जैन हे पहिले 'व्हिगन' होते का? जैन धर्मात प्राण्यांबाबत, खाण्या-पिण्याबाबत नेमकं काय सांगितलं गेलंय?

भारतीयांच्या शाकाहारी आहारात विविध प्रकारच्या चवींच्या पदार्थांचा समावेश होतो

फोटो स्रोत, Victor Koldunov/Alamy

फोटो कॅप्शन, भारतीयांच्या शाकाहारी आहारात विविध प्रकारच्या चवींच्या पदार्थांचा समावेश होतो
    • Author, चारुकेशी रामादुराई
    • Role, लेखिका

पाश्चिमात्य देशातील असंख्य लोक आपल्या आहारशैलीत बदल करत व्हिगन (Vegan) आहारपद्धतीकडे वळत आहेत. परंतु दुसऱ्या कोणत्याही सजीवाला हानी पोहचणार नाही, याची खबरदारी घेणाऱ्या 2,500 वर्षांच्या जुन्या श्रद्धेबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.

ब्रिटीश प्राणी हक्क अधिकार वकिल डोनाल्ड वॉटसन यांनी जवळपास 80 वर्षांपूर्वी 'व्हिगन' ही संज्ञा वापरली असली तरी, गेल्या दोन दशकांत व्हिगन हा (केवळ वनस्पती-आधारित अन्न खाण्याचं एका महिन्याचं आव्हान) स्वयंस्फूर्तीने पुढे आलेला जगण्याचा एक प्रभावी ट्रेंड बनू पाहतोय.

दरम्यान, पूर्वेकडील अनेक संस्कृतींमध्ये प्राण्यांबद्दलची दयाळूभावना म्हणून मांसाहारापासून दूर राहण्याची प्रथा गेल्या दोन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे.

विशेषत: इसवी सन पूर्व 5 व्या ते 7 व्या शतकाच्या दरम्यान उत्तर भारतात उगम पावलेला जैन धर्म आधीपासूनच प्राण्यांशी संबंधित उत्पादनं व्यर्ज्य असण्याच्या आधुनिक काळातील व्हिगन तत्त्वांशी साधर्म्य साधतो.

"अहिंसा हे सर्व जैन धर्मीयांसाठी जीवनाचं एक मूलभूत तत्त्व आहे," असं राजस्थान विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या निवृत्त प्राध्यापक कुसुम जैन यांनी स्पष्ट केलं.

या विषयावर विस्तृत संशोधन आणि विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापक जैन पुढे म्हणाल्या की, "केवळ मानवच नाही तर प्राणी, कीटक आणि कधीकधी वनस्पती, अगदी पाण्यात किंवा जमिनीखाली राहणाऱ्या सर्वांचा यामध्ये अंतर्भाव होतो. कोणत्याही जीवाला दुखापत करणं किंवा कोणत्याही अर्थाने इजा करणं ही जैनांसाठी हिंसा आहे."

प्राध्यापक जैन यांनी पुढे विस्ताराने सांगितलं की, जैन वाईट विचार किंवा चुकीचे शब्दप्रयोग करण्याचं टाळतात, कारण त्यांचा विश्वास आहे की “प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात.”

या समजुती 24 आध्यात्मिक गुरूंच्या शिकवणीतून तयार झाल्या आहेत, ज्यांना तीर्थंकार म्हणून ओळखलं जातं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महावीर हे जैन धर्मातील 24 वे आणि अंतिम तीर्थंकार होते, जे बुद्धांचे समकालीन होते.

जैन लोक निर्मात्या देवतेची उपासना करण्याऐवजी अनुसरण करतात. प्राध्यापक जैन यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, "तीर्थंकर हे मानुष्यप्राणी होते ज्यांना त्यांच्या कृतींमुळे संतपद प्राप्त झालं. त्यांना ज्ञान आणि निर्वाण प्राप्ती झाल्यामुळे ते आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवतात."

भारताच्या लोकसंख्येच्या (2011 च्या जनगणनेनुसार) जैनांची संख्या 0.4% असली तरी, जैन धर्म अजूनही जिवंत असून भारतात भरभराटीला आलेला असा धर्म आहे. गुजरात आणि राजस्थान या पश्चिमेकडील राज्यांमध्ये मोठ्या संख्येने असलेले जैन धर्मीय संपूर्ण भारतभर आढळतात, रणकपूर आणि दिलवारा (किंवा देलवारा) मध्ये काही उत्कृष्ट जैन मंदिरे आहेत. जैन हे भारतातील अतिशय समृद्ध समुदायांपैकी एक आहेत, ते इतके प्रभावशाली आहेत की त्यांनी त्यांनी मोठ्या रेस्टॉरंट्सना त्यांच्या लोकप्रिय पदार्थांचे स्वतंत्र जैन मेनू किंवा जैन प्रकार (विशिष्ट घटक बदलून किंवा वगळून "शाकाहारी" अन्नाप्रमाणेच याचा विचार करा) यांचा अंतर्भाव करण्यास भाग पाडलं आहे.

