'मला खरी ओळख लपवून खेळावं लागलं'; माजी क्रिकेटरच्या लेकीचा 'ट्रान्स महिला' म्हणून संघर्ष

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"मी आयुष्यातली पहिली 20 वर्षं पुरुषाच्या शरीरात काढली. क्रिकेट माझ्या रक्तात आहे, पण मला माझी खरी ओळख लपवून खेळावं लागलं."

अनाया बांगर एक क्रिकेटर आणि ट्रान्स महिला म्हणून तिच्या प्रवासाविषयी बोलते, तेव्हा त्यात स्वतःची खरी ओळख मिळण्यासाठीचा तिचा संघर्षही दिसून येतो.

खरं तर आपलं नाव आणि आपली लैंगिक ओळख म्हणजे जेंडर आपल्याला जन्मासोबतच दिलं जातं. पण काहीजणांसाठी ती ओळख त्यांची खरी ओळख नसते. असं घडतं, तेव्हा त्या व्यक्तीची घुसमट होते आणि स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यासाठीही धाडस दाखवावं लागतं.

अनायानं ते धाडस दाखवलं आहे आणि आता क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा ती मांडते आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत तिनं या वाटचालीविषयी सांगितलं.

आर्यन ते अनाया, अस्तित्वाचा प्रवास

अनाया आधी आर्यन बांगर म्हणून ओळखली जायची. माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्या पोटी जन्माला आल्यानं साहजिकच तिला घरातच क्रिकेटचं बाळकडूही मिळालं.

त्या काळात तिनं आर्यन म्हणून पुरुषांच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या वयोगटांमध्ये मुंबई आणि पाँडिचेरीचं प्रतिनिधित्व केलं. पण आरशात दिसणारा चेहरा आपला नाही, ही आपली खरी ओळख नाही, याची जाणीव तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

ती सांगते, "आठ-नऊ वर्षांची असेन, तेव्हा मला या गोष्टीची हळूहळू जाणीव होऊ लागली. पण प्रत्यक्षात मी ते स्वीकारेपर्यंत बराच काळ गेला. कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मी 20-21 वर्षांची असताना मला माझी जेंडर आयडेंटीटी समजली, जी मी इतकी वर्ष दाबून ठेवली होती."

आपली लैंगिक ओळख बाजूला ठेवून क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं. कधी साधं नेलपेंट लावून गेल्यावरही आर्यनची खिल्ली उडवली गेली.

त्यात एका क्रिकेटरचं अपत्य, म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं जायचं. "त्यावेळी मी लोकांना तोंड द्यायला तयार नव्हते. माझी खरी ओळख समजली, तर क्रिकेट सोडावं लागेल असा दबावही वाटायचा. ते खूपच असह्य होतं."

शेवटी तिनं युकेमध्ये जायचा निर्णय घेतला. तिथल्या क्लब्जमध्ये खेळायचं, मास्टर्स डिग्री मिळवायची, शिक्षण घ्यायचं आणि सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा, असं तिनं ठरवलं.

युकेमध्ये कधी क्लबच्या ड्रेसिंगरूमध्ये तर कधी मित्रांच्या घरी राहात तिची वाटचाल सुरू झाली. अडचणी बऱ्याच आल्या, पण तिथल्या थोड्या खुल्या वातावरणात अनायाला हळूहळू मनासारखं जगता येऊ लागलं आणि तिनं हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा निर्णय घेतला.

तिनं मग स्वतःसाठी नवं नाव निवडलं – अनाया अर्थात अद्वितीय.

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय?

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे HRT ही अशी उपचारपद्धती, जी मानवी शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्सची म्हणजे संप्रेरकांची पातळी कायम राखण्यात मदत करते.

अनेकदा वेळेआधीच मेनोपॉजची लक्षणं असलेल्या महिलांवर उपचारांसाठीही या थेरपीचा वापर केला जातो.

तसंच HRT हा जेंडर ट्रान्झिशन म्हणजे लिंगबदल प्रक्रियेचाही महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ जन्मतः पुरुषाचं शरीर असलेल्या पण ट्रान्स महिला अशी ओळख असलेल्या व्यक्तीला स्वतःची खरी लैंगिक ओळख मिळवताना HRT ची मदत होते.

पण या थेरपीचे अनेक साईड इफेक्ट्सही आहेत.

