राधे माँ यांचा सुखविंदर कौर ते 'देवी माँ' हा प्रवास कसा झाला? वाचा त्यांची कहाणी

राधे माँ नेहमीच लाल वस्त्र परिधान करून आणि हातात त्रिशूळ घेऊन भक्तांसमोर येतात.
फोटो कॅप्शन, राधे माँ नेहमीच लाल वस्त्र परिधान करून आणि हातात त्रिशूळ घेऊन भक्तांसमोर येतात.
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

त्या चमत्काराचा दावा करतात. त्यांचे भक्त त्यांना 'देवी माँ' मानतात. त्या आहेत सुखविंदर कौर. मात्र भक्तांमध्ये आणि समाजात त्या 'राधे माँ' या नावानं प्रसिद्ध आहेत.

भारतात बाबांची मोठी गर्दी झालेली असताना ज्या महिलांना यात स्वत:चं स्थान निर्माण करता आलं आहे, अशा मोजक्या महिलांपैकी त्या एक आहेत.

भक्ती, भीती, अंधश्रद्धा आणि रहस्याच्या या दुनियेत स्वत:च स्थान निर्माण करणं कठीण आहे. 'राधे माँ' यांच्या या दुनियेचा धांडोळा बीबीसीनं घेतला आणि प्रत्येक स्तराचा उलगडा केला.

लुई वुताँ आणि गुची सारख्या महागड्या ब्रँडच्या पर्स हातात घेऊन, सोनं आणि हिऱ्याचे दागिने आणि फॅशनेबल कपडे परिधान करून महिला गोळा होत आहेत.

या महिला 'राधे माँ' च्या भक्त आहेत. दिल्लीत जवळपास मध्यरात्री 'राधे माँ' यांचं दर्शन सुरू होतं. या महिला त्यासाठीच आल्या आहेत.

स्वत:ला 'चमत्कारी माता' म्हणवून घेणाऱ्या राधे माँ यांना संतासारखं साधं जीवन आवडत नाही. त्यांची वेशभूषा साधी नाही, त्या मोठे प्रवचन देत नाहीत. इतकंच काय, त्या भक्तांना सकाळी भेटत नाहीत.

बीबीसीनं जेव्हा त्यांची भेट घेतली, तेव्हा त्या मोकळेपणानं म्हणाल्या, "हे सत्य आहे की चमत्कार केल्यावर नमस्कार होतो. एरवी कोणी एक रुपयादेखील देत नाही. मात्र जेव्हा त्यांना चमत्काराचा अनुभव येतो, त्यांची कामं होतात, तेव्हा ते दान करतात."

दिल्लीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राधे माँ.
फोटो कॅप्शन, दिल्लीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राधे माँ.

या 'चमत्कारांच्या' अनेक कहाण्या आहेत. त्यांचे भक्त दावा करतात की ज्यांना मूलबाळ नसतं, त्यांना राधे माँ च्या आशिर्वादानं अपत्यं होतात. ज्यांना फक्त मुलीच होत असतात, त्यांना मुलं होतात. ज्यांचा व्यापार तोट्यात सुरू असतो, त्यांना नफा होऊ लागतो. आजारी लोक निरोगी होतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

देवाचं रुप असल्याचा आणि चमत्कार करण्याचा दावा फक्त 'राधे माँ'च करत नाहीत. भारतात असे अनेक स्वयंघोषित बाबा आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच चालली आहे.

यातील काही जणांवर भ्रष्टाचारापासून लैंगिक हिंसेपर्यंतचे अनेक आरोपदेखील झाले आहेत. राधे माँ यांच्यावर देखील 'काळी जादू' करण्याचे आणि एका कुटुंबाला हुंडा घेण्यासाठी चिथावणी देण्याचे आरोप झाले. मात्र पोलिसांच्या तपासात सर्व आरोप फेटाळले गेले.

यानंतर देखील हजारो लोक या बाबा आणि देवींच्या दर्शनासाठी येत असतात. 2024 मध्ये उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये अशाच एका बाबाच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात 120 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

प्राध्यापक श्याम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत. नागपूरमध्ये आम्ही त्यांना भेटलो.

