अधिक महिन्यातलं जावयाचं कौतुक हा छुपा हुंडा आहे का?

अनारसे, खण, दीपदान

फोटो स्रोत, Asmita Godbole

"धोंड्याचा महिना आहे ना... करावं लागतं. पटत नाही, पण कर्ज काढून प्रथा पाळाव्या लागतात इथे..." बुलढाणा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहणारी अश्विनी सांगत होती. अश्विनीचं चार महिन्यांपूर्वीच लग्न झालंय.

"अधिक महिन्यात जावयाचं कौतुक समजू शकते, पण म्हणून सोन्या- चांदीच्या वस्तूच कशाला द्यायला हव्यात, हा छुपा हुंडाच नाही का?" अश्विनीच्याच वयाची पण मुंबईत राहणारी स्नेहा (नाव बदललं आहे) सांगते. स्नेहाचं गेल्या वर्षी लग्न झालंय.

स्नेहा स्वतः चांगली नोकरी करते. कमावते. नवरा मोठ्या पदावर कामाला आहे. पण अधिक महिन्याचं वाण देताना स्नेहाच्या आई-वडिलांची मात्र दमछाक झाली.

जावयाला सोन्याची चेन, मुलीला अंगठी, सासू- सासऱ्यांना कपडेलत्ते शिवाय चांदीच्या ताटातलं अनारशाचं वाण... सेवानिवृत्त झालेल्या स्नेहाच्या आई-वडिलांना हे सगळं जडच होतं. पण मुलीच्या सासरकडची मंडळी काही बोलायला नकोत म्हणून त्यांनी हे कसंबसं निभावलं.

स्नेहानेच स्वतःसाठी साठवलेले थोडे पैसे या अधिकच्या वाणासाठी आई-वडिलांना दिले, असं ती सांगते. खरं नाव प्रसिद्ध करू नका, असं स्नेहा आवर्जून सांगते.

अधिक महिन्यात धोंड्याचं जेवण आणि त्याबरोबर जावयाला वाण द्यायची पद्धत आहे.

फोटो स्रोत, Ashwini

फोटो कॅप्शन, अधिक महिन्यात धोंड्याचं जेवण आणि त्याबरोबर जावयाला वाण द्यायची पद्धत आहे.

याउलट विदर्भातल्या छोट्या गावातली अश्विनी या प्रथेविषयी मनमोकळं बोलते. नावासह लिहिलंत तरी चालेल म्हणते. तिलाही ही प्रथा पटत नाही. पण स्नेहासारखा तिचाही नाईलाज असल्याचं ती सांगते. "वडील शेती करतात. भावानं नुकतंच अॅग्रीकल्चरचं शिक्षण पूर्ण केलंय. आत्ताच लग्नासाठी भरमसाठ खर्च झालाय. देणी-घेणी झाली आहेत. लगेच हा धोंड्याचा महिना आला. माझ्या सासरी कुणी काही बोलू नये म्हणून शेवटी वडिलांनी कर्ज घेऊन हे सगळं केलंय."

"नवरा नको म्हणतो. त्यांनाही पटत नाही, पण सासू-सासऱ्यांना समजावणं कठीण आहे," अश्विनी सांगते. धोंड्याच्या महिन्यात अमूक वाण द्या म्हणून कुणी उघड सांगत नाही. पण ३३ धोंड्यांमध्ये (पुरणाचा पदार्थ) एखादा सोन्याचा दागिना किंवा महागडी वस्तू ही अपेक्षा गावाकडे कॉमन आहे, असं अश्विनी सांगते.

ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं. सोशल मीडियावर धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना नावानं अनेक पोस्ट्स सध्या दिसत आहेत. त्या साधारण ३ प्रकारच्या आहेत. बहुतेक पोस्टमध्ये अधिक महिना 'साजरा' करण्याचे फोटो आहेत- हा प्रकार क्रमांक १ झाला. जावयांच्या कौतुक सोहळ्याचे घरगुती फोटो किंवा अनारशांचं ताट, चांदीच्या ताटात ३३ धोंड्यांचा फोटो अशा पोस्ट्स फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर दिसतात.

हळदीकुंकू वाण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अधिक महिन्यात वाणाबरोबर दीपदान करावं, असंही मानलं जातं.

दुसऱ्या प्रकारच्या पोस्ट्समध्ये जावई, सासू- सासरे, बायको या नात्यांवर अधिक महिना, धोंड्याचा महिना या निमित्ताने यथेच्छ विनोद करण्यात आले आहेत.

तिसरा प्रकार अधिक महिन्याविषयी गंभीरपणे व्यक्त होणाऱ्यांचा. अशा पोस्टमधून अनेक प्रश्न उभे केले आहेत. अधिक महिना नेमका का येतो, यापासून ते याला धोंड्याचा महिना का म्हणतात, धोंड्याचा आणि जावयाचा संबंध कसा आला, ३३ला ३० - ३ का म्हणायचं, अधिक महिन्यात अनारसेच का इथपर्यंत अनेक चर्चा झडत आहेत.

'जावयाला दान या नावानं सासरच्या मंडळींना पुन्हापुन्हा काही महागडं द्यायचं म्हणजे छुपा हुंड्याचाच प्रकार आहे. या प्रथा बंद करायला हव्यात,' असं व्यक्त होणारी मंडळीही आहेत.