या 24 आध्यात्मिक गुरुंना तीर्थंकार म्हणून ओळखलं जातं (साभार: इतिहास आणि कला संग्रह/अलमी)

फोटो स्रोत, History and Art Collection/Alamy

फोटो कॅप्शन, या 24 आध्यात्मिक गुरुंना तीर्थंकार म्हणून ओळखलं जातं

जैन धर्माची भिक्षा घेतलेले भिक्खू आणि साध्वींकडून धर्मातील अतिशय कठोर अहिंसक तत्त्वांचं पालन केलं जातं.

ते फक्त मऊ, न शिवलेले कपडेच घालत नाहीत तर चुकून कोणताही उडणारा कीटक श्वासाद्वारे आत जाऊ नये म्हणून मास्कने तोंड झाकतात आणि मुंग्या किंवा छोटे जीव पायाखाली येऊ नयेत म्हणून ते चालताना त्यांच्या समोरचा रस्ता झाडूने स्वच्छ करतात.

परंतु जीवनाच्या एका पैलूबाबत बहुतांश जैन अतिशय कट्टर असतात, ते म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि आचारपद्धती. सर्वसाधारणपणे ते शाकाहारी आहार घेतात व मांस, मच्छी आणि अंडयाचं सेवन टाळतात.

कांदे, बटाटे, गाजर आणि लसूण यांसारख्या मातीखाली उगवणा-या कोणत्याही वनस्पती खाण्यास जैन धर्माने बंदी घातली आहे कारण त्या उपटल्यास त्या परिसंस्थेत वाढणारे कीटक नष्ट होऊ शकतात. कांदा आणि लसणाच्या चवीला पर्याय म्हणून जैन लोक त्यांच्या पदार्थांमध्ये हिंगाचा वापर करतात. विविध प्रकारच्या बडीशेपच्या एका जातीच्या डिंकाच्या अर्काला लसणासारखा झणझणीत वास असतो आणि त्याचा संपूर्ण भारतात वापर केला जातो.

अन्नधान्य

फोटो स्रोत, Rawf8/Alamy

मास्टरशेफ इंडियामध्ये नुकत्याच झालेल्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या आणि जैन धर्माचं पालन करणाऱ्या शेफ अरुणा विजय यांनी त्यांच्या ऋतूमानाप्रमाणे बदलणा-या आहाराच्या सवयींबद्दल सांगितलं.

"चातुर्मासाच्या काळात म्हणजे साधारणपणे जून ते ऑक्टोबर असे चार महिने ज्यावेळी भारतात पावसाळा असतो त्यावेळी आम्ही पालक, राजगिरा, धणे आणि पुदिना यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांपासून दूर राहतो. याचं कारण म्हणजे बरेच सूक्ष्मजीव पावसाळी हवामानात वाढतात आणि जेव्हा आपण या झाडांना कापतो आणि खातो तेव्हा आपण नकळतपणे लहान कीटक आणि जंतूंना नष्ट करत असतो."

त्यांनी असंही सांगितलं की, पावसाळा ऋतुच्या सर्वोच्च काळातील आठ दिवसात पर्युषण म्हणून ओळखल्या जाणार्‍या काळात जैन लोकं सर्व भाज्या आणि फळं खाण्याचं टाळतात. फक्त कडधान्ये, शेंगा आणि मसूर खातात, तसंच दुधापासून तयार करण्यात आलेले, विशेषतः दह्यापासून तयार केलेले खाद्यपदार्थांचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात.

जैन आहार करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित असला तरी, जैनांना दुग्धजन्य पदार्थ खाण्याची परवानगी आहे आणि आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्यात कोणतीही नैतिक अडचण येत नसल्याचं दिसतं.

प्रोफेसर जैन म्हणाल्या की, “खरंतर तूप हे अन्नाच्या सर्वात शुद्ध प्रकारांपैकी एक मानलं जातं.”

विजय यांच्या अनुमानानुसार पारंपरिक दुग्धव्यवसाय हा प्राण्यांप्रती नैतिकता आणि करूणा दाखवतो, कारण ज्यावेळी शास्त्रांची निर्मिती झाली तेव्हा त्यातून कोणतंही व्यावसायिक उत्पादन केलं जात नसे.

