धाकट्या भावालाही संपत्तीचा समान वाटा मिळावा म्हणून आग्रह धरणाऱ्या बहिणीची हत्या, 21 वर्षांपासून प्रकरण कोर्टातच

डॉ. आशा गोयल कुटुंबियांसमवेत

फोटो स्रोत, Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, डॉ. आशा गोयल कुटुंबियांसमवेत
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

63 वर्षीय कॅनेडियन नागरिक आणि प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशा गोयल यांची 22 ऑगस्ट 2003 रोजी मुंबईत मलबार हिल येथे हत्या करण्यात आली.

या घटनेला दोन दशक लोटली तरीही डॉ. आशा गोयल यांना न्याय मिळालेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून डॉ. गोयल यांची मुलगी रश्मी गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन, एकवीस वर्षाने तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आशा घेत व्यक्त केलीय.

"21 वर्षानंतर तरी आईला न्याय मिळेल का?" असा आशावादी सवाल डॉ. रश्मी गोयल यांनी उपस्थित केला आहे.

अत्यंत क्रूरपणे माझ्या आईची हत्या होऊन ही आम्हाला न्यायासाठी इतकी वर्ष प्रतीक्षा करावी लागते असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

या प्रकरणाच्या पुढील कार्यवाहीसाठी आणि आईला न्याय मिळावा याकरिता डॉ. आशा गोयल यांची कन्या प्रा. रश्मी गोयल कॅनडाहून सध्या मुंबईत आल्या आहेत.

दरम्यान कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 17 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. आरोपीच्या वकिलांनी आरोपी आजारी असल्यासंदर्भातील प्रमाणपत्र कोर्टापुढे सादर केल्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काय आहे प्रकरण ?

हे प्रकरण 2003 साली मुंबईत घडले होते.

मलबार हिल आणि मुंबईतील इतर परिसरात डॉ. आशा गोयल (लग्नापूर्वीचे आडनाव अगरवाल) आणि कुटुंबीयांची वारसा संपत्ती आहे.

या संपत्तीवरून आशा गोयल व त्यांचे तीन भाऊ आणि चार बहिणी यांच्यामध्ये वाद होता. अगरवाल कुटुंबीयांची संपत्ती तिन्ही भावांमध्ये समान वाटप करावी यासाठी गोयल आग्रही होत्या.

घटनेला दोन दशक लोटली तरीही डॉ. अशा गोयल यांना न्याय मिळालेला नाही.

फोटो स्रोत, Dr. RashmiGoyal

फोटो कॅप्शन, घटनेला दोन दशक लोटली तरीही डॉ. आशा गोयल यांना न्याय मिळालेला नाही.

मात्र, तीन भावांमध्ये ही संपत्ती सारखी वाटप करण्यावरून वाद विवाद होता. कारण दोन मोठे भाऊ लहान भावाला काही कारणाने संपत्तीचा वाटा देण्यास तयार नव्हते. त्यामुळे डॉ. आशा गोयल यांनी दोन मोठ्या भावांना, लहान भाऊ शेखर अगरवाल याला देखील संपत्तीचा वाटा द्यावा अशी मागणी करत होत्या.

त्यामुळे सुभाष अगरवाल आणि सुरेशचंद्र अगरवाल या दोन मोठ्या भावांचा याला विरोध होता. त्यामुळे 2003 साली ऑगस्ट महिन्यामध्ये आशा गोयल मुंबईत आल्या होत्या. त्या दरम्यान आशा गोयल यांच्या हत्येचे प्रकरण घडले होते.

घटना कशी घडली ?

2003 ऑगस्ट महिन्यामध्ये 13 तारखेच्या दरम्यान आशा गोयल कॅनडाहून मुंबईत सांताक्रुज परिसरात आपल्या बहिणीच्या घरी येऊन गेल्या..

त्या त्यांच्या भावाच्या मलबार हिलमधल्या घरी भाऊ आणि वहिनी आजारी असल्यानं बघण्यास आल्या होत्या.

मलबार हिल परिसरातील सुधाकर बिल्डिंगमध्ये भाऊ सुरेशचंद्र अगरवाल यांच्या 14 मजल्यावर आशा उतरल्या होत्या.

आशा गोयल यांचा भाऊ सुरेश चंद्र अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, आशा गोयल यांचा भाऊ सुरेश चंद्र अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

23 ऑगस्ट 2003 रोजी त्या कॅनडाला परतणार होत्या. पण 23 ऑगस्टची सकाळ उजाडली त्या कॅनडाला काही परतल्याच नाही. कारण झोपेत असताना आदल्या दिवशीच त्यांची निर्घृण हत्या झाली.

निर्दयीपणे चाकूचे वार करत आशा गोयल यांची हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नव्हते , तर ग्रॅनाईटच्या दगडांनी त्यांनी त्यांचे डोके ठेचले होते.

घरातच 63 वर्षीय वृद्धेची अशाप्रकारे थरकाप उडवणारी हत्या झाल्याने, मुंबईत सर्वत्र खळबळ उडाली होती.

