बीबीसीच्या नावाने व्हायरल झालेलं निवडणूक सर्वेक्षण खरं आहे का?

बीबीसी

गेल्या काही दिवसांपासून ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब अशा विविध सोशल मीडिया हँडलवरून एक फेक न्यूज व्हायरल होत आहे.

या फेक न्यूजमध्ये दावा करण्यात आला आहे की, बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडी 'इंडिया' जिंकणार आहे.

पण बीबीसीने असं कोणतंही सर्वेक्षण केलेलं नाही.

बीबीसीच्या नावाने अशा प्रकारची फेक न्यूज व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही अशा खोट्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.

परंतु बीबीसीने प्रत्येक वेळी आपली बाजू स्पष्ट केली आहे. बीबीसीने निवडणुकांबाबत कोणत्याही प्रकारचे 'प्री इलेक्शन सर्व्हे', 'ओपिनियन पोल' किंवा 'एक्झिट पोल' केलेले नाहीत आणि यावेळीही असं कोणतंच सर्वेक्षण झालेलं नाही.

बऱ्याचदा निवडणुकांच्या काळात बीबीसीने अमुक एक 'निवडणूक सर्वेक्षण' केलं असून अमुक एक पक्ष जिंकणार असल्याचा खोटा प्रचार केला जातो.

बीबीसी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की, बीबीसी निवडणूक सर्वेक्षण करत नाही किंवा कोणत्याही एका पक्षाने केलेले 'निवडणूक सर्वेक्षण' प्रकाशित करत नाही.

याआधी देखील बीबीसीने आपल्या नावाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणांची विश्वासार्हता नाकारली आहे.

असं असूनही काही लोक अजूनही बीबीसीच्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी बीबीसीच्या नावाने असे निवडणूक सर्वेक्षण करण्यात आले होते, अशी प्रकरणे यापूर्वीही पाहायला मिळाली आहेत.

परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बीबीसीने असे कोणतेही सर्वेक्षण केलेले नाहीत. कोणत्याही प्रकारचे निवडणुकीचे भाकीत करणे बीबीसीच्या संपादकीय धोरणांना धरून नाही.