कीर्तनकार बनले राजकीय पक्षांचे भोई, थेट राजकीय प्रचार आणि भाष्य करणे योग्य की अयोग्य?

वारी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

( ही बातमी पहिल्यांदा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता ती पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

निवडणुकीवेळी आणि नंतर देखील कीर्तनकारांनीही प्रकर्षाने राजकीय पक्षांची बाजू घेत प्रचार केल्याचं निदर्शनास आलं.

अनेक वेळा कीर्तनकार किंवा धार्मिक नेत्यांनी केलेल्या नेत्यांमुळे वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, धार्मिक आधारावर प्रचार करणं हीच बाब अयोग्य ठरते. पण असं असतानाही गेल्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला.

एका बाजूला राजकीय पक्षांनी कीर्तनकारांना आपल्या प्रचारासाठीचं माध्यम बनवलं. त्याचवेळी काही कीर्तनकारांनीही वेगवेगळ्या पक्षांच्या 'राजकीय पालख्यां'चे भोई होत, त्यांचे विचार वाहण्याला महत्त्व दिल्याचं दिसून आलं.

वारकरी संप्रदाय आणि राजकारण यांचं आजवरचं नातं कसं राहिलं आहे? अशा प्रकारे कीर्तनकारांनी राजकीय भूमिका घेणं हे संप्रदायाच्या वैचारिक भूमिकेला धरुन आहे का?

या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांनी मतदारांवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे? या आणि अशा प्रश्नांचा धांडोळा आपण घेणार आहोत.

राजकीय पक्षांकडून कीर्तनकारांचा वापर कसा झाला?

सध्या विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत आध्यात्मिक आघाड्या कार्यरत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या आघाड्या अधिक सक्रिय दिसून येतात.

मात्र, राजकीय प्रचार करण्यामध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या आध्यात्मिक आघाड्या अधिक संघटीत आणि अधिक प्रभावी दिसून येतात.

अलीकडेच शरद पवार यांच्या पक्षाकडूनही आध्यात्मिक आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यावर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली होती.

या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यामध्ये कीर्तनकारांनी कशाप्रकारे भूमिका निभावली याबाबत आम्ही या आध्यात्मिक आघाड्यांच्या प्रमुखांशीच चर्चा केली.

'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'कडून अनेक वारकरी धर्मपरिषदा घेण्यात आल्या.

फोटो स्रोत, Facebook/Akshay Bhosle

फोटो कॅप्शन, 'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'कडून अनेक वारकरी धर्मपरिषदा घेण्यात आल्या.

'भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी'चे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाल्याचा परिणाम दिसून आला. मुल्ला-मौलवींनी फतवे काढून मुस्लिम उमेदवारांना तसेच महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.

त्यासाठी महाविकास आघाडीचे लोक अल्पसंख्याकांचं लांगूलचालन करत राहिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील धर्माचार्यांनी आणि सगळ्या पंथाच्या संतांनी एकत्र येत हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला."

विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कीर्तनकारांची एकजूट करुन कशाप्रकारे महायुतीचा प्रचार केला याविषयीची माहिती 'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'चे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

वारकरी

ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम्ही सर्व जिल्ह्यातील मुख्य कीर्तनकारांची मोट बांधली. प्रत्यक्ष बैठका तसेच शेकडो झूम कॉल मिटींग्स झाल्या.

जिल्ह्या-जिल्ह्यात काम करणारे शिवभक्त, गोरक्षक, कीर्तनकार यांना एकत्र करण्यात आलं आणि त्यातून जिल्हानिहाय रचना ठरवण्यात आली. फक्त वारकरीच नव्हे तर जेवढ्या संप्रदायांचे वेगवेगळे आश्रम आहेत, त्यांच्यापर्यंत निरोप दिले गेले."

"जिल्हानिहाय आम्ही सहा-सात धर्मपरिषदा घेतल्या. 'भक्ती शक्ती संवाद यात्रा' तसेच निवडणुकीच्या आधी तीन महिन्यापूर्वी 'मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा' देखील काढली. त्या माध्यमातून सर्व 36 जिल्ह्यातील संत-महंतांचं एकत्रिकरण केलं.

