विधानसभा की 'कुटुंबसभा'? आमदार म्हणून निवडून आलेले सख्खे नातेवाईक कोण आहेत?

संजना जाधव, विलास भुमरे, किरण सामंत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, संजना जाधव, विलास भुमरे, किरण सामंत
    • Author, प्रियांका जगताप
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मोठ्या मताधिक्क्यानं महायुतीला कौल दिला आहे, तर महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला आहे.

राज्यातील 288 जागांपैकी महायुतीनं तब्बल 230 आणि महाविकास आघाडीनं 50 जागा जिंकल्या आहेत, तर इतरांना 8 जागा मिळाल्या.

गेल्या काही वर्षांत देशातलं, तसंच राज्यातलं राजकारण बऱ्याच अर्थानं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा अधिकच गडद झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळालं आहे.

खरंतर भारतीय राजकारण लोकशाही तत्त्वावर आधारित असलं तरी राष्ट्रीय तसंच स्थानिक राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

चळवळींचा इतिहास असलेल्या पुरोगामी म्हणवल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या कुटुंबांचं वर्चस्व असतं, त्यांच्याच कुटुंबाच्या वाट्याला अनेकदा महत्त्वाची राजकीय पदं मिळाल्याचं दिसून येतं.

एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या किंवा अनेक भावंडं सत्तेत असलेली दिसून येतात.

महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील उमेदवारांच्या यादीकडे पाहिल्यास लक्षात येतं की, एकाच राजकीय कुटुंबात एकापेक्षा अनेक पदं असल्याचं पाहायला मिळतं.

कोणकोणत्या राजकीय कुटुंबात किती राजकीय पदं आहेत, कोण कोणाचे नातेवाईक आहेत, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

ग्राफिक

खासदार सुनील तटकरे - आमदार आदिती तटकरे

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे लोकसभेला रायगड मतदार संघातून निवडून आले, तर त्यांच्या कन्या अदिती तटकरे या विधानसभेला श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या आहेत.

त्यामुळे तटकरेंच्या एकाच घरात वडील खासदार आणि मुलगी आमदार अशी दोन पदं आली आहेत.

सुनिल तटकरे आणि अदिती तटकरे

दानवे बहीण-भाऊ

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाला असला तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला आहे.

त्यांच्या कन्या संजना जाधव या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन आमदारकीची पदं घेऊन आलेले दानवे बंधूभगिणी विधानसभेत पोहोचले आहे.

संजना जाधव आणि संतोष दानवे

किरण सामंत-उदय सामंत

शिवसेनेच्या शिंदे गटाचे उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदार संघातून पुन्हा एकदा निवडून आले आहेत.

शिवाय, त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हेदेखील विधानसभेला राजापूर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे या सामंत बंधूंची जोडी विधानसभेत आता एकत्र पाहायला मिळणार आहे.

किरण सामंत आणि उदय सामंत

राणे कुटुंबात एक खासदार दोन आमदार

भाजप खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलं यंदा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उभी होती. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.

तर शिंदेंच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे एकाच घरात वडील खासदार तर दोन मुलं आमदार अशी पदं आली आहेत.

 निलेश राणे आणि नितेश राणे

मावसभावांची जोडी

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार झाले, तर त्यांचेच सख्खे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळं या मावसभावांची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे.

आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा कोपरी-पाचपखाडी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे वडील आमदार आणि पुत्र खासदार अशी दोन्ही पदं एकाच घरात आली आहेत.

पवार 'पॉवर'

शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेले नेते आहेत.

आताही पवार कुटुंबातील शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत. त्यांचे पुतणे अजित पवार बारामतीमधून विधानसभेला निवडून आले आहेत आहेत, तर शरद पवारांचे नातू रोहित पवार कर्जत जामखेडमधून विधानसभेला निवडून आले आहेत. त्यामुळं एकाच घरात दोन आमदार आणि एक खासदार ही पदं आली आहेत.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार

जयंत पाटील-सत्यजीत देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजीत देशमुख हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले.

जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजीत यांच्या पत्नी रेणुका सख्ख्या बहिणी आहेत. या दोघी म्हैसाळचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यामुळं आता एकाच घरातील दोन जावई विधानसभेत पाहायला मिळणार आहेत.

जयंत पाटील आणि सत्यजीत देशमुख

संदीपान भुमरे-विलास भुमरे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे निवडूण आले आहेत.

शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे विलास भुमरे हे पुत्र आहेत. त्यामुळं एकाच घरात आमदार आणि खासदार ही पदं मिळाली आहेत.

संदीपान भुमरे आणि विलास भुमरे

कर्डिले-जगताप

भाजपचे शिवाजीराव कार्डिले राहुरी मतदार संघातून निवडून आले आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असलेले त्यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर शहरामधून विधानसभेला निवडून आले आहेत.

शिवाजीराव कार्डिले आणि संग्राम जगताप

मुंडे भावंडं

भोकर मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे त्यांचे वडील आहेत.

साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्र राजे आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे चुलत बंधू आहे.

साताऱ्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेले प्रतापसिंह राजे भोसले यांचे उदयनराजे भोसले हे पुत्र आहेत, तर साताऱ्याचे आमदार आणि खासदार अशी दोन्ही पदे भूषवलेली अभयसिंह राजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू होते. शिवेंद्रराजे भोसले हे अभयसिंह यांचे पुत्र आहेत.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. तर भाजपच्या आमदार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ही चुलत भावंडं आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवर गटाचे आमदार छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत.

हेरंब कुलकर्णी

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, हेरंब कुलकर्णी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्रातल्या या घराणेशाहीवर बीबीसी मराठीने सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचित केलीय. त्यांनी घराणेशाहीसंदर्भात अभ्यास करून, 'महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही' असा अहवालही तयार केलाय.

हेरंब कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "हजारो कार्यकर्ते आयुष्यभर एखाद्या मतदार संघासाठी काम करतात. परंतु, घराणेशाहीच्या राजकारणामुळे त्यांचं राजकीय करिअर पुढं जात नाही, हे लोकशाहीत अन्यायकारक आहे."

नव्या विधानसभेत एकाच घरातील दोन-दोन व्यक्ती आता सभागृहात शेजारी-शेजारी बसणार आहेत.

घराणेशाही वाढत जाण्याचं कारण सांगताना हेरंब कुलकर्णी म्हणतात की, नवीन पिढीचा नेता आला, तर त्याच्याजवळ जाऊन त्यांच्या नजरेत स्वतःचं स्थान पक्कं करायच्या स्पर्धेत कार्यकर्ते अडकतात. कारण कार्यकर्ते हे नेत्यांच्या आधारानं जगत असतात. त्यामुळं बंड किंवा संघर्ष केला तर आपण बाहेर फेकले जाऊ आणि नेत्यांच्या ओळखीतून मिळणारा विविध प्रकारचा फायदा किंवा पदं गमावून बसू ही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात असते."

दरम्यान, एककीकडे विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळत नसताना, दुसरीकडे एकाच राजकीय कुटुंबातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं जातं, हे 'पुरोगामी' म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात घडतंय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)