संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, असा होता अंगावर काटा आणणारा घटनाक्रम

संतोष देशमुख
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष झालं आहे. त्यानिमित्तानं आधी प्रकाशित केलेला लेख पुन्हा देत आहोत.

----------------------------------

( सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्र राज्य ढवळून निघाले.

12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले असून त्यात ही घटना कशी घडली, नेमके कोणते पुरावे पोलिसांच्या हाती लागले? याचे तपशील दिले आहेत.

या चार्जशीटच्या आधारे बीबीसी मराठीने हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे की सदर घटना नेमकी कशी घडली आणि तिचा घटनाक्रम कसा आहे?

29 नोव्हेंबर 2024 - स्थळ मस्साजोग, ता. केज, जि. बीड

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यापासून 11 किमी दूर असलेल्या मस्साजोग गावातील एका कार्यालयातली शांत सकाळ होती. अपारंपरिक ऊर्जा तयार करणाऱ्या अवादा कंपनीचं हे स्थानिक कार्यालय.

दिल्लीच्या परिसरातील नोएडा या औद्योगिक वसाहतीत या कंपनीचं ऑफिस आहे. देशभरात पवनचक्की, सोलार पॅनेल यांच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते.

लाल रेष
लाल रेष

महाराष्ट्रात यवतमाळ, धामणगाव, बुलढाणा, खामगाव, सातारा, चाळीसगाव या ठिकाणी प्रकल्प उभारल्यानंतर कंपनीने बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावी एक प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले होते.

मस्साजोगच्या कार्यालयाचे प्रमुख सुनिल केदु शिंदे यांच्या खांद्यावर कंपनीने ही जबाबदारी सोपवली होती. 29 नोव्हेंबर 2024 च्या सकाळी अंदाजे 11.30 वाजता शिंदेंना मोबाईलवर एक फोन आला.

या फोननंतर महाराष्ट्र राज्य पूर्ण ढवळून निघेल आणि भविष्यात होणाऱ्या घटनांची या फोनने सुरुवात नोंदवली जाईल याची कल्पना त्यांना असणे शक्यच नव्हतं.

पवनचक्क्यांचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पवनचक्क्यांचे प्रातिनिधिक छायाचित्र ( संग्रहित)

हा फोन होता विष्णू चाटेचा. सुनिल शिंदे यांनी फोन उचलल्यानंतर विष्णू चाटे म्हणाला, 'वाल्मिक अण्णा बोलणार आहेत.'

'वाल्मिक अण्णा'ने फोनवर सांगितले, "अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा."

त्यावर सुनिल शिंदे यांनी म्हटले होते की, 'बरं आण्णा मी मेसेज देतो'. त्यावर वाल्मिक कराडने शिवी देत म्हटले की मेसेज द्या नाहीतर आणखी काही द्या. पण आहे त्या परिस्थितीत काम बंद करा. "आता निवडणुका झाल्या आहेत मी मोकळाच आहे," असं देखील कराड यावेळी म्हणाला.

विष्णू चाटे

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना धमकी दिल्याची नोंद चार्जशीटमध्ये आहे

काही दिवसांपूर्वीच सुनिल शिंदे यांचे सहकारी आणि अवादा कंपनीचे भूमी अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांच्या परळी येथील कार्यालयातून बोलवणे आले होते.

थोपटे यांनी दिलेल्या जबाबानुसार, '8 ऑक्टोबरला विष्णू चाटेनी धमकी दिली होती की, अवादा कंपनीची केज तालुक्यात असलेली कामं सुरू ठेवायची असतील, तर 2 कोटी रुपये द्या, अन्यथा काम बंद करा. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईलहून अनेक धमक्या आल्या. जर काम सुरू ठेवलं, तर जिवे मारण्यात येईल अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.'

प्रकल्प अधिकाऱ्याचे झाले होते अपहरण

पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच 28 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुनिल शिंदे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्याकडून खंडणी मागण्यात आली होती.

