'शिवाजी विद्यापीठ' हे नाव देण्यामागचा काय आहे इतिहास? नाव बदलण्याच्या मागणीला का होतोय विरोध?

फोटो स्रोत, Shivaji University
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असं करण्यात यावं, अशी मागणी अधूनमधून डोकं वर काढते.
सध्या हिंदुत्ववादी संघटनांकडून या मागणीला अधिक जोर दिला जात असून त्यासाठी सोमवारी (17 मार्च) कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला.
दुसऱ्या बाजूला, या नामविस्तारास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या नावावरुन नक्की काय रणकंदन सुरु आहे, शिवाजी विद्यापीठ हे नाव देण्यामागचा नेमका इतिहास काय आहे, ही मागणी आताच इतकी जोर का धरु लागली आहे, आणि नामविस्तारामागचे धोके काय सांगितले जात आहेत, अशा सर्व प्रश्नांचा हा आढावा...
सध्याचा वाद काय आहे?
शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असं करण्यात यावं, ही मागणी याआधीही झालेली आहे. पण, याआधीच्या मागण्या चर्चेच्या पातळीवरच राहिल्या होत्या.
मात्र, अलीकडे या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्याची घोषणा आणि त्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारीही सुरु झाली. या मागणीसाठीचे वातावरण जसजसे पुन्हा तापू लागले तसतसे या मागणीला विरोध करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या.

फोटो स्रोत, Shivaji University
15 मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्ताराला विरोध करण्याची भूमिका सदस्यांनी घेतली.
या बैठकीत हाच मुद्दा सर्वाधिक गाजला. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य ऍड. अभिषेक मिठारी यांनी नामविस्ताराला विरोध करणारा स्थगन प्रस्ताव मांडला आणि तो याच बैठकीत मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली.


मात्र, हा विषय संवेदनशील असून नामविस्ताराचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याने सध्या त्यावर चर्चा नको. तसेच, आपल्या भावना संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन देत त्यावर चर्चा करण्यास सभेचे अध्यक्ष म्हणजेच कुलगुरु डी. टी. शिर्के यांनी नकार दिला.
त्यानंतर सदस्यांनी सभागृहातच निषेधाचे फलकही झळकवले. सरतेशेवटी, हा स्थगन प्रस्ताव चर्चेविना स्वीकारण्यात आला.

फोटो स्रोत, Shivaji University
काल 17 मार्च रोजी हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदू जनजागृती समितीने मोर्चा काढत आपली मागणी अधोरेखित केली. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यातील काही आमदारांनीही पाठिंबा दिलेला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा हे या मोर्चावेळी उपस्थित होते. या मोर्चाला संबोधित करताना टी. राजा यांनी 'आम्ही विद्यापीठावर चढून सध्या असलेल्या नावाचा बोर्ड देखील जाळून टाकण्याची हिंमत ठेवतो,' असं विधान केलंय.
दुसऱ्या बाजूला, या नामविस्तारास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. 'शिवाजी विद्यापीठ' हे नाव देण्यामागे मोठा इतिहास असून नामविस्तार केल्यास शिवाजी महाराजांचं नाव वापरातूनच हद्दपार होण्याचा धोका आहे, असं विरोधकांकडून सांगितलं जात आहे.

