिला वाटतं. "मांँ की जिंदगी तो गुजर गई. लेकीन हमारा क्या?" तिचा प्रश्न सुगीबाईंच्या झोपडीतला अंधार भेदत गेला.
नंदुरबारमधल्या तिच्यासारख्या अनेक तरुण मुलींचा तो आवाज होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











