You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गर्लफ्रेंडला पाठवलेल्या टेडी बेअरचा स्फोट भलत्याच माणसाच्या हातात झाला आणि...
- Author, भार्गव पारेख
- Role, बीबीसी गुजराती
"राजूने माझ्या मोठ्या मुलीचा प्रेमाच्या नावाखाली छळ केला. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. त्याने माझ्या लहान मुलीला लग्नाची भेट म्हणून टेडी बेअर पाठवला. त्याच्या आत बॉम्ब होता. तो उघडल्यावर त्याचा स्फोट झाला आणि माझ्या जावयाने त्याचे डोळे गमावले. मी आता पूर्णपणे हतबल झालो आहे. मी आता माझ्या जावयाला माझा एक डोळा देऊ शकतो."
हे शब्द आहेत हरीश दळवी यांचे. त्यांच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे आणि भेटवस्तू आलेला टेडी बेअरचा स्फोट झाला आणि जावयाने डोळे गमावले. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर ही दुर्घटना घडली आणि होत्याचं नव्हतं झालं.
हरीश दळवी नवसारी जिल्ह्यातील वंसाडा गावातील मिंढबारी या खेडेगावात राहतात. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अत्यंत थाटामाटात त्यांच्या मुलीचं लग्न केलं. हरीश भाई आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय आनंदात होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ही कुवार्ता कानी पडली आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.
बीबीसीशी बोलताना हरीशभाई म्हणाले, "मी माझ्या घरी निवांत बसलो होतो तेवढ्य़ात माझ्या मुलीचा सलमाचा फोन आला आणि तिने सांगितलं की लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा स्फोट झाला आहे. मी तिथे गेलो आणि माझा जावई आणि त्याचा भाचा जियांश रक्ताच्या थारोळ्यात पडले होते."
'मी माझ्या जावयाला डोळे देणार'
"स्फोट झाल्यावर घरातलं सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. आम्ही लतेश आणि त्याच्या भाच्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. माझ्या मुलीने सांगितलं की ते लग्नात मिळालेल्या भेटवस्तू उघडून पाहत होतो. मी माझ्या वहिनीबरोबर चहा करायला आत गेले होते. त्यांच्या कानावर आवाज पडला आणि आम्ही धावत आलो. टेडी बेअर इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये लावला होता. तिचा नवरा आणि भाचा रक्ताच्या थारोळ्यात दिसले."
हरीशभाई म्हणाले, "आम्ही खूप आठवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला आठवलं की, हे गिफ्ट आरतीने दिलं होतं. ती माझ्या मोठ्या मुलीची जागृतीची मुलगी आहे. जेव्हा आरतीला विचारलं तेव्हा तिने सांगितलं की ते गिफ्ट राजेशने दिलं होतं आणि जागृतीला द्यायला सांगितलं होतं."
"आमचा अंदाज खरा ठरला. ज्या माणसाने माझ्या मोठ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलं, त्यानेच हे कृत्य केलं. मग तो माझ्या लहान मुलीचं आयुष्य का उद्धवस्त करतोय? माझ्या जावयाचं डावं मनगट पूर्णपणे वेगळं झालं आहे. डॉक्टरांच्या मते त्याने डोळेही गमावले आहेत."
"मी माझ्या दुर्दैवी जावयासाठी काहीही करू शकत नाही. पण मी त्याला माझा एक डोळा देईन"
वन्साडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्रसिंह वघेला या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ते म्हणाले, "आम्ही आरतीकडे चौकशी केली. ती जागृतीची मैत्रीण आहे. तिने सांगितलं की, टेडी बेअर राजेश पटेलनं दिला होता. याच राजेशबरोबर जागृती लिव्ह- इन -रिलेशनपमध्ये होते. राजेशने तो टेडी बेअर जागृतीच्या मुलाला द्यायला सांगितला होता."
