लीलावती रुग्णालयात 'आर्थिक गैरव्यवहार' आणि 'काळी जादू' केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

फोटो स्रोत, Getty Images/UGC
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मुंबईसह देशातील एक प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लीलावती रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहार आणि 'काळी जादू' झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप खुद्द रुग्णालयाच्या विश्वस्तांकडून माजी विश्वस्त आणि इतरांविरोधात करण्यात आला आहे.
या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) अधिकृत तक्रार करण्यात आल्याचंही विश्वस्तांकडून सांगण्यात आलं आहे.
लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ज्या रुममध्ये तुम्ही बसता, प्रशांतभाई बसतात, चारू मेहता बसतात त्या खोलीत फ्लोअरखाली काही गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. आम्ही खबरदारी घेत, साक्षीदारांसमोर व्हिडिओग्राफी करत ते फ्लोअर खोदलं. त्यातून 8 कलश सापडले त्यात मानवी केस, हाडं, तांदूळ या प्रकरची काळ्या जादूसाठी वापरली जाणारी सामग्री सापडली."
काय आहे प्रकरण?
मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाच्या देखरेख करणाऱ्या लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टकडून (LKMM) माजी विश्वस्तांविरोधात अनेक आरोप करण्यात आले आहेत.
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्ट (LKMM) यांनी त्यांच्या माजी विश्वस्त आणि इतरांविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ED) कडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
यामुळे ट्रस्टच्या कामकाजावर आणि रुग्णालयाच्या दररोज हजारो रुग्णांना सेवा देण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होत असल्याचंही ट्रस्टच्या आताच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे.
माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टवर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर, सध्याच्या विश्वस्तांनी मागील प्रशासनाच्या काळात ट्रस्टच्या कामकाजात लक्षणीय अनियमितता लक्षात आल्याचं सांगत याचं फॉरेन्सिक ऑडिट करत यात लेखापरीक्षकांनी लीलावती मेडिकल (LKMM) ट्रस्टच्या माजी विश्वस्तांकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता, आर्थिक हेराफेरी आणि निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे ऑफशोअर खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी यासारख्या गंभीर गैरव्यवहार उघडकीस आल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणी आतापर्यंत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.
यात 'फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान उघड झालेल्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल, फसवणूक, बनावटगिरी आणि गैरव्यवहाराशी संबंधित ज्याची रक्कम 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या रकमेचा गैरवापर तृतीय-पक्ष वितरकांसोबत बेकायदेशीर व्यवहारांद्वारे करण्यात आला, ज्यामध्ये रुग्णालयासाठी फसव्या खरेदी करारांचा समावेश होता, ज्याचे मूल्य 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते," असंही सांगण्यात आलं आहे.
इतर अनेक आरोप करण्यात आले असून ही प्रकरणं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) पूर्वसूचक गुन्हे म्हणून पात्र ठरत असल्याने, LKMMने अंमलबजावणी संचालनालयाला औपचारिकपणे या आर्थिक गुन्ह्यांची त्वरित दखल घेण्याचे आणि कायद्याच्या तरतुदींनुसार चौकशी सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
लीलावती रुग्णालय ट्रस्टचे स्थायी निवासी प्रशांत मेहता यांनी माध्यमांना दिलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितलं, "आम्ही लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टची अखंडता जपण्यासाठी आणि आरोग्यसेवेसाठी दिलेला प्रत्येक रुपया दररोज आमच्यावर अवलंबून असलेल्या हजारो रुग्णांच्या कल्याणासाठी वापरला जाईल याची खात्री करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत.
"फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालेले घोर गैरव्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार हे केवळ माजी विश्वस्तांवर असलेल्या विश्वासाचा विश्वासघात नाही तर आमच्या रुग्णालयाच्या मुख्य ध्येयाला थेट धोका आहे. या बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि पीएमएलएच्या तरतुदींनुसार अंमलबजावणी संचालनालयाला जलद आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन करतो. वैयक्तिक फायद्यासाठी हजारो लोकांच्या आरोग्यसेवेशी कधीही तडजोड केली जाऊ नये," असं मेहता यांनी सांगितले.
'काळी जादू' केल्याचा आरोप
लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ज्या रुममध्ये तुम्ही बसता, प्रशांतभाई बसतात, चारू मेहता बसतात त्या खोलीत फ्लोअरखाली काही गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. आम्ही खबरदारी घेत, साक्षीदारांसमोर व्हिडिओग्राफी करत ते फ्लोअर खोदलं.
"त्यातून 8 कलश सापडले त्यात मानवी केस, हाडं, तांदूळ या प्रकरची काळ्या जादूसाठी वापरली जाणारी सामग्री सापडली. यानंतर आम्ही वांद्रे पोलीस स्टेशनला संपर्क साधला. काळ्या जादू विरोधातील गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सांगितलं. गुन्हा दाखल नाही झाला यानंतर आम्ही कोर्टात गेलो. कोर्टानेच यात चौकशी सुरू केली आहे. कोर्टाने याची गंभीरतेने दखल घेतली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
तसंच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "लीलावती रुग्णालयाची स्थापना 1997 साली झाली. किशोर मेहता आणि त्यांच्या पत्नी चारू मेहता यांनी रुग्णालयाची स्थापना केली. 2002 नंतर किशोर मेहता आजारी असताना त्यांच्या काही नातेवाईकांनी बेकायदेशीररीत्या रुग्णालयाचा ताबा घेतला. नंतर जवळपास 20 वर्षं रुग्णालय त्यांच्याच ताब्यात होते. या काळात रुग्णालयात अनियमितता, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला जो फाॅरेंसीक आॅडिटमध्ये समोर आला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लीलावती रुग्णालय हे मुंबईसह देशातील एक प्रतिष्ठित रुग्णालय मानले जाते. अनेक मोठे राजकीय नेते, बाॅलीवूड सेलिब्रिटीज आणि इतर व्हीआयपी लोक उपचारासाठी दाखल होत असल्याने अनेकदा रुग्णालय चर्चेत किंवा बातम्यांमध्ये असते.
लिलावती रुग्णालयाच्या वेबसाईटनुसार, रुग्णालयाची स्थापना 1997 साली केवळ 10 बेड्स आणि सुरुवातीला 22 डाॅक्टरपासून झाली. एवढ्या वर्षांमध्ये रुग्णालयाची वाढ ही 323 बेड्स, एक मोठे इंटेंसिव्ह युनीट केअर (ICU), आधुनीक सुविधांसह 12 ऑपरेशन थिएटर्स, 300 पेक्षा अधिक वैद्यकीय सल्लागार, 1800 मनुष्यबळ इतकी झालेली आहे.
लीलावती रुग्णालयात दररोज जवळपास 300 आतले रुग्ण आणि 1500 बाहेरच्या रुग्णांवर उपचार केले जातात.