ते म्हणतात, "परमेश्वराचा साक्षात्कार होणं हाच जीवनाचा उद्देश असल्याचा सामान्य संस्कार बहुतांश भारतीय कुटुंबांमध्ये केला जातो. त्यासाठी ध्यान, प्रार्थना, भजन-कीर्तन केलं तर सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त झालेल्या बाबा किंवा देवीला लोक भगवान मानतात. लोकांना वाटतं की ते चमत्कार करू शकतात."

'राधे माँ'चे भक्त कोण आहेत?

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की गरीब लोक किंवा अडाणी, अशिक्षित लोक आहेत, ते या प्रकारच्या बाबा-बुवांमुळे प्रभावित होतात. याच प्रकारचे लोक भक्त असतात. मात्र राधे माँ यांचे अनेक भक्त श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांमधील आहेत.

मला ऑक्सफर्ड विद्यापीठातील सैद बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेणारे आणि एक शैक्षणिक कन्सल्टन्सी चालवणारे पुष्पिंदर भाटिया भेटले. त्या रात्री ते देखील त्या महिलांबरोबर दर्शनासाठी रांगेत होते.

ते मला म्हणाले की 'दैवी शक्तींच्या मानवी रुपाची' भक्ती करण्याचा विचार त्यांनी कधीही केला नव्हता.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

पुष्पिंदर म्हणाले, "सुरुवातीला माझ्या मनात प्रश्न होते की, देव मानवी रुपात येतो का? हे खरं असतं का? तुमचं आयुष्य बदलून जाईल, असा आशिर्वाद त्या देतात का? हे तथाकथित चमत्कार कसे होतात?"

पुष्पिंदर भाटिया यांचं कुटुंब एका मोठ्या दु:खद घटनेला तोंड देत होतं. त्यावेळेस ते राधे माँ यांच्या संपर्कात आले. अनेकजण म्हणतील की त्या परिस्थितीमुळे ते मानसिकदृष्ट्या कमकुवत असतील किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकता आला असेल.

मात्र, ते सांगतात की त्यावेळेस राधा माँ यांच्या बोलण्यातून त्यांना वाटलं की राधे माँ यांना खरोखरंच त्यांची काळजी वाटते.

पुष्पिंदर म्हणाले, "मला वाटतं की पहिल्याच दर्शनाच्या वेळेस त्यांच्या तेजस्वीपणानं मला आकर्षित केलं. मला वाटतं, जेव्हा तुम्ही त्यांच्या मानवी रुपापलीकडे जाऊन त्यांना पाहता, तेव्हा तुम्ही तत्काळ त्यांच्याशी जोडले जाता."

राधे माँ
फोटो कॅप्शन, पुष्पिंदर सिंह हे एका शैक्षणिक कन्सल्टन्सी कंपनीचे सीईओ आहेत.

'राधे माँ'चं दर्शन मिळणं त्यांच्या भक्तांसाठी खूपच मूल्यवान बाब आहे. दिल्लीतील एका खासगी घरात मध्यरात्रीच्या वेळेस अशाच एका दर्शनाला हजर राहण्याची संधी आम्ही मिळवली.

तिथे शेकडो भक्त जमले होते. त्यामध्ये एक मोठे व्यापारी आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील होते. दुसऱ्या शहरातून विमान प्रवास करून ते खास राधे माँ यांच्या दर्शनासाठी त्यांच्या कुटुंबासह तिथे आले होते.

पत्रकार म्हणून मी, तिथे काय चालतं हे पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी गेले होते. मला सांगण्यात आलं की आधी दर्शन घ्यावं लागेल. मग मला एका लांबलचक रांगेत उभं करण्यात आलं.

त्यानंतर सांगण्यात आलं की कशाप्रकारे प्रार्थना करावी लागेल. तसंच मला इशारा देण्यात आला की जर मी प्रार्थना केली नाही, तर माझ्या कुटुंबावर एखादं संकट येऊ शकतं.

