जादूटोणा विरोधी कायदा काय आहे? वाचा, नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्यभर ज्यासाठी प्रयत्न केले त्या कायद्याबद्दल

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि विवेकवादी विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी आज कोर्टाचा निकाल लागला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जो कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हयातभर प्रयत्न केले, तो त्यांच्या हत्येनंतर अस्तित्वात आला.
ज्याला जादूटोणा विरोधी कायदा म्हटलं जातं, तो नेमका काय आहे? कोणकोणत्या गोष्टी यामध्ये येतात?
या कायद्याचं पूर्ण नाव आहे - महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013.
इंग्लिशमध्ये याचं नाव आहे - Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifice and Other Inhuman, Evil and Aghori Practices and Black Magic Act, 2013
26 ऑगस्ट 2013 रोजी हा कायदा अंमलात आला. हा फौजदारी कायदा आहे.
कायदा आणण्यासाठीचा संघर्ष
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा 1989 मध्ये अशा प्रकारचा कायदा तयार करण्यासाठीची मागणी केली.
अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला आणि महाराष्ट्रातल्या अनेक सरकारांकडे यासाठी पाठपुरावा केला.
तब्बल 14 वर्षं हे विधेयक अडकलं. अंधश्रद्धा विरोधी कायदा असं मूळ नाव बदलून दरम्यानच्या काळात जादूटोणाविरोधी कायदा असं करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
2013 सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे विधेयक मांडलं जावं असा डॉ. दाभोलकर आणि अंनिसचा प्रयत्न होता. पण अधिवेशन संपेपर्यंत हे विधेयक मांडलं गेलं नाही.
20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली.

फोटो स्रोत, Facebook
आणि 24 ऑगस्ट 2013 ला महाराष्ट्र सरकारने याविषयीचा अध्यादेश काढला. 2013 डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आलं. विधानसभा आणि विधानपरिषदेत विधेयक संमत झालं आणि वटहुकुमाचं कायद्यात रूपांतर झालं.
अशाप्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. पण मूळ मसुद्यातल्या अनेक गोष्टी वगळण्यात आल्याने कायद्याची तीव्रता कमी करण्यात आल्याची टीकाही करण्यात आली.
या कायद्याला राजकीय पक्ष, उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी विरोध केला होता.
या कायद्यानुसार कोणत्या गोष्टी गुन्हा ठरू शकतात?
- भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने वा साखळीने बांधून मारहाण करणे, काठीने वा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, दोराने वा केसाने बांधणे वा केस उपटणे, शरीरावर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहोचवणे, उघड्यावर लैंगिक कृत्य करण्यास जबरदस्ती करणे, त्या व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, त्या व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र वा विष्ठा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती.
- एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार - प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसवणे.
- अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने आणि जीवाला धोका निर्माण होईल, शरीराला जीवघेण्या जखमा होतील अशा अमानुष, अघोरी, अनिष्ट प्रथांचा अवलंब करणे आणि अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे वा सक्ती करणे.
- मौल्यवान वस्तू, गुप्तधन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष. अनिष्ट, अघोरी कृत्य - जादूटोणा करणे. जारणमारण वा अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा अशी अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे आणि त्या करता प्रवृत्त करणे वा प्रोत्साहन देणे.
- आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचं भासवून किंवा एखाद्या व्यक्तीत अशी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा तिचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होईल असं सांगणे, धमकी देणे, फसवणे, ठकवणे.
- एखादी व्यक्ती करणी, जादूटोणा करते, भूत लावते वा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते असा समज निर्माण करणे, किंवा एखादी व्यक्ती अपशकुनी आहे, रोगराईला कारणीभूत आहे असं भासवून तिला त्रास देणे. एखादी व्यक्ती सैतान वा सैतानाचा अवतार असल्याचं जाहीर करणे
- जारणमारण, करणी वा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, तिची नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं.
- मंत्राच्या मदतीने भूत-पिशाच्च्यांना आवाहन करणे वा करण्याची धमकी देऊन एखाद्याच्या मनात भीती निर्माण करणे. एखाद्या व्यक्तीला झालेली शारीरिक इजा ही भूताचा वा अतिंद्रिय शक्तींचा कोप असल्याचा समज करून देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे. त्याऐवजी अमानुष, अनिष्ट, अघोरी कृत्य वा उपाय करायला प्रवृत्त करणे
- कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.
- बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्रीच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.
- स्वतःत अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे, किंवा कुणाचा अवतार असल्याचं वा स्वतःचा आत्मा पवित्र असल्याचं भासवणे. याच्या नादी लागलेल्या व्यक्तीला पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती, प्रेयसी, प्रियकर असल्याचं सांगून लैंगिक संबंध ठेवणे.
- मूल न होणाऱ्या स्रीला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचं भासवून त्याद्वारे इतरांची लुबाडणूक करणे.

