नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळस्कर दोषी; तीन आरोपींची निर्दोष सुटका

फोटो स्रोत, bbc
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
विरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवलं आहे.
अंदुरे आणि कळस्कर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावला आहे.
या निकालानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो. प्रत्यक्ष मारेकऱ्यांना शिक्षा झालीय. जे सुटले त्यांच्याविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढाई घेऊन जाऊ. या कटामागे जे सूत्रधार होते, मूळातला जो सूत्रधार आहे त्याला अटक झालेली नाही. या बाबींविरोधात आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात जाऊ."

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं की, “11 वर्षांनंतर विवेकाच्या मार्गानं जाऊन न्याय मिळतो, ही भावना आमच्या मनात निर्माण झालेली आहे. ज्यांना सोडलं, त्यांना कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलं ते अजून कळालेलं नाहीये. कारण निकालाची प्रत हातात आलेली नाहीये. पण जे संबंधित होते, त्यांना 8 वर्षं तुरुंगात राहावं लागलं आहे. ती शिक्षा त्यांना मिळालेली आहे."

मुक्ता यांनी पुढे म्हटलं की, “यामागचा मास्टरमाईंड अजून सापडलेला नाही, असं आमचं म्हणणं आहे. हा व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे असं सीबीआयनं म्हटलं आहे. तो कोण ते सीबीआयनं शोधणं गरजेचं आहे.”
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं.
या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू होती. 2021 मध्ये या पाचही जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर हत्या, हत्येचा कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत गुन्हे निश्चित करण्यात आले होते.

आरोपींचे वकील काय म्हणाले?
आरोपींचे वकील साळशिंगीकर म्हणाले की, "शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांना दोषी व्यक्त करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच 5 लाखांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा वाढेल असं न्यायालयानं म्हटलं आहे. इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. विक्रम भावे, संजीव पुनाळेकर, डॉ. वीरेंद्र तावडे यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
"या केसमध्ये पुणे पोलिस, क्राईम ब्रँच आणि सीबीआय यांची वेगवेगळी थिअरी राहिली आहे. आज जरी दोघांना शिक्षा दिली असली, तिचा आदर करतो. निकालाची प्रत हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास करणार आणि नक्कीच उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार."
सनातन संस्थेची प्रतिक्रिया काय?
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी प्रतिक्रिया दिलीय की, “डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भात सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. देशभरात सनातन संस्थेला बदनाम करण्याचं षड्यंत्र आखलं गेलंय. त्या अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय, असं आम्ही मानतो. कारण ज्या दिवशी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी हिंदुत्त्ववाद्यांचा हात आहे, असं म्हटलं होतं. या प्रकरणाची दिशा भरकटवण्यात आली होती.”

फोटो स्रोत, CHETAN RAJHANS
राजहंस पुढे म्हणाले, “याप्रकरणी सनातन संस्थेच्या विक्रम भावेंना 2 वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला. तर वीरेंद्र तावडे यांना 8 वर्षं कारावासात राहावं लागलं. तसेच हिंदुत्ववाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांनाही 42 दिवस कारावासात ठेवण्यात आलं. हिंदुत्ववाद्यांना गोवण्यासाठी हे षड्यंत्र आखण्यात आलं होतं. आज न्यायालयाच्या निकालामुळे हे षड्यंत्र फसलं आहे. याप्रकरणी दोन हिंदुत्ववादी शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांना न्यायालयानं दोषी ठरवलं असलं तरी आमची खात्री आहे की त्यांनासुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलं आहे आणि त्यांचे नातेवाईक याप्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागतील.”
दबा धरून बसलेल्या आरोपींनी केला गोळीबार
डॉ. दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते.
यावेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला.
यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली.
‘’आम्ही सारे दाभोलकर’’ म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
यामुळे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पुणे पोलिसांनी केली होती पहिली अटक, पण...
पुणे पोलिसांनी या प्रकरणात जानेवारी 2014 मध्ये पहिली अटक केली. ती कथित बंदूक विक्रेता मनिष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना. पण, याधीच्या प्रकरणात या दोघांचीही अटक वादग्रस्त ठरलेली होती.
ठाणे पोलिसांनी 20 ऑगस्ट 2013 ला सायंकाळी चार वाजता खंडणीच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. दाभोलकरांच्या हत्येनंतर काही तासांतच ही अटक झाली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं.
यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा एटीएसने केला होता. यापैकी एक बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं. एटीएसकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती.
पण, सुरुवातीला 2012 च्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण, या प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो 21 जानेवारी 2014 ला.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
कारण, यावेळी या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते. एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा आरोपींनी कोर्टात केला होता.
पण, त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पुणे पोलिसांनी या दोघांविरोधात आरोपपत्रपही दाखल केलं नव्हतं.
या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली.
पण, पुणे पोलिसांकडून तपास सीबीआयकडे कसा गेला?
पुणे पोलिसांचा तपास भरकटताना पाहून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी झाली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून 2014 मध्ये दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणात सीबीआयनं पहिली अटक केली.
10 जून 2016 रोजी सनातन संस्थेशी संबंधित कान, नाक घसा (ENT Surgeon) तज्ज्ञ डॉ. विरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती.
याआधी याच तावडेला पानसरे हत्या प्रकरणात 2015 ला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील एक सत्रूधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं.
सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा सीबीआयनं केला होता.
तावडेविरोधात 6 सप्टेंबर 2016 ला हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयनं दावा केला होता.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
कोल्हापुरातील हिंदूत्ववादी कार्यकर्ते आणि धातूच्या वस्तू बनवणारे कारागीर संजय साडविलकरच्या साक्षीनुसार तावडेला अटक केली होती. तावडे आणि अकोलकर दोघेही 2013 मध्ये साडविलकरला भेटले होते.
तावडेला साडविलकरच्या मदतीनं शस्त्र तयार करायची होती. त्यासाठी अकोलकरनं देशी बनावटीचे पिस्टल आणि रिव्हॉल्वर आणले होते.
तावडेनं अकोलकर आणि पवार दोघांनाही दाभोलकरांची हत्या करायला सांगितलं होतं, असा दावा सीबीआयनं त्यांच्या आरोपपत्रात केला होता.
हत्या होऊन दोन वर्ष झाली तरी तपास संथ गतीनं सुरू होता. त्यामुळे दाभोलकर कुटुंबीय कोर्टात पोहोचले.
हायकोर्टाच्या निगराणीखाली तपास सुरू झाला
पुणे पोलिसांच्या तपासावर टीका झाल्यानंतर 2015 मध्ये डॉ. हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. तब्बल आठ वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास चालला.
हायकोर्टानं एप्रिल 2023 ला ही याचिका निकाली काढली होती. कारण, सीबीआयनं पाचही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
दरम्यानच्या काळात हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास सुरू असताना सीबीआयने तब्बल पाच वर्षांनंतर दोन आरोपींना अटक केली होती.
पण, या आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं तेव्हा सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
सीबीआयनं पहिले आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं. पण, सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं.
कारण, सीबीआयनं आधी केलेल्या दाव्याच्या अगदी उलट जात ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक करत या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं. पण, शरद कळसकर आणि सचिन अंदुरेचा सुगावा कसा लागला? तर गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या परशूराम वाघमारेकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसनं 2018 ला नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती.
यात शस्त्रसाठ्यासोबतच वैभव राऊत आणि शरद कळसकरला अटक केली होती. त्याची चौकशी करताना शरद कळसकर हा दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं.
त्यानं दाभोलकरांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं, असं सीबीआयचं म्हणणं होतं. त्याने माहिती दिल्यानुसार सचिन अंदुरेला औरंगाबादेतून अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही तिसरी अटक होती. अटक केल्यानंतर तीन महिन्यांमध्ये आरोपपत्र दाखल करणं गरजेचं असतं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
पण, या प्रकरणात अनेक धागेदोरे तपासायचे आहे असं सांगत सीबीआयनं कोर्टाकडे वेळ मागवून घेतली होती. अखेर 13 फेब्रुवारी 2019 मध्ये या दोन्ही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
या दोघांनीही दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं होतं. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने सचिन अंदुरेला दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तुल आणि दुचाकी पुरविली होती, असा दावा सीबीआयनं पुणे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता.
मग आरोपींनी वापरलेली शस्त्र कुठे आहेत? याचा तपास करताना सीबीआयनं आणखी दोघांना अटक केली आणि त्या बंदुकीचा शोध सुरू झाला.
सीबीआयने 26 मे 2019 मध्ये मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना अटक केली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात शरद कळसकरने गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला. त्यानुसार कळसकरनं चार पिस्तुल ठाण्याच्या खाडीत फेकून दिल्या, तर विक्रम भावेनं शूटर्ससाठी परिसराची रेकी केली, असे आरोप सीबीआयने केले होते.
सीबीआय कोठडीतील चौकशीनंतर 5 जुलै 2019 ला संजीव पुनाळेकर यांची जामिनावर सुटका झाली होती. ठाण्याच्या खाडीत फेकलेल्या पिस्तुलासाठी विदेशी एजन्सीच्या मदतीनं सीबीआयनं शोधमोहिम राबवली होती. यासाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च आला होता.
अखेर 5 मार्च 2020 ला हे पिस्तुल सापडल्याचा दावा सीबीआयनं केला होता. पण, हेच पिस्तुल हत्येसाठी वापरले की नाही यासाठी फॉरेन्सिक आणि बॅलेस्टीक तज्ज्ञांकडून तपासणीसाठी पाठवलं होतं. त्याचा अहवाल अद्यापही सीबीआयनं अधिकृतपणे समोर आणला नाही.
पण, जुलै 2021 ला हिंदुस्तान टाईम्सने बॅलेस्टीक तज्ज्ञांच्या हवाल्यानुसार हे पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नाही, असा अहवाल दिल्याचं म्हटलं आहे.
आरोपींना अटक झाली, आरोपपत्र दाखल झाले, शस्त्रांचा शोध सुरू झाला. पण, आरोपींवर दोषारोप निश्चित व्हायला तब्बल नऊ वर्ष लागले.
हत्येच्या नऊ वर्षांनंतर 5 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित
तब्बल नऊ वर्षानंतर 15 सप्टेंबर 2021 ला दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष कोर्टानं पाचही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते.
तसेच संजीव पुनाळेकरांविरोधात IPC कलम 201 (पुरावे नष्ट करणे किंवा खोट्या सूचना देणे) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला होता. पण, या पाचही आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास कोर्टात नकार दिला होता.
पाचही आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 2021 पासून खटल्याची सुरुवात झाली होती. यात तब्बल 20 साक्षीदार तपासण्यात आले.