थोपटे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, "8 ऑक्टोबर 2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटे यांची भेट झाली होती. या भेटीत देखील खंडणी मागण्यात आली होती. तसेच अवादा कंपनीच्या वरिष्ठांचे नंबर्स वाल्मिक कराडने घेतले होते."

आरोपी वाल्मिक कराड

फोटो स्रोत, Facebook/Walmik Karad

फोटो कॅप्शन, आरोपी वाल्मिक कराड

29 नोव्हेंबरला आलेला फोन हा त्याच धमक्यांच्या साखळीतील होता.

पण त्या दिवशी एक वेगळी घटना घडली. 29 नोव्हेंबरला दुपारी 1.00 वाजता सुदर्शन घुले मस्साजोग प्रकल्पावर आला आणि त्याने 'काम बंद करा, नाही तर हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील,' अशी धमकी दिली होती.

व्हीडिओ कॅप्शन, संतोष देशमुख हत्येपूर्वी आरोपींनी काय काय केलं? CID च्या चार्जशीटमध्ये केले धक्कादायक खुलासे

सुनिल शिंदेंनी आपल्या जबाबात म्हटले की, "त्याच दिवशी सुदर्शन घुलेने मला हे देखील सांगितले की, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा, तुमच्या एक एक मिनिटाची रिपोर्टिंग वाल्मिक अण्णांकडे जाते. त्यांनी जे सांगितले आहे ती डिमांड पूर्ण करा, नाहीतर काम करू दिले जाणार नाही. कुणाचाही विरोध संपादन करा, पण वाल्मिक अण्णांचा विरोध घेऊ नका."

"तुम्ही अण्णांच्या डिमांड पूर्ण केल्यानंतर तिथे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. तुम्हाला इथे 100 जण सांभाळण्यापेक्षा तिथे एकाच जागेवर सेटलमेंट राहू द्या. त्यानंतर तुम्हाला कुठेच काही करायची गरज पडणार आहे," असे सुदर्शनने म्हटल्याची नोंद चार्जशीटमध्ये आहे.

या धमक्यांनंतर सुनिल शिंदे हे घाबरले. त्यांनी वेळोवेळी पोलीस आणि वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली. लेखी तक्रारी दिल्या. फोनवर येणाऱ्या धमक्यानंतर आता आरोपी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडायच्या धमक्या देऊ लागले होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

6 डिसेंबर 2024 - स्थळ - अवादा प्रकल्प कार्यालय मस्साजोग

अवादा कंपनीच्या गेटवर चार पाच जण काळ्या स्कॉर्पिओतून आले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या अमरदीप सोनवणेंना मारहाण केली आणि काठी गेटवर आपटत गेट उघडण्यास भाग पाडले. त्याच ठिकाणी अमरदीप यांच्यासोबत अशोक सोनवणे आणि भैय्यासाहेब सोनवणे होते.

अमरदीप यांना आल्या आल्या सुदर्शन घुलेनी, 'सरक रे' असे म्हटले होते.

त्यादिवशी काय घडले हे अशोक सोनवणेंनी त्यांच्या दिलेल्या जबाबातून समजून घेऊ.

सोनवणे जबाबात सांगतात, "त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मी सुदर्शन घुले आहे. मी वाल्मिक अण्णांचा माणूस आहे. माझी वाट अडवायची तुमची लायकी आहे?"

असं म्हणत या व्यक्तीने अशोक सोनवणेंना काठीने डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस मारहाण केली. सुदर्शन घुलेसोबत आलेल्या सुधीर सांगळे, प्रतीक घुले, ज्ञानेश्वर मुळे यांनी तिथे मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ करुन दहशत पसरवली.

संतोष देशमुख हत्येविरोधात रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता
फोटो कॅप्शन, संतोष देशमुख हत्येविरोधात रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता

हा सर्व गोंधळ सुरू असताना त्या ठिकाणी अशोक सोनवणेंनी गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बोलवले. संतोष देशमुख काही गावकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांना त्यांनी तिथून हाकलून लावले.