त्या खोलीत राधे माँ यांच्या आवडत्या लाल आणि सोनेरी रंगांची सजावट करण्यात आली होती. तिथे जणूकाही फक्त राधे माँ यांच्या डोळ्यांच्या खुणेनंच सर्व काही होत होतं.

त्या एका क्षणी खूश, तर एका क्षणी नाराज होत्या.... आणि मग तो राग, न जाणो कसा त्यांच्या एका भक्तामध्ये गेला. संपूर्ण खोलीत शांतता पसरली. त्या भक्ताचं डोकं आणि शरीर जोरजोरात हलू लागलं. ती भक्त महिला जमिनीवर लोळू लागली.

मग भक्तांनी राधे माँ यांना राग सोडून माफ करण्यास सांगितलं. काही मिनिटांनंतर, बॉलीवूडचं एक गाणं वाजवण्यात आलं. राधे माँ नाचू लागल्या. रात्रीचं सौंदर्य पुन्हा परतलं.

त्यानंतर भक्तांची रांग पुन्हा पुढे सरकू लागली.

राधे माँ यांचा पंजाब ते मुंबईपर्यंतचा प्रवास

राधे माँ यांचा जन्म पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील दोरांग्ला या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं नाव सुखविंदर कौर ठेवलं.

सुखविंदर कौर यांच्या बहीण रजिंदर कौर यांनी मला सांगितलं, "मुलं नेहमी म्हणतात, मी पायलट होईल, डॉक्टर होईल, तसं देवी माँ सांगायच्या, मी कोण आहे? त्यावर वडील त्यांना एकशे पस्तीस वर्षांच्या एका गुरुजींकडे घेऊन गेले. ते म्हणाले की ही मुलगी एकदम भगवतीचं रुप आहे."

वयाच्या विसाव्या वर्षी सुखविंदर कौर यांचा विवाह मोहन सिंह यांच्याशी झाला. त्यानंतर त्या मुकेरियां शहरात राहू लागल्या. पैसे कमावण्यासाठी त्यांचे पती परदेशात गेले.

राधे माँ यांनी सांगितल्यानुसार, "यादरम्यान मी साधना, तपस्या केली. मला देवीचं दर्शन झालं. त्यानंतर मी प्रसिद्ध झाले."

राधे माँ चा जुना फोटो घेऊन एक भक्त
फोटो कॅप्शन, राधे माँ चा जुना फोटो घेऊन एक भक्त

आता रजिंदर कौर मुकेरियां शहरातच राधे माँ यांच्या नावानं बनलेल्या एका मंदिराची देखभाल करतात. हे मंदिर राधे माँ यांचे पती मोहन सिंह यांनी बांधलं आहे.

रजिंदर कौर म्हणतात, "आम्ही त्यांना डॅडी म्हणतो. त्या आमच्या माँ आहेत, त्यामुळे ते आमचे वडील झाले."

राधे माँ यांचे पती जेव्हा परदेशात होते. तेव्हा त्या त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या बहिणीकडे सोडून भक्तांच्या घरी राहू लागल्या. त्यांचे बहुतांश भक्त व्यापारी कुटुंबांमधील होते.

एका शहरातून दुसऱ्या शहरात, असं करत त्या मुंबईत पोहोचल्या. तिथे एक दशकाहून अधिक काळ त्या एका व्यापारी कुटुंबाबरोबर राहिल्या. त्यानंतर त्या आपल्या मुलांबरोबर राहू लागल्या.

ज्या लोकांच्या घरी राधे माँ राहिल्या, ते सर्व त्यांचे कट्टर भक्त आहेत. ते दावा करतात की त्यांच्या घरी देवी माँ ची 'पावलं पडल्यामुळे' त्यांच्या घरात सुखसमृद्धी आली.

'देवी माँ'चं संसारी जग

राधे माँ यांची दुनिया विचित्र आहे. त्यात दैवी गोष्टींबरोबरच संसारी गोष्टी आणि नातेगोते देखील आहेत.

