जेमिमाच्या धडाकेबाज खेळीनं भारताची फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनी हरवलं

महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनी शानदार विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली.

नवी मुंबईत डीवाय पाटील स्टेडियमवर भारतासमोर विजयासाठी 339 धावांचं भलं मोठं आव्हान होतं.

पण जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारतानं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. जेमिमालाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमनं धावांचा यशस्वी पाठलाग करताना रचलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या महिला टीमनं विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

याआधी 2005 आणि 2017 साली भारताला उपविजेतेपद मिळालं होतं.

आता 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतच विश्वचषकाचा अंतिम सामना होणार असून त्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असेल.

दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीत इंग्लंडला 125 धावांनी हरवून फायनल गाठली आहे.

महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व आहे आणि यंदाच्या विश्वचषकातही त्यांनी एकही सामना गमावलेला नव्हता. पण त्याच ऑस्ट्रेलियाला हरवण्याची कामगिरी भारतीय महिलांनी केली आहे.

जेमिमा भारताच्या विजयाची शिल्पकार

भारताच्या या विजयात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ठोकलेलं शतक निर्णायक ठरलं.

आपल्या पहिल्याच विश्वचषकात खेळताना जेमिमानं ही शानदार कामगिरी बजावली. तिनं 134 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 धावांची खेळी केली.

जेमिमाचं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधलं हे तिसरंच शतक आहे.

खरं तर जेमिमा एरवी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करते, पण आज तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

त्याविषयी सामन्यानंतर बोलताना जेमिमानं सांगितलं की भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर जेमिमा शॉवर घ्यायला गेली. आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचं आहे, हे तिला आधी माहिती नव्हतं.

खेळायला उतरण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी तिला तिसऱ्या क्रमांकवार खेळावं लागणार असल्याची माहिती मिळाली.

त्याआधी 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या दोन्ही सलामीवीर किम गार्थच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतल्या.

शफाली वर्मान 5 चेंडूंमध्ये 10 धावा करून पायचीत झाली. तर हिलीनं स्मृती मंधानाचा 24 धावांवर झेल टिपला.

मग जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीतनं 167 धावांची झुंजार भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

हरमनप्रीत 88 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांसह 89 धावा करून बाद झाली. अ‍ॅश्ली गार्डनरनं अ‍ॅनाबेल सदरलँडच्या गोलंदाजीवर हरमनप्रीतचा झेल टिपला.

दीप्ती शर्मा लवकर धावचीत झाली. तिनं 17 चेंडूंमध्ये तीन चौकारांसह 24 धावा केल्या.

ऋचा घोषनं आल्या आल्या फटकेबाजी सुरू केली आणि 16 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांसह 26 धावाही केल्या. पण सदरलँडच्या गोलंदाजीवर गार्थनं तिचा झेल टिपला.

अमनजोत कौरनं 8 चेंडूंमध्ये दोन चौकारांसह नाबाद 15 धावा ठोकत भारताच्या विजयाला हातभार लावला.

ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स अशा पडल्या

त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत 338 धावा करून भारतासमोर विजयासाठी 339 धावांचं लक्ष्य ठेवलं.

ऑस्ट्रेलियाच्या फिबी लिचफील्डनं शतक ठोकत त्यांच्या डावाची मजबूत पायाभरणी केली. एलिस पेरी आणि अ‍ॅश्ली गार्डनरनं अर्धशतकं ठोकली.

तर भारताकडून दीप्ती शर्मा आणि श्री चरणीनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. तर क्रांती गौड, अमनज्योत, राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

भारतीय संघात प्रतिका रावलऐवजी शफाली वर्माचा समावेश करण्यात आला, तर हरलीन आणि उमा छेत्रीऐवजी क्रांती गौड आणि ऋचा घोष यांना संघात स्थान देण्यात आलं होतं.

क्रांती गौडनं अगदी लवकर भारताला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. तिनं ऑस्ट्रेलियाची कर्णधार अलिसा हिलीला अवघ्या पाच धावांवर त्रिफळाचित केलं, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता 5.1 षटकांत 1 बाद 25 धावा.

त्यानंतर लगेचच पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं खेळ थांबवावा लागला. पण साधारण पंधरा मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू झाला.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फिबी लिचफील्डनं त्यांच्या टीमचा डाव सावरला.

फिबीनं 93 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि तीन षटकारांसह 119 धावांची भागीदारी रचली आणि कारकीर्दीत पहिल्यांदा विश्वचषकाच्या सामन्यात शतक साजरं केलं.

तसंच एलिस पेरीसह दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारीही रचली.

फिबीच्या या खेळीनं भारताला मात्र बॅकफूटवर नेलं. भारतीय टीमनं खराब फिल्डिंगमुळे विकेट्स काढण्याच्या काही संधीही गमवाल्या.

अखेर लिचफील्डला बाद करण्यात भारताला यश आलं. अमनजोतनं लिचफील्डचा त्रिफळा उडवला.

त्यानंतर फिरकी गोलंदाज श्री चरणीनं बेथ मुनी आणि अ‍ॅनाबेल सदरलँडला बाद केलं. बेथनं 24 तर अ‍ॅनाबेलनं तीनच धावा केल्या.

मग राधा यादवनं एलिस पेरीला 77 धावांवर त्रिफळाचित केलं. पेरीनं 88 चेंडूंमधल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार लगावले.

त्यानंतर ताहिला मॅग्रा 12 धावांवर असताना जेमिमा रॉड्रिग्जच्या थ्रोवर ऋचा घोषनं स्टंप उडवत तिला धावचीत केलं.

अ‍ॅश्ली गार्डनरनं 63 धावांची खेळी केली, पण ती धावचीत झाली आणि ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला.

त्यानंतर राधा यादवनं 50 व्या षटकात अलाना किंगला चार धावांवर तर सोफी मोलिन्यूला शून्यावर मात केलं. तर किम गार्थ 17 धावांवर धावचीत झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)