यासंदर्भात आम्ही ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्याशी बातचित केली.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "कोल्हापुरातील आम्हा काही मंडळींची अलीकडेच बैठक झाली, त्यामध्ये आम्ही या नामविस्ताराच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की, 'शिवाजी' हे नाव फार महत्त्वाचं आहे. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचं 'एमएस युनिव्हर्सिटी' वा जवाहरलाल युनिव्हर्सिटीचं 'जेएनयू' असा संकोच होऊन संक्षिप्त नाव झालं. आपण नाव बदललं तर आपल्याही विद्यापीठाचं नाव 'सीएसएमयू' असं होईल."
या गोष्टीकडे जे दूषित दृष्टीकोनातून पाहत आहेत, त्यांचे राजकीय आणि सांस्कृतिक हितसंबंध वेगळे आहेत, असा दावा कोल्हापूरस्थित लेखक उमेश सूर्यवंशी करतात. ते 'कोदण्ड : प्रबोधनकार ठाकरे विचारवेध' या पुस्तकाचे लेखक आहेत.
खरं तर ते या मागणीसोबतच गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणी रेटत आहेत. त्यांचा मूळ हेतू शिवाजी विद्यापीठाशी संबंधित नसून तो सर्वथ: राजकीय आहे. ही मागणी करणारे लोक विद्यापीठाच्या अवस्थेबाबत मात्र काहीच बोलत नाहीत. शिवाजी विद्यापीठ जगावं, यासाठी हे लोक काय करतात का, असा सवालही ते करताना दिसतात.
काय आहे नावामागचा इतिहास?
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमागे आणि नावामागे प्रदीर्घ असा इतिहास आहे, हा मुद्दाही या दोघांनी अधोरेखित केला.
राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक भालबा विभुते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना विद्यापीठाचा हा इतिहास उलगडून सांगितला. 'सुवर्ण महोत्सवी शिवाजी विद्यापीठ' या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं असून विद्यापीठाचा संपूर्ण इतिहास संकलित केला आहे.
मूळात हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला असून हे नाव देतानाही सखोल चर्चा करुन विचारांतीच हे नाव देण्यात आलं असल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Shivaji University
ते सांगतात की, "ज्यांचे या नावाबद्दल गैरसमज आहेत, त्यांनी ते दूर करण्याची गरज आहे. विद्यापीठ स्थापन होऊन जवळजवळ 63 वर्षे झाली असून 'शिवाजी विद्यापीठ' याच नावाने जागतिक पातळीवर गाजलेलं आहे. स्थापनेच्या वेळीही कोल्हापूर इथे होणाऱ्या विद्यापीठाला 'छत्रपती शिवाजी महाराजांचं' नाव द्यावं आणि 'छत्रपती' असा उल्लेख त्यामध्ये असावा, याबद्दल चर्चा झाली होती. किंबहुना शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी जी समिती नेमली होती, त्या समितीचं नावही 'श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी स्थापन करणेबाबत...' असंच होतं," अशी माहिती त्यांनी दिली.

फोटो स्रोत, Shivaji University
प्राचार्य सी. रा. तावडे या अकरा सदस्यीय समितीचे अध्यक्ष होते.
या समितीत प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या नेतृत्वाखाली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, राजाराम बापू पाटील, ना. सी. फडके, डॉक्टर बी. एस. पाटील, डॉ. बी. आर. ढेकणे, डॉ. भगवान दास, डॉ. बी. एस. नाईक, व्ही. ए. आपटे, आर. एस. मुगळी यांचा समावेश होता.
या समितीने विद्यापीठाबाबत चार महिने सर्वांगीण विचार करताना नावाचाही विचार केलेला होता. तावडे समितीच्या अहवालातील परिच्छेद 67 मध्ये त्याची माहिती मिळते. या समितीचं नाव लांबलचक असलं तरीही विद्यापीठाचं नाव देताना ते असंच ठेवलं तर ते नंतर संक्षिप्त होतं आणि त्यामधून शिवाजी महाराजांसारखा नॅशनल हिरो मागे पडतो, असा मुद्दा चर्चेला आला.
याच समितीत सयाजीराव युनिव्हर्सिटी (M.S. University), राणी पार्वतीदेवी कॉलेज (R.P.D. College), गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज (G.K.G.) यांचाही उल्लेख झाला. ही नावे नंतर कशी संक्षिप्त होतात, यावर चर्चा झाल्याचं आढळते.

असं या विद्यापीठाबाबतही होऊ नये, तसेच शिवाजी महाराजांचं नाव सतत ध्यानीमनी रहावं, यासाठी प्रस्तावित विद्यापीठास 'शिवाजी विद्यापीठ' असं नाव देण्याची शिफारस तावडे समितीनं केली होती.
या तावडे समितीनं तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांच्याकडे आपला अहवाल 30 जानेवारी 1962 रोजी सादर केला.
या अहवालावर शासकीय संस्कार झाल्यानंतर 8 जुलै 1962 रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री शांतीलाल शहा यांनी विधानपरिषदेत विधेयक मांडतानाही 'कोल्हापूर येथे स्थापन होणारे शिवाजी विद्यापीठ' असाच उल्लेख केला आहे.