“माझ्या वाढत्या वयात आमच्या घरी दूध, दही, लोणी आणि तूप यांसारख्या दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या गरजा भागवण्यासाठी गायी होत्या. आम्ही नेहमी आमच्या वापरासाठी दूध काढायच्या आधी वासराला त्याची दुधाची तहान भागवायला द्यायचो," असं विजय म्हणाले.

राजस्थानच्या रणकपूरमधील जैन मंदिर

फोटो स्रोत, Jan Wlodarczyk/Alamy

फोटो कॅप्शन, राजस्थानच्या रणकपूरमधील जैन मंदिर

खाद्य लेखिका सोनल वेद त्यांच्या 2021 सालच्या ‘व्हूज समोसा इज इट एनिव्हे’ या पुस्तकात स्पष्ट करतात की, जैन आहाराची तत्त्व अहिंसेच्या संकल्पनेशी आणि मांस सेवन करण्याच्या वैश्विक परिणामांशी जोडलेली आहेत.

"जैन जरी आणि शाकाहारी आहारपद्धती एकमेकांपेक्षा भिन्न असली तरी, क्रूरता-जमिनीवर उगवणारं अन्न खाणं या बाबी त्यांच्यामध्ये सामान्य आहे," असंही त्या म्हणाल्या.

संपूर्ण भारतातील खाण्याच्या सवयींचा व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास हे लक्षात येतं की भारतीय पाककृतीमध्ये नैसर्गिकरित्या व्हिगन असलेल्या अनेक पदार्थांचा समावेश आहे.

वेद यांचे सर्वात अलिकडीलचे नोव्हेंबर 2023 साली प्रकाशित झालेल्या ‘द इंडियन व्हिगन’ या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की, जेव्हा त्या त्यांच्या पुस्तकांसाठी संशोधन करत होत्या तेव्हा त्यांना भारतीय अन्न व्हिगन आहारपद्धतीच्या किती जवळ जाणारं आहे हे समजलं.

"मला लक्षात आलं की, भारताच्या पश्चिम किनार्‍यावर अरबी समुद्राच्या काठावर उगम पावणार्‍या मालवणी पाककृतीपासून ते पूर्वेकडील बंगाली खाद्यपदार्थांपर्यंत भारतीय अनेक दशकांहून अधिक काळ मांसाऐवजी वनस्पती आधारित पाककृतींचा आस्वाद घेतला जातोय," असं त्या म्हणाल्या.

"दक्षिण भारतीय थाळीमध्ये, उदाहरणार्थ दही वगळता सर्व काही शाकाहारी आहे - भात, कूटू, पोरियाल, सांभर, रसम," विजय म्हणाले, या पारंपारिक थाळीत वाफवलेल्या भातासोबत भाजी आणि मसूरपासून तयार केलेले पदार्थ दिले जातात.

भारतात शाकाहारी असणं किती सोपे आहे हे लक्षात घेता, भारतात आणि इतरत्र राहणारे तरुण पिढीतील अनेकजण ही जीवनशैली स्वीकारत आहेत, अनेक जैन देखील दुग्धविरहित, पूर्णपणे व्हिगन आहाराकडे वळत आहेत यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही.

"विशेषत: कोविड नंतर भारतीयांच्या खाण्याच्या सवयी नक्कीच बदलतायत," असं विजय यांनी नमूद केलं.

"आरोग्यावर आता सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जातं. आणि मी माझे स्वतःचे अनेक मित्र व्हिगन होताना पाहतोय,” असं ते म्हणाले.

वेद यांच्या मते, "भारतीय व्हिगन खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेचे मूल्य 2022 मध्ये $1,372.3 दशलक्ष इतकं होतं आणि ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे स्पष्ट आहे की व्हिगन हे फॅड नव्हे जीवनाचा एक मार्ग बनत असल्याचं दिसून येतंय.”

वेद याचं स्वागत करतात, “शाश्वत जीवनशैलीसोबत व्हिगन आहारपद्धतीचा मेळ साधल्यास हवामान बदलाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल," असं त्या म्हणाल्या.

प्राध्यापक जैन याकडे जैन समाज पाळत असलेल्या अहिंसेच्या मूलभूत तत्त्वांच्या प्रसाराच्या दृष्टीकोनातून पाहतात. "शेवटच्या तीर्थंकराचा जन्म 2,500 वर्षांपूर्वी झाला होता, म्हणून मी म्हणेन की जैन तत्त्वज्ञानाच्या तुलनेत व्हिगन ही अतिशय नवीन संकल्पना आहे," असं त्या हसत म्हणाल्या.

त्यांचं वर्णन करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द विचारात न घेता, विजय यांनी नमूद केल्याप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे "[जैन] चुकूनही कुणालाही इजा होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

'जगा आणि जगू द्या' हे आमचं ब्रीदवाक्य आहे."

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)