अनाया त्याविषयी सांगते, "मी आयुष्यातली पहिली 20 वर्षं पुरुषाच्या शरिरात काढली होती. असं शरीर ज्यात पुरुषाचे हार्मोन्स होते. त्यामुळे ही थेरपी घेऊ लागल्यावर विचार करण्याची, जगण्याची पद्धतच बदलली."

"त्या बदलांतून जातानाही पहिले 6 महिने ते 1 वर्ष म्हणजे पुन्हा एकदा किशोरवयातून गेल्यासारखं वाटत होतं."

एका बाजूला क्रिकेट आणि करियर सांभाळताना HRT मुळं होणाऱ्या बदलांचा सामना तिनं कसा केला, याविषयी अनाया सांगते,

"सगळं खूप कठीण होतं. आजही कठीण आहे. मी ट्रान्झिशनची प्रक्रिया सुरू करून आता दीडच वर्ष झालं आहे."

"असाही विचार यायचा की लोकांना कसं सामोरं जाणार? जग आता मला वेगळ्या नजरेनं बघू लागलंय, त्याचा सामना कसा करायचा? मी आधी जशी राहात होते, तसं राहायचा प्रयत्न करत होते आणि हे असं होईल याची मला कल्पना होती. पण ते प्रत्यक्षात घडतं, तेव्हा त्याचा सामना करणं कठीण जातं. लोक काय म्हणतात याचा विचार न करता मी माझ्यात होणाऱ्या बदलांना सामोरी गेले."

जवळच्यांचा पाठिंबा आणि क्रिकेट विश्वातील प्रतिक्रिया

एकवेळ लोकांना तोंड देणं सोपं असतं, पण घरच्यांचं काय? अनाया सांगते की, मित्रांनी काही दिवसांतच तिची ओळख स्वीकारली, पण आई-वडिलांसह काहींना हे स्वीकारण्यासाठी वेळ लागला.

"आईवडिलांना मी सांगितलं, तेव्हा मी यूकेमध्ये होते. मी त्यांच्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली होती. ट्रान्स व्यक्ती म्हणजे काय असतं, काय अनुभव असतात हे मांडणारे काही व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये होते. पहिल्यांदा मी त्यांना माझ्याबद्दल सांगितलं तेव्हा ती प्लेलिस्ट आधी पाठवली होती."

"ते अजूनही हळूहळू स्वीकारत आहेत. पण माझा धाकटा भाऊ अथर्व पाठीशी उभा राहिला आहे. तो माझं जेंडर बदलल्यावरही नेहमीसारखा, म्हणजे मी त्याचं भावंडच आहे असाच वागतो. तो आता माझा उल्लेख त्याची बहीण म्हणून करतो. ही गोष्ट खूप दिलासा देणारी आहे."

न बदलेली आणखी एक गोष्ट आहे. मुशीर आणि सर्फराज खान या मुंबई आणि भारतासाठी खेळणाऱ्या क्रिकेटर्ससोबतची अनायाची मैत्री. मुंबईला परतल्यावर तिनं सर्फराजसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

"त्यांना भेटले तेव्हा कळलं आमची मैत्री आधी लहानपणी जशी होती, तशीच आताही कायम आहे. हे पाहून मला मोठा दिलासा मिळाला. क्रिकेटच्या जगात हे दोघं कायम माझ्या पाठीशी उभे राहिले."

"बाकी अनेकांनी समोरून मला आदरानं वागवलं, पण माझ्या मागे बरंच काही बोलल्याचं मी ऐकलं आहे. खरं सांगायचं तर मला आता फरक पडत नाही."

पण अनायानं 2024 मध्ये तिची नवी ओळख अखेर सोशल मीडियावरून जगासमोर मांडली, तेव्हा अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.

त्यानंतर एका मुलाखतीत अनायानं गौप्यस्फोट केला की, एका सीनियर क्रिकेटरनं तिला न्यूड फोटो पाठवले होते. तसंच क्रिकेटमधल्या काहींचं वागणं किंवा फोनवरचा संवाद असभ्य होता.

हे सगळं बोलून दाखवल्यावर आता परिस्थिती बदलली आहे का?

अनाया सांगते, "काही फरक तर पडला नाही. लोकांना वाटतं की मी लक्ष वेधण्यासाठी हे केलं. पण माझं सत्य सर्वांना कळावं, असंच फक्त मला वाटतं.

