अटल बिहारी वाजपेयी 14 वर्षं एकांतवासात काय करत होते?

अटल बिहारी वाजपेयी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अटल बिहारी वाजपेयी
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गुरुवार 13 मे 2004. कॅबिनेटची अखेरची बैठक संपवून अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले. त्यांच्या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. ते संध्याकाळी राष्ट्रपतींकडे राजीनामा देत असताना तिथून जवळच असलेल्या काँग्रेसच्या अकबर रोडवरच्या मुख्यालयात जल्लोष सुरू होता. आता सोनिया गांधी पंतप्रधान होणार, असं काँग्रेसचे कार्यकर्ते गात-नाचत कॅमेऱ्यांसमोर सांगत होते.

राजीनामा देऊन वाजपेयी बाहेर पडले आणि म्हणाले, "माझ्या पक्षाचा आणि आघाडीचा पराभव झाला असला तरी देशाचा विजय झाला आहे… आम्ही पद सोडलं असलं तरी जबाबदारी सोडली नाही..."

आता यापुढे वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होणार होते. तशी घोषणाच सुषमा स्वराज यांनी केली. पण त्यावेळी कुणालाही कल्पना नसेल की अटल बिहारी वाजपेयी यापुढे विजनवासात जाणार होते. ज्यांचा एक-एक शब्द ऐकण्यासाठी देश आतुर असायचा ते वाजपेयी आता शांत होणार होते...

Presentational grey line

घणाघाती वक्ता, प्रतिभावान कवी आणि सद्गृहस्थ राजकारणी अशी प्रतिमा असलेले अटल बिहारी वाजपेयी गेल्या 14 वर्षांत क्वचितच सार्वजनिकरीत्या दिसले आहेत. 2004 पासूनच्या या 14 वर्षांच्या काळात वाजपेयींच्या आयुष्यात काय काय घडलं?

2004 साली 'शायनिंग इंडिया'ची घोषणा देणारा भाजप निवडणुकीत पराभूत झाला आणि काँग्रेस सत्तेत आली. सोनिया गांधींनी 'अंतरात्म्याची हाक' ऐकत मनमोहन सिंगांकडे सत्तेची सूत्रं सोपवली. विरोधी पक्ष नेत्याचं पद वाजपेयींऐवजी लालकृष्ण अडवाणींकडे गेलं.

त्यानंतर वाजपेयींचा सार्वजनिक जीवनातला वावर एकाएकी कमी झाला. वाजपेयी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार नाहीत, असं सुषमा स्वराज म्हणाल्या असल्या तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर 2005 साली मुंबईत शिवाजी पार्क इथे भाजपच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात वाजपेयींनी निवृत्तीची घोषणा केली. पल्लेदार भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वाजपेयींनी त्रोटक भाषण करत पक्षाची जबाबदारी अडवाणी आणि प्रमोद महाजन या नव्या 'राम आणि लक्ष्मणा'च्या जोडीकडे सोपवली.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

लखनौतून निवडून आलेले वाजपेयी अजूनही लोकसभेचे खासदार होते पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता त्यांना संसदेच्या कामकाजात नियमितपणे भाग घेणं शक्य नव्हतं. 2007 साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी व्हीलचेअरवरून मतदानासाठी आलेल्या वाजपेयींना पाहणं अनेकांना चटका लावून गेलं.

2007 साली संसद प्रांगणात वाजपेयी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2007 साली संसद प्रांगणात वाजपेयी.

2007 साली वाजपेयी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी येणार की नाही यावर बरीच चर्चा झाली. हो-नाही म्हणता म्हणता त्यांनी लखनौत सभा घेतली आणि मी मतदानाला येईन असंही आवर्जून सांगितलं.

'मला आता सक्रिय राजकारणातून निवृत्त करा' असं त्यांनी भाजप नेत्यांना सांगितलं होतं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राने तेव्हा लिहिलं होतं. प्रचारासाठी आलेले वाजपेयी मतदानासाठी मात्र येऊ शकले नाहीत.

2007 सालीच वाजपेयींनी आतापर्यंतचा अखेरचा महाराष्ट्र दौरा केला. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ परिवाराच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. एव्हाना वाजपेयींच्या चालण्या-फिरण्यावर बरीच बंधनं आली होती. त्यांच्या व्हीलचेअरसकट त्यांना स्टेजवर आणण्यासाठी एका विशेष लिफ्टची सोय करण्यात आली होती.

"वाजपेयी मैदानात आले आणि लोकांनी दिलेली प्रतिक्रिया अभूतपूर्व होती. लोक त्यांना पाहण्यासाठी धडपड करत होते. काही लोक तर उठून उभे राहिले, अनेकांनी पायातल्या चपला काढल्या आणि हात जोडून स्टेजवर आलेल्या वाजपेयींना नमस्कार केला." बीबीसी मराठीचे रोहन नामजोशी सांगतात.

वाजपेयी

फोटो स्रोत, Vijay Gupta

2009 साली त्यांची खासदारकी संपली आणि सक्रिय राजकारणातून ते पूर्णपणे निवृत्त झाले. त्यापुढे ते निवडणूक लढले नाहीत.

वाजपेयींना नेमका आजार काय?