त्यांच्याकडून हिंदू लोकांच्या श्रद्धांवर घाला घालण्याचं काम करणाऱ्या महाविकास आघाडीचा चेहरा लोकांसमोर उघड करण्याचं काम आम्ही केलं."

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आध्यात्मिक व वारकरी आघाडीचाही प्रचार रथ महाराष्ट्रामध्ये फिरत होता.

फोटो स्रोत, Facebook/Viththal More

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आध्यात्मिक व वारकरी आघाडीचाही प्रचार रथ महाराष्ट्रामध्ये फिरत होता.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख विठ्ठल (आबा) मोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, साधू-संतांच्या पुरोगामी शिकवणीचं प्रतिनिधित्व आपल्याला संविधानामध्ये दिसून येतं.

"हिंदुत्त्ववादी पक्षांकडून साधू-सतांच्या विचारांना बाजूला सारुन जाती-धर्मामध्ये द्वेष पेरला जात आहे. तुकोबा-ज्ञानोबांच्या विचारांच्या पूर्णपणे उलट विचार पसरवला जात असून त्यालाच वारकरी विचार म्हणून रुजवण्याचं काम महायुतीचे लोक करत आहेत.

त्याला उत्तर देण्यासाठी आणि संताचा खरा विचार पुढे आणण्यासाठी म्हणून 15 महिन्यांपूर्वी आम्ही ही आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत आम्ही प्रचार रथ तयार करुन संपूर्ण राज्यभर दौरा केला. ठिकठिकाणी कीर्तन करुन संतांचा विचार हाच संविधानाचा विचार कसा आहे, हे पटवून देण्याचं काम आम्ही केलं."

कधीपासून सुरु झाला वारकऱ्यांकडून प्रचार?

वारकरी संप्रदाय आणि राजकारण यांचं आजवरचं नातं कसं राहिलं आहे, याविषयीची माहिती हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

त्यांचं वारकरी संप्रदायाचा इतिहास मांडणारं 'होय होय वारकरी' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणतात की, "यापूर्वी वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर उघडपणे दिसत नव्हता. सगळ्याच पक्षांमधील बहुसंख्य नेते हे वारकरी संप्रदायाच्या प्रभाव क्षेत्रातले होते किंवा स्वत: वारकरी होते.

उदाहणार्थ, 'शेतकरी-कामगार पक्षा'ची स्थापनाच आळंदीमध्ये झाली. हा पक्ष कम्यूनिस्ट आणि फुले-आंबेडकरवादी असला तरीही या पक्षाचे बहुसंख्य नेते वारकरीच होते. सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये वारकरी संप्रदाय विखुरलेला होता. तो कोणत्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करणारा नव्हता."

वारकरी

विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे, गणपतराव तपासे, माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, उल्हासदादा पवार, बबनराव पाचपुते, पंढरीनाथ कबीरबुवा, रामकृष्ण मोरे, बाबासाहेब दांडेकर, बाळासाहेब भारदे, वि. स. पागे, केशवराव धोंडगे, शामकांत मोरे, बापूसाहेब पाटील - एकंबेकर असे विविध पक्षीय राजकारणी स्वत: वारकरी वा वारकरी विचारांचे होते, असं बंडगर सांगतात.

या निवडणुकीत झालेल्या प्रचाराविषयी बोलताना ते म्हणतात की, "याआधी कीर्तनाच्या माध्यमातून उघडपणे कुणीही राजकीय प्रचार करत नव्हतं. सुप्तपणे नक्कीच व्हायचा. पण यंदा हा प्रचार उघडपणे झाला.

यातील एक बाजू असं म्हणायला लागली की, संतांचं कार्य हे धर्माचं कार्य असून ते फक्त आम्ही करतोय, त्यामुळे, आम्हाला मतदान करा. दुसऱ्या बाजूला, संविधानाचा विचार हाच संतांचा विचार आहे आणि संविधान टिकवण्याचं काम आम्ही करत असल्यामुळे आम्हाला मतदान करा, असं दुसऱ्या बाजूकडून सांगण्यात आलं. अर्थात, असं म्हणणाऱ्यांचा आवाज फारच क्षीण होता."

