प्रेयसीला गिफ्ट म्हणून होम थिएटरमधून पाठवला बॉम्ब, स्फोटात नवरा मुलगा मृत्यूमुखी

लग्नात गिफ्ट म्हणून होम थिएटर मिळालं, पण ही भेटवस्तूच जीवघेणी ठरली.

या होम थिएटरचा स्फोट झाला आणि नवरा मुलगा तसंच त्याच्या भावाचा त्यामध्ये मृत्यू झाला.

छत्तीसगढमधल्या कबीरधाम जिल्ह्यात 3 एप्रिलला ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गिफ्टमध्ये बॉम्ब होता. जेव्हा होम थिएटरचा प्लग जोडला तेव्हा त्याचा स्फोट झाला.

या स्फोटात नवरा मुलगा जागीच मृत्यूमुखी पडला, तर त्याच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या स्फोटात दीड वर्षांचं लहान मुलही जखमी झालं.

हा बॉम्ब वधूच्या माजी प्रियकराने पाठवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आपल्या प्रेयसीचं दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न होत असल्याच्या रागातून त्यानं हे कृत्य केलं.

सरजू मारकम असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे. त्याला मंगळवारी (4 एप्रिल) अटक करण्यात आली. पण त्याने अजूनपर्यंत जबाब दिला नाही.

पोलिसांनी म्हटलं, सरजू मारकम (33 वर्षे) याचे या 29 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्याशी लग्न करून आपली दुसरी बायको म्हणून राहावं यासाठी तो दबाव आणत होता.

पण मुलीच्या कुटुंबाने नकार दिला आणि तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं.

पोलिसांनी म्हटलं की, हा स्फोट इतका मोठा होता की, खोलीचं छप्पर आणि भिंतही हादऱ्याने कोसळली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)