सिंगापूर भेट किम जाँग-उन यांच्या डोनाल्ड ट्रंपकडून काय अपेक्षा असतील?
12 जूनला उत्तर कोरियाचे किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या ऐतिहासिक भेटीसाठी सिंगापूर सज्ज झालंय. ही फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी नाही तर सिंगापूरसाठीही महत्त्वाची घटना असल्याचं सिंगापूरचे पंतप्रधान ली शियेन लूंग यांनी म्हटलं आहे.
म्हणूनच या भेटीवर सिंगापूर हा देश दोन कोटी सिंगापूर डॉलर म्हणजेच अंदाजे 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. या रकमेतली अर्धी रक्कम ही केवळ या दोघांच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणार आहे.
या भेटीत अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये एखादा करार झाल्यास सिंगापूरला इतिहास नेहमी आठवलं जाईल, असं किम यांनी लूंग यांना भेटल्यानंतर म्हटलं आहे.
दरम्यान, 5 जूनला सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन यांनी वाशिंगटनमध्ये म्हटलं होतं की, "या भेटीच्या यजमानपदासाठी सिंगापूरनं स्वत:हून हात पुढे केला नव्हता, तर अमेरिकेनं यासाठी आम्हाला विचारणा केली होती. मला वाटतं की, सिंगापूरच्या लोकांना याचा अभिमान असायला हवा. निष्पक्ष, विश्वासू आणि सुरक्षित असल्यामुळेच आमच्या सिंगापूरची भेटीसाठी निवड करण्यात आली आहे."
उत्तर कोरियाच्या अपेक्षा काय?
या भेटीतून अमेरिकेला काय हवंय, हे तर जगजाहीर आहेच - उत्तर कोरियाने आण्विक नि:शस्त्रीकरण करावं.
पण कित्येक दशकं पैसा आणि मेहनती घालून जमवलेली ही अण्वस्त्रं उत्तर कोरियाने त्यागली तर त्यांना त्याबदल्यात काय मिळणार? साहजिकच या त्यागाची परतफेड म्हणून उत्तर कोरियाच्याही काही मागण्या आणि अपेक्षा असतीलच.

अमेरिका उत्तर कोरियानजीक अनेक वर्षं युद्धनौका, युद्धविमानं आणि सैन्य पाठवत आला आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी किम करू शकतात.
दक्षिण कोरियाबरोबरच्या सैन्य कारवाईंसाठीच्या कसरती थांबवण्याचा त्यांनी याआधीही आग्रह केला होता.
सोबतच उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था सुधारण्याचं किम जाँग-उन यांचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या देशावरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची मागणी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोबतच, किम यांना आता जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा नेता व्हायचं आहे. अमेरिका, रशिया, चीन, दक्षिण कोरियासारखाच मान उत्तर कोरियाला मिळावा, त्यांनाही त्याच पातळीवरची वागणूक मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

फोटो स्रोत, Singapore / MOCI
भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्था सहसा किम यांच्याभोवतीच्या ताज्या घडामोडींवर बातम्या देत नाही. या सिंगापूर भेटीचाही तिथे फार थोडाच उल्लेख आहे, पण रोडोंग सिनमन वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये किम जाँग-उन सिंगापूरमध्ये असल्याच्या वृत्तांना दुजोरा दिला आहे.
"या भेटीतून घेऊन आपण नव्या युगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवी नाती निर्माण करत आहोत," असं या लेखात म्हटलं आहे.
"यापूर्वी कुठल्याही देशाबरोबर आमचे फार चांगले संबंध नसले तरी, जर तो देश आमच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवणार नसेल तर आम्ही नक्कीच चर्चतून संबंध सुधारू शकतो," असं या संपादकीयमध्ये म्हटलं आहे.
भेट सिंगापूरमध्येच का?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांच्या भेटीसाठी दोन्ही कोरिया देशांमधला लष्कर विरहित भाग(DMZ), मंगोलिया आणि बीजिंग ही नावंही सुरुवातीला चर्चेत होती.
उत्तर कोरिया आणि चीन यांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापारी देवाणघेवाण होते. त्यामुळे अमेरिकेनं बीजिंगच्या नावाला काट मारली. उत्तर कोरियाशी बोलणी करण्यासाठी चीनची मध्यस्थी नको, अशीच त्यांची भूमिका होती.