फोटो स्रोत, Shivaji University
हे विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं तर तिथेही त्या समितीमध्ये हेच नाव संमत करण्यात आलं. विधानपरिषदेत आणखी चार दिवस चर्चा झाली नंतर विधानसभेत दोन दिवस चर्चा झाली. तेव्हा वेगवेगळे मुद्दे उपस्थित झाले होते. या विद्यापीठास कोल्हापूर विद्यापीठ वा राजाराम विद्यापीठ का म्हणत नाही, असेही मुद्दे पुढे आले. काहींनी तर कोल्हापुरात विद्यापीठच नको, असंही म्हटलं आहे.
परंतु, सरतेशेवटी सर्वानुमते कोल्हापूरमधील प्रस्तावित विद्यापीठास 'शिवाजी विद्यापीठ' हे नाव देण्याचं विधान मंडळानं निश्चित केलं. तत्कालीन शिक्षणमंत्री शांतीलाल शहांनीही माहिती दिली की, सिलेक्ट कमिटीनं चर्चा करुन विचारांती हे नाव दिलं आहे. भविष्यात या विद्यापीठाचं नावही संक्षिप्त होऊ नये ही त्यामागची भूमिका होती. त्यामुळे, हेच नाव मान्य झालं. समितीकडून आलेल्या विधेयकास विधान परिषदेने 17 जुलै 1962 ला मान्यता दिली. 17 ऑगस्ट 1968 ला हे नाव राज्यपालांच्या परवानगीनंतर गॅझेट झालं.
"या नावामागे एवढा मोठा दीर्घ इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घेतला तर नाव देताना सखोल विचार केला असल्याचं स्पष्ट होतं, त्यामुळे, नावाबद्दल गैरसमज असणाऱ्यांनी ते दूर करण्याची गरज आहे," असंही ते म्हणाले.
'विद्यापीठचं टिकलं नाही, तर नाव काय दिलंय, याला काय अर्थ उरणार आहे?'
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येत नामविस्तारास विरोध दर्शवला आहे.
शिवाजी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना या मागणीबाबत नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे प्रमुख मिलींद भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना कर्मचाऱ्यांच्या वतीने आपली भूमिका माडंली.
ते गेल्या 37 वर्षांपासून विद्यापीठाचे कर्मचारी असून लवकरच निवृत्त होणार आहेत.

फोटो स्रोत, Shivaji University
ते म्हणाले की, "नामविस्तार केल्यास ते विद्यापीठाचं नाव संक्षिप्त रुपात प्रचलित होईल आणि त्यातून शिवाजी महाराजांचा उल्लेखच नाहीसा होईल, ही भीती आम्हाला आहे. आम्हाला राजकारणाशी काही देणंघेणं नसून या विद्यापीठाच्या छत्रछायेखाली आम्ही तीस-तीस वर्षं सेवा दिलेली आहे. त्या नावाचा असा अपभ्रंश झालेला आम्हाला चालणार नाही, ही कर्मचारी म्हणून आमची भावना आहे. मी आता रिटायर व्हायला आलो आहे, पण आमच्या पूर्ण निष्ठा या विद्यापीठात वाहिलेल्या आहेत. जे विद्यापीठाशी संबंधितच नाहीत, ते अशा स्वरुपाच्या मागण्या करत आहेत."
विद्यापीठाशी काय शिक्षणाशीही ज्यांचा काही संबंध आलेला नाही, असे लोक विनाकारण या मुद्द्यावरुन राजकारण करत आहेत, अशा शब्दात विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य असलेल्या अभिषेक मिठारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अधिसभेत स्थगन प्रस्ताव त्यांनीच मांडला होता.

ते म्हणाले की, "कालच्या मोर्चात कोल्हापुरातील लोकच नव्हते. इतकंच काय, तेलंगणातील आमदार इथं येऊन शिवाजी महाराजांच्या नावाचा बोर्ड जाळण्याची भाषा करुन जातो, हे निषेधार्ह आहे. या अतिउजव्या विचारसरणीच्या संघटना असून कोल्हापूरकरांना हा नामविस्तार अजिबात नकोय, हे मोर्चातील सहभागींच्या अल्प संख्येवरुन दिसून येतं. अधिसभा ही समाजाचं प्रतिबिंब असते. तिथे एकमताने विरोध झालाय. स्थगन प्रस्ताव स्वीकारला जाणं ही गोष्टही दुर्मिळ आहे, तीदेखील घडली आहे."
पुढे, राजकारणासाठी नको ते मुद्दे उकरून काढले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते सांगतात की, "नावातील बदल हा मुद्दा महत्त्वाचा नसून विद्यापीठासमोरचे प्रश्न, रखडलेला निधी आणि खालावलेला दर्जा हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. विद्यापीठचं टिकलं नाही, तर नाव काय दिलंय, याला काय अर्थ उरणारे? तुमच्या धर्माच्या राजकारणासाठी आमच्या शिवाजी विद्यापीठाचा वापर का करताय? नावाचा बोर्ड जाळण्याची भाषा करणाऱ्यांची नाटकं कोल्हापूरकर खपवून घेणार नाहीत," असंही ते म्हणाले.
'...तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार!'
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्ताराची मागणी करणाऱ्या संघटना आता या मुद्द्यावरुन इतक्या आक्रमक का झाल्या आहेत, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संघटक सुनील घनवट यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते आपल्या मुद्द्यांबाबत आक्रमकपणे बोलत होते.

