केस गळती रोखण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश महत्त्वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पिलर अर्जेन्टो एरिझोना
- Role, आरोग्य तज्ज्ञ
कोणाचे केस गळत नाहीत? आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. पण लोकांनी या समस्येला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे, ते त्यासाठी विविध उपाय करताना दिसतात.
पण आपण जे अन्न खातो ते आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं.
आहारामुळे त्वचा आणि केस चमकदार होतात.
केस गळणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. जर तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील तर तुमच्या शरीरात कशाची तरी कमतरता आहे हे लक्षात घ्या. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दीर्घकालीन ताणतणाव, आनुवंशिकता, संप्रेरकांमध्ये बदल किंवा काही औषधांचे दुष्परिणाम यामुळे केस गळू शकतात.
आपल्या केसांवर परिणाम करणाऱ्या घटकांसोबतच केसांची सहज काळजी कशी घ्यायची याचीही माहिती आज आपण घेऊ.
तज्ञांच्या मते, केस पाहून आपण कोणता आहार घेतो हे समजतं.
केसगळती टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
निरोगी केसांसाठी प्रथिने, ब जीवनसत्व, लोह आणि जस्ताने समृध्द असलेले पदार्थ आवश्यक असतात.
एनोरेक्सिया (कमी वजन) आणि बुलिमिया (जास्त खाऊन उलटी करणे) यांसारखे विकार केस गळतीसाठी कारणीभूत असतात.
नेमक्या कोणत्या अन्नामुळे केस गळतात हे स्पष्ट नाही.
मात्र, काही उदाहरणं पाहिल्यास त्याचा अंदाज येऊ शकतो.
जसं की, जास्त शर्करायुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने केवळ हृदयविकारच नाही तर तणाव आणि पेशींमध्ये दाह होऊ शकतो. यामुळे आपलं शरीर अधिक संवेदनशील बनते आणि नंतर केस गळतात.
त्यामुळेच अनेक औषधं दाहक-विरोधी प्रभावांवर अधिक लक्ष केंद्रित करतात.
म्हणूनच मासे आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यासारख्या दाहक-विरोधी गुणधर्म असलेल्या पदार्थांना आहारात प्राधान्य दिलं जातं.
काही तर्कानुसार, दाह होण्यास कारणीभूत असलेल्या आहारामुळे केसांचं संरक्षण होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
यावर बरेच अभ्यास देखील झालेत.
उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात की भूमध्यसागरीय आहारामध्ये (ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, सुका मेवा, तूप) दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
केस गळण्याची मुख्य कारणं कोणती?
तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन्सची पातळी वाढते. या हार्मोनचा स्राव वाढला किंवा कमी झाला तर समस्या उद्भवू शकतात.
दैनंदिन जीवनातील लहान-सहान ताणतणाव आता रोजचाच झाला आहे. ही तणावपूर्ण स्थिती दीर्घकाळ राहिल्यास केस गळू लागतात.
कोर्टिसोल, अधिवृक्क ग्रंथीद्वारे तयार होणारे हार्मोन, केस गळतीशी संबंधित आहेत.
जेव्हा तणाव कमी होतो, तेव्हा शरीरातील या हार्मोनची पातळी सामान्य होते.

फोटो स्रोत, Getty Images
आहारातून या हार्मोनची पातळी नियंत्रित करणं शक्य आहे का?
नक्कीच शक्य आहे.
अॅव्हाकॅडो (फळाचा एक प्रकार), मासे, विशिष्ट प्रकारचा सुका मेवा, ओमेगा-3, फॅटी ऍसिडस् समृध्द अन्न आणि विविध जीवनसत्त्वं, खनिजे यांचा आहारात समावेश करून कॉर्टिसोल हार्मोन नियंत्रित केला जाऊ शकतो.
कोणत्या पदार्थांमुळे केस निरोगी राहू शकतात?
केसगळती रोखण्यासाठी आंबवलेले पदार्थ खाणं हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो.
हे पदार्थ आपल्या आतड्यात असलेल्या मायक्रोबायोटासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मायक्रोबायोटा हा सूक्ष्मजंतूंचा समूह आहे जो आपल्या आतड्यात असतो.
मायक्रोबायोटा आपल्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मायक्रोबायोटा आपण खात असलेल्या पोषक तत्वांसोबत क्रिया करतो.

फोटो स्रोत, Getty Images
आपण जे अन्न खातो त्यानुसार आपल्या शरीरातील मायक्रोबायोटा बदलतो.
शरीरातील अन्नाचे चयापचय आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण मायक्रोबायोटाच्या संख्येवर अवलंबून असते. त्याच्या संख्येनुसार, शरीरात भिन्न रासायनिक आणि चयापचय क्रिया होत असतात.
यातून ताण तणावाशी लढण्यास देखील मदत होते.
म्हणजेच आपल्या आहारात विविधता असेल तर आतड्यातील जीवाणूंमध्येही विविधता असते.
म्हणूनच प्रोबायोटिक्स जसं की दही, आंबवलेले पदार्थ आणि ताक प्यायल्यास केसांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
या गोष्टींचं पालन केल्यास केसांचं आरोग्य चांगलं राहील.
(पिलर अर्जेन्टो एरिझोना सॅन जॉर्ज युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सेसमध्ये पीडीआय फॅकल्टी आहेत.)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