कोण होत्या आशा गोयल ?

आशा गोयल या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि कॅनडाच्या नागरिक होत्या. आशा गोयल यांचा जन्म 1940 ला मथुरा येथे झाला होता. बारा वर्षाच्या असताना त्या मुंबईत स्थलांतरित झाल्या.

टोपीवाला मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. त्यांनी आपलं जीवन प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रासाठी समर्पित केले होते .

डॉ. आशा गोयल

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, डॉ. आशा गोयल

1963 मध्ये लग्न केल्यानंतर, त्या कॅनडामध्ये गेल्या. तिथे त्यांनी यशस्वीरित्या हजारो बाळांची व स्त्रियांची दयाळूपणे काळजी घेतली आणि हेडवॉटर हेल्थकेअरमध्ये प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे नेतृत्व केले.

आशा गोयल यांच्या पश्चात त्यांचे पती आणि मुलगा संजय गोयल (व्हँकुव्हरमधील एक व्यापारी आहे), मुलगी रश्मी (डेन्व्हर विद्यापीठात क्रिमिनल लॉची प्राध्यापक) आणि दुसरी मुलगी सीमा (विनिपेगमधील एक कलाकार आणि शिक्षक) आहे.

याप्रकरणी काय–काय घडलं?

2003 ऑगस्ट महिन्यामध्ये ही घटना घडल्यानंतर मलबार हिल पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भांदवि कलम 302, 442 अणि 387 कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला.

आशा गोयल यांचा भाऊ सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

चोरी करण्याच्या उद्देशाने घरात कोणीतरी घुसून बहिणीची हत्या केल्याचं सुरेश अग्रवाल यांनी पोलिसांना जबाब दिला होता.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयाचे धागे आशा गोयल यांच्या दोन्ही बंधू अगरवाल भावांपर्यंत पोहोचले होते.

मात्र या प्रकरणी तीन महिन्याच्या कालावधीत आरोपपत्र न्यायालयात दाखल होणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही.

2005 साली अखेर या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी याप्रकरणी सबळ पुरावे न्यायालयात सादर केले. यामध्ये रक्ताने माखलेले कपडे, डीएनए आणि एका आरोपीने हत्या केल्याची याप्रकरणी कबुली दिली होती.

अगरवाल कुटुंबीयांची संपत्ती तिन्ही भावांमध्ये समान वाटप करावी यासाठी गोयल आग्रही होत्या.

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, अगरवाल कुटुंबीयांची संपत्ती तिन्ही भावांमध्ये समान वाटली जावी, यासाठी गोयल आग्रही होत्या.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याप्रकरणी 2006 ला एकूण चार आरोपी अटक झाले होते. त्यात प्रदीप परब, मनोहर शिंदे, पी. के. गोयंका आणि नरेंद्र गोयल हे होते. पी के गोयंका हा आशा यांचा एक भाऊ सुभाष याचा मॅनेजर होता. तर नरेंद्र गोयल हा आशा यांचा दुसरा भाऊ सुरेश यांचा जावई होता.

आरोप पत्रामध्ये एका साक्षीदाराच्या वतीने दोन्ही भावांच्या सांगण्यावरूनच हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र कोर्टात हे प्रकरण पुढे तारीख पे तारीख असे चालत राहिले. यातील चारही आरोपी पुढे हे जामीनावर सुटले.

आशा गोयल यांच्या हत्येनंतरच्या पुढील तीन महिन्यात सुरेश या त्यांच्या भावाचे ही निधन झाले. तर या प्रकरणातील आरोपी असलेल्या मनोहर शिंदेचे देखील निधन झाले.

या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून सुरुवातीला राजा ठाकरे हे काम पाहत होते. त्यानंतर आता हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे आहे.

गेल्या 21 वर्षात या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया संथ गतीने चालल्याने ठोस निकाल या प्रकरणांमध्ये लागू शकला नाही असं आशा गोयल यांची मुलगी रश्मी गोयल सांगते. आता या प्रकरणाचा खटला 21 वर्षानंतर या आठवड्यामध्ये मुंबईतील सत्र न्यायालयात चालवला जाणार आहे.

इतके पुरावे असतानाही इतका विलंब का? - रश्मी गोयल

डॉ. आशा गोयल यांच्या कन्या प्रा. रश्मी गोयल म्हणाल्या की, 'आरोपींचा कबुलीजबाब आणि ठोस पुरावे उपलब्ध असताना इतका मोठा विलंब भारतीय न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. या प्रक्रियेत एक प्रमुख साक्षीदार आणि एका आरोपीचाही मृत्यू झाला आहे.

पुढे गोयल म्हणाल्या की, आता या खटल्याची वकिली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम करीत आहेत. डॉ. गोयल यांचे सर्व कुटुंब कॅनडामध्ये राहते आणि अजूनही न्यायाची वाट पाहत असल्याने, याप्रकरणी काय निकाल लागतो याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष ठेवले जात आहे.

