अजित पवारांनी भर पत्रकार परिषदेत घेतली एकनाथ शिंदेंची फिरकी, नेमकं काय घडलं?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आमच्या सर्व सहकारी पक्षांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. आताच आम्ही महायुतीच्यावतीने राज्यपालांना पत्र दिलेलं आहे."
नियमानुसार राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी दावा केलेला आहे. राज्यपालांनी दावा स्वीकारल्यानंतर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधीची वेळ दिलेली आहे.
फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्यावतीने माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं, मी त्यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार यांनीही पत्र देऊन, मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी विनंती केली आहे. या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेऊन राज्यपालांनी निमंत्रित केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात हा सोहळा होईल."


उद्या (5 डिसेंबर) रोजी किती जणांचा शपथविधी होईल याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "किती जणांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. सगळे मिळून निर्णय घेऊन. आजपर्यंत तिघंही एकत्रित निर्णय घेत आलो आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील. महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

'शिंदेंचं संध्याकाळपर्यंत ठरेल, पण मी तर उपमुख्यमंत्री होणारच'
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले की, "मी फक्त एकच खुलासा करू इच्छितो की माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. माध्यमांनी उगाचच बातम्या बनवल्या, माझ्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जे घर दिलेलं आहे ते नीट करण्यासाठी गेलो होतो. आमच्या ज्या केसेस चालल्या आहेत त्याबाबत मी वकिलांना भेटलो नव्हतो. आमच्या चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. सुप्रीम कोर्ट सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य निर्णय देईल असा विश्वास आहे. त्यासंदर्भातच मी वकिलांना भेटायला गेलो होतो. मला कुणीही भेट नाकारली नाही. त्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो."

अजित पवार म्हणाले की, "आम्हाला सरकार चालवायचा अनुभव आहे आणि त्याचा उपयोग राज्यातील प्रत्येक घटकाला कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. देशातलं क्रमांक एकच राज्य अशी महाराष्ट्राची ओळख टिकवण्यासाठी आम्ही तिघे मिळून काम करू."
दरम्यान या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या विधानाने एकच हशा पिकला. पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपदाबाबत विचारल्यानंतर शिंदे म्हणाले की, "आम्ही संध्याकाळपर्यंत याबाबत ठरवणार आहोत." यातच अजित पवारांनी शिंदेंना थांबवत सांगितलं की, "त्यांचं संध्याकाळपर्यंत ठरेल पण मी मात्र उपमुख्यमंत्री होणारच आहे, मी सोडणार नाही."
'अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही काम करू'
शिवसेनेचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज आम्ही राज्यपालांची भेट घेऊन महायुतीचे सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली. मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी देवेंद्रजींनी याच ठिकाणी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. मी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांना म्हणजेच देवेंद्रजींना देऊन टाकला होता. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं होतं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होतंय."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "एवढं बहुमत कधीच मिळालं नव्हतं. या राज्यातल्या प्रत्येक मतदाराने महायुतीवर मतांचा वर्षाव केला. त्यामुळे महायुतीला अतिशय दैदिप्यमान असा विजय मिळाला. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय देणार आहोत हे महत्त्वाचं होतं. सर्व मतदारांचे धन्यवाद, राज्य चालवताना जे निर्णय आम्ही घेतले आणि जी विकासकामं महाविकास आघाडीने थांबवली होती ती सगळी कामं आम्ही सुरु केले. सरकार हे राज्यातल्या जनतेच्या विकासासाठी असतं. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली. जनतेनेही आमच्या कामाची पोचपावती दिली. अंदाज वर्तवणाऱ्या तज्ज्ञांचा अंदाज बाद ठरवून मतदारांनी आम्हाला विजयी केलं."
एकनाथ शिंदे म्हणाले की, "देवेंद्रजींना पाच वर्षांचा आधीच अनुभव आहे आणि आता आम्ही टीम म्हणून काम करणार आहोत. मागची अडीच वर्षं आम्ही ज्या पद्धतीने मिळून काम केलं तसंच आम्ही काम करू. आपण इतिहास बघितलं तर लक्षात येईल की एवढ्या कमी काळात कधीच एवढ्या लोककल्याणकारी योजना घोषित झाल्या नव्हता. देवेंद्रजींना पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो."
