किम जाँग-उन यांच्या उत्तर कोरियात एकमेव मराठी माणसाचा काय आहे अनुभव?

फोटो स्रोत, Facebook/Atul Gotsurve
- Author, आरती कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एकमेकांवर भयंकर हल्ले करण्याची भाषा करून जगावर टांगती तलवार ठेवणारे नेते येत्या काही तासांत भेटत आहेत. उत्तर कोरियाचे किम जाँग-उन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भेटणार आहेत. या दोन देशांमधला तणाव निवळत असताना भारतानेही उत्तर कोरियाशी संबंध नव्याने प्रस्थापित केले आहेत.
उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत होण्याचा मान एका मराठी माणसाला मिळाला आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतले अधिकारी अतुल मल्हारी गोतसुर्वे यांची तिथे नेमणूक झाली आहे. याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये अतुल गोतसुर्वे प्याँगयांगमध्ये रुजू झाले. ते म्हणतात, उत्तर कोरियामध्ये भारतीय लोकांची संख्या कमीच आहे आणि मराठी लोकांबद्दल बोलायचं झालं मी या देशातला एकमेव मराठी माणूस आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
प्रश्न : सोलापूर ते उत्तर कोरियाची राजधानी प्याँगयांग हा तुमचा प्रवास कसा झाला?
उत्तर : सोलापूर जिल्ह्यातलं चपळगाव हे माझं मूळ गाव. पण माझे वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे पुण्यात शिक्षणाची संधी मिळाली. मी सिव्हील इंजिनिअरींगमध्ये B.E., M.E. केलं. पहिल्यापासूनच मला सनदी सेवेत जाण्याची इच्छा होती. 2004 मध्ये मी भारताच्या परराष्ट्र सेवेत रुजू झालो. मेक्सिको, क्युबा यासारख्या पाश्चिमात्य देशात मी काम केलं आहे. त्यामुळेच जेव्हा मला उत्तर कोरियासारख्या पूर्वेकडच्या देशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी ती स्वीकारण्याचा निर्णय लगेचच घेतला.
प्रश्न :उत्तर कोरियामधली हुकूमशाही, अण्वस्त्रचाचण्या, अमेरिकेला त्यांनी दिलेलं आव्हान या सगळ्यामुळे हा देश सतत चर्चेत असतो. अशा देशात जाण्याचा निर्णय कठीण नव्हता का?
उत्तर : नाही. अजिबात नाही. भारताचे राजदूत म्हणून तुम्ही एखाद्या देशात जाता तेव्हा तुम्ही 125 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करत असता. त्यामुळे एकतर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटतं, डिप्लोमॅट हा त्या देशाच्या सैनिकासारखा असतो. त्याच्यावर जी जबाबदारी दिली जाते ती त्याने कर्तव्यदक्षपणे निभावायची असते. भारत सरकारने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली हा मी माझा बहुमान समजतो.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न : प्याँगयांगला जाऊन तुम्हाला एक महिना झाला आहे. तुम्हाला हे शहर कसं वाटतं?
उत्तर : प्रत्येक देशाचा म्हणून एक वेगळा चेहरामोहरा असतो, वेगळी संस्कृती असते. प्याँगयांगला आल्यावर पहिल्यांदा नजरेत भरते ती इथली स्वच्छता. डेडाँग नदीकाठचं हे शहर आखीवरेखीव आहे. शहरात ट्रामने फिरता येतं. इथले लोक खूपच शिस्तीचे आणि कष्टाळू आहेत. ते सतत काही ना काही कामात असतात. इथल्या महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. पूर्वेकडचा देश असल्यामुळे इथे दिवस खूप लवकर उजाडतो आणि रात्री आठपर्यंत बराच उजेड असतो. सध्या इथे स्प्रिंगटाईम आहे. हिवाळ्यात मात्र खूपच गारठा असतो, असं मी ऐकलं आहे.

फोटो स्रोत, Atul Gotsurve
प्रश्न :उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग-उन यांच्याशी तुमची भेट झाली का?
