भालचंद्र नेमाडे म्हणतात, 'धार्मिक उन्मादाचा मुकाबला करण्याचं सामर्थ्य वारकरी चळवळीत'

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe
- Author, भालचंद्र नेमाडे
- Role, ज्येष्ठ साहित्यिक
महाराष्ट्रातील वारकरी चळवळ ही एक समाजात अगदी खालपर्यंत पसरलेली आणि शतकानुशतकं मुळं धरून बसलेली चळवळ आहे. या चळवळीबद्दल, त्या मागच्या तत्त्वज्ञानाबद्दल सगळीकडे मोठं कुतूहल आहे.
सर्वसामान्य, अशिक्षित लोकांनी चळवळ इतकी वर्षं केवळ टिकवूनच धरली नाही तर ती जोमानं वाढवत कशी नेली? प्रतिकूल परिस्थितीत, वेगवेगळ्या राजवटीत या पंथानं आपलं अस्तित्व कसं राखलं? सर्वसमावेशक होत असतानाच आपलं मूळ स्वत्व या पंथानं कसं राखलं? याबाबत मोठं कुतूहल आहे.
वारकरी पंथ अशा गरीब लोकांकडून टिकवला गेलेला पंथ आहे ज्यांच्याकडे कसलीही संसाधनं नाहीत.
तुकारामासारख्या माणसाला हे अशिक्षित लोकंच किती तरी जवळ घेतात आणि अभंग म्हणत म्हणत जातात त्याच्या गावापर्यंत जातात. तेथून त्याच्या पादुका घेऊन पंढरपूरला कैक वर्षं जात आहेत. दरवर्षी आषाढी-कार्तिकीमध्ये त्यांच्या भक्तीचा जो आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो अनोखा असतो.
वारीचं सर्वसमावेशक रूप
वारकरी पंथाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं सर्वसमावेशक स्वरूप. आपल्याकडे हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हे लिंगायत आहे, असे कप्पे पाडण्याचा प्रकार आहेत. मात्र या वारकरी चळवळीत आपल्याला सर्व धर्माची आणि सर्व पंथांची तत्व पाहायला मिळतील.
जैन लोकांचे शाकाहारी तत्त्व या पंथात आहे. विठ्ठल बुद्धाचा अवतार आहे असंही म्हटलं गेलंय. विठ्ठल शंकराचाच अवतार असल्याचंही मानलं जातं.
वारकरी पंथ हा शैव आणि वैष्णव यांच्यातील मधला मार्ग काढला गेलाय असाही एक विचार आहे. वारकरी पंथाचे संस्थापक मानले जाणारे निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ते नाथपंथीयांचे शिष्य होते.
नामदेवाबद्दल तर आपल्याला माहीतच आहे की त्यानं हे भक्ती तत्वज्ञान दक्षिणेतून उत्तरेत नेलं आणि शीख धर्मग्रंथांमध्ये त्याला महत्त्वाचं स्थान आहे.