"माझी कहाणी त्यातल्या चांगल्या-वाईट भागासह लोकांना कळावी. कारण त्यातून त्यांना कळेल की ट्रान्सवूमन असणं म्हणजे काय असतं. त्यांचे अनुभव काय असतात."

"ट्रान्सजेंडर व्यक्तींना लोक रस्त्यावरही पाहतात, त्यांना हीन वागणूक देतात. पण थोडा आदर ठेवायला हवा. आम्ही आमचे अनुभव शेअर करत राहिलो, तर त्यातून लोकांना कळेल आणि ते सर्वांचा आदर राखतील."

क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांना प्रतिनित्वासाठी लढा

गेल्या वर्षी आयसीसीनं आणि काही आठवड्यांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं म्हणजे ईसीबीनं ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यावर बंदी घातली.

अनायाच्या मते अशी सरसकट बंदी योग्य नाही. "मला मान्य आहे की, काही ट्रान्स महिलांना त्यांनी हार्मोन थेरपी घेतल्यावरही मेल प्युबर्टीतून गेल्याचा लाभ मिळत असेल. पण अनेकजण असे आहेत जे ट्रीटमेंटनंतर किंवा सर्जरी केल्यानंतर आणखी कमजोर होतात. ते महिलांएवढे किंवा कधी कधी त्यांच्यापेक्षाही कमी ताकदवान असतात."

अनायाच्या मते पूर्ण बंदी घालण्याऐवजी सर्वात ताकदवान महिला खेळाडू आणि सर्वात कमजोर महिला खेळाडू यांच्यातलं मार्जिन किंवा अंतर पाहावं आणि जे त्या मार्जिनमध्ये बसतात, त्यांना खेळू देण्यास हरकत नसावी.

"माझी आयसीसीला आणि क्रिकेट संघटनांना विनंती आहे की, यावर अजून थोडा विचार करा आणि गाईडलान्स तयार करा."

"आयसीसी आणि ईसीबीच्या नियमांनुसार आता मेल प्युबर्टीमधून गेलेल्या म्हणजे किशोरवयात पुरुष म्हणून शरिराचा विकास झालेल्या व्यक्तींना HRT केल्यानंतरही महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही."

"पण भारतासारख्या देशात 18 वर्षांखालील वयात HRT करताच येत नाही. या सगळ्यात काहीतरी मार्ग निघायला हवा. माझ्यासारखे अनेकजण आहेत – कदाचित आणखी काही क्रिकेटर्स त्यांचं जेंडर लपवून खेळत असतील."

एखाद्याला नेमका शारिरीक ताकदीचा कसा लाभ होतो याचाही विचार करायचा हवा, असं ती नमूद करते.

"मायकल फेल्प्ससारख्या खेळाडूचं शरीरच जणू स्विमिंगसाठी बनलं होतं. मग त्याला त्या अतिरिक्त शारिरीक ताकदीचा फायदा मिळतोय, म्हणून तुम्ही त्याला काही वेगळ्या कॅटेगरीत टाकलं का?"

"त्याला इतर पुरुषांसोबत खेळू दिलं जातं, का तर तो 'नैसर्गिकरित्या पुरुष' म्हणून जन्मला आहे. मग ज्या लोकांना त्यांची ओळख मिळवण्यासाठी शरीर बदलावं लागलं आहे, त्यांचा का विचार होत नाही?"

खेळाचं जग बायनरी आहे म्हणजे ते स्त्री आणि पुरुष असाच विचार करतं. पण आता जसे आणखी लोक त्यांची ओळख खुलेपणानं स्वीकारतील तेव्हा बदल व्हावाच लागेल, असं ती सांगते.

सध्या अनाया करियरच्या वेगळ्या वाटा शोधते आहे. सोशल मीडियावर तिचा प्रभाव वाढला आहे. क्रिकेट खेळण्याचा मार्ग सध्या बंद झाला असला, तरी खेळण्याचं स्वप्न तिनं जपलं आहे.

"मला अजूनही क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. मी एवढी वर्षं क्रिकेट खेळले आहे, माझ्या बाबांना खेळताना पाहिलं आहे, माझ्या रक्तात क्रिकेट आहे. कधी ते माहिती नाही, पण देशासाठी खेळायचं आहे."

"मला माझं आयुष्य खरेपणानं जगायचं आहे. मला जे मनात येतं ते करेन. लोकांना आवडलं तरी ठीक, नाही आवडलं तरी ठीक."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)