उत्तर : नाही. अजून तरी नाही. पण लवकरच अशा भेटीची शक्यता आहे. मी किम योंग-नाम यांना भेटलो. ते उत्तर कोरियाच्या प्रजासत्ताकाचे प्रमुख (President of the Presidium of the Supreme People's Assembly of North Korea) आहेत. अलीकडेच भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनीही उत्तर कोरियाचा दौरा केला आहे. भारत आणि उत्तर कोरिया भौगोलिकदृष्ट्या जवळ आहेत. तसंच या देशांमध्ये 1973 साली द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाले. आता या नातेसंबंधांना 45 वर्षँ पूर्ण होतील. त्यानिमित्ताने हे दोन्ही देश संयुक्त उपक्रम राबवणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत का?
उत्तर : सध्या लगेचच तसा काही कार्यक्रम आखलेला नाही.
प्रश्न :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे प्रमुख किम जाँग-उन यांच्या भेटीकडे भारत कसं पाहतो?
उत्तर : या भेटीकडे सगळ्या जगाचंच लक्ष लागलं आहे. कोरियन द्विपकल्पामध्ये शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्यासाठीच्या सर्व उपायांचं भारत समर्थन करतो. जगात शांतता नांदण्याच्या दृष्टीने ही भेट आणि चर्चा महत्त्वाची आहे.
प्रश्न :भारत आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये तुम्हाला कोणते समान दुवे आढळतात?
उत्तर : उत्तर कोरिया हा भारताप्रमाणेच शेतीप्रधान देश आहे. इथे पाऊस चांगला पडतो. त्यामुळे भातशेती चांगली होते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात. त्यामुळे भारताकडून त्यांना कृषी क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाची मदत हवी आहे. भारतातलं बियाण्यांमधलं संशोधन त्यांना महत्त्वाचं वाटतं.
प्रश्न : उत्तर कोरियाच्या नागरिकांना भारताबद्दल काय वाटतं?
उत्तर : भारताने सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे, असं त्यांना वाटतं. भारतीय लोकांचं राहणीमान, इथलं तंत्रज्ञान, संस्कृती, बॉलीवुड या सगळ्याचंच त्यांना आकर्षण आहे. भारतासारखीच इथेही कुटुंबव्यवस्था आहे. त्यामुळे इथे बऱ्याच लोकांनी मला अमिताभ बच्चन यांच्या 'बागबान' चित्रपटाबद्दल उत्सुकतेनं विचारलं. दंगल, बाहुबली हे सिनेमेही इथे लोकप्रिय आहेत.
प्रश्न : उत्तर कोरियामध्ये भारतीय लोकांची संख्या किती आहे?
उत्तर : दक्षिण कोरियामध्ये व्यवसाय, नोकरी, संशोधन यानिमित्ताने अनेक भारतीय राहतात. पण उत्तर कोरियामध्ये मात्र तशी स्थिती नाही. इथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयांमध्ये काही भारतीय काम करतात. त्यात माझ्या माहितीप्रमाणे मराठी माणसं इथपर्यंत पोहोचलेलीच नाहीत. मी माझ्या नोकरीच्या निमित्ताने इथे आलो. या देशातला मी एकमेव मराठी माणूस आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न : उत्तर कोरियामधल्या लोकांचा जगाशी कितपत संपर्क येतो?
उत्तर : या देशाची एक सीमा चीनला लागून आहे आणि एका सीमेचा 15 किलोमीटरचा भाग रशियाशी जोडलेला आहे. त्यामुळे या दोन देशात त्यांचं येणंजाणं, व्यापार अनेक वर्षांपासून चालत आला आहे. सध्या या देशावर आर्थिक निर्बंध असल्यामुळे आयात- निर्यातीचं प्रमाण कमी आहे. पण उत्तर कोरियाचा जास्त व्यापार हा याआधी चीनशीच होता.
प्रश्न : तिथल्या लोकांना इंटरनेटचा वापर करता येतो का?
उत्तर : नाही. या देशात इंटरनेट खूपच मर्यादित स्वरूपात आहे.
प्रश्न : उत्तर कोरियाचे भारताचे राजदूत म्हणून तुमच्यासमोर काय उद्दिष्ट आहे?
उत्तर : भारत आणि उत्तर कोरियाच्या द्विपक्षीय संबधांना यावर्षी 45 वर्षँ पूर्ण होतायत. यानिमित्ताने या दोन देशांतले राजनैतिक संबंध दृढ करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्यासोबतच या दोन देशात कृषी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यापार वाढवण्यावरही आम्ही भर देणार आहोत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त