"आरती म्हणाली राजेश रडला आणि म्हणाला की, जागृती त्याच्याकडून कोणतंही गिफ्ट घेणार नाही. पण त्याला हे गिफ्ट त्याच्या मुलीला द्यायचं होतं. राजेशने टेडी बेअर लग्नाच्या दिवशी दिला होता. आणि आम्ही त्याला अटक केली आहे."
"माझ्या भावाचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे."
राजेश आणि जागृती बद्दल बोलताना हरीशभाई म्हणाले, "राजेश आणि माझी मुलगी एका कंपनीत नोकरी करायचे तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याने तिच्याशी लग्न करण्याचं वचन दिलं आणि ती गरोदर राहिली. त्यांना एक मुलगी आहे. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार जिला आणि जागृती घरी परत आली."
"राजेश जागृतीला धमक्या देत होता. तो असं काही करेल याची पुसटशी कल्पना दिली असती तर आम्ही पोलिसांत तक्रार दिली असती."
या प्रकरणी बोलताना सूरत भागाचे महानिरीक्षक राजकुमार पांडियान म्हणाले, "जेव्हा हा टेडी बेअर न्यायवैद्यक विभागाकडे पाठवला तेव्हा असं लक्षात आलं की, आत डिटोनेटर्स आणि जिलेटिनच्या कांड्या लावल्या होत्या. आम्ही राजेशची चौकशी केली. त्यात आम्हाला असं लक्षात आलं की त्याने त्याचा मित्र महेश पांड्याकडून जिलेटिनच्या कांड्या विकत घेतल्या होत्या. तो विहिरीचे स्फोट करण्यासाठी जिलेटिन आणि डिटोनेटर तयार करणाऱ्या कंपनीत काम करतो."
"त्याने अशा पद्धतीने या गोष्टी टेडी बेअर मध्ये भरल्या जेणेकरून जेव्हा टेडी बेअर इलेक्ट्रिक सॉकेटला लावल्याक्षणी त्याचा स्फोट होईल. त्याने जागृतीला हे गिफ्ट त्यांच्या आरती नावाच्या एका मैत्रिणीच्या हातून पाठवलं होतं. जागृती आणि तिच्या मुलीला मारून टाकणं हा त्याचा मुख्य उद्देश होता."
राजेशचं आधीच लग्न झालं होतं आणि त्याला पहिल्या लग्नापासून दोन मुलं होती. गेल्या सात वर्षांपासून जागृतीला लिव्ह इन मध्ये राहण्याचं आमिष दाखवत होता. त्यांचं लग्न झालं नाही पण त्यांना एक मुलगी होती.
जागृतीने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावला. ते एका वकिलाला भेटले. तेव्हा वकिलांनी घटस्फोट झाल्याशिवाय लग्न करता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे जागृती तिच्या वडिलांकडे तिच्या सहा वर्षांच्या मुलीबरोबर परत आली.
राजेश तिला त्रास देतच राहिला. तिला मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी स्फोटकं पुरवणाऱ्या महेश पांड्यालाही अटक केली आहे.
याविषयी बोलताना लतेश तडवीची बहीण अमिता यांच्याशी आम्ही बातचीत केली. अमिता अजूनही या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्या म्हणतात, "राजेश पटेलचं भांडण जागृतीशी होतं. त्यात माझ्या भावाचा काय दोष होता? त्याने त्याचे दोन्ही हात आणि डोळे गमावलेत. माझ्या भावाचं आयुष्य उद्धवस्त झालं आहे."
या प्रकरणाविषयी आम्ही मानसोपचारतज्ज्ञ प्रशांत भिमाणी यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, "अशा लोकांना Impulse control Disorder नावाचा एक रोग झाला असतो. जर तू माझी नाही तर कोणाचीही होऊ शकणार नाही अशी त्यांची वृत्ती आहे. मालकी हक्काची भावना प्रबळ असते. प्रेयसी त्याच्या मनासारखी वागली नाही तर त्यांना तिला धडा शिकवायचा असतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)