रुग्णालयाने आरोप फेटाळले
माध्यमातून दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हे आरोप निराधार आणि कपटपूर्ण असल्याचं या स्टेटमेंटमध्ये म्हटलं गेलं आहे. तसंच हे सर्व आरोप ठामपणे नाकारले जातात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 'त्यांचा हेतू माझ्या अशिलाची बदनामी करणे आणि त्यांना आरोपित ट्रस्टी आणि त्यांच्या अवैध नेमणुकीविरोधातील कार्यवाही सोडून देण्यासाठी दबाव आणणे आहे, ज्यावर सध्या निर्णय घेणे बाकी आहे,' असंही यात म्हटलं आहे.

'संबंधित प्राधिकरण (चॅरिटी कमिशनर) यांनी सप्टेंबर 2024 च्या आदेशाद्वारे माझ्या अशिलाच्या स्थायी ट्रस्टी म्हणूनच्या स्थितीला मान्यता दिली आहे. तेव्हापासून ते याला आव्हान देत आले आहेत.'

'माझे अशिल 2007 पासून प्रतिष्ठित लिलावती हॉस्पिटलचे ट्रस्टी आहेत. त्यांच्या जवळपास दोन दशकांच्या कार्यकाळात, त्यांनी आपल्या अथक मेहनतीने समर्पित होऊन काम केले आहे. लिलावती आज तज्ज्ञांच्या टीमसह एक जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा पुरवणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते.'

या निवेदनात म्हटल्यानुसार, 'माझ्या अशिलाच्या कार्यकाळात, हॉस्पिटलचा टर्नओव्हर 200 कोटी रुपयांपासून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. 250 कोटी रुपयांची एकूण चॅरिटी केली गेली आहे, ज्यात शिबिरे आयोजित करणे, महिलांसाठी आणि मुलींना मोफत तपासणी, गरजूंसाठी हजारो मोफत शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. ठेवी 10 कोटी रुपयांपासून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. जागतिक दर्जाचे उपकरण 250 कोटी रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्यात आले आहेत.
तसंच काळी जादू केल्याच्या आरोपांना कुठलाही प्रतिसाद देण्याचंही मेरीट नसून ते केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहेत असंही, या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