भाजपची आध्यात्मिक आघाडी खूप आधीपासून सक्रिय आहे.

फोटो स्रोत, Facebook/Tushar Bhosle

फोटो कॅप्शन, भाजपची आध्यात्मिक आघाडी खूप आधीपासून सक्रिय आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र, वारकरी कीर्तनकारांचा वापर राजकीय प्रचारासाठी होणं हे वारकरी संप्रदायासाठीच घातक असल्याचं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार हभप राजाभाऊ महाराज मांडतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "कीर्तनकार म्हणून त्या गादीवर बसून कुणीही प्रचार करता कामा नये, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.

तुम्ही कीर्तन करत नसताना एखाद्या राजकीय सभेत जाऊन भूमिका मांडत असाल, तर ते तुमचं व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून एकवेळ मान्य करता येईल. पण अशा प्रकारे कीर्तनातूनच राजकीय भूमिका मांडल्याने वारकरी संप्रदायाचंच नुकसान होतं."

हाच मुद्दा हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगरही अधिक विस्ताराने मांडतात.

ते म्हणतात की, "बरेचसे नेते भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार असून वारकरी संप्रदायाशी विसंगत गोष्टींचं आचरण करणारे आहेत. पण या निवडणुकीत असं सांगितलं गेलं की तुम्ही उमेदवार पाहू नका, तर पक्षाची विचारधारा म्हणून मतदान करा.

उमेदवाराचं आचरण वारकरी संप्रदायाशी विसंगत असू शकतं किंबहुना असणारच, म्हणूनच पक्षाची विचारधारा पहा, असं सांगितलं गेलं. याहून महत्त्वाची बाब अशी की, धर्माचा वापर राजकारणासाठी करणं हेच संविधानाशी आणि संतांच्या विचारांशीही विसंगत आहे."

वारकरी

हिंदुत्व विरुद्ध संविधान

महायुतीकडून प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांनी 'हिंदुत्वा'चा मुद्दा लावून धरला होता तर महाविकास आघाडीचा प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांनी वारकरी मूल्ये समाविष्ट असलेल्या 'संविधान रक्षणा'चा मुद्दा लावून धरला होता.

मात्र, वारकरी संप्रदायाला हिंदुत्वाचा मुलामा देण्याचा प्रयत्न फार आधीपासूनच सुरू असल्याचा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार सचिन परब मांडतात. ते 'रिंगण' हा संतसाहित्याला वाहिलेला वार्षिक अंक दरवर्षी प्रकाशित करतात.

त्यांच्या मते, "हिंदुत्वाचा विचार हाच वारकरी विचार असल्याचा प्रचार आताच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. निवडणुकीत या गोष्टीला अधिक ऊत येतो. विशेषत: रामजन्मभूमी आंदोलनापासून याला अधिक गती आली.

वारकरी संप्रदायाची विचारसरणी रुढ वैदिक विचारसरणीहून भिन्न आहे, हेच पुसून टाकण्याचा प्रयत्न अधिक जोरकसपणे करण्यात येत आहे. 90 च्या दशकानंतर तर अनेक कीर्तनकार हे हिंदुत्ववादी पठडीतूनच तयार झाले. त्यामुळे, वेगळ्या पद्धतीने प्रचार करायला सांगायचीही गरज भासू नये, अशा पद्धतीने ते वारकरी विचारांच्या विपरीत असणाऱ्या हिंदुत्वाचा प्रचार नेहमीच करतात.

फक्त या निवडणुकीतच प्रचार झाला, हा देखील गैरसमज आहे. तो याआधीही होत आला आहे. यावेळी मात्र, त्यांनी आपली ताकद पूर्णपणे पणाला लावली. राजकीय पक्षांनीही यासाठी आर्थिक ताकद पुरवण्याचं काम केलं. शेवटच्या दिवशी तर वारी वाचवायची असेल तर भाजपला मतदान करा, अशा पोस्ट्सदेखील फिरवण्यात आल्या."

