कोण आहे राधे मा? काय म्हणतात त्यांच्या गावातले लोक

फोटो स्रोत, RADHE MAA FACEBOOK
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे मा नुकत्याच एका मुलाखतीनंतर पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. एकेकाळी केवळ टिव्ही आणि सत्संग सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसणाऱ्या राधे मा आज सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. पण कोण आहेत राधे मा?
1965 मध्ये पंजाबच्या गुरूदासपुर जिल्ह्यातील दोरांगला गावात सुखविंदर कौर यांचा जन्म झाला. दोघा भावांमध्ये सुखविंदर एकटीच बहीण होती.
लहानपणापासूनच राधे माचा ओढा हा अभ्यासापेक्षा आध्यात्माकडेच जास्त होता, असं दोरांगलाचे रहिवासी सांगतात.
वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह मुकरियाच्या मोहन सिंह यांच्याशी झाला. पण ते नोकरीसाठी परदेशी गेल्यावर राधे माचा ओढा आध्यात्माकडेच राहिला.
घराजवळच्या काली मंदिरात त्या दिवसदिवसभर पूजाअर्चा करायच्या.
कालांतराने आजूबाजूचे लोक त्यांच्याभोवती जमा व्हायला लागले. राधे मा समोर कोणताही नवस मागितला की तो पूर्ण होतो, असा समज लोकांमध्ये तग धरू लागला.

फोटो स्रोत, RADHE MAA
हळूहळ राधे माची ख्याती पंजाबबाहेर इतर राज्यांमध्ये पसरू लागली. पंजाबशिवाय महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लोकं पण राधे माचे शिष्य होऊ लागले.
दोरांगलाच्या जवळपास प्रत्येक घरात राधे माचे छायाचित्र पहायला मिळते. राधे माचे भक्त सांगतात की त्यांनी कधीही लोकांना आपली धार्मिक पूजाअर्चा सोडून त्यांची भक्ति करायला सांगितलं नाही.
राधे मा तर गरजूंची मदत करण्यास सदैव तयार असतात, असेही ते म्हणतात.
नंतर राधे मा मुंबईला शिफ्ट झाल्या आणि तिथं त्यांनी एक आश्रम उघडला.
राधे मा वर अनेक आरोप झाले. विविध व्हीडिओंमधून त्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आणि त्यावर अनेक वादही झाले.
राधे माच्या गावातले लोक आधी राधे माचं कौतुक करताना थकत नव्हते. पण गुरमीत राम रहीमच्या प्रकरणानंतर मात्र गावातले त्यांचे शिष्य माध्यमांशी बोलणं टाळतात.
दोरांगलाचे माजी सरपंच वरिंदर कुमार यांच्यानुसार गेल्या पंधरा वर्षांपासून राधे मा गावातील गरीबांना आर्थिक मदत करत आहे. "कोणाकडे लग्न असेल, शिक्षणासाठी किंवा उपचाराकरिता पैसा लागत असेल, तर त्या आर्थिक मदत पाठवतात."
गावात जनरल स्टोर चालवणारे अजय कुमार हे राधे मासोबत शाळेत शिकत होते. त्यांच्या दुकानात राधे माचा फोटो लागला आहे.
गावातच फोटो स्टुडिओ चालवणारे छायाचित्रकार राजेश कुमार प्रत्येक आठवड्याला मंदिरात होणाऱ्या सत्संग कार्यक्रमात सहभागी होतात.
ते सांगतात - "राधे मां स्वतःला धर्म गुरू मानत नाही. मी फक्त राधे मा आहे असे त्या म्हणतात."
काहीनाकाही कारणाने चर्चेत किंवा राहणाऱ्या राधे मा 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाल्या होत्या.
आज मुंबईत आणि दिल्लीतल्या भक्तांमध्ये त्या व्यस्त असतात. मात्र त्यांच्या गावी आणि तिकडल्या भक्तांमध्ये त्यांची लोकप्रियता तशीच कायम असल्याचं चित्र दिसून येतं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