थोडक्यात, धोंड्याचा महिना, अधिकचं वाण, अनारसे आणि जावई यांच्यासह सेलिब्रेशनचा फंडा आणि छुपा हुंडा याविषयी चर्चा झडत आहेत.

अनारसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शहरी भागात अनेक जण 33 अनारशांचं वाण अधिक महिन्यात जावयाला देतात.

अधिक महिना का येतो?

16 मेपासून अधिक ज्येष्ठ महिना सुरू झाला आहे. १३ जूनला हा अधिक महिना संपेल. मराठी महिने चंद्रावर आधारित असतात. या चांद्रमासाला सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी आणि कालगणना एकसारखी होण्यासाठी पंचांगकर्त्यांनी अधिक महिन्याची योजना केली, असं जाणकार सांगतात.

साधारण दर पावणेतीन वर्षांनी अधिक मास येतो. ग्रेगोरियन कालगणना म्हणजे इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर ३६५ दिवसात एक वर्ष पूर्ण होतं. पण चांद्रमासाचा विचार केला तर ३५४ तिथींचं एक वर्ष असतं. हा ११ दिवसांचा अनुशेष तिसऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो.

अनारशांचं वाण, निरांजन

फोटो स्रोत, Swapna Kulkarni

फोटो कॅप्शन, अनारशांच्या वाणाबरोबर दीपदान करण्याची पद्धत आहे.

हिंदू पंचांगाचे अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात, "जेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. म्हणजेच ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास होतो."

धोंड्याचा महिना आणि जावयाचा संबंध

अधिक महिन्यात दानधर्म करावा, असं शास्त्रात असल्याचं सोमण सांगतात. पण यथाशक्ती दान असावं आणि ते गुप्त असावं याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. "हिंदू संस्कृतीत गुप्त दानाला महत्त्व आहे. प्रतिष्ठेसाठी परंपरेच्या नावावर केलेलं दान शास्त्रात उल्लेखलेलं नाही. अनारशाचं वाण आणि दीपदान एवढंच अपेक्षित असतं. जावयाला विष्णूचं स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे."

धोंड्याचं जेवण

फोटो स्रोत, Ashwini

फोटो कॅप्शन, अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे अनेक घरांमध्ये करतात.

महागड्या वस्तू, सोनं-नाणं जावई किंवा सासरच्या मंडळींना देण्याची प्रथा अनिष्ट आहे, असंही ते म्हणतात. अलीकडच्या काळात ही पद्धत सुरू झाल्याचं ते मान्य करतात. "आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान , अर्थदान, ग्रंथदान गरजू लोकांना करण जास्त योग्य आहे," असंही ते नमूद करतात.

सेलिब्रेशनचा फंडा आणि मार्केटिंगचं लोण

लोकपरंपरेच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर यांना या अधिक महिन्याच्या परंपरेविषयी आणि त्याच्याशी जोडलेल्या जावयाला वाण द्यायच्या पद्धतीविषयी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "कालगणनेचा फरक नोंदवण्यासाठी योजलेल्या गणितीय आणि भौगोलिक गोष्टीचा विनाकारण धार्मिकतेशी संबंध जोडण्यात आला आहे. जावयाला द्यायचं सोन्या-चांदीचं वाण हे तर अजिबात परंपरेतून वगैरे आलेलं नाही."

"माझ्या लहानपणी पुण्यासारख्या सनातनी शहरातसुद्धा केळीच्या पानावर किंवा पत्रावळीत ३३ अनारशांचं वाण यशाशक्ती दिलेलं मी पाहिलं आहे. दीपदान ही प्रथा होती आणि अगदी वातसुद्धा वाणावर ठेवून दान दिलेली पाहिलेली आहे. मुलीला चोळीचा खण दिला जायचा," त्या सांगतात.

धोंड्याच्या महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत रूढ होत आहे.

फोटो स्रोत, Ashwini

फोटो कॅप्शन, या महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत रूढ होत आहे.

तारा भवाळकर ८० वर्षांच्या आहेत. "एवढ्या वर्षांत महाराष्ट्राच्या अनेक भागात राहिले, संस्कृतीचा जवळून अभ्यास केला तरी ही अधिक महिन्याच्या वाणाची प्रथा मात्र कुठे रुजून वर आलेली दिसली नाही. हा मला सध्याच्या भाषेत निव्वळ सेलिब्रेशनचा फंडा वाटतो. आर्थिक परिस्थिती बदलली तसे वाणाचे संदर्भ बदलले. अधिक महिना यंदा फारच मोठ्या प्रमाणावर प्रस्थ म्हणून वाढलेला दिसतोय. रोकडकेंद्री अर्थव्यवस्थेचं हे लक्षण आहे. "

तारा भवाळकर म्हणतात की, मार्केटिंगमुळे याचं लोण पसरतं आहे. धोंड्याच्या महिन्याचं वाण अकारण प्रतिष्ठेचं व्हायला लागलं ते त्याच्या जाहिराबाजीमुळे.

अधिक महिन्यात छोट्या मोठ्या दागिन्यांच्या दुकानात झळकणाऱ्या जाहिराती तारा भवाळकर यांच्या बोलण्यातली सत्यता दर्शवतात. सोशल मीडियावरच्या पोस्टसुद्धा पुरेशा बोलक्या ठरतात. पण अश्विनी आणि स्नेहासारख्या सुशिक्षित तरुण मुली नाईलाज म्हणून हे स्वीकारत असतील तर काय करायचं? याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर आम्हाला नक्की कळवा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)