या आठवड्यात हे प्रकरण सत्र न्यायालयात सुरू होईल. या खटल्यात एक महत्त्वाचे वळण येण्याची अपेक्षा आहे, जेव्हा प्रमुख साक्षीदार प्रदीप परब, जो आता सरकारी साक्षीदार बनला आहे, त्याची साक्ष होईल.

भावानेच बहिणीच्या हत्येनंतर दिली होती तक्रार

आशा गोयल यांची हत्या झाल्यानंतर ज्या भावाच्या घरी म्हणजेच सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या घरी आशा गोयल थांबल्या होत्या, त्यांनी या याप्रकरणी तक्रार दिली होती.

सुरेश अग्रवाल यांनी 23 ऑगस्ट 2003 रोजी दिलेल्या जबाबाबत म्हटलं की चोरी करण्याच्या उद्देशाने चोर घरामध्ये आले होते आणि त्याचवेळी बहिणीची हत्या घडल्याचा त्यांनी जबाबामध्ये म्हटले आहे.

सर्व घटनाक्रम नक्की काय होता याबाबत त्यांनी सविस्तर जबाबात माहिती दिली आहे.

तीन भावांमध्ये ही संपत्ती सारखी वाटप करण्यावरून वाद विवाद होता.

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, तीन भावांमध्ये ही संपत्ती सारखी वाटप करण्यावरून वाद विवाद होता.

डॉ. गोयल त्यांच्या धाकट्या भावाच्या शेखरच्या हक्कांसाठी लढत होत्या आणि त्यांना वडिलांच्या मालमत्तेत योग्य वाटा मिळावा, अशी त्यांची इच्छा होती. या मुद्द्द्यावरून त्यांचा सुरेश आणि सुभाषशी वाद झाल्याचे गोयल कुटुंबीयाकडून सांगितले जाते. त्यावरूनच त्यांची हत्या झाल्याची त्यांची मुलगी सांगते.

मात्र 2003 साली या प्रकरणाची तक्रार घेत असताना मालमत्तेवरून कोणताही वाद नव्हता असा जबाब पोलिसांना सुरेशचंद्र अगरवाल यांनी बहीण अशा गोयल याच्या हत्येची तक्रार देताना म्हटलं होतं.

मात्र या प्रकरणाचा तपास गेल्या काही वर्षात झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये सुरेशचंद्र अगरवाल आणि सुभाष अगरवाल यांच्या सांगण्यावरून आरोपींनी हत्या घडवून आणल्याचं पोलिसांना आरोपींनी सांगितलं. त्यामुळे पुढे सुरेशचंद्र अगरवाल यांना देखील पोलिसांनी आरोपी बनवले असं गोयल कुटुंबाकडून माहिती देण्यात आली. मात्र या प्रकरणी अजूनही सुनावणी सुरू आहे.

भक्कम पुरावे असूनही, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा खटला वर्षानुवर्षे अडकला

या प्रकरणासंदर्भात रश्मी गोयल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "या प्रकरणामध्ये एका आरोपीने दिलेला कबुलीजबाब, डीएनए विश्लेषण आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले, यांसह अनेक भक्कम पुरावे असूनही, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा खटला वर्षानुवर्षे अडकला आहे. या प्रकरणामधील काही आरोपींचे निधन झाले तर काही जामिनावर मोकाट फिरत आहेत."

रश्मी गोयल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या दीर्घ विलंबाबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती.

अनेक भक्कम पुरावे असूनही, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा खटला वर्षानुवर्षे अडकला आहे.

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, अनेक भक्कम पुरावे असूनही, न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा खटला वर्षानुवर्षे अडकला आहे.

न्यायासाठी होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाला मोठ्या मानसिक यातना सहन कराव्या लागत असून न्याय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत असं रश्मी गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. डेन्व्हर विद्यापीठात गुन्हेगारी कायद्याच्या प्राध्यापक असलेल्या रश्मी गोयल यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"आम्ही खूप वाट पाहिली आहे, आता आमचा संयम सुटला आहे. माझ्या आईने संपूर्ण आयुष्य इतरांना बरे करण्यासाठी दिले, पण तिच्या निर्घृण हत्येप्रकरणी अजूनही न्याय मिळालेला नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी हस्तक्षेप करून या खटल्याला न्याय मिळवून द्यावा.

एवढे ठोस पुरावे असतानाही गुन्हेगार सुटून जात असतील, तर भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर गंभीर प्रश्नचिन्हासमोर उभी राहील," असे रश्मी गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Dr. Rashmi Goyal

फोटो कॅप्शन, डॉ. आशा गोयल यांच्या हत्येप्रकरणी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती.

ही विलंबित न्याय प्रक्रिया केवळ गोयल कुटुंबासाठीच दुःखद नाही, तर भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील गंभीर समस्या आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार अशा गोयल यांची मुलगी रश्मी गोयल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

याप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयात पुरावा साक्षीदार साक्ष देण्यासाठी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरोपींचे वकील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीची टीम करत आहेत. संपर्क झाल्यास त्यांचीही प्रतिक्रिया अपडेट करण्यात येईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.