'कंपनी चालू द्या, लोकांना रोजगार मिळू द्या', असं संतोष देशमुख यावेळी आरोपींना म्हणाले होते.

तर,

'सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली आणि तिथून ते आल्या पावली निघून गेले.

संतोष देशमुख हे शिवाजी थोपटेंना म्हणाले तुम्ही घाबरू नका. तुम्हाला कोणी धमकी देत असेल, तर आम्ही आहोत.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं सांत्वन करताना गावकरी

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं सांत्वन करताना गावकरी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संतोष देशमुख यांना देखील जिवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत असत. मात्र, गावातील लोकांना रोजगार मिळेल यामुळे तो प्रकल्प (प्लांट) सुरू ठेवावा असा विचार ते करत होते.

'प्रकल्प बंद पाडण्याच्या आड येऊ नकोस,' अशा धमक्या वारंवार संतोष देशमुख यांना येत होत्या. याबाबत त्यांनी आपली मुलगी आणि भाऊ धनंजय यांच्याशी देखील चर्चा केली होती. जर तू खंडणीच्या आड आलास, तर वाल्मिक अण्णा तुला जिवे सोडणार नाहीत, असं सुदर्शन घुलेनी त्यांना म्हटलं होतं.

6 तारखेला जेव्हा अवादा कंपनीच्या प्रकल्पाहून हाकलून देण्यात आले त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन घुलेनी फोनवरुन सर्व वृत्तांत वाल्मिक कराडला सांगितला. त्यावर वाल्मिक कराड म्हणाला, "जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले, तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही. आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल."

6 डिसेंबरला झालेल्या घटनेनंतर पुढे दोन दिवसातच असं काय घडलं ज्यामुळे ही इतकी भयंकर घटना घडली असा प्रश्न कुणालाही पडल्या वाचून राहणार नाही.

7 डिसेंबर - आरोपींना अटक आणि जामिनावर सुटका

6 तारखेच्या भांडणानंतर चार आरोपींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. 7 डिसेंबर रोजी या आरोपींना दुपारी 1.30 वाजता अटक करण्यात आली. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या आरोपांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आणि जामिनावर सोडण्यात आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विविध नेत्यांनी मस्साजोग गावाला भेटी दिल्या

फोटो स्रोत, sureshdhas/facebook

फोटो कॅप्शन, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विविध नेत्यांनी मस्साजोग गावाला भेटी दिल्या

अवादा कंपनीच्या प्लांटवर झालेल्या भांडणाचा एक व्हीडिओ देखील आला आणि त्यात सुदर्शन घुलेला माघार घ्यावी लागल्याचे दिसत होते. यावरुन त्याला काही जणांनी फोन देखील केले होते. असाच फोन सुदर्शन घुलेच्या मित्राने केला आणि त्याने त्याची विचारपूस केली.

सुदर्शन घुलेनी त्या मित्राला भेटण्यासाठी बोलवले आणि तोच मित्र पोलिसांचा गोपनीय साक्षीदार बनला. त्या व्यक्तीने दिलेला जबाब चार्जशीटमध्ये नोंदवण्यात आला आहे.

8 डिसेंबर - हॉटेल तिरंगा, नांदूर फाटा, केज

गोपनीय साक्षीदाराने सांगितले की, तो गंगा-माऊली साखर कारखाना रोड टाकळी येथे सुदर्शन घुलेला भेटला. त्यावेळी सुदर्शन घुले त्याला म्हणाला की, विष्णू चाटे यांचा फोन आला होता. त्यांनी आपल्याला नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावले आहे.

गोपनीय साक्षीदार आणि सुदर्शन घुले आणखी एका व्यक्तीसोबत 'तिरंगा हॉटेल'मध्ये पोहचले. त्या ठिकाणी विष्णू चाटे आधीच येऊन बसला होता.