त्यांच्या व्यापारी मुलांनी एक मोठी हवेली बनवली आहे. राधे माँ त्यात राहतात. जी व्यापारी कुटुंबं राधे माँ यांच्या सर्वात जवळचे भक्त आहेत, त्याच बड्या व्यापारी कुटुंबातील मुलींशी राधे माँ यांच्या मुलांचादेखील विवाह झाला आहे.

हवेलीत राधे माँ इतर कुटुंबापेक्षा वेगळं राहतात. त्या एका वेगळ्या मजल्यावर राहतात. जेव्हा भक्तांना दर्शन द्यायचं असतं किंवा राधे माँ यांना एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विमानानं दुसऱ्या शहरात जायचं असतं, तेव्हाच त्या तिथून बाहेर पडतात.

राधे माँ यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमांची जबाबदारी त्यांची मोठी सून मेघा सिंह सांभाळतात. मेघा म्हणतात, "त्या आमच्याबरोबर राहत नाहीत. आम्ही धन्य आहोत की त्यांच्या कृपेनं आम्ही त्यांच्या चरणी राहत आहोत."

राधे माँ
फोटो कॅप्शन, पंजाबमधील दोरांगला गावातील एका कार्यक्रमात काढलेल्या जुन्या छायाचित्रात सुखविंदर कौर.

राधे माँ यांना देण्यात येणाऱ्या दानाचा हिशोब त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे भक्त ठेवतात.

मेघा म्हणतात, "राधे माँ यांच्या सूचनेनुसार त्यांच्या भक्तांनी एक सोसायटी बनवली आहे. गरजू लोक तिथे अर्ज करतात. अर्जदाराची पूर्ण चौकशी करून त्याला मदत केली जाते. राधे माँ स्वत: मात्र संसारी गोष्टींपासून दूर आहेत."

अर्थात राधे माँ यांना भडक रंगाचे कपडे आणि दागिने आवडतात.

बीबीसीशी बोलताना राधे माँ म्हणाल्या, "कोणत्याही विवाहित महिलेप्रमाणे चांगले कपडे परिधान करणं आणि लाल लिपस्टिक लावणं मला आवडतं. पण मला मेकअप आवडत नाही."

मात्र आम्ही जितका वेळ त्यांच्यासोबत होतो, तितका वेळ त्यांनी मेकअप केलेला होता.

मेघा म्हणाल्या, "तुम्ही तुमच्या देवाच्या मुर्तीसाठी नेहमी सर्वात सुंदर वेशभूषा आणता. मग जिवंत देवीसाठी का नाही? आम्ही नशीबवान आहोत की त्या आहेत आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे."

2020 मध्ये राधे माँ, त्यांचे लाल कपडे परिधान करून आणि हातात त्रिशूल घेऊन, बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर आल्या होत्या. त्यांनी बिग बॉसच्या घराला आशिर्वाद दिला होता.

त्यांची आजची प्रतिमा त्यांच्या आधीच्या दिसण्यापेक्षा एकदम वेगळी आहे. मी जेव्हा पंजाबात गेले आणि त्यांच्या भक्तांना भेटले, तेव्हा त्यातील अनेकांनी मला राधे माँ यांचे जुने फोटो दाखवले.

चमत्काराचे दावे आणि त्यामागचं 'सत्य'

संतोष कुमारी मुकेरियां गावात राहतात. त्यांनी त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात भगवान शिव आणि पार्वतीच्या फोटोंबरोबरच राधे माँ चा फोटोदेखील ठेवला आहे.

त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या पतीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्या राधे माँ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर लवकरच त्यांच्या पतीची तब्येत चांगली झाली होती. त्यामुळे संतोष कुमारी राधे माँ यांच्या भक्त झाल्या.

संतोष कुमारी त्यांच्या देवघरात ठेवलेला राधे माँचा फोटो दाखवताना.
फोटो कॅप्शन, संतोष कुमारी त्यांच्या देवघरात ठेवलेला राधे माँचा फोटो दाखवताना.

संतोष कुमारी म्हणाल्या, "देवी माँ यांच्यामुळेच आज माझे पती जिवंत आहेत. त्यांच्या तोंडातून रक्त आलं होतं. त्यानंच त्यांनी माझी मांग भरली. टिळा लावला आणि म्हणाल्या, जा... काहीही होणार नाही. तुझा पती बरा होईल."

