क्रिकेटमध्ये पुरुषांच्या आधी महिलांनी केलेले 10 विक्रम, वन डे तील 400 धावांचाही समावेश

महिला क्रिकेटची सुरुवात अगदी अलीकडेच झाली असा अनेकांचा गैरसमज असतो. महिला क्रिकेट पुरुषांच्या तुलनेत बरंच मागे आहे असंही अनेकांना वाटतं.

पण महिला अगदी अठराव्या शतकातही क्रिकेट खेळायच्या.

जुलै 1745 मध्ये इंग्लंडमध्ये महिलांचा पहिला सामना झाल्याची नोंद आहे आणि महिला क्रिकेटमधला पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना 1934 मध्ये खेळवला गेला होता.

पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटचा प्रसार थोडा संथपणे झाला. पण क्रिकेटमध्ये अनेक गोष्टींची सुरुवात महिला क्रिकेट पासून झाली आहे.

विशेषतः वन डे क्रिकेटमध्ये अशा अनेक गोष्टी आणि अनेक विक्रम आहेत जे पुरुषांच्या आधी महिलांनी केले आहेत.

त्यातले काही विक्रम भारतीयांच्या नावावर जमा आहेत. काही प्रमुख विक्रमांचा आढावा घेऊया

1. वन डे क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक

वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक म्हटलं की अनेकांना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, रोहित शर्मा, अशांची आठवण येईल.

पण हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे.

2010 साली ग्वाल्हेरमध्ये सचिननं द्विशतक ठोकलं होतं. पण त्याच्या तेरा वर्ष आधी म्हणजे 1997 मध्ये बेलिंडानं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक ठोकलं होतं.

मुंबईतल्या एमआयजी क्लबच्या ग्राऊंडवर 16 डिसेंबर 1997 रोजी महिला विश्वचषकात डेन्मार्कविरुद्धच्या लढतीत बेलिंडानं 155 चेंडूंमध्ये 22 चौकारांसह 229 धावांची खेळी केली होती.

2. वन डेत एकाच डावात चारशे धावा

बेलिंडा क्लार्कनं द्विशतक ठोकलं, त्याचं सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला टीमनं 50 षटकांत तीन बाद 412 धावा करत विक्रम रचला.

त्यांचा संघ पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चारशेची वेस ओलांडणारा पहिला संघ ठरला.

पुरुष क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्गमध्ये 2006 साली झालेल्या वन डे सामन्यात प्रत्येकी चारशे धावा नोंदवल्या. त्याच्या नऊ वर्ष आधीच ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी वन डेत चारशेची वेस ओलांडली होती.

3. वन डेत एकाच डावात पाच विकेट्स

वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी पहिल्यांदा बजावण्याचा विक्रमही एका महिलेच्या नावावर आहे.

1973 सालच्या महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या टिना मॅकफेर्सननं यंग इंग्लंड महिला संघाविरुद्ध 12 ओव्हर्समध्ये अवघ्या 14 धावा देत पाच विकेट्स काढल्या होत्या. (त्या काळी वन डे सामने 50 नाही तर 60 षटकांचे असायचे)

टिनाच्या कामगिरीनंतर दोन वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीनं पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ही कामगिरी साधली. 1975 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध लीड्स इथे झालेल्या सामन्यात लिलीनं 12 षटकांत 34 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट्स काढल्या होत्या.

4. एकाच वन डेत सहा डिसमिसल्स

विकेटकीपिंगमध्येही महिला क्रिकेटर्स पुरुषांपेक्षा मागे नाहीत.

पुरुषांच्या वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक सहा डिसमिसल्सचा विक्रम अ‍ॅडम गिलख्रिस्टनं 2000 साली रचला, पण त्याच्या सात वर्ष आधी दोन महिला विकेटकीपर्सनी ही कामगिरी बजावली होती.

त्या दोघी म्हणजे भारताच्या कल्पना वेंकटाचर आणि न्यूझीलंडच्या सारा इलिंगवर्थ. 1993 सालच्या विश्वचषकात एकाच दिवशी दोघींनी ही कामगिरी बजावली होती.

कल्पना यांनी डेन्मार्कविरुद्धच्या लढतीत पाच यष्टीचीत आणि एक झेल अशी सहा डिसमिसल्सची नोंद केली. तर सारा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच झेल आणि एक यष्टीचीत अशी सहा डिसमिसल्स नोंदवली.

5. कसोटीत शतक आणि दहा विकेट्स

ऑलराऊंडर म्हणून कसोटीत एकाच मॅचमध्ये शतक आणि दोन्ही डावांत मिळून दहा विकेट्स घेण्याची कामगिरी अ‍ॅलन डेव्हिडसन यांनी 1960 साली तर इयान बोथम यांनी 1980 साली बजावली होती.

पण ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटर बेट्टी विल्सन यांनी 1958 सालीच हा नोंदवला होता.

त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळताना मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 4 विकेट्स काढल्या होत्या आणि दुसऱ्या डावात शतकही ठोकलं होतं.

6. वन डेतली पहिली टाय मॅच

वन डे क्रिकेटमधील पहिली टाय मॅच महिला क्रिकेटमधलीच आहे.

1982 साली इंग्लंड आणि न्यूझीलंडमधल्या सामन्यात दोन्ही टीम्सनी 147 रन्स केल्या होत्या.

7. सर्वात तरुण क्रिकेटर

सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटर कोण असं विचारलं तर तुम्ही सहज सचिन तेंडुलकर, मुश्ताक मोहम्मद, हसन राजा अशी नावं घ्याल.

पण हा विक्रम पाकिस्तानच्या साजिदा शाहच्या नावावर जमा आहे, जिनं 2000 साली वयाच्या तेराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समध्ये खेळलेली सर्वात तरुण क्रिकेटर ठरण्याचा विक्रम शफाली वर्माच्या नावावर जमा आहे.

8. पहिला वर्ल्ड कप आणि टी20 सामना

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये पहिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 1975 साली भरला, पण त्याच्या दोन वर्ष आधी 1973 मध्ये महिला विश्वचषकाचं आयोजन झालं होतं.

जगातला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी 20 सामनाही महिला क्रिकेटमध्ये रंगला.

5 ऑगस्ट 2004 रोजी झालेल्या त्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये लढत झाली.

तर पुरुषांच्या ट्वेन्टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची सुरुवात 17 फेब्रुवारी 2005 रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडधल्या लढतीनं झाली.

9. पिंक बॉल क्रिकेट

डे नाईट क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि टेस्ट क्रिकेटला घटता प्रतिसाद यावर उपाय म्हणून डे नाईट टेस्ट क्रिकेटची सुरुवात झाली.

नेहमीच्या लाल किंवा पांढऱ्या चेंडूऐवजी गुलाबी रंगाच्या चेंडूनं हे सामने खेळले जातात.

पण पहिला पिंक बॉल सामना पुरुषांच्या नाही तर महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळला होता.

2008 साली क्वीन्सलँड आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांनी एका प्रदर्शनीय ट्वेन्टी20 सामन्यात पिंक बॉलचा वापर केला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पिंक बॉलचा वापर पहिल्यांदा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधल्या लढतीत 2009 साली करण्यात आला होता.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं पिंक बॉल स्वीकारेपर्यंत 2015 साल उजाडलं, त्यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं अडलेड टेस्टमध्ये पिंक बॉलचा वापर केला.

10. ओव्हरआर्म बोलिंग

इतकंच नाही, तर मुळात क्रिकेटमधील ओव्हरआर्म बोलिंगमागेही एक महिलाच असल्याचं सांगितलं जातं.

एकोणिसाव्या शतकातली क्रिकेटर ख्रिस्टिना विलेस हिनं 1805 साली खेळताना स्कर्टची अडचण होऊ नये म्हणून वरून बॉल टाकायला सुरुवात केली.

त्यातूनच आधुनिक क्रिकेटचा जन्म झाला, असं अनेक इतिहासकार मानतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)