भय्यू महाराज - आध्यात्मिक गुरू की पॉलिटिकल फिक्सर?

फोटो स्रोत, Suryoday Parivar
आध्यात्मिक आणि राजकीय गुरू भय्यू महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांना आधी इंदूरमधल्या बाँबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
बीबीसीशी बोलताना इंदूरचे DIG हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितलं की भय्यूंनी सिल्व्हर स्प्रिंग परिसरातल्या राहत्या घरी आत्महत्या केली. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसंच भय्यूंच्या आश्रमाला सील करण्यात आलं आहे.
त्यांना काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारनं राज्य मंत्र्याचा दर्जा दिला होता. ते 50 वर्षांचे होते.
का केली आत्महत्या?
भय्यूंची सूसाईड नोट सापडली असून त्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. भय्यूंच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की ते कौटुंबिक कारणांमुळे निराश होते.
गेल्याच महिन्यात इंदूरला भय्यू महाराजांची भेट घेतलेले पत्रकार आणि जय महाराष्ट्र चॅनेलचे राजकीय संपादक आशिष जाधव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "भय्यू महाराज गेल्या सहा महिन्यांपासून तणावाखाली दिसत होते. सूर्योदय ट्रस्टवर स्वामित्व हक्क, प्रशासन कोणाचं राहील यावरून कुटुंबात वाद सुरू होते."
"तणावामुळे त्यांचं वजन जवळपास 20 किलो कमी झालं होतं. मी त्यांना कारणही विचारलं. त्यावर ते म्हणाले, गेले सहा महिने मी तणावाखाली आहे. ट्रस्टमध्ये जे काही सुरू आहे, त्यावरून वाद सुरू आहेत. माझ्याभोवती 24 तास पहारा असतो आणि इंदूरच्या आश्रमावरही सतत लक्ष ठेवलं जातं."
भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं हृदयविकारानं निधन झाले. त्यानंतर 2017मध्ये त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी विवाह केला.
पॉलिटिकल फिक्सर?
भय्यू महाराजांचं राजकीय वलय चर्चेत आलं ते अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवरील ऐतिहासिक उपोषणानंतर.
केंद्रातल्या युपीए सरकारनं विलासराव देशमुखांच्या मदतीनं भय्यू महाराजांना सरकारचा दूत म्हणून पाठवलं होतं. यावर आशिष जाधव सांगतात, "राजकीय प्रकाशझोतात राहायला त्यांना आवडायचं, म्हणूनच राजकीय वादात मध्यस्थी करायला ते पुढाकार घ्यायचे. यामुळे काही जण त्यांना पॉलिटिकल फिक्सरही म्हणत."

फोटो स्रोत, Facebook/BhaiyyuMaharaj
आध्यात्मिक गुरू म्हणून ओळख असलेल्या भय्यू महाराजांचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनेक नेत्यांशी जवळचे संबंध होते.
"मला दत्ताचा साक्षात्कार झाल्यानं माझ्या बोलण्याला दत्ताचं अधिष्ठान आहे, असं ते सांगायचे. दुसरं म्हणजे, भय्यू महाराजांना आध्यात्मिक गुरू चंद्रास्वामींनी दिलेली तंत्रविद्या अवगत होती असं म्हटलं जायचं. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला मिळेल किंवा राजकीय निर्णय घायला मदत होईल असा विश्वास अनेक नेत्यांना होता," असंही आशिष जाधव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
मोदींच्या शपथविधीवरून नाराजी
भय्यू महाराजांशी जवळचे संबंध असलेले नवी दिल्लीतले पत्रकार अशोक वानखेडे यांनीही त्यांच्या काही आठवणी सांगितल्या.
"भय्यू महाराजांचा स्वभाव मनमिळावू होता. अगदी झोकून देऊन ते समाजकार्य करायचे," असं वानखेडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"भय्यू महाराजांचं सुरुवातीचं काम विदर्भ आणि मराठवाड्यातलं आहे. तिथूनच त्यांचा संघाशी संबंध आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना ते आपले गुरू मानायचे."