मला आश्चर्य वाटलं की अनेक भक्तांनी राधे माँ यांच्या दैवी शक्तीमुळे त्यांच्या तोंडातून रक्त येत असल्याचा दावा केला. त्या भक्तांच्या मते राधे माँ यांच्या खास शक्तीमुळे तसं घडलं होतं.

'श्री राधे माँ चॅरिटेबल सोसायटी' दर महिन्याला संतोष कुमारींसह जवळपास पाचशे महिलांना एक ते दोन हजार रुपये पेन्शन देते. यातील बहुतांश महिला विधवा किंवा एकट्या आहेत.

पेन्शन मिळणाऱ्या या भक्तांनी चमत्काराच्या अनेक कहाण्या सांगितल्या. मात्र त्यामध्ये त्यांना वाटणाऱ्या भीतीचाही उल्लेख होता.

सुरजीत कौर म्हणाल्या, "आम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. माझं नुकसान होईल. मी जर दिवा लावला नाही तर माझं नुकसान होतं. मी आजारी पडते."

राधे माँ यांची कृपा राहावी म्हणून सुरजीत दररोज त्यांच्या फोटोसमोर दिवा लावतात.

राधे माँचा धाकटा मुलगा, मोठा मुलगा, मोठी सून, धाकटी सून त्यांच्या मुंबईतील हवेलीमध्ये
फोटो कॅप्शन, राधे माँचा धाकटा मुलगा, मोठा मुलगा, मोठी सून, धाकटी सून त्यांच्या मुंबईतील हवेलीमध्ये

प्राध्यापक श्याम मानव यांच्या मते, देवी माँ ला त्यांची भक्ती कमी झाली आहे असं वाटू नये, अशी भीती भक्तांमध्ये असते आणि म्हणून असं होतं.

ते म्हणाले, "लॉ ऑफ प्रोबेबिलिटीमुळे जी भविष्यवाणी खरी होते, त्याचं श्रेय बाबांना मिळतं. मात्र ज्या खऱ्या होत नाहीत, त्याचं डिसक्रेडिट बाबांना दिलं जात नाही. भक्त स्वत:लाच दोष देऊ लागतात की आमची भक्ती अपुरी पडली किंवा आमचं नशीबच असं आहे."

"माझ्यावरील बाबांची कृपा कमी होईल. बाबाच्या प्रिय लोकांमधून मला बाजूला किंवा वेगळं काढलं जाईल अशी देखील भीती असते."

राधे माँ यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या चमत्काराचे दावे खोटे असल्याचं सांगणारेदेखील अनेकजण होते.

दिल्लीतील एका कार्यक्रमात भेटलेल्या एका महिलेनं हे "दावे खोटे" असल्याचं सांगितलं.

दुसऱ्या एकानं सांगितलं की त्यांनी कोणताही चमत्कार स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला नाही. मेकअप केल्यामुळे आणि महागडे कपडे परिधान केल्यामुळे एखादी व्यक्ती देव किंवा भगवान होत नाही.

तरीदेखील ते राधे माँ यांच्या कार्यक्रमाला आले होते. ते म्हणाले की रिअ‍ॅलिटी शो मध्ये पाहिल्यानंतर प्रत्यक्षात राधे माँ यांना पाहण्याची उत्सुकता होती म्हणून ते कार्यक्रमाला आले होते.

भक्ती आणि भीती

या तपासाच्या दरम्यान मला काहीजण असेदेखील भेटले, जे आधी राधे माँ यांचे भक्त होते.

या लोकांनी सांगितलं की त्यांच्या बाबतीत राधे माँ यांच्या 'चमत्कार' किंवा 'आशिर्वादा'चा उपयोग झाला नाही. उलट त्यांचं नुकसानच झालं. अर्थात त्यातील कोणीही त्यांची ओळख उघड करण्यास तयार नव्हतं.