विष्णू चाटे हा सुदर्शन घुलेला म्हटला, "आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे, स्वतःची इज्जत घालवलीस आणि आमची पण घालवलीस. तुला प्लँट बंद करायला पाठवले होते. तो तुम्ही बंद केला नाही. उलट हात हालवत परत आला."

त्यावर मस्साजोगमध्ये काय घडले हे सुदर्शन घुलेनी सांगितले. त्यावर विष्णू चाटे म्हणाला, "वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की कामही बंद केले नाही. खंडणी दिली नाही. संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर काय परिणाम होतात."

त्यावर सुदर्शन घुले म्हणाला, "आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा करणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो."

9 डिसेंबर 2024 - वेळ दुपारी 3.00 वा; स्थळ - नांदूर फाटा, दांगट पेट्रोल पंपासमोर, केज

संतोष देशमुखांचे अपहरण कसे झाले याविषयी त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यावेळी काय घडलं हे सांगितलं आहे.

शिवराज देशमुख हे पिसेगावहून आले होते. त्यांना दांगट पेट्रोल पंपासमोर संतोष देशमुख आपल्या टाटा इंडिगो कारमध्ये बसलेले दिसले.

ग्राफिक्स

शिवराज हे संतोष यांच्याकडे गेले. तेव्हा संतोष यांनी विचारले की, तुला मस्साजोगला यायचं आहे का? शिवराज हो म्हणाले. तर संतोष यांनी शिवराज यांना गाडी चालवण्याची विनंती केली. शिवराज हे ड्रायव्हिंग सीटवर होते आणि संतोष त्यांच्या बाजूला बसले.

9 डिसेंबर 2024 - वेळ दुपारी 3.30 वा. मांजरसुंबा ते केज रोड, टोल नाका, डोणगाव फाटा

शिवराज देशमुख यांनी दिलेल्या जबाबानुसार, केजहून मस्साजोगकडे जाताना डोणगाव फाट्याजवळ असलेल्या टोलनाक्याच्या आधी संतोष देशमुख यांच्या कारसमोर एक काळी स्कॉर्पिओ आडवी आली. यातून सहा जण खाली उतरले आणि त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूची काच दगडाने फोडली आणि कोण कुठे बसले आहे याचा अंदाज घेतला.

संतोष देशमुख ज्या बाजूने बसले होते त्या बाजूला ते गेले. कारचा दरवाजा उघडला. संतोष देशमुख यांना लाकडी काठीने मारहाण करत स्कॉर्पिओमध्ये बसवले आणि केजच्या दिशेनी ती कार निघून गेली. त्या कारच्या पाठोपाठ एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार आली.

संतोष देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम (ग्राफिक्स)

फोटो स्रोत, BBC/Kailas Pimpalkar

शिवराज यांना सुदर्शन घुलेची ओळख पटली होती आणि स्विफ्टमधील लोक हे त्यांचे साथीदार होते याचाही अंदाज आला होता. जुन्या भांडणाचा राग मनात धरून सुदर्शनने अपहरण केल्याचं शिवराज यांनी जबाबात सांगितलं.

मारहाण आणि हत्या

सुदर्शन घुले, जयराम चाटे, श्रीकृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार या सहा आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात नेले. या ठिकाणापासून एका बाजूला सुदर्शन घुलेचे शेत आहे. त्याच ठिकाणी अत्यंत क्रूरपणे आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केली.

चार्जशीटमध्ये 'वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट' आहे. त्यात कोणत्या हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली याची माहिती आहे. ही हत्यारे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असून पोलिसांनी त्यांचे परीक्षण करुन सुरक्षितरीत्या ठेवली आहेत.

या अहवालानुसार, एक 41 इंचाचा गॅसचा पाइप आहे. ज्याच्या एका बाजूला गोलाकार करण्यात आले आणि काळ्या करदोड्याने बांधून मूठ म्हणून वापरली.

दुसरे हत्यार एक मेटल व्हिप आहे. ज्याच्या एका बाजूला अर्धा इंचाची मूठ आहे. त्यात पाच क्लच वायर लोंबकळलेल्या असे हत्यार तयार करण्यात आले.

संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
फोटो कॅप्शन, संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. (डावीकडे सुदर्शन घुले, संतोष देशमुख, उजवीकडे सुधीर सांगळे)

एक लोखंडी रॉड आणि एक बांबूची काठी ही हत्यारे पोलिसांना सापडली. आणखी एक हत्यार वापरण्यात आले होते ते पोलिसांना तपासात सापडले. ते म्हणजे पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप.

या पाईपने सरपंचांना इतकी मारहाण करण्यात आली होती की या पाईपचे एकूण 15 तुकडे झाले आणि ते शेतात विखरले गेले होते.

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. 15 व्हीडिओ आणि 8 फोटो आरोपीकडे मिळाल्याची नोंद आहे.

या व्हीडिओत ते आरोपी प्रत्यक्ष मारताना आणि आनंद साजरा करताना दिसत आहेत. हे फोटो जेव्हा पहिल्यांदा माध्यमांमध्ये आले आणि सोशल मीडियावर आले तेव्हा राज्यात संतापाची लाट उसळली.

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीडमधील केज येथे तणावपूर्ण शांतता होती.
फोटो कॅप्शन, संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर बीडमधील केज येथे तणावपूर्ण शांतता होती.

संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम अहवालात (पीएम रिपोर्ट) त्यांना झालेल्या मारहाणीचे तपशील आहेत. रक्ताचे ओघळ डोक्यावरुन वाहत पायापर्यंत येऊन वाळून गेल्याचे एकेठिकाणी सांगितले आहे. चेहऱ्यापासून ते पायापर्यंत सर्व ठिकाणी त्यांना बोथट हत्यारांनी वारंवार मारण्यात आले होते.

देशमुख यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे ही धोकादायक नव्हती, परंतु जर खूप ताकदीने वापर केला, तर ती हत्यारे धोकादायक ठरू शकतात असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकळल्याच्या खुणा आहेत. पाठीवर तर एकही जागा शिल्लक नाहीये जिथे रक्त साकाळले नाही. संपूर्ण पाठीवर रक्त साकळले आहे अशी नोंद पीएम रिपोर्टमध्ये आहे.

या रिपोर्टमध्ये एकूण 56 नोंदी आहेत. एकाच प्रकारची जखम असेल, तर त्या जखमेची नोंद एकच अशा या 56 नोंदी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नेमके किती वार झाले किंवा त्यांना किती ठोसे लगवण्यात आले याची गिनती या ठिकाणी नाहीये.

9 डिसेंबर - वेळ संध्याकाळी 7 च्या सुमारास, दैठणा शिवार, ता. केज

दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसहापर्यंत देशमुख यांना मारहाण झाल्याचे चार्जशीटमधून समजते. त्यांचे प्राण गेल्यावर किंवा प्राण गेले आहेत असे समजून आरोपींनी त्यांना दैठणा शिवारात रस्त्याच्या कडेला टाकले.

संतोष देशमुख यांच्या शोधात पोलिसांनी पथके पाठवली होती. संतोष देशमुख जेव्हा पोलिसांना सापडले तेव्हा ते रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावर दैठणा शिवारात उताण्या अवस्थेत निपचित पडलेले होते असे म्हटले आहे.

सरपंचांचे शरीर हे थंड होते आणि थोड्या अंतरावर त्यांच्या पांढऱ्या बनियनची बाही पूर्णपणे फाटून त्याचा सपाट कपडा झाला होता.

तेथून जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा सरपंच संतोष देशमुख हे 'ब्रॉट डेड' आणले गेले, अशी नोंद आहे.

मस्सोजोग येथे लागलेले बॅनर

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, मस्सोजोग येथे लागलेले बॅनर

या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. नंतर अटकसत्र सुरू झाले. एक-एक करुन सात आरोपींना या प्रकरणात अटक झाली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

या प्रकरणात तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)