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल 23 डिसेंबरला जाहीर झाला आणि भाजपप्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र, आठवडा उलटून गेला, तरी नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
अशातच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी सोमवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. यात त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली गेली. त्यांचा मान राखला गेला पाहिजे, असं ते म्हणाले होते.
केसरकर काय म्हणाले होते?
दीपक केसरकर म्हणाले, "शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. जिंकली. त्यांचा मान राखला जावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही हिंदुत्ववादी पक्षासोबत आहोत. अजित पवार धर्मनिरपेक्ष पक्षाचं नेतृत्त्व करतात."
"काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला विलंब होण्यात कोणताही हात नाही. आमच्याकडून कोणत्याही प्रकारे उशीर झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठका रद्द केलेल्या नाहीत. कारण कोणती बैठकच नव्हती," असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.
"त्यांची तब्येत बरी नाही, सध्या ते उपचार घेत आहेत. कोणताही आधार नसताना श्रीकांत शिंदे यांचंही नाव चर्चेत आणलं गेलं ," असंही त्यांनी नमूद केलं.
शिंदे गृहमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या मुद्यावर बोलताना केसरकर म्हणाले, "शिंदे हे कुठल्याही पदासाठी आग्रही नाहीत. दोन्ही नेत्यांनी बरोबरीने काम केलेलं आहे. त्यांचा मान राखला गेला पाहिजे असं वाटतं. आता हा मान कसा राखायचा हे दिल्लीनं ठरवायचं आहे."
केसरकरांनी त्यांच्या पक्षातील लोकांनी या विषयावर कोणतंही भाष्य केलं जाऊ नये, असं आवाहन केलं. तसंच माध्यमांनी आधार नसलेल्या चर्चा थांबवाव्यात, असंही म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी एक्सवर केलेली पोस्ट चर्चेत आहे. यात श्रीकांत शिंदे म्हणाले, “महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. मात्र, ते त्यांच्या साताऱ्यातील गावी जाऊन बसले आहेत.
ना शिंदेंच्या शिवसेनेकडून, ना भाजपकडून, ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, हे सांगितलं गेलं नाहीय.
याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरून महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची माहिती दिलीय.
बावनकुळेंच्या माहितीनुसार, येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळा पार पडेल.
ही बातमीही वाचा : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीत कोण प्रमुख दावेदार आणि शर्यतीत कोण?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी 5 डिसेंबररोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.”
महायुतीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होण्यापूर्वीच भाजपने शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
शिवाय, सत्ता स्थापनेचा दावा केला नसताना आणि शपथविधीबाबत राज्यपालांच्या कार्यलयाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रम जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, “मला हलक्यात घेऊ नका,” असं एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटले होते. अर्थात त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असला, तरी त्यांचा इशारा हा मित्र पक्षांनाही होता, अशीही चर्चा रंगली होती.
“माझ्यामुळे मुख्यमंत्री ठरवण्यात कोणतीही अडचण आहे असं मनात आणू नका,” असं फोनवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.
असं असलं तरी ही भूमिका जाहीर केल्याच्या 48 तासांतच आपण नाराज असल्याचे उघड संकेतही शिंदे यांनी दिले होते. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळून आठवडा उलटला, तरी मुख्यमंत्रीपदाच्या नावाचा सस्पेंस कायम आहे.
भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं म्हणणारे एकनाथ शिंदे मुंबईतील मित्र पक्षांसोबतच्या बैठका रद्द करून आपल्या गावी सातारा येथे निघून गेले आहेत. तर, आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अशात मुख्यमंत्री कोण होणार हा पेच कायम आहे.
दिल्ली ते दरे; आतापर्यंतचा घटनाक्रम काय?
23 नोव्हेंबर - महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला. विधानसभेच्या 288 पैकी 240 जागा जिंकत महायुतीला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. यात भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं. भाजप 130, शिवसेना (शिंदे गट) 57, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या.