अगदी ज्ञानदेवांच्या आधीपासूनच महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठीची वारी करायला लागल्याचे जाणकार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अगदी ज्ञानदेवांच्या आधीपासूनच महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठीची वारी करायला लागल्याचे जाणकार सांगतात.

राष्ट्रवादीच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख विठ्ठल (आबा) मोरे सांगतात की, "महायुतीकडून संतांचंच नाव घेऊन अत्यंत चुकीचा आणि विखारी प्रचार केला जात आहे. त्यामुळे, लोकांपर्यंत खरा वारकरी विचार नेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर दौरा केला. त्यांचा प्रचार चुकीचा असल्याचं सांगत महाविकास आघाडीचा प्रचार केला."

एका बाजूला, कीर्तनकारांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेलीच नाही, असा दावा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले करतात.

ते म्हणतात की, "कीर्तनकारांनी महायुतीलाच मतदान करा, असं कुठंही म्हटलेलं नाही. कीर्तनकारांनी 'हिंदू म्हणून एकत्र या आणि जे हिंदूहिताचा विचार करतील, त्यांच्या बाजूने मतदान करा, हे आवाहन केलं. या आवाहनानंतर जे भाजप आणि शिवसेना हे जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, त्यांना तो लाभ मिळणारच ना?"

तर दुसऱ्या बाजूला, "निवडणुकीमध्ये कीर्तनकारांनी उडी घेऊन प्रचार करावा, अशी परिस्थिती आतापर्यंत कधीच आली नव्हती. ती आता आली म्हणून आम्हाला प्रचारामध्ये उतरावं लागलं. मुस्लीम समाजाचे धर्मगुरु राजकीय भूमिका घ्यायला लागले म्हणून आम्हाला त्यामध्ये उडी घ्यावी लागली.

तसेच, या भूमिकाही निवडणुकीपुरत्याच तात्पुरत्या असतात. किती दिवस आपण सर्वधर्मसमभावाचं तत्त्व घेऊन बसणार?" असं मत शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले मांडतात.

मात्र, सर्वधर्मसमभाव हाच वारकरी तत्त्वज्ञानाचा पाया असल्याचं राजाभाऊ चोपदार अधोरेखित करतात.

ते म्हणतात की, " 'भेदाभेद भेद अमंगळ' असा संतांचा विचार आहे. मात्र, तुम्ही जर राजकीय पक्षाचा अजेंडा राबवून जाती-धर्मामध्ये भेद निर्माण करत असाल, तर तुम्ही संताचा विचार अवलंबत नसून तुमचा वैयक्तिक अजेंडा राबवत आहात.

कारण, संतांनीच असं सांगितलंय की, आपला लढा व्यक्तीशी नसून प्रवृत्तीशी आहे. प्रवृत्ती जर गेली तर त्या व्यक्तीला आपण पुन्हा स्वीकारलं पाहिजे. मूळ वारकरी विचाराने जे काम करत आहेत, तेच खरे वारकरी आहेत, असं मला वाटतं."

शिवाय, राजकीय प्रचार करणारे काही जण म्हणजे सगळा वारकरी संप्रदाय नव्हे, हेदेखील ते आवर्जून नमूद करतात.

वारकरी

कीर्तनकारांनी केलेला प्रचार एकवेळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मान्य करायचा झाला तरीही झालेला राजकीय प्रचार वारकरी मूल्यांना धरुन झाला नाही, असं ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगतात.

"या प्रचारामध्ये अनेक खोट्या आणि चुकीच्या गोष्टी सांगितलं गेल्या. जसं की, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर वारी बंद पडेल वा महाविकास आघाडीच्या नेत्यांची वारकरी संप्रदायावर श्रद्धा नाही इत्यादी.

शरद पवारांबद्दलही अपप्रचार झाला. ते देवाला मानत नाहीत, ते पंढरपूरला येत नाहीत, वारी बंद पडू द्यायची नसेल तर महायुतीला मतदान करा वगैरे अनेक चुकीच्या गोष्टी पसरवण्यात आल्या. इथं मी कुणाची बाजू घेत नाही, पण राजकीय मुद्दा बाजूला ठेवला तरीही या गोष्टी फॅक्ट म्हणून चुकीच्या होत्या.