फोटो स्रोत, Shivaji University
ते म्हणाले की, "छत्रपती या नावामध्ये आदर आहे. ती उपाधी आहे. त्यासाठी खास राज्याभिषेक करावा लागतो. तो झाल्यावरच ही पदवी मिळते, त्यामुळे ती छोटी गोष्ट नाहीये. मात्र, एकेरी उल्लेखामुळे शिवाजी महाराजांचा सतत अवमान होतो. तो होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. महाराजांचं नाव आदराने घेतलं जाण्यासाठी 'छत्रपती' हा उल्लेख पाहिजेच."
विद्यापीठाच्या स्थापनेवेळी झालेल्या चर्चेमध्ये नावाबद्दलचा मुद्दा चर्चेत आला होता, याबाबत बोलताना ते म्हणाले की, "नाव संक्षिप्त होईल, एवढंच लॉजिक तिथे लावण्यात आलंय. पण त्या चर्चेत शिवाजी महाराजांचा अनादर होतो, याबाबत काहीच चर्चा झाली नाही. आधीच्या काळातील सरकारं या मागणीकडे दुर्लक्ष करत होती. पुरोगामी विचारांच्या लोकांचा प्रभाव सगळीकडे होता. आता हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आल्यामुळे आम्ही ही मागणी आता लावून धरतो आहोत. जर ही माणगी मान्य झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार आहोत," असंही ते म्हणाले.
'शिवाजी' म्हटल्यामुळे अनादर होतो?
'शिवाजी' या नावामुळे अपमान होतो, हा मुद्दा अत्यंत तकलादू असल्याचं जयसिंगराव पवार सांगतात. आपण आईला, रामाला, कृष्णाला एकेरी नावानेच उच्चारतो, तेव्हा आपल्या मनातील भाव अनादराचा असतो का, असा प्रतिसवाल ते उपस्थित करतात.
"कोल्हापुरात शिवाजी पुतळा, शिवाजी पार्क, शिवाजी तरुण मंडळ, शिवाजी पेठ, शिवाजी चौक तरुण मंडळ, शिवाजी पूल, शिवाजी स्टेडियम, शिवाजी मार्केट, शिवाजी उद्यमनगर अशा कित्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शिवाजी' या नावानेच केला जातो. तो बोलीभाषेत रूतलेला शब्द असून 'शिवा' या शब्दाला 'जी' असा प्रत्यय लागून तयार झालेला आदरार्थीच शब्द आहे. आजवर असा उल्लेख करणारे कोल्हापुरकर आपल्या मनात शिवाजी महाराजांच्या बाबत अनादर बाळगूनच बोलत होते, असं म्हणायचंय का," असा सवाल लेखक उमेश सूर्यवंशी उपस्थित करतात.

फोटो स्रोत, Facebook/Shivaji University
ते सांगतात की, "खुद्द शाहू महाराज स्वत: छत्रपती होते. त्यांनी 'शिवाजी वैदिक विद्यालय' काढलं होतं. पहिले कृषीमंत्री पंजाबराव देशमुख यांची अमरावतीमधील शिक्षण संस्था ही 'श्री शिवाजी शिक्षण संस्था' अशीच आहे. या कुणालाही शिवाजी महाराजांबद्दल आदर नव्हता, असं म्हणायचं का?"
"महामानव आणि मानव यांच्यामधलं अंतर कमी करणं महत्त्वाची गोष्ट असते. संतांनी विठ्ठलाचा उल्लेख एकेरीच केला आहे, प्रसंगी 'विठ्या', 'विठू' असाही केलेला आहे. विठ्ठलाला माऊली म्हणणारे त्याचा अनादर करतात, असं समजावं का?"

नाव बदलण्याच्या मुद्द्यासोबतच गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावर बंदी घालण्याचीही मागणीही ते रेटत आहेत. त्यांचा मूळ हेतू शिवाजी विद्यापीठाशी संबंधित नसून तो सर्वत: राजकीय आहे, असं उमेश सूर्यवंशी सांगतात.
"विशेष म्हणजे अशा एकेरी उल्लेखाचं हे काही पहिलं पुस्तक नव्हे. याआधी याच शिर्षकाचं पुस्तक प्रकाशित झालेलं असून स्वत: प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचं नाव 'दगलबाज शिवाजी' असं आहे," असंही ते सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