24 नोव्हेंबर – महायुतीतील मित्रपक्षांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावे करण्यास सुरुवात केली. भाजपच्या नेत्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्याने आणि गेल्यावेळेस तडजोड केल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी वक्तव्य केली. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर कायम रहावेत अशी मागणी करण्यास सुरुवात केली.
25 नोव्हेंबर – शिवसेनेकडून कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही मागणी उचलून धरली. राज्यात विविध ठिकाणी यासाठी कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच बिहार पॅटर्न महाराष्ट्रातही राबवण्याचा आग्रह झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे मात्र मौन बाळगून होते.
26 नोव्हेंबर – सरकारचा कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याही दिवशी त्यांनी माध्यमांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणं किंवा प्रतिक्रिया देणं टाळलं. यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या आणि मुख्यमंत्रीपदासाठी दबावतंत्र सुरू असल्याच्या चर्चा.
27 नोव्हेंबर – नाराजीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप श्रेष्ठींचा निर्णय पक्षाला मान्य असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्रीपदावरून माघार तसंच दावा सोडल्याचं यावरून स्पष्ट झालं.

28 नोव्हेंबर – महायुतीतील तिन्ही नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी भाजप श्रेष्ठींनी तिन्ही नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती.
तसंच मुख्यमंत्री पद भाजपकडे राहील असंही स्पष्ट करण्यात आलं. परंतु इतर महत्त्वाची खाती म्हणजेच गृह आणि अर्थ खात्याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव ठेवल्याची माहिती. तसंच या भेटीच्या फोटोत एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसलं.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमांवर या भेटीचा फोटो पोस्ट केला. परंतु शिंदे यांनी एकही फोटो पोस्ट केला नाही. माध्यमांशी बोलताना मात्र एकनाथ शिंदे यांनी बैठक सकारात्मक झाल्याचं सांगितलं.
29 नोव्हेंबर – महायुतीच्या नेत्यांची मुंबईतील बैठक अचनाक रद्द झाली. यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ आपल्या गावी सातारा जिल्ह्यात निघून गेल्याने खातेवाटवाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, शिंदे यांचे सहकारी उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याचं कारण पुढे केलं.
30 नोव्हेंबर – भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे बैठक घेतली. परंतु केंद्रातून भाजपचे निरीक्षक अद्याप आले नसल्याने भाजपचा गटनेता मात्र अद्याप निवडला नाही.
4 डिसेंबर : भाजपने त्यांच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीसांची निवड केली. महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी फडणवीसांना पाठिंबा दिला आणि राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला आहे.
गृहखातं किंवा अर्थखात्यासाठी आग्रह
एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळातील स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा असेल अशी महत्त्वाची खाती मिळतील असा त्यांचा प्रस्ताव असल्याचे समजते.
परंतु भाजप गृहखातं सोडण्यास तयार नसून अजित पवार यांच्याकडेच अर्थखातं राहील, असाही वरिष्ठांचा निर्णय असल्याने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांचे सहकारी आणि आमदार संजय शिरसाठ यांनीही प्रतिक्रिया देताना, “मुख्यमंत्री पद जर भाजपकडे जाणार असेल, तर गृहमंत्रीपदासाठी आमचा आग्रह निश्चित असेल,” असं म्हटलं आहे. तसंच मविआच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं होतं, तसंच एमआरडीसी हे सुद्धा महत्त्वाचं खातं होतं. यामुळे यासाठीही शिंदे गट आग्रही असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे शुक्रवारी (29 नोव्हेंबर) तब्येत बिघडल्याचे कारण देत साताऱ्यातील आपल्या दरे या मूळगावी निघून गेले. तिथे गेल्यानंतरही त्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद अद्याप साधलेला नाही. तर संजय शिरसाठ यांनी, “महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास एकनाथ शिंदे आपल्या गावी जातात.” अशी प्रतिक्रिया दिल्याने नव्याने चर्चांना उधाण आलं.