या सर्व गोष्टींमुळे राधे माँ यांच्या ज्या भक्तांचा त्यांच्या दैवी शक्तीवर विश्वास आहे आणि जे त्यांची सेवा करण्यास तयार आहेत, अशा भक्तांबद्दल माझ्या मनात असलेलं कुतुहल आणखी वाढलं.

एका संध्याकाळी तर मी थक्कच झाले. राधे माँ यांचे भक्त त्यांच्या खोलीत जमिनीवर बसलेले होते. त्यावेळेस राधे माँ यांनी त्यांच्या सर्वात जवळच्या भक्तांना प्राण्यांचे आवाज काढण्यास सांगितलं आणि ते भक्त त्याला तयार झाले.

राधे माँ यांनी त्यांना कुत्र्यांचा आणि माकडांची नक्कल करून दाखवायला सांगितलं. त्या भक्तांनी कुत्र्यांप्रमाणे ओरडण्याचा आवाज काढला आणि माकडांसारखं खाजवून दाखवलं.

मी असं कधीही पाहिलं नव्हतं.

राधे माँ यांच्या सून मेघा सिंह देखील त्या खोलीत होत्या. भक्तांच्या या वर्तवणुकीमागचं कारण मी त्यांना विचारलं.

मेघा सिंह यांना या गोष्टीचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही.

त्यांनी सांगितलं की गेल्या तीन दशकापासून भक्तांना दर्शन देण्याव्यतिरिक्त राधे माँ त्यांच्या खोलीतच असतात.

मेघा म्हणाल्या, "त्यामुळे त्यांच्याकडे मनोरंजनाचं ते एकमेव साधन आहे. आम्ही सर्वजण नक्कल करून किंवा विनोद सांगून प्रयत्न करतो की त्यांनी हसावं, त्यांचं मनोरंजन व्हावं."

त्यांच्या या उत्तरामुळे मला वारंवार देण्यात आलेला तो इशारा आठवला. तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की भक्तांनी पूर्ण श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे.

मी पुष्पिंदर सिंह यांना विचारलं की राधे माँ त्यांच्या भक्तांकडे काय मागतात?

त्यावर त्यांनी उत्तर दिलं, "काहीही नाही. त्या फक्त म्हणतात, 'माझ्याकडे याल तेव्हा मन आणि मेंदू खुला करून या'. मी पाहिलंसुद्धा आहे की जुने असो की नवे असो, जेव्हा लोक या विचारांनी त्यांच्याकडे येतात, तेव्हा त्या भक्तांसाठी चमत्कार करतात. जर तुम्ही त्यांची परीक्षा घेण्यासाठी गेलात तर तुम्ही त्या सत्संगाचा भाग राहणार नाहीत."

या सर्व गोष्टींचा अर्थ होता की भक्तीसाठी पूर्ण समर्पण असलं पाहिजे. 'देवाचा साक्षात्कार होण्यासाठी' सर्व तर्कांचा त्याग करावा लागतो.

श्याम मानव
फोटो कॅप्शन, प्राध्यापक श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आहेत.

प्राध्यापक श्याम मानव यांना वाटतं की कोणताही प्रश्न न विचारता पूर्ण श्रद्धा ठेवल्यामुळेच लोक 'अंधश्रद्धाळू' होतात.

ते म्हणाले, "ज्याची आपल्या गुरूवर दृढ श्रद्धा असते, त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, असं आम्हाला सांगितलं जातं. जो शंका बाळगेल, तपासण्याचा प्रयत्न करेल, तो श्रद्धा ठेवू शकणार नाही."

अंधश्रद्धा म्हणा किंवा भक्ती, राधे माँ यांना खात्री आहे की त्यांचे भक्त त्यांच्यासोबत राहतील. ज्या लोकांना त्यांच्या चमत्कारांवर विश्वास नाही किंवा जे त्यांना ढोंगी मानतात, राधे माँ यांना त्यांची चिंता वाटत नाही.

राधे माँ स्मित करत म्हणतात, "आय डोन्ट केअर... कारण देव माझ्यासोबत आहे, तो सर्वकाही पाहतो आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.