वेगाने आलेल्या एका चेंडूनं 17 वर्षांच्या क्रिकेटपटूचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

    • Author, लाना लॅम
    • Role, सिडनी

मेलबर्नच्या मैदानावर एक दुर्दैवी प्रसंग घडला आहे. अवघ्या 17 वर्षांचा क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा सरावादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला.

हेल्मेट घातलेलं असतानाही नेक गार्ड नसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात शोककळा पसरली असून, यामुळे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

बेन ऑस्टिन मंगळवारी (28 ऑक्टोबर) फर्नट्री गली येथे नेट्सवर सराव करत होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातलं होतं, परंतु नेक (मान) गार्ड घातलेला नव्हता.

सरावादरम्यान तो बॉलिंग मशीनवरून येणाऱ्या चेंडूंचा सामना करत होता. परंतु, वेगाने आलेला एक चेंडू थेट त्याच्या मानेला लागला.

आपत्कालीन पथकाने (इमर्जन्सी स्टाफ) लगेचच घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी बेनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. त्याला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आलं होतं, पण गुरुवारी (30 ऑक्टोबर) त्याचा मृत्यू झाला.

'जे आवडायचं ते करतानाच गेला'

घटनेनंतर बेनच्या वडिलांनी सांगितलं की, बेनला क्रिकेट खूप आवडायचं आणि तोच त्याच्या आयुष्यातील मोठा आनंद होता.

ते म्हणाले, "या दु:खद घटनेने बेनला आमच्यापासून हिरावून नेलं आहे. तो अनेक वर्षांपासून जे करत आला, तीच गोष्ट तो आता करत होता, ती म्हणजे उन्हाळ्यात मित्रांसोबत नेटमध्ये क्रिकेट खेळणं. आम्हाला त्याचंच समाधान आहे."

या दुर्दैवी घटनेच्या वेळी जो मुलगा बॉलिंग मशीनच्या मदतीने बेनला चेंडू टाकत होता, त्या सहकाऱ्याच्या आम्ही पाठीशी आहोत, असं ऑस्टिन कुटुंबानं म्हटलं आहे.

ते म्हणाले, "या घटनेचा परिणाम दोन मुलांवर झाला आहे, आणि या कठीण काळात आम्ही मनापासून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत."

"आम्ही बेनला गमावल्याने संपूर्ण कुटुंब हादरलं आहे," असं बेनचे वडील जेस ऑस्टिन म्हणाले.

तर क्रिकेट व्हिक्टोरियाने, बेनच्या मृत्यूने देशभरातील क्रिकेट समुदाय शोकात आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

बेनच्या मृत्यूमुळे आमचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे, असं जेस ऑस्टिन म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "ट्रेसी आणि माझ्यासाठी बेन हा लाडका मुलगा होता, कूपर आणि जॅकचा अतिशय प्रेमळ भाऊ आणि आमच्या कुटुंब व मित्रांच्या आयुष्यातील एक चमकणारा तारा होता."

क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स यांनी हा सगळ्यांसाठी "अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काळ" असल्याचे म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशननुसार, कमिन्स म्हणाले, "बेनच्या मानेला चेंडू लागला होता. हा तसाच अपघात होता जसा दहा वर्षांपूर्वी फिलिप ह्यूजसोबत घडला होता."

फिलिप ह्यूजचाही अशाच अपघातात मृत्यू

2014 मध्ये शेफिल्ड शिल्ड सामन्यात फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूज याचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर खेळातील सुरक्षात्मक साधनांमध्ये सुधारणा करण्यात आली.

ह्यूजला सिडनीतील रुग्णालयात कृत्रिम कोमामध्ये ठेवण्यात आलं होतं, आणि दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.

ह्यूजच्या डोक्याच्या मागच्या डाव्या भागाला दुखापत झाली होती. तिथं हेल्मेटची सुरक्षा नव्हती. ती जागा हेल्मेटच्या खाली होती, हे स्पष्ट झालं.

कमिन्स यांनी बेनच्या निधनाबद्दल दिलेल्या निवेदनात म्हटलं की, "व्हिक्टोरिया आणि राष्ट्रीय पातळीवरील संपूर्ण क्रिकेट समुदाय या दुर्घटनेमुळे खूप व्यथित झाला आहे, आणि हे दु:ख आपल्यासोबत दीर्घकाळ राहील."

त्यांनी बेनची आठवण एक प्रतिभावान खेळाडू, सगळ्यांचा आवडता सहकारी आणि कर्णधार म्हणून केली. तो मेलबर्नच्या साऊथ ईस्ट भागातील अंडर-18 सर्कलमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता.

कमिन्स म्हणाले, "हे पाहून खूप दु:ख होतं की, एक तरुण इतक्या लवकर आपल्यातून निघून गेला. आणि विशेष म्हणजे आपलं आवडतं काम करताना त्याचा मृत्यू झाला आहे."

बेन फर्नट्री गली क्रिकेट क्लबकडून खेळत होता. क्लबने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या तरुण खेळाडूला श्रद्धांजली अर्पण केली. त्याने अनेकांच्या आयुष्यात आनंद आणला होता, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं.

बेनने वेव्हर्ली पार्क हॉक्स ज्युनियर फुटबॉल क्लबकडूनही 100 पेक्षा जास्त सामने खेळले होते. क्लबने सांगितलं की बेन 'दयाळू', सर्वांचा 'आदर करणारा' आणि 'उत्कृष्ट फुटबॉलपटू' होता.

क्लबने लिहिलं, "आमच्या क्लब आणि कम्युनिटीने एक चांगला तरुण सदस्य गमावला आहे. पुढील अनेक वर्षं आम्हाला त्याची उणीव जाणवेल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन