महिला विश्वचषकात भारतीय टीमची पाकिस्तानवर मात, 88 धावांनी दणदणीत विजय

महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय टीमने पाकिस्तानला 88 धावांनी हरवलं आहे.

भारताने पाकिस्तानसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानची टीम 43 ओव्हरमध्ये 159 धावा बनवून ऑलआउट झाली.

भारताने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था 31 व्या षटकात 5 बाद 102 अशी झाली.

भारताच्या क्रांती गौडनं भेदक मारा करून तीन विकेट्स काढल्या आहेत. क्रांती सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील ठरली.

दीप्ती शर्माने देखील तीन विकेट्स घेतल्या.

महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं भारताच्या डावात सर्व विकेट्स काढण्याची कामगिरी बजावली आहे.

पण आजवर पाकिस्तानी महिलांना भारताविरुद्ध वन डेत 200 धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. या सामन्यातही पाकिस्तानला 159 धावांवर रोखून भारताने ही परंपरा कायम ठेवली आहे.

पाकिस्तानकडून सिदरा अमीनने 81 धावांची इनिंग खेळली.

मुनीबा अलीच्या रन आऊटची चर्चा

पाकिस्तानची सलामीवीर मुनिबा अलीच्या विकेटची बरीच चर्चा होते आहे, कारण काहीशा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत मुनिबा बाद झाली. पाकिस्तानच्या डावातील चौथ्या षटकात हा प्रकार घडला.

क्रांती गौडनं टाकलेल्या त्या षटकातल्या अखेरच्या चेंडूवर मुनीबा पायचीत झाल्याचं अपील आधी भारतानं केलं होतं. तेव्हा मुनीबा धाव घेण्याच्या पवित्र्यात नव्हती, पण क्रीझमधून बाहेर गेली होती.

तेवढ्यात दीप्ती शर्मानं स्लीपमधून बॉल स्टंपवर फेकला. मग रनआऊटसाठी पंचांनी थर्ड अंपायरकडे रीव्ह्यू मागितला.

मुनीबानं आधी बॅट क्रीझमध्ये टेकवली होती, पण नंतर क्षणभर उचलली. नेमका ज्याक्षणी बॉल स्टंपवर आदळून बेल्स उडाल्या, त्या क्षणी मुनीबाची बॅट हवेत होती. त्यामुळे थर्ड अंपायर केरीन क्लास्टनी तिला बाद ठरवलं.

गोंधळात भर पडली, कारण आधी मुनीबा नाबाद असल्याचं स्टेडियममधल्या स्क्रीनवर झळकलं. कदाचित केरीन यांनी तोवर पूर्ण क्लिप पाहिली नसल्याचं नंतर समोर आलं. संपूर्ण रिप्ले पाहिल्यावर मुनीबानं बॅट थोडी वर उचलल्याचं दिसलं तेव्हा थर्ड अंपायरनी तिला बाद केलं.

मुनीबानं पॅव्हेलियनकडे परतायला सुरुवात केली, पण या निर्णयानं पाकिस्तानच्या गोटात गोंधळ उडाला होता. त्यांनी डगआऊटमधून मुनीबाला सीमारेषेवर मैदानातच थांबायच्या सूचना केल्या. फोर्थ अंपायर किम कॉटन यांच्याशी पाकिस्तानी कर्णधार फातिमा साना चर्चा करताना दिसली.

स्पष्टीकरण मिळाल्यावर मुनीबाला पॅव्हेलियनमध्ये परतण्याची सूचना मिळाली आणि पुढची फलंदाज सिद्रा अमीन मैदानात उतरली.

