You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटर्सचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्यांना अटक; कोण आहेत हे आरोपी?
मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत एका व्यक्तीनं गैरवर्तन केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणी ऑस्ट्रेलिया संघाचे संरक्षण अधिकारी डॅनी सिमन्स यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 74 (जे एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करण्याशी संबंधित आहे) आणि कलम 78 (महिलांचा पाठलाग करणे किंवा स्टॉकिंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
इंदूरचे ऍडिशनल डेप्यूटी पोलीस कमीश्नर (क्राईम) राजेश दंडोतिया यांनी बीबीसीशी बोलताना याबाबत माहिती दिली.
"अकील अहमद खजरानामध्ये राहणारा आरोपी आहे. त्याने गाडी चालवत दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत छेडछाड केली तसेच तो बॅड टच करून पळून गेला होता.
या प्रकरणी गुन्हा नोंद करून पाच पोलीस ठाण्यांमधील पथकांनी मिळून आरोपीला अटक केली आहे."
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी साधारणत: 11 वाजता घडली.
तेव्हा दोन ऑस्ट्रेलियन खेळाडू इंदूरमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमधून पायी चालत 500 मीटरवर असलेल्या खजराना रोडवरील एका कॅफेमध्ये जात होत्या.
इंदूरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, "महिला खेळाडू बाहेर जात असताना बाईकवरील एका व्यक्तीनं त्यांचा पाठलाग केला. तसेच, त्यांच्याविषयी अपशब्द वापरले.
घाबरलेल्या खेळाडू त्वरित हॉटेलमध्ये परतल्या आणि त्यांनी आपल्या संघाच्या व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यानंतर, ऑस्ट्रेलियन टीमच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली."
राजेश दंडोतिया यांनी असंही सांगितलं की, "पोलिसांच्या एका टीमने तत्परतेनं या प्रकरणी तपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला.
त्यामध्ये आरोपी मोटारसायकलवरून या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा पाठलाग करताना दिसून आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे."
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 30 सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत खेळला जात आहे.
या चषकाचा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
बीबीसीआयने काय म्हटलं?
या प्रकरणी बीसीसीआयचे व्हाईस प्रेसीडेंट राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजीव शुक्ला यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे की, "आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध करतो. लोकांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की, त्या (महिला खेळाडू) परदेशी पाहुण्या आहेत आणि आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. इंदूर पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. बीसीसीआय आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने देखील आपल्या बाजूने पावलं उचलली आहेत."
राजीव शुक्ला यांनी पुढे म्हटलंय की, "बीसीसीआयला असं वाटतं की, अशाप्रकारची घटना पुन्हा घडू नये."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)