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe
याचाच अर्थ हे सगळ्यांना सांभाळणारे असे सर्वसमावेशक लोक आहेत. आपण ज्याला Eclectic म्हणतो म्हणजे चांगलं जे काही असेल ते घेत राहणं असा हा चळवळीचा गाभा आहे. त्याला धर्माचं काही स्वरूप राहत नाही.
आपल्या देशाचं जे काही नुकसान झालं आहे ते संघटित धर्मामुळे झालं आहे, की जिथे कोणी तरी धार्मिक मुख्याधिकारी असतो. वारकरी पंथात असं काही नाही. महानुभाव आणि नाथ पंथही असाच होता.
आपण ज्याला लोकशाहीकरण म्हणतो अशी सूत्रं या पंथांमध्ये आपल्याला दिसतात.
एखादी गोष्ट इतकी शतकं टिकून राहणे याला एक तात्त्विक आधार असतो. तो तात्त्विक आधार आपल्याला यातून शोधावा लागतो. खूप लोकांनी यासाठी प्रयत्न केला. अमेरिकन, जर्मन लोकांनी वारकरी पंथावर संशोधन केलं. गुंथर सोंथायमरसारख्या जर्मन संशोधकानं यावर काम केलं.
स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये यावर अभ्यास झाला. यामागे या सर्वांना असं वाटतं की ही अतिशय लोकशाहीवादी अशी चळवळ आहे. ज्याच्यात जे काही चांगलं असेल ते घ्यायचं असं या चळवळीचं तत्व आहे. यामुळे या पंथाचा मोठा विस्तार झाला.
वारकरी पंथाचा भौगोलिक प्रभाव जर आपण पाहिला तर अगदी तामिळनाडूत तामिळ तुकाराम आहे. याशिवाय कानडी, तेलुगू आणि कोकणीतही तुकाराम आहे.
समतेचा प्रत्यक्षात अंगीकार
ही चळवळ चिरस्थायी राहण्यामागं आणखी एक तत्त्व आहे ते म्हणजे समतेचा प्रत्यक्षात अंगीकार करणारी ही चळवळ आहे. तुम्ही जसं असाल तसं या. तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल तरी वारीत येताना तुम्ही समान पातळीवर येता.
समता राज्यघटनेत मांडायची आणि प्रत्यक्षात कुठेच समता नाही अशा भानगडीत हे लोकं पडलेले नाहीत. समतेचं तत्त्व आपण मांडतोय पण जगातील सर्वात श्रीमंत माणसंही इथं आहेत आणि सर्वांत भुकेली माणसंही इथेच आहेत. वारकरी पंथ समता प्रत्यक्ष आचरणात आणतो.
तुम्ही जर वारीला येणार असाल तर एक केवळ जादा पोषाख घेऊन यायचा, टाळ घेऊन यायचं अन् चालत चालत निघायचं.
अतिशय साधेपणानं, कोणालाही तोशीस लागणार नाही किंवा त्रास होणार नाही अशी वाटचाल वारकरी करतात. येथे कोणी लहान किंवा मोठा असा प्रकार नाही.

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe
साधारण नवव्या-दहाव्या शतकात वारकरी पंथ जोर धरू लागला आणि दिंडीची परंपरा सुरू झाली. या शेकडो वर्षात राजवटी किती बदलल्या ते पाहा. सुरुवातीला राष्ट्रकूट होते, वाकाटक, यादव होते, मुसलमान सत्ताधीश होते, पेशवाई होती, ब्रिटिशांचं राज्य होते.
या सर्व राजवटींना पुरून उरत या पंथानं आपली तत्त्वं जोपासली. सहिष्णुतेच्या बळावरच वारकरी पंथाला ही जोपासना करणे शक्य झालं. सहिष्णुता म्हणजे इतरांकडून जे योग्य वाटतंय ते घ्यायचं आणि आपलं जे मूळ सत्व आहे ते मात्र सोडायचं नाही.
जातिभेद पाळायचा नाही हे तत्त्व हा पंथ मुसलमानांकडून शिकला. मुसलमानांनी सत्ता मिळवण्यात आणि ती राखण्यामध्ये जातिभेद न पाळणं हे महत्त्वाचं कारण होतं. वारकरी पंथाने हा मुद्दा उचलला. निदान पंथात तरी ते जातिभेद पाळत नाहीत.
म्हणून आपण पाहतो की सर्व जातीधर्माचे लोक एकत्र जमतात, एकत्र राहतात. लिंगायत धर्माकडून नामदेवासारख्या संतानं घेतलं की संसार करता करता तुम्हाला वैराग्याची गोष्टी पाळता येणं शक्य आहे. त्यासाठी विधींची किंवा कर्मकांडाची गरज नाही.
दानधर्म करत राहणं ही गोष्ट या पंथाने जैन धर्मीयांकडून घेतली. आसक्ती सोडून निर्वाणाकडे पाहत राहणं हे तत्व बौद्ध धर्मातून घेतलं. या सगळ्या गोष्टी काळानुसार या पंथात जमा झालेल्या दिसतात. त्यामुळे या पंथाचा तात्त्विक पाया भक्कम झाला.
आविष्काराचं साधन मौखिक
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारकरी पंथ टिकून राहिला, वाढत राहिला आणि आजही तो आपल्याला पूर्वीइतकाच जोमदार दिसतो याचं आणखी एक कारण म्हणजे या पंथानं सुरुवातीपासून आपलं आविष्काराचं साधन मौखिक ठेवलं आहे.
छापण्याची कला नव्हती तेव्हा हा पंथ सगळीकडे पसरला. तुकारामांचे अभंग ऐकल्यावर ब्रिटिश इतिहासकार ग्रँट सारख्या लोकांना आश्चर्य वाटले की एवढे हे अभंग खेडोपाडी म्हटले जातात पण त्याचं पुस्तक कसं नाही. मौखिक गोष्टी एकप्रकारे सुरक्षित असतात. एकदा तुम्ही पाठ केलं की स्मृतीत ते राहतं. तुकारामाच्या वह्या बुडवल्या पण मौखिक जे होतं ते कुणाला बुडवता आलं नाही.
आजही प्रिटिंग आणि इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यात हा मौखिकतेचा मुद्दा लागू आहे.