महिला वन डे क्रिकेटमध्ये ICC च्या प्लेयिंग कंडिशनच्या नियम 30.1.2 नुसार एखाद्या खेळाडूनं रन घेण्याच्या पवित्र्यात असताना किंवा डाईव्ह करत असताना त्यांची बॅट क्रीझमध्ये टेकवून मग वर उचलली असेल तर त्यांना नाबाद ठरवता येतं. मुनीबा धाव काढण्याच्या किंवा डाईव्ह करण्याच्या पवित्र्यात नव्हती त्यामुळे तिची बॅट वर उचलली गेल्यावर बेल्स उडाल्या तेव्हा ती बाद ठरली.

नंतर रिप्लेमध्ये मुनीबा आधी पायचीतही झाल्याचं स्पष्ट झालं.

कीटकांमुळे जेव्हा सामना थांबला

या सामन्यात उडणाऱ्या किटकांमुळे खेळ काही काळासाठी थांबवावा लागला.

मैदानावर उडणारे कीटक खेळाडूंच्या डोक्यावर घिरट्या घालत होते आणि डोळ्यांत जात होते. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी करताना अडचण येत होती.

पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी छोट्या स्प्रेचा वापर करून किडे पळवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर अडचण एवढी वाढली की भारतीय डावादरम्यान खेळ काही काळ थांबवावा लागला.

मग मैदानात सगळीकडे कीटकनाशकांची फवारणी केल्यावरच सामना पुन्हा सुरू झाला.

याआधी कधी उडत्या मुंग्या किंवा मधमाशांमुळेही खेळ थांबवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॉस, हँडशेक आणि वाद

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या तणावाचं प्रतिबिंब क्रिकेटमध्ये उमटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच आशिया चषकात भारताच्या पुरुष खेळाडूंनी पाकिस्तानी टीमला तीनदा हरवलं, तेव्हा तीन्ही सामन्यांत हस्तांदोलन केलं नव्हतं.

कोलंबोमध्येही हरमनप्रीत कौर आणि फातिमा सना या दोघीही नाणेफेकीसाठी आल्या तेव्हा त्यांनी हस्तांदोलन केलं नाही.

पण या न झालेल्या हस्तांदोलनाएवढीच प्रत्यक्ष नाणेफेकीच्या वेळेस घडलेल्या घडामोडींचीही चर्चा झाली.

या लढतीत पाकिस्ताननं हा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पण टॉसच्या वेळेस फातिमा सनानं हेड्स नाहीस तर टेल्स म्हटल्याचा दावा काही सोशल मीडिया यूझर्सनी केला आहे.

प्रत्यक्षात सामन्याच्या ब्रॉडकास्टर्सनी दाखवलेल्या टॉसच्या क्लिपमध्ये सना हेड्स म्हणताना ऐकू येतं आणि मॅच ऑफिशियल्सनीही हेड्स इज द कॉल असं स्पष्ट म्हटलं आहे.

भारताच्या डावात काय घडलं?

महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्ताननं भारताच्या डावात सर्व विकेट्स काढण्याची कामगिरी बजावली .

भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने 32 चेंडूत चार चौकारांसह 23 धावा केल्या. मात्र स्मृती पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्या चेंडूवर पायचीत झाली.

त्यानंतर प्रतीका रावलला 37 चेंडूत 31 धावा काढल्यानंतर सादिया इक्बालने त्रिफळाचीत केले.

तर, कर्णधार हरमनप्रीत कौरला 19 धावा काढल्यानंतर डायना बेगच्या गोलंदाजीवर सिद्रा नवाजने झेलबाद केले.

हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. तिनं 65 चेंडूंमधल्या खेळीदरम्यान चार चौकार आणि एक षटकारही लगावला.

जेमिमा रॉड्रिग्सनं 32, दीप्ती शर्मानं 25, स्नेह राणानं 20 तर रिचा घोषनं नाबाद 35 धावा केल्या.

पाकिस्तानकडून डायना बेगनं 4, सादिया इक्बालनं आणि फातिमा सानानं प्रत्येकी 2 तर रामीन शमीम आणि नाश्रा संधूनं प्रत्येकी एक विकेट काढली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)