फोटो स्रोत, YOGESH_MORE
कायद्यातून कोणत्या गोष्टी वगळण्यात आल्या?
- कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा, या प्रकारचे उपासना मार्ग. वारकरी संप्रदायाच्या वाऱ्या.
- हरिपाठ, कीतर्न, भजन - प्रवचन व इतर धार्मिक वा पारंपरिक शास्त्रांचे, विद्या - कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार, प्रसार.
- दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रचार - प्रसार व साहित्य वितरण करणे. शारीरिक व आर्थिक नुकसान न करणाऱ्या प्रकारचे धर्मगुरुंचे चमत्कार सांगणे, त्याचा प्रचार - प्रसार आणि साहित्य वितरण करणे.
- घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांकडून शारीरिक वा आर्थिक नुकसान न करणारे प्रार्थना, उपासना आणि धार्मिक विधी
- सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक आणि त्यासंबंधीची इतर धार्मिक कृत्ये. अंगात येणे, कडकलक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरम मिरवणूक आदि सर्व धार्मिक विधी.
- धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान व नाक टोचणे. जैन धर्मियांद्वारा करण्यात येणारे केश लोचन यासारखे धार्मिक विधी
- वास्तुशास्त्र, ज्योतिषी आणि जोशी, नंदीबैलवाले व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला आणि जमिनीखालील पाणी सांगण्याबद्दलचा सल्ला.
- राज्यशासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित केलेल्या कोणत्याही धार्मिक पारंपरिक कृती
जादूटोणा कायद्याखाली गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा काय आहे?
या कायद्याखालील गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला किमान 6 महिने ते जास्तीत जास्त 7 वर्षांचा कारावास आणि किमान 5 ते जास्तीत जास्त 50 हजारांचा दंड होऊ शकतो.

फोटो स्रोत, CNR / Nitin Nagarkar
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकर या कायद्याच्या अंमलबजावणीविषयी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "जादूटोणा विरोधी कायद्याची लढाई जवळजवळ 20 वर्षांची होती. त्यामुळे ज्या अपेक्षित गोष्टी होत्या, त्या सगळ्या तरतुदी त्यात येऊ शकल्या नाहीत. पण लोकशाहीमध्ये संवदेनशील विषयांवरचे कायदे करताना या गोष्टी घडतात याची आम्हाला जाणीव आहे. पण अत्यंत महत्त्वाची बाब, की दैवी शक्तीचा दावा करणं आणि त्या माध्यमातून लोकांना फसवणं, ठगवणं हा गुन्हा ठरला.
"12 कलमं अंधश्रद्धा म्हणून सांगण्यात आली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात गेल्या 10- 12 वर्षांत नक्की दिसून आलेला आहे. जवळजवळ हजार - बाराशे बाबा-बुवांना अटक झालेली आहे. यातला एकेक बाबा काही हजार, काही वेळेला लाख लोकांचं देखील शोषण करत असतो. आणि जर असं शोषण होत असेल, तर लोकांना त्याविरोधात एक हत्यार मिळालेलं आहे.
"परंतु त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जसं समाजप्रबोधनाच्या बाकीच्या कायद्यांच्या बाबतीत आहे, तीच केस जादूटोणा विरोधी कायद्याच्याबाबतीतही आहे. अजूनही कितीतरी चांगल्या गोष्टी त्यात करता येऊ शकतात.
"दक्षता अधिकाऱ्यांची तरतूद आहे ज्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई करता येऊ शकते. पोलिसांचं प्रशिक्षण करता येऊ शकतं. जर या सगळ्या गोष्टी येत्या कालखंडात घडल्या, तर अधिक प्रभावी पद्धतीने त्याचा समाजामध्ये परिणाम झालेला दिसेल."
दक्षता अधिकारी काय आहे?
या कायद्यानुसार राज्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये 'दक्षता अधिकारी' म्हणून पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हा अधिकारी त्याच्या अधिकार क्षेत्रात या कायद्याच्या अधिनियमांचा - नियमांचा भंग होतोय का यावर लक्ष ठेवतो.
नियम भंग झाल्यास त्याचा तपास करणं, जवळच्या पोलीस ठाण्यात त्याविषयीची तक्रार दाखल करणं किंवा एखाद्या कृत्याला बळी पडलेल्या व्यक्तीने वा तिच्या कुटुंबाने तक्रार दाखल केलेली असेल तर त्यावर योग्य आणि वेगवान कारवाई होईल याची खातरजमा करणं ही या अधिकाऱ्याची कामं असतात.
या गुन्ह्याबाबतचा खटला चालवण्यासाठी पुरावे गोळा करण्याचं कामही दक्षता अधिकारी करत असतो.