फोटो स्रोत, BBC/ Sharad Badhe
वारकरी संप्रदायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय लोकशाहीवादी आणि विकेंद्रीकरणावर भर देणारा पंथ आहे. एकच एक केंद्र आहे असं या पंथात नाही.
म्हणजे पंढरपूर या पंथात महत्त्वाचं असलं तरी देहू, आळंदी, पैठण या ठिकाणी गेलं तरी चालतं आणि त्यांनाही महत्त्व आहे. पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं काही नाही. अगदी तुकारामही पंढरपूरला गेला नव्हता असे म्हणतात. तिथेच जाऊन काही केलं पाहिजे असं काही नाही.
तुम्ही इंद्रायणीत आंघोळ करा नाही तर तुमच्या गावाच्या नदीत आंघोळ करा, गोदावरीत करा, तापीत करा तरी चालेल. ज्याला जसं शक्य आहे तसं करण्याची मुभा आहे. आणखी एक म्हणजे चालत जाणं यामध्ये एक सर्जनशीलता आहे.
आपल्या शहरी माणसाला पायी चालण्यातला सर्जनशीलपणा कळणार नाही. पण आपण चालताना जे दिसतं, जे अनुभवतो, माणसांना जोडलो जातो ते अतिशय क्रिएटिव्ह असतं. ही एक आधुनिक कृती आहे.
स्त्रियांना समान वागणूक
वारकरी संप्रदायाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आणि बरोबरीचा दर्जा. मोठ्या प्रमाणात या पंथात स्त्रिया संत झालेल्या आहेत. रोमन कॅथलिक पंथात आता आतापर्यंत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नव्हतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्या तुलनेत वारकरी पंथात अगदी जनाबाईपासून ते बहिणाबाईपर्यंत महिला संतांची परंपरा आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बारा महिने सतत शेतात राबावं लागणाऱ्या स्त्रियांना दिंडीमुळे काही दिवसांसाठी का होईना मोकळेपणा आणि आराम मिळणे शक्य होतं.
सिमाँ दे बोव्हॉर ज्याला 'सिसिफिसच्या यातना' म्हणते, त्या शेतातल्या आणि घरातल्या अगणित यातनांमधून बायकांनी मिळणारी ही सुटका खरोखरच स्वर्गीय आनंद देणारी आहे.
मुसलमानांचा या पंथातील सहभागही लक्षणीय आहे. मुसलमान संतांची मोठी परंपरा वारकरी पंथात आहे. शेख महंमदांसारखे जवळपास 25 मुसलमान संत आहेत ज्यांनी मुसलमानी परंपरेत राहून विठ्ठलावरही लिहिलं. अशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा आणि टोकाला न जाणारा मार्ग या पंथात दिसतो.

फोटो स्रोत, BBC/Sharad Badhe
मीरा-कबीर यांच्यापासून ते अगदी चैतन्यप्रभूपर्यंत या पंथाने त्यांना सोबत जोडून घेतलं.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अपुरी साधनं, नैसर्गिक संकटं अशा परिस्थितीतही ही चळवळ टिकून आहे. आज अत्यंत टोकाला जाणारी धार्मिक उन्मादी प्रवृत्ती, विशेषत: आपल्या देशाला न शोभणारी विचारसरणी वाढवणं चाललेलं आहे.
आपली खरी परंपरा विसरून अतिशय शिताफीनं लोक आक्रमक होत आहेत. याच्याशी मुकाबला करण्याचं उत्तर आपल्याला वारकरी संप्रदायात सापडू शकेल.
धर्मवेड्या लोकांची जी वृत्ती आहे ती काही आपल्या मातीतली नाही. वारकरी संप्रदाय जे तत्त्व मांडत आलाय ते आपल्या मातीतलं आहे.
सर्वांना जवळ घेणं आणि पराकोटीला न नेणं हे आपल्या मातीतलं तत्वज्ञान आहे. हेच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल.
(या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