यामुळे एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार का किंवा ते सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कोणत्याची नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

फोटो स्रोत, ANI
गेल्या अडीच वर्षांच्या युती सरकारच्या काळात भाजपने केवळ 40 आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण असं असलं तरी गृहमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस होते. तर अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं.
यामुळे आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा असल्यास या दोन खात्यांपैकी एक खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे रहावं यासाठी त्यांचा आग्रह असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाठ सांगतात, “मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं, तर गृहखातं आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे.
कारण गेल्यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं नव्हतं. ते उपमुख्यमंत्र्यांकडे होतं. तसंच माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली होती त्यावेळी अर्थखात्याने त्यांना सुरुवातीला थोडा विरोध केला होता. यामुळे एकनाथ शिंदे यांनी जनतेला जो योजनांबाबत शब्द दिला आहे तो पाळण्यासाठी आर्थिक नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणालाही सापडलेलं नाही. मुख्यमंत्री बदलतो त्यावेळी त्याच्याकडे असलेली खाती किंवा सहकाऱ्याकडे असलेल्या खात्यांची चर्चा सुरू होते. पण हे मुख्यमंत्री ठरल्यानंतर होते.”
एकनाथ शिंदे यांच्यासमोर काय पर्याय आहेत?
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहिला, तर भाजप आपल्या समर्थक अपक्षांसह 138 पर्यंतचा आकड सहज पार करेल. दुसरीकडे अजित पवार यांच्या 41 जागा आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविनाही भाजपचं सरकार राज्यात स्थापन होऊ शकतं ही वस्तुस्थिती आहे.
असं असलं तरी भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत वितुष्ट ओढावून घेईल अशी परिस्थिती नाही, असंही विश्लेषक सांगतात. भाजपनं असं केल्यास पक्षाची प्रतिमा आणि विरोधकांच्या कडव्या आरोपांना पक्षाला सामोरं जावं लागेल.
तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. इतकंच नाही तर केंद्रातही एनडीए सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे सात खासदार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानीवडेकर सांगतात, “एकनाथ शिंदे यांचं मनपरिवर्तन व्हावं यासाठी भाजप त्यांना वेळ देत आहे. परिस्थिती ओळखून त्यांनी लवकरात लवकर ती स्विकारावी यासाठी सत्तास्थापनेला विलंब होतोय असं वाटतं.
कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे वाटाघाटी करण्यासाठी फारसा स्कोप नाही. कारण पुरेसा वेळ देऊनही त्यांना परिस्थिती लक्षात येत नसेल, तर भाजप त्यांच्याविनाही सरकार स्थापन करू शकतं. यामुळे एकनाथ शिंदे यांना ते वेळ घेऊ देतील. पण यातून साध्य काहीच होणार नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
एकनाथ शिंदे यांची गृह किंवा अर्थ खात्यांसह विधानसभा अध्यक्षपदासाठीही मागणी असल्याचं समजतं. परंतु यापैकी कोणत्याही मागणीचा प्रस्ताव मान्य न झाल्यास एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात का? ते सरकारला बाहेरून पाठिंबा देतील का? अशीही चर्चा सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे केवळ पक्षाचे प्रमुख राहत सहकाऱ्यांना मंत्रीपदं देतील असाही एक पर्याय असल्याचं बोललं जात आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, “महाराष्ट्रातील राजकारणाची अनिश्चितता पाहिली तर काहीही अशक्य नाही. यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नसतील आणि त्यांना हवी असलेली वजनदार खाती त्यांना मिळणार नसतील, तर ते युती सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात.
तसंच शिंदेंनी बाहेरून पाठिंबा दिला, तर विरोधकांची जी स्पेस आहे, जी पोकळी विरोधकांची निर्माण झालेली आहे ती जागा सुद्धा एकनाथ शिंदे घेऊ शकतात. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेता झाले आणि सर्व स्पेस घेतली तरीही आश्चर्य वाटायला नको. हा सुद्धा राजकीय रणनितीचा भाग असू शकतो.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