उत्तर कोरियाचे निवडक देशांशी व्यापारी संबंध आहेत. त्यात सिंगापूर वरच्या क्रमांकावर आहे. 2016मध्ये उत्तर कोरियाच्या व्यापारात सिंगापूरचा क्रमांक आठवा होता.
टक्केवारीत सांगायचं तर उत्तर कोरियाच्या एकूण परदेशी व्यापारापैकी 0.2% व्यवहार त्यांनी सिंगापूरशी केला.
गेल्या वर्षी अगदी शेवटपर्यंत सिंगापूर आणि उत्तर कोरिया यांच्या दरम्यानचा व्यापार सुरूच होता. नंतर दोन देशांमधली 'व्हिसा ऑन अरायव्हल' पद्धत बंद झाली.
सिंगापूरमध्ये आजही उत्तर कोरियाचा दूतावास आहे, अगदी संयुक्त राष्ट्रांचा विरोध असताना, सिंगापूरमधल्या दोन कंपन्या आजही उत्तर कोरियाबरोबर व्यापारी संबध ठेवून आहेत.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं 2016मध्ये एक बातमी दिली होती. त्यानुसार, प्याँगयांग आणि सिंगापूर अशी दुहेरी वाहतूक करणारी व्यापारी जहाजं सिंगापूरमधून कुठल्याही तपासणीशिवाय पार होतात.
हे सगळं आहेच. पण, किम जाँग उन यांनी सिंगापूर ठिकाण निवडण्यामागे आणखी काही कारणं आहेत. त्यांना सिंगापूर अतिशय जवळचं वाटतं.
गुप्तचर यंत्रणेतल्या काही लोकांनी बीबीसीच्या एशिया बिझनेस कॉरस्पाँडंट करिश्मा वासवानी यांना दिलेल्या माहितीनुसार, किम जाँग उन यांना इथं सुरक्षित वाटतं. त्यांची सिंगापूर बँकेत खाती होती. आणि वैद्यकीय चाचण्यांसाठीही ते सिंगापूरमध्ये येऊन गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या आर्थिक कारणांव्यतिरिक्त इतरही कारणं समोर येत आहेत.
सिंगापूर तटस्थ प्रदेश
"किम जाँग उन यांना सिंगापूर जवळचं वाटण्याचं आणखी एक कारण आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या रोम करारावर सिंगापूरनं सही केलेली नाही. त्यामुळे किम जाँग उन इथं असताना त्यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचा कुठलाही खटला चालू शकत नाही," द डिप्लोमॅट वृत्तपत्राचे अंकित पांडा यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय सिंगापूरमध्ये ट्रंप किंवा किम जाँग उन - दोघांविरोधात निदर्शनं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण सिंगापूर हा एकच राजकीय पक्ष असलेला पक्ष आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय इथं सभा घेता येत नाहीत.
सिंगापूरला एक ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. 2015मध्ये चीन आणि तैवान दरम्यानची हाय प्रोफाईल बैठकही इथंच पार पडली होती.
अमेरिका आणि चीन दोघांचं दोस्त राष्ट्र
सध्याच्या वातावरणात भूराजकीय संबंधांबाबत भूमिका घेणं सोपं नाही. एकीकडे अमेरिकन अध्यक्षांना तोंड द्यायचं, तर दुसरीकडे चीनच्या वाढत्या प्रभावाचा अंदाज घेत चालायचं. पण, सिंगापूरनं काही अपवाद सोडले तर या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सिंगापूरची कुशल रणनीती हे एक कारण आहेच. शिवाय सिंगापूर हा देश असियान देशांची बँक म्हणून ओळखला जातो.
यापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या काळात म्हणजे ओबामा आणि क्लिंटन यांच्या काळात व्हाईट हाऊसनं प्याँगयाँग बरोबरचे संबंध तोडावेत यासाठी सिंगापूरवर दबाव आणला होता.
पण, सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांबरोबर असलेल्या जवळच्या संबंधांमुळे या भेटीसाठी सिंगापूरची निवड झाली आहे.
सिंगापूर हे आशियातलं व्यापारी केंद्र आहे. या भागातले जास्तीत जास्त व्यापारी करार इथंच घडून येत आहेत.
(बीबीसीच्या एशिया बिझनेस कॉरस्पाँडंट करिश्मा वासवानी यांच्या रिपोर्टमधील माहितीवर आधारित)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