असत्य बाबींचा आधार घेऊन कीर्तनकार म्हणून प्रचार करणं, हा वारकरी संप्रदायाच्या विचारांचा पराभव आहे," असं ते सांगतात.

राजकारणासाठी वारकरी विचारांचा पराभव होणं ही आमच्यासाठी खेदाची बाब असल्याचं ते नमूद करतात.

वारकरी परंपरेतील सर्व संतांनी पांडुरंगाला आद्यदैवत मानून 'भेदाभेद भ्रम अमंगळ' असल्याचा विचार मांडला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वारकरी परंपरेतील सर्व संतांनी पांडुरंगाला आद्यदैवत मानून 'भेदाभेद भ्रम अमंगळ' असल्याचा विचार मांडला.

दुसऱ्या बाजूला, "शरद पवार आणि जरांगे फॅक्टरमुळे महाराष्ट्रात जातीयवाद प्रचंड फोफावला. त्यामुळे, ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्राला आपण जाती-पातीच्या राजकारणातून मुक्त करुन हिंदू म्हणून एक केलं पाहिजे, हे संतांचं आद्य कर्तव्य आहे," असं तुषार भोसले ठामपणे सांगतात.

कीर्तनकारांनी राजकीय भूमिका घेतल्यास वारकरी संप्रदायाचं काय नुकसान होईल, याबाबत बोलताना ज्ञानेश्वर बंडगर म्हणतात की, "वारकरी विचारांशी विसंगत वागणाऱ्या राजकारण्यांचा प्रचार-प्रसार करणं हाच वारकरी संप्रदायाचा विचार आहे, असा समज त्यातून समाजात तयार होईल.

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अमुक एका पक्षाला पूरक आहे, असं होण्यापेक्षा अमुक एखादा पक्ष वारकरी तत्त्वज्ञानाच्या कसोटीने वागतो का? या मुद्द्याला खरं तर समाजामध्ये मध्यवर्ती स्थान मिळायला हवं.

अन्यथा एखाद्या पक्षाचे गुणदोष म्हणजेच वारकरी संप्रदायाचे गुणदोष म्हणून त्याचं मूल्यमापन होण्याचा धोका आहे," असं ते आग्रहाने मांडतात.

वारकरी

सत्ता आणि वारकरी विचार

वारकऱ्यांचं सत्तेसोबतचं नातं कसं असावं, यासंदर्भात बोलताना शासन कोणत्याही एका धर्माचं नसल्याचं राजाभाऊ चोपदार आवर्जून सांगतात.

ते म्हणतात की, "शासन हे शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, वारकरी नसणाऱ्यांचं, हिंदूंचं, मुस्लिमांचं आणि अगदी दारु पिणाऱ्यांचंही आहे. सरकार हे सर्वांचंच असतं, ते एका जातीपातीचं वा धर्माचं नसतं. सरकारला धर्म नसल्यामुळे त्यांना सगळ्यांचीच काळजी घ्यायची आहे.

कोणत्याही विचारांचं सरकार असो, वारकरी आजवर आपल्या समस्यांकरिता शासनाकडे नेहमी जात आले आहेत. कारण, वारकऱ्यांच्या समस्या मांडण्यात काहीही गैर नाही. विविध पक्षांच्या वारकरी आघाड्या फक्त वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्यापुरत्या मर्यादीतच असाव्यात. त्यांनी प्रचारात उतरू नये."

सत्ता आणि वारकरी संप्रदायाच्या नात्याबद्दल ज्ञानेश्वर बंडगर म्हणतात की, "वारकरी हा देखील समाजाचा भाग आहेत आणि त्यांचेही काही प्रश्न असू शकतात.

ते सोडवण्यासाठी म्हणून राजकारण्यांशी संबंध असणं ही वेगळी गोष्ट आहे. राजकारण्यांशी अंतर ठेवून कसं वागायचं, यासंदर्भातील विवेक महत्त्वाचा आहे."