वाजपेयी पंतप्रधान असतानाच 2000 साली त्यांच्या उजव्या गुडघ्याची वाटी बदलण्याचं ऑपरेशन मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये झालं होतं. 2004 नंतर त्यांच्या हालचाली मर्यादित झाल्याचं दिसू लागलं होतं.

2009 साली वाजपेयींना एक झटका आला आणि त्यांचं बोलणं पूर्णतः बंद झालं, असं त्यांचे मित्र NM घटाटे सांगतात. त्यावेळी वाजपेयींना दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

वाजपेयींना अल्झायमर किंवा डिमेन्शिया असल्याचं वृत्त अनेकदा प्रसारमाध्यमांमधून झळकलं. पण याबाबत उलट-सुलट मतं आहेत. त्यांना बोलता येत नाही हे स्पष्टच आहे. त्यांना अनेकदा विस्मरणही होतं असं त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात.

अधिकारवाणीने मात्र याबाबत कधीच कुणी सांगत नव्हतं. वाजपेयींवर गेली 15 वर्षं उपचार करत असलेले AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वाजपेयींना विस्मरण होत असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. पण त्यांना डिमेन्शिया असल्याचं वृत्त त्यांनीच नाकारलं होतं.

चायनीज जेवण वाजपेयींना आवडतं, गोडाधोडाच्या पदार्थांवरही त्यांचं विशेष प्रेम. पण डायबेटीस, किडनीचे विकार आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा त्रास यामुळे त्यांच्या आहारावर अनेक बंधनं आली आहेत. हे पदार्थ आता विशेष प्रसंगीच बनवले जातात. आत्ता वाजपेयींना युरीन इन्फेक्शनमुळेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

लोकांसमोर आले 'भारतरत्न वाजपेयी'

वाजपेयींना मार्च 2015मध्ये त्यांच्या निवासस्थानी भारतरत्न हा सन्मान प्रदान करण्यात आला. तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. अत्यंत थकलेले आणि आपल्या व्हीलचेअरला खिळून असलेले वाजपेयी तेव्हा पुन्हा लोकांना दिसले होते.

1963 साली डॉ. काणेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

फोटो स्रोत, KNOWINDIA.GOV.IN

फोटो कॅप्शन, 1963 साली डॉ. काणेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

वाजपेयींना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी अनेक वर्षं केली जात होती. ते चालू-फिरू शकत असताना त्यांना हा गौरव देण्यात आला असता तर अधिक योग्य झालं असतं अशीही खंत अनेकांनी या वेळी व्यक्त केली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आहेत कुठे वाजपेयी?

गेली अनेक वर्षं दिल्लीतल्या कृष्ण मेनन मार्गावरच्या आपल्या निवासस्थानी वाजपेयी आपल्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य आणि अनेक वर्षं त्यांच्यासोबत असलेल्या मिसेस कौल यांच्यासोबत राहात होते, असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं होतं. 2014 साली कौल यांचं निधन झालं.

त्यांना नेमाने भेटायला येणाऱ्या मंडळींमध्ये त्यांचे डॉक्टर्स, अनेक दशकं त्यांचे मित्र असलेले ज्येष्ठ वकील NM घटाटे, वाजपेयींचे जुने सहकारी लालकृष्ण अडवाणी आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री BC खंडुरी हे असतात.

गेल्या 14 वर्षांत दर 25 डिसेंबरला काही नेते न चुकता वाजपेयींची भेट घेतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग न चुकता वाजपेयींच्या निवासस्थानी हजेरी लावायचे.

वाजपेयींच्या निवासस्थानी मनमोहन सिंग.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाजपेयींच्या निवासस्थानी मनमोहन सिंग.

सिंग यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगताना वाजपेयींचे स्नेही NM घटाटे यांनी 2014 साली एका मुलाखतीत सांगितला. "पंतप्रधान मनमोहन सिंग अटलजींच्या प्रकृतीची न विसरता चौकशी करतात. त्यांचे जुने संबंध आहेत. नरसिंह राव पंतप्रधान असताना वाजपेयींनी जेव्हा त्यांच्या सरकारच्या एका अर्थसंकल्पावर टीका केली होती तेव्हा राव यांनी वाजपेयींना फोन करून सांगितलं होतं की, 'माझे अर्थमंत्री मनमोहन सिंग या टीकेने दुखावले गेले आहेत आणि ते राजीनाम्याची भाषा करत आहेत.' यानंतर वाजपेयींनी मनमोहन सिंग यांना फोन करून ती वैयक्तिक नव्हे तर राजकीय टीका होती असं सांगत ती मनाला लावून न घेण्याचा सल्ला दिला. इथूनच एका खास मैत्रीची सुरुवात झाली."

भाजपचे राम-लक्ष्मण वाजपेयी आणि अडवाणी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भाजपचे 'राम-लक्ष्मण' वाजपेयी आणि अडवाणी.

लालकृष्ण अडवाणीसुद्धा वाजपेयींना भेटत असत. अडवाणींनी अनेकदा वाजपेयींचा उल्लेख आपले 'गुरू' म्हणून केला आहे. भाजपमध्ये अडवाणी-वाजपेयी ही दुक्कल अनेक वर्षं 'राम-लक्ष्मण' म्हणून ओळखली जात असे.

यातले लक्ष्मण असलेले अडवाणी आता भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आहेत आणि राम म्हणवले जाणारे अटल बिहारी वाजपेयी गेली 14 वर्षं एकांतवासात होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)