फोटो स्रोत, Twitter/PankajaGopinathMunde
नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभाबद्दलची आठवणही वानखेडेंनी आवर्जून सांगितली. "मोदींच्या शपथविधीची निमंत्रण पत्रिका तर आली, पण वैयक्तिक बोलावणं न आल्यामुळे भय्यू महाराज नाराज होते." आपल्याला फोन करून त्यांनी ही व्यथा बोलून दाखवल्याचं वानखेडे सांगतात. "शेवटी जेव्हा मोंदींनी त्यांचा रुसवा काढला तेव्हा ते दिल्लीला शपथविधीसाठी गेले."
ठाकरेंमध्ये उद्धव लाडका
भय्यू महाराज यांचे ठाकरे कुटुंबीयांशीही जवळचे संबंध होते. पण उद्धव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये उद्धव त्यांना जास्त जवळचे होते असं वानखेडे सांगतात.
"उद्धव त्यांचं म्हणणं ऐकतात असं ते म्हणायचे. पण राज त्यांचं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल ते कधी फारसं चांगलं बोलले नाहीत. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. पण त्यांना यश आलं नाही" असं वानखेडे सांगतात.
आधी वडिलांचा मृत्यू त्यानंतर काकांबरोबर सुरू झालेला वाद आणि पहिल्या पत्नीचा मृत्यू यामुळे ते सतत नैराश्यात होते, असं वानखेडे यांचं निरीक्षण आहे.
मॉडेलिंग ते महाराज
भय्यू महाराजांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1968 ला झाला. त्यांचं कुटुंब मध्य प्रदेशातल्या शुजालपूर इथलं होतं, पण त्यांचे महाराष्ट्राशी जवळचे संबंध होते. त्यांनी आधी कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं होतं. त्यानंतर ते अध्यात्माकडे वळले.
त्यांनी 'सद्गुरू दत्त धार्मिक एवं प्राथमिक ट्रस्ट' या संस्थेची इंदूर येथे स्थापना केली होती. वयाच्या 37 व्या वर्षी ते सगळ्यात तरुण आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखले जाऊ लागले होते.
ते गोरगरिबांसाठी काम करत असले तरी महागड्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांची मुलगी पुण्यात शिकत असून ती लंडनमध्ये शिक्षणासाठी जाणार होती.
मध्यस्थ महाराज
2008 साली अण्णा हजारेंनी लोकपालच्या विषयावर उपोषण केलं होतं, तेव्हा मध्यस्थी करण्यासाठी ते दिल्लीत आले होते. पुढे 2011 साली नरेंद्र मोदींनी सद्भावना उपोषण केलं होतं, तेव्हा त्यांनी भय्यू महाराजांकडून मोसंबीचा रस पिऊन उपोषण सोडलं होतं.

फोटो स्रोत, Facebook/BhiyyuMaharaj
2016 साली गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता. तेव्हा त्या पंतप्रधान मोदींना भेटायला दिल्लीत गेल्या आणि गुजरातमध्ये जाण्याआधी त्यांनी इंदूर गाठलं. तिथे त्या भय्यू महाराजांना भेटल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
ते नियमितपणे मुंबई-महाराष्ट्रात येऊन इथल्या नेत्यांशी भेटीगाठी करायचे. त्यांचे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पंकजा मुंडे तसंच विलासराव आणि शरद पवारांशी जवळचे संबंध होते. अनेक राजकीय पुढारी त्यांच्या आश्रमात जात असत.
आत्महत्येमुळे धक्का
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. भय्यू महाराज आणि गुरुदेव या नावाने ओळखले जात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शोक व्यक्त करताना लिहिलं आहे की त्यांचे भय्यूंशी जवळचे संबंध होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे की भय्यू महाराज सर्वांच्या दु:खात सहभागी होते. त्यांच्यावर अनेक लोक अवलंबून होते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलायला नको होतं.
(भोपाळहून शुरिया निजाझी यांनी पाठवलेल्या माहितीसह.)
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