याहून वेगळा मुद्दा सचिन परब मांडतात. ते म्हणतात की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये नेहमीच मध्यवर्ती राहिला आहे. त्यामुळे, या वैचारिक-सांस्कृतिक लढाईमध्ये आपला विचार हाच वारकरी विचार असल्याचं ठसवण्यामध्ये हिंदुत्ववादी मंडळी यशस्वी झाल्याचा मुद्दा ते अधोरेखित करतात.

वारकरी

ते म्हणतात की, "हिंदुत्ववाद्यांचा प्रतिवाद करण्यात पुरोगामी मंडळी फारच मागे पडली आहेत. वैदिक हिंदू धर्माहून वेगळा असणारा वारकरी विचार हा हिंदुत्ववादी विचारसरणीहून कसा वेगळा आहे, याची मांडणी वारकऱ्यांपर्यंत पोहोचवणंही गरजेचं होतं.

मात्र, हिंदुत्ववाद्यांशी तुलना करता पुरोगामी लोक अगदीच तोकडी आहेत. ही लढाई राजकीय नसून ती वैचारिक-सांस्कृतिक आहे, याचं भान पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांना नाही. असलं तरीही ते त्यादृष्टीने काही करताना दिसत नाहीत.

सर्वसमावेशकता हाच वारकरी विचार असल्याचं तत्त्वज्ञान मागे पडून संकुचिततेलाच वारकरी विचार म्हणून ठसवण्यामध्ये हिंदुत्ववादी यशस्वी झाले आहेत."

'ज्ञानोबा-तुकाराम' हाच वारकरी संप्रदायाचा विचार आहे, असं म्हटलं जातं. याचा अर्थ, ज्ञानेश्वर ते तुकाराम या परंपरेत येणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या संतांनी जो विचार मांडला आहे, तो विचार म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार होय.

अगदी ज्ञानदेवांच्या आधीपासूनच महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठीची वारी करायला लागल्याचे जाणकार सांगतात. नंतर संत नामदेवांनी संघटीत केलेल्या या वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान दिलं ते संत ज्ञानदेवांनी!

ते या संप्रदायाचा पाया ठरले आणि त्याचा कळस झाले ते संत तुकाराम. अगदी चोखोबासारखा अस्पृश्य असो वा शेख महंमदांसारखा मुसलमान असो, कबीरांसारखा निर्गुणी असो असो वा कान्होपात्रेसारखी वेश्या असो. या सगळ्यांनीच पांडुरंगाला आद्यदैवत मानून 'भेदाभेद भ्रम अमंगळ' असल्याचा विचार मांडला. आपल्या काव्यातून द्वेषापेक्षा प्रेमाचं महत्त्व अधोरेखित केलं.

अगदी बाराव्या शतकापासून ते आजतागायत हा संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अगदी बाराव्या शतकापासून ते आजतागायत वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे.

अगदी बाराव्या शतकापासून ते आजतागायत हा संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक राहिला आहे.

याचा अर्थ, सर्व प्रकारच्या शासन काळात वारकरी संप्रदायाने इतर धर्मांहून वेगळं तरीही सर्व प्रकारच्या 'भेदाभेदाचा आणि द्वेषाचा भ्रम अमंगळ मानणारं' आपलं असं तत्त्वज्ञान आणि अस्तित्व टिकवून ठेवलं आहे.

या शासकांत यादव राजवट, तेराव्या ते सतराव्या शतकापर्यंतची इस्लामी किंवा मुघलांची राजवट, त्यानंतर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आणि नंतरची पेशवाई यांचा समावेश होता.

त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रजांची राजवट तसेच स्वातंत्र्यानंतर मोठा काळ काँग्रेसची सत्ता आणि अगदी अलीकडच्या काळात असलेली भाजप-शिवसेनेची सत्तादेखील आहेतच.

पण, वरीलपैकी कोणत्याही शासन काळात वारी बंद पडलेली नाही. वारकरी संप्रदायाला वाचवण्यासाठीचे प्रयत्न कोणत्याही सत्तेला करावे लागल्याचे दाखलेदेखील इतिहासात